Home LATEST NEWS ताजी बातमी मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटणाऱ्याला ज्यांनी पकडून दिलं, त्या दोन महिलांनी BBC...

मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटणाऱ्याला ज्यांनी पकडून दिलं, त्या दोन महिलांनी BBC ला काय सांगितलं?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

इहलाम हमीदी आणि रुखसार सय्यद या दोन महिलांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

26 जून 2026 रोजी मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान उंदीर मारण्याचं विष असलेल्या कॅप्सूल वाटणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

हजारो भाविक सहभागी असलेल्या या मिरवणुकीत इहलाम हमीदी आणि रुखसार सय्यद या दोन महिलांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातील फय्याज प्रेमजी याला अटक केली आहे. त्याच्याकडून 14,900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये झिंक फॉस्फाईड हे विषारी रसायन वापरण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या कॅप्सूल रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या असून अधिक तपास सुरू आहे.

या घटनेत मिरवणुकीत स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या इहलाम हमीदी आणि रुखसार सय्यद यांनी संशय घेत आरोपीला पकडलं. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली आणि त्याला त्यांच्या ताब्यात दिलं. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

रुखसार आणि इहलाम यांना संशय कसा आला?

26 जून 2026 रोजी सायंकाळी अंजीरवाडी येथून रहमत बाग कब्रस्तान येथे मोहरमनिमित्त मिरवणूक जात होती. सुमारे 30 हजार लोक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान विविध धार्मिक उपक्रम सुरू होते. त्याचवेळी हा प्रकार घडला.

या मिरवणुकीत घाटकोपर आणि भायखळा परिसरात राहणाऱ्या या इहलाम हमीदी आणि रुखसार सय्यद या दोन महिला स्वयंसेवक म्हणून काम करत होत्या. दोघीही शिक्षित असून गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य करत आहेत.

आरोपीकडून 14,900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये झिंक फॉस्फाईड हे विषारी रसायन वापरण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

इहलाम हमीदी या पेशाने कॉफी व्यावसायिक आहेत. त्या कुटुंबासह मुंबईतील भायखळा परिसरात राहतात. गेली अनेक वर्षे त्या मोहरमनिमित्त या मिरवणुकीत सहभागी होतात आणि स्वयंसेवक म्हणून काम करतात.

तर रुखसार सय्यद या मुंबईच्या उपनगरात वास्तव्यास आहेत. त्या सौंदर्यप्रसाधन साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. इहलाम आणि रुखसार या दोघी मैत्रिणी आहेत.

26 जून रोजी मिरवणुकीदरम्यान त्या नेमून दिलेल्या मशिदीच्या परिसरात लोकांच्या मदतीसाठी तैनात होत्या. तिथे हा प्रकार घडल्याने दोघींना संशय आला आणि त्यातून पुढे हे प्रकरण उघडकीस आलं.

गोळ्यांच्या पॅकेटवर माहिती नसल्याने संशय आला

रुखसार सय्यद यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “मी आणि इहलाम माझगाव मशिदीबाहेर स्वयंसेवक म्हणून काम करत होतो. मिरवणुकीत थकलेले लोक एका ठिकाणी बसले होते. त्यावेळी एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात कॅप्सूल वाटत होता. सर्व प्रकारावर हे इलाज आहे, असे तो व्यक्ती सांगत होता. ‘नियाज-ए-हुसेन’ म्हणत लोक त्या घेत होते. इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ श्रद्धेने वाटला जाणारा प्रसाद किंवा साहित्य म्हणून त्या दिल्या जात होत्या. रात्र असल्यामुळे पॅकेटवर काय लिहिलं आहे, ते दिसत नव्हतं.”

या कॅप्सूल रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या असून अधिक तपास सुरू आहे.

त्या पुढे सांगतात, “इहलामने एक कॅप्सूलचं पॅकेट हातात घेतलं. त्यावर काही व्यवस्थित लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला संशय आला. आम्ही ती कॅप्सूल उघडली तर त्यामध्ये काळसर पावडर होती. त्यावरील माहिती गूगलवर शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे हे काहीतरी धोकादायक असू शकतं, हे संशयास्पद आहे असं वाटलं.”

रुखसार यांनी पुढे सांगितलं, “ती व्यक्ती समोर दिसली आणि तिथून निघून जात असताना आम्ही त्याला थांबवलं. त्याच्या हातात निळ्या रंगाची मोठी पिशवी होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅप्सूल होत्या. आम्ही विचारल्यानंतर तो घाबरला. त्याच्यासोबत आणखी दोन जण होते. त्यांच्या पिशव्यांमध्येही कॅप्सूल होत्या. मी त्याच्या कॉलरला पकडलं. आम्ही तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तसेच मिरवणुकीत घोषणा करून या कॅप्सूल घेऊ नका, असं सांगण्याची विनंती केली. त्यानंतर आम्ही स्वयंसेवकांसह लोकांकडून त्या कॅप्सूल गोळा करून पोलिसांच्या ताब्यात दिल्या.”

‘ती व्यक्ती कॅप्सूल फेकून वाटत होती’

इहलाम हमीदी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “ती व्यक्ती कॅप्सूल फेकून वाटत होती. अशा प्रकारे तबर्रुक वाटलं जात नाही. त्यामुळे मला संशय आला. त्याने फेकलेली एक कॅप्सूल माझ्या पायाजवळ पडली. मी ती उघडली. सुरुवातीला आयुर्वेदिक औषध असेल, असं वाटलं. पण त्याचा वास खूप उग्र होता.”

कॅप्सूल्समध्ये झिंक फॉस्फाईड हे विषारी रसायन वापरण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, “पॅकेटवर काही माहिती लिहिली होती. पण तीन गोळ्यांनी इतके सगळे आजार कसे बरे होतील, हा प्रश्न पडला. रुखसारलाही संशय आला. तो समोर दिसताच, थांबवून त्याला आम्ही पकडलं. तो म्हणाला, ‘मी काय केलं?’ आम्ही त्याला सांगितलं, ‘ते पोलीस सांगतील.’ त्याच्या हातातील पिशवी मी काढून घेतली. तसेच, आम्ही लोकांना या गोळ्या कोणीही घेऊ नयेत आणि स्वयंसेवक तसेच पोलिसांकडे त्या जमा कराव्यात असे सांगितलं. हा सगळा प्रकार साधारण 20 मिनिटं सुरू होता.”

पोलिस तपासात काय समोर आलं?

फैयाज निसार प्रेमजी असं या आरोपीचं नाव आहे. तो 39 वर्षांचा असून पुण्यातील विमाननगरचा रहिवासी आहे.

त्याच्यावर बीएनएसच्या (BNS) कलम 109, 110 आणि 123 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मुंबईचे झोन-1 चे पोलिस उपायुक्त जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी मिरवणुकीदरम्यान गोळ्यांचं वाटप करत असताना भायखळा पोलिसांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं. संबंधित व्यक्तीने त्या गोळ्या वेदनाशामक असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यातील एक गोळी सेवन केलेल्या व्यक्तीला उलट्या आणि अस्वस्थतेसारखे त्रासदायक परिणाम जाणवले.

फैयाज निसार प्रेमजी असं या आरोपीचं नाव आहे. तो 39 वर्षांचा असून पुण्यातील विमाननगरचा रहिवासी आहे.

पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्यामुळे या गोळ्यांचं पुढील वाटप रोखण्यात आलं, असंही त्यांनी सांगितलं.

सध्या संबंधित व्यक्ती धोक्याबाहेर आहे. त्याच्या तक्रारीवरून भायखळा पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता, 2023’ च्या कलम 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.

मिरवणुकीला लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवण्याचा हा कट होता, अशी कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे. त्याने 50 किलो झिंक फॉस्फाईड आणि 30 हजार रिकाम्या कॅप्सूल मिळवल्या होत्या. मुंबईत वास्तव्यास असताना गेल्या 15 दिवसांत त्याने त्या भरल्या होत्या. वेदनाशामक औषध असल्याचं भासवून त्या वितरित करण्याचा त्याचा बेत होता, असं डीसीपी जयंत मीना यांनी सांगितलं आहे.

आतापर्यंत चार जणांना कॅप्सूलमुळे झाला त्रास

पोलिसांच्या माहितीनुसार, चार जणांनी या कॅप्सूलचं सेवन केल्याचं समोर आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत.

सलमान सय्यद या शिवाजीनगर येथील रहिवाशाला गोळी खाल्ल्यानंतर त्रास झाला. सलमान सय्यद यांनी सांगितलं, “मिरवणुकीदरम्यान अशक्तपणा आल्यामुळे वाटप होत असलेली गोळी घेतली. काही वेळाने मला उलटी झाली आणि अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जवळच असलेल्या लोकांनी मला हबीब रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.”

सलमान सय्यद या शिवाजीनगर येथील रहिवाशाला गोळी खाल्ल्यानंतर त्रास झाला.

सलमानप्रमाणेच सय्यद अब्बास यांनाही या गोळीचं सेवन केल्यामुळे त्रास झाला. याबाबत त्यांनी सांगितलं, “मिरवणुकीदरम्यान मला व्हिटॅमिन-सीच्या नावाने ही कॅप्सूल एका व्यक्तीने दिली. तो सांगत होता की, ही व्हिटॅमिन-सीची गोळी आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच ती खाऊ शकतात. या गोळीने काही नुकसान होणार नाही. मात्र काही वेळाने गोळी घेतल्यानंतर माझी तब्येत बिघडली आणि मी जवळच माझ्या गाडीत जाऊन बसलो. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी मला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी याप्रकरणी माझा जबाब नोंदवला आहे.”

‘या’ महिलांमुळे मोठी दुर्घटना टळली

मिरवणुकीतील या प्रकारासंदर्भात स्वयंसेवक महिलांनी सतर्कता दाखवत हा प्रकार पोलिसांसमोर आणला. त्यामुळे पोलिसांनी स्वयंसेविकांचं कौतुक केलं आहे. तसेच, सर्व स्तरावरून इहलाम हमीदी आणि रुखसार सय्यद यांच्या सतर्कतेची दखल घेत त्यांचं कौतुक केलं जात आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, “सतर्क महिला नागरिकांनी तात्काळ माहिती दिल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.”

पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अटक आरोपी फय्याज प्रेमजी याला पोलिसांनी रविवारी (28 जून) न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आरोपीने हे कृत्य एकट्याने केलं की त्याच्यासोबत आणखी कोणी सहभागी होतं, याचा तपास पोलीस करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, घटनेपूर्वी आरोपी सुमारे दोन आठवडे मुंबईतील एका हॉटेलमध्ये राहत होता. त्याची पार्श्वभूमी, डिजिटल पुरावे आणि संभाव्य हेतू यांचाही तपास केला जात आहे.

समुदायातील काही सदस्यांनी पोलिसांना सांगितलं की, अलीकडच्या काळात त्याचा समाजाशी संपर्क कमी झाला होता. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, या सर्व बाबींची स्वतंत्र पडताळणी सुरू असून कोणत्याही हेतूबाबत अद्याप अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. विविध बाजूने चौकशी सुरू आहे.

रुखसार सय्यद आणि इहलाम हमीदी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला. मात्र पुढील तपासातून या प्रकरणामागचा नेमका उद्देश काय होता आणि आणखी कोणी सहभागी होतं का, याचा उलगडा होणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC