Home LATEST NEWS ताजी बातमी रश्मिका मंदानानं विजय देवराकोंडाबद्दल असं काय म्हटलं, की ते एकाएकी ट्रोल होऊ...

रश्मिका मंदानानं विजय देवराकोंडाबद्दल असं काय म्हटलं, की ते एकाएकी ट्रोल होऊ लागले?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

रश्मिका मंदाना

वाचन वेळ: 4 मिनिटे

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि तिचा पती विजय देवराकोंडा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

दोघांनीही सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्टद्वारे त्यांच्या नात्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आणि ट्रोलिंगला उत्तर दिलेलं आहे.

‘कॉफी विथ करण 9’ या टीव्ही शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा एकत्र दिसले.

या शोमध्ये त्या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल चर्चा केलेली आहे.

या कार्यक्रमानंतर, विजय देवराकोंडाच्या वृत्तीबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही केलं जाऊ लागलं.

काहींनी विजयला ‘रेड फ्लॅग’ म्हटलं, तर काहींनी रश्मिकाला नात्याबद्दल सल्लेही दिले.

त्यानंतर आता रश्मिकानं एका लांबलचक पोस्टद्वारे या लोकांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर लगेचच, विजय देवराकोंडानंही इन्स्टाग्रामवर पोस्ट करून म्हटलं आहे की, तो आणि रश्मिका “खूप आनंदी” आहेत.

‘100 वेळा विचारायला सांगितलं होतं’

'कॉफी विथ करण' मधील काही विधानांनंतर रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले (फाइल फोटो).

‘कॉफी विथ करण 9’ मध्ये होस्ट करण जोहर, रश्मिका आणि विजय देवराकोंडा यांच्यात लग्नाबद्दल झालेल्या चर्चेनंतर, सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली.

रश्मिकानं स्पष्ट केलं की, तिनं विजयला लग्नाची मागणी घातली होती. विजयनं तिला एकदा नव्हे तर शंभर वेळा विचारायला सांगितलं होतं. रश्मिकाच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर सुमारे वर्षभर ती विजयला लग्नासाठी विचारत राहिली.

मात्र, हे संभाषण अत्यंत हलक्याफुलक्या आणि विनोदी वातावरणात चाललं होतं.

विजयनं शोमध्ये सांगितलं की, त्याला लग्नासारखा मोठा निर्णय केवळ त्यावेळच्या भावनांच्या आहारी जाऊन घ्यायचा नव्हता.

रश्मिका मंदाना

या संभाषणाचा काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेक युझर्सनी विजयच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरूवात केली.

एका युझरनं विजयला ‘वॉकिंग रेड फ्लॅग‘ म्हटलं आणि लिहिलं की त्यानं संपूर्ण जगासमोर आपल्या पत्नीचा अपमान केला आहे.

काही लोकांनी विजयच्या या विधानावर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं की त्यानं रश्मिकाला लग्नासाठी 100 वेळा विचारायला सांगितलं होतं. काही युझर्सनी याकडे नात्यातील विषमतेचं लक्षण म्हणून पाहिलं.

मात्र, अनेक लोकांनी असंही म्हटलं की, टीव्ही शोमधील काही मिनिटांच्या संभाषणाच्या आधारावर जोडप्याच्या संपूर्ण नात्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही.

काही लोकांनी विजयचा बचाव करत म्हटलं की, सोशल मीडिया युझर्स एखाद्या व्यक्तीला न ओळखताच ‘टॉक्सिस’ किंवा ‘प्रॉब्लेमॅटिक’ म्हणत आहेत.

रश्मिकाचं उत्तर

रश्मिका मंदाना

यानंतर रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

सुरुवातीला ती म्हणाली आहे की, ती सहसा अशा बाबींवर भाष्य करत नाही. कारण, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण ह्या वेळी, तिनं विजयसोबतच्या तिच्या नात्याभोवती सुरू असलेल्या वादावर बोलण्याचा निर्णय घेतला.

रश्मिकानं लिहिलं की, “आमच्या दोघांच्याही सोशल मीडिया प्रोफाइलवर अनावश्यक मतं, कमेंट्स आणि न मागितलेल्या सल्ल्यांचा भडिमार झाला आहे. ज्या दृढनिश्चयानं लोकांनी आमचा पाठलाग केला, त्यामुळे मी खरोखरच हादरून गेले होते. मला वाटलं, ‘हे काय चाललं आहे?’ म्हणून मी थोडा वेळ थांबले आणि विचार केला, आणि आता मला आमच्या आयुष्याबद्दल माझा छोटासा दृष्टिकोन मांडायचा आहे. सर्वात आधी, हे किती वेळा किंवा वर्षभर करण्याबद्दल कधीच नव्हतं. काही लोक त्यावरच अडकून राहिले. हो, ते संवाद झाले होते. पण आमच्यापैकी कुणीही भव्य किंवा दिमाखदार प्रपोजलच्या शोधात नव्हतं. त्याला फक्त एवढंच हवं होतं की, आम्ही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ आणि अवकाश द्यावा, जेणेकरून आयुष्यातील सर्व चढ-उतार, आनंद आणि तणाव असूनही, आपल्याला हेच हवं आहे आणि हीच योग्य वेळ आहे, याची खात्री करता येईल. आणि आम्ही ते केलं. आम्ही एकमेकांना निवडलं.”

रश्मिकानं तिला सल्ले देणाऱ्या लोकांना पुढं म्हटलंय की, लोकांनी तिच्या आणि विजयच्या नात्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

रश्मिका असंही म्हणाली की, तिला तिच्या पतीचं वेड आहे. पुढे तिनं असा प्रश्नही विचारलाय की, एखाद्या व्यक्तीनं आपल्या जोडीदारावर इतके प्रेम दाखवणं ही वाईट गोष्ट कधीपासून झाली?

तिनं लिहिलंय की, “जर मला आयुष्यात पुन्हा तोच निर्णय घ्यायचा झाला, तर मी पुन्हा विजयलाच निवडेन.”

ती म्हणाली की, ती विजयला हे शंभर वेळा नाही, तर अगदी हजार वेळा विचारायलाही तयार असती.

‘हा स्त्रीवाद नाही, ही तर दादागिरी’

ज्यांनी तिच्याबद्दल काळजी असल्याच्या नावाखाली तिला नात्यातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता, त्यांच्यावरही रश्मिकानं निशाणा साधला.

ती म्हणाली की, एखाद्या स्त्रीला न ओळखता तिच्या कुटुंबावर आणि वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणं म्हणजे ‘स्त्रीवाद’ नव्हे.

तिच्या मते, ही ‘स्त्रीवादाच्या नावाखाली होणारी दादागिरी’ आहे.

विजय देवराकोंडा काय म्हणाला?

रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडा

रश्मिकाच्या पोस्टनंतर लगेचच विजय देवराकोंडानंही इन्स्टाग्रामवर आपल्या पत्नीसोबतचे फोटो आणि व्हीडिओ शेअर केले.

त्यानं लिहिलंय की, “माझी जिवलग मैत्रीण, माझी पत्नी, माझी जीवनसाथी. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक, आणि तिला निवडून मी योग्य निर्णय घेतला आहे. ज्या लोकांना आमची काळजी वाटते आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत. मी स्वतःला भाग्यवान समजतो.”

“जर संपूर्ण जगाविरुद्ध फक्त मी आणि ती असणार असू, तर तसंच असो. प्रेम आणि आनंदानं भरलेलं साधं जीवन साजरं करणाऱ्या प्रत्येकाला खूप खूप प्रेम.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC