Home LATEST NEWS ताजी बातमी रस्ता, पूल नसल्यानं उपचाराअभावी 23 वर्षीय महिलेचा मृत्यू; गावकरी म्हणतात, ‘आमच्यासाठी हे...

रस्ता, पूल नसल्यानं उपचाराअभावी 23 वर्षीय महिलेचा मृत्यू; गावकरी म्हणतात, ‘आमच्यासाठी हे नवीन नाही’

5
0

Source :- BBC INDIA NEWS

मृत रुसाबाई वळवी

फोटो स्रोत, Dilip Padvi

  • Published

  • वाचन वेळ: 4 मिनिटे

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातल्या वेहगी येथील बारीपाडा या दुर्गम गावातील 23 वर्षीय महिलेचा वैद्यकीय उपचाराअभावी मृत्यू झाला आहे.

रस्ता आणि नदीवर पूल नसल्यामुळे वेळेत वैद्यकीय उपचार मिळू न शकल्याने रुसाबाई सुभाष वळवी (23 वर्षे) यांचा मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

नातेवाईक त्यांना उपचारासाठी बांबू आणि चादरीची झोळी करून रुग्णालयात घेऊन जात होते. पण ते वाटेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, वेहगी बारीपाडा गावाची प्रशासनाच्या पथकाने पाहणी केली असल्याचं नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

या ठिकाणी सुमारे 100 मीटर लांबीचा पूल बांधण्याची गरज असून, त्यासाठी यापूर्वीच राज्य सरकारकडं प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

बांबू चादरीची झोळी करून नेत होते…

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास रुसाबाई यांच्या छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या.

त्यांची प्रकृती बिघडू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठीचे प्रयत्न नातेवाईक आणि गावकऱ्यांकडून सुरू होते.

पण, गावापर्यंत पक्का रस्ता नसल्यानं आणि नदीवर पूल किंवा फरशी नसल्यानं रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही.

शिवाय गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळं रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्यातही अडचणी आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

दिलीप जयसिंग पाडवी

फोटो स्रोत, Dilip Padvi

अखेर नातेवाईकांनी बांबू आणि चादरीच्या सहाय्याने झोळी तयार करून रुसाबाई यांना पायी चालत रुग्णालयाकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र उपचार मिळण्यापूर्वी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

रुसाबाई या दोन दिवसांपूर्वीच पतीसोबत माहेर असलेल्या वेहगी बारीपाडा येथे आल्या होत्या. त्यांना सात महिन्यांचं बाळ असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

‘रोजचं मढं, त्याला कोण रडं’

वेहगी गावामध्ये अनेक समस्या असल्याचं ग्रामस्थ दिलीप जयसिंग पाडवी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

“आमच्या गावात मोबाईल नेटवर्क नाही. मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात किलोमीटर चालत जावं लागतं. त्या रस्त्यावर दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकत नाही. कच्चा रस्ता असल्यामुळे गाडी गावापर्यंत आणता येत नाही,” असं ते म्हणाले.

पाडवी यांच्या म्हणण्यानुसार, या भागात पाच पाडे असून त्यांची सुमारे 1800 लोकसंख्या आहे. या परिसरात तीन अंगणवाड्या आणि दोन जिल्हा परिषद शाळा आहेत.

वेहगी येथील बारीपाडा या दुर्गम गावात रस्ता आणि नदीवर पूल नसल्यामुळे अशाप्रकारे उपचारासाठी रुसाबाई यांना नेत होते.

फोटो स्रोत, Dilip Padvi

“अनेक वर्षांपासून आम्ही रस्ता आणि पुलासाठी प्रयत्न करत आहोत. अशा घटना आमच्यासाठी नवीन नाहीत. 1800 लोकसंख्येच्या या वसाहतीत रोज कुणाला ना कुणाला अडचण येते. त्यामुळे ‘रोजचं मढं, त्याला कोण रडं’ अशी आमची अवस्था झाली आहे,” असंही पाडवी म्हणाले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नदीला वर्षभर पाणी असल्याने या भागातील संपर्क आणखी कठीण होतो आणि अत्यवस्थ रुग्ण, गर्भवती महिला तसेच विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

जिल्हाधिकारी काय म्हणाल्या?

नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, वेहगी बारीपाडा गावाची प्रशासनाच्या पथकाने पाहणी केली आहे.

या ठिकाणी सुमारे 100 मीटर लांबीचा पूल बांधण्याची गरज असून, त्यासाठी यापूर्वीच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रकल्प भांडवली खर्चाच्या दृष्टीने मोठा असल्यामुळे राज्यस्तरावर मंजुरी आणि निधी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

“या भागात वाहतुकीची सोय लवकर उपलब्ध करून देता यावी यासाठी लहान पुलांचा समावेश असलेला पर्यायी प्रस्ताव तयार करून मला सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो जिल्हा निधीतून मंजूर करण्यात येईल,” असंही सेठी म्हणाल्या.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास रुसाबाई यांच्या छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या.

फोटो स्रोत, Dilip Padvi

याशिवाय, “दुर्गम भागांतील संपर्क सुविधा सुधारण्यासाठी गेल्या वर्षी जिल्हा प्रशासनाने रस्ते, पूल, मोबाईल इंटरनेट टॉवर, बँका आणि वीजपुरवठा यांचा समावेश असलेला व्यापक ‘ॲक्सेसिबिलिटी ॲक्शन प्लॅन’ सुरू केला असून, त्याअंतर्गत अनेक कामांना सुरुवात करण्यात आला आहे,” असं त्यांनी सांगितलं.

“ज्या भागांमध्ये रस्ते नाहीत किंवा अंतर खूप जास्त आहे, अशा ठिकाणच्या कामांसाठी राज्य सरकारची मंजुरी आणि अर्थसंकल्पीय तरतूद आवश्यक असते. अशा सर्व भागांसाठी एक सॅच्युरेशन प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे,” असं मिताली सेठी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC