Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
-
Published
-
वाचन वेळ: 8 मिनिटे
वय वाढलं की प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो, मग लघवीचे त्रास सुरू होतात, अशी समजूत अनेक पुरुषांमध्ये असते. लघवीचा प्रवाह क्षीण होण्याचं प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणं हे एकमेव कारण नसतं. त्यामागे मूत्रमार्ग अरुंद होणं, मूत्राशयाच्या स्नायूंची ताकद कमी होणं, काही औषधांचा परिणाम किंवा न्यूरोलॉजिकल समस्या यांसारखी इतर कारणंही असू शकतात.
लघवीची धार कमी होणं, लघवी सुरू व्हायला वेळ लागणं किंवा रात्री वारंवार लघवीला जावं लागणं अशा अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यातही बहुतांशवेळा हे तर वाढत्या वयामुळे झालंय, हे नैसर्गिकच आहे असं समजून डॉक्टरांकडे जाणं टाळलं जातं.
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमध्ये दिसणारी लघवीशी संबंधित लक्षणं केवळ वाढलेल्या प्रोस्टेटचा संकेत नसतात. मूत्रमार्गात आलेला अडथळा, प्रोस्टेटमधील संसर्ग किंवा जळजळ, मूत्राशयाचं बिघडलेलं कार्य, मधुमेह, मज्जासंस्थेशी निगडित आजार किंवा काही प्रकरणांमध्ये गंभीर रोगदेखील अशा लक्षणांमागे असू शकतात. त्यामुळे ‘धार कमी झाली म्हणजे प्रोस्टेट’ असं सरसकट गृहीत धरणं धोकादायक ठरू शकतं.
फोटो स्रोत, Getty Images
विशेष म्हणजे प्रोस्टेटचा आकार फारसा वाढलेला नसतानाही काही पुरुषांना लघवी सुरू व्हायला खूप वेळ लागतो, धार मध्येच थांबते, लघवी झाल्यानंतरही मूत्राशय पूर्ण रिकामा न झाल्याची भावना राहते किंवा वारंवार स्वच्छतागृहात जावं लागतं. दुसरीकडे, अनेक पुरुषांमध्ये प्रोस्टेट वाढलेला असूनही फारशी लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे नेमकं कारण शोधण्यासाठी योग्य तपासणी आवश्यक ठरते.
लघवीत रक्त दिसणं, अचानक लघवी बंद होणं, वारंवार मूत्रसंक्रमण होणं किंवा वेदनांशिवायही लघवीच्या पद्धतीत सातत्याने बदल जाणवणं ही अशी काही लक्षणं आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
मग पुरुषांमध्ये लघवीच्या तक्रारींची प्रमुख कारणं कोणती? वाढलेला प्रोस्टेट, मूत्रमार्गातील अरुंदपणा, प्रोस्टेटचा संसर्ग आणि मूत्राशयाचे आजार यामधला फरक डॉक्टर कसा ओळखतात? आणि कोणती लक्षणं तातडीने वैद्यकीय सल्ल्याची गरज दर्शवतात? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.
प्रोस्टेट काय आहे?
प्रोस्टेट ही एक पुरुषांच्या जननेंद्रियाजवळ असणारी लहानशी ग्रंथी असते.
एखाद्या अक्रोडाच्या आकाराएवढी ही ग्रंथी असते. ती शिश्न आणि मूत्राशय यांच्या मधल्या भागात असते. तसेच ती मूत्रमार्गाजवळ असते.
क प्रकारचा पांढरा प्रवाही पदार्थ तयार करणे हे या ग्रंथीचं मुख्य काम असतं. हा स्राव आणि वृषणं (टेस्टिकल्स)मधून तयार झालेले शुक्रजंतू (स्पर्म) एकत्र होऊन वीर्य (सिमेन) तयार होतं.
प्रोस्टेट ग्रंथी कोणाला असते?
- पुरुष
- ट्रान्सवूमन
- ज्यांना जन्मावेळेस पुरुष घोषित केलंय असे नॉन बायनरी लोक
- काही इंटरसेक्स लोक
प्रोस्टेट वाढण्याचा आणि मूत्राचा संबंध
प्रोस्टेटचा आकार आणि लघवीशी संबंधित लक्षणं यांचा नेहमीच थेट संबंध असेल असं नाही.
तुलनेनं लहान प्रोस्टेटही त्याचा आकार आणि तो कोणत्या भागावर परिणाम करतो यावर अवलंबून लघवीच्या मार्गात लक्षणीय अडथळा निर्माण करू शकतो. त्याच वेळी, प्रोस्टेटचा आकार बराच वाढलेला असूनही काही पुरुषांमध्ये तुलनेने कमी लक्षणं दिसू शकतात.
त्यामुळे केवळ प्रोस्टेटच्या आकारावरून समस्या किती गंभीर आहे हे ठरवण्याऐवजी लक्षणं आणि मूत्रविसर्जनाची कार्यक्षमता यांचे मूल्यांकन करणं महत्त्वाचं आहे.
म्हणजेच काही रुग्णांमध्ये प्रोस्टेटचा आकार तुलनेनं कमी वाढलेला असतानाही लघवीच्या तक्रारी जाणवू शकतात.
फोटो स्रोत, Getty Images
काही पुरुषांना मूत्राशय पूर्ण रिकामं झालेलं नाही अशी भावना होत असते. अजून एकदा लघवीला जायला हवं असं वाटत असतं. लघवी केल्यानंतर मूत्राशयात काही प्रमाणात लघवी शिल्लक राहिल्यास अशी भावना निर्माण होऊ शकते.
इथंही प्रोस्टेटमुळे होणारा अडथळा हे यामागील एक कारण असू शकतं. मात्र, मूत्राशयाच्या स्नायूंची कमजोरी, मूत्रमार्ग अरुंद होणं आणि काही न्यूरोलॉजिकल समस्या यामुळेही असं होऊ शकते.
ही भावना सातत्यानं जाणवत असल्यास, लघवी केल्यानंतर मूत्राशयात किती लघवी शिल्लक राहते हे तपासण्यासाठी डॉक्टर आवश्यक तपासणी करू शकतात.
फोटो स्रोत, Getty Images
प्रोस्टेटबद्दल अनेक गैरसमजही आहेत. एक सामान्य गैरसमज म्हणजे, वयस्कर पुरुषांमध्ये होणारी प्रत्येक मूत्रविषयक समस्या प्रोस्टेट वाढल्यामुळेच होते. प्रत्यक्षात मूत्राशय, मूत्रमार्ग, संसर्ग, मुतखडा, औषधं, मधुमेह आणि इतर वैद्यकीय स्थितींमुळेही लघवीशी संबंधित लक्षणं उद्भवू शकतात.
एका विशिष्ट वयानंतर अशी लक्षणं सहन करावीच लागतात, असाही एक गैरसमज आहे. मात्र, विशेषतः लक्षणं दीर्घकाळ सतत राहिल्यास किंवा वाढत असल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी होणं आवश्यक आहे.
तिसरं म्हणजे, केवळ प्रोस्टेटचा आकार पाहून लक्षणांची तीव्रता ठरवता येत नाही. योग्य मूल्यांक करुन लक्षणं, वैद्यकीय तपासणी आणि आवश्यकतेनुसार मूत्रसंस्थेचं कार्य किती चांगल्या प्रकारे सुरू आहे हे तपासणाऱ्या विविध चाचण्यांचा विचार केला जातो.
रात्री वारंवार लघवीला जाणं
अनेकदा पुरुषांना रात्री वारंवार लघवीला जावं लागतं. कधी दोनदा तर कधी तीनदा उठल्यामुळे झोपही जाते आणि झोपेची गुणवत्ताही कमी होते.
लघवीच्या त्रासाबरोबर अपुऱ्या झोपेमुळे परिणाम सहन करावे लागतात. तसंच एकदा उठल्यामुळे परत नीट झोप लागणंही कठीण होतं. पण रात्री वारंवार लघवीला जाण्यामागंही प्रोस्टेट हे एकमेव कारण आहे का असा प्रश्न आम्ही डॉ. अजित गुजेला यांना विचारला. ते ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमध्ये युरोलॉजिस्ट कन्सल्टंट आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
डॉ. अजित गुजेला म्हणाले, “रात्री वारंवार लघवी होण्याला नॉक्टुरिया (Nocturia) म्हणतात, यामागं अनेक कारणं असू शकतात. संध्याकाळी जास्त प्रमाणात द्रवपदार्थ घेणं, कॅफीन किंवा अल्कोहोलचं सेवन, मधुमेह, झोपेशी संबंधित विकार, काही औषधे तसेच मूत्राशयाशी संबंधित समस्या यामुळेही रात्री वारंवार लघवी होऊ शकते. प्रोस्टेट वाढणं हे त्यापैकी एक कारण असू शकते; मात्र, प्रत्येक वेळी त्याचे कारण प्रोस्टेटच आहे असे गृहीत धरू नये.”
(पुरुषांसाठी रात्री किती वेळा लघवी ‘नॉर्मल’? 2-3 वेळा उठणं धोकादायक लक्षण? असतं हे समजून घेण्यासाठी येथील लिंकवर क्लिक करा.)
फोटो स्रोत, Getty Images
याबरोबरच काही पुरुषांना लघवी रोखून धरण्याची सवय असते. परंतु वारंवार आणि दीर्घकाळ लघवी करण्यास विलंब केल्यास मूत्राशयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि काही व्यक्तींमध्ये मूत्राशय पूर्णपणं रिकामं होण्यासंबंधी समस्या निर्माण होण्यास हातभार लागू शकतो.
त्यामुळे दीर्घकाळ लघवी रोखून ठेवण्याची सवय टाळावी. याचा नेमका परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असतो. तसंच त्या व्यक्तीला आधीपासून मूत्राशय किंवा मूत्रमार्गाशी संबंधित समस्या आहेत की नाही, यावरही तो अवलंबून असतो.

त्रास नक्की कशामुळे होतोय हे कसं शोधतात?
प्रोस्टेटमधली वाढ, मूत्रनलिका अरुंद होणं किंवा तिला दुखापत होणं, प्रोस्टेटचा दाह आणि मूत्राशयाच्या समस्या यांच्यामुळे लघवीच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो.
पण यातला फरक डॉक्टर कसा ओळखतात? आणि योग्य कारण कसं शोधतात? हाच प्रश्न आम्ही डॉ. श्याम वर्मा यांना विचारला. डॉ. वर्मा मुंबईतल्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात कन्सल्टंट युरोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट सर्जन आहेत.
ते म्हणाले, “या सर्व स्थितींमध्ये दिसणारी लक्षणं बऱ्याच प्रमाणात सारखी असू शकतात. त्यामुळे फक्त लक्षणांच्या आधारे निदान करता येत नाही. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास महत्त्वाचे संकेत देतो.”
फोटो स्रोत, Getty Images
डॉ. वर्मा पुढं सांगतात, ” प्रोस्टेटच्या सौम्य वाढीमध्ये, वाढत्या वयानुसार लक्षणं हळूहळू विकसित होतात. लघवीची धार कमकुवत होणं, लघवी सुरू होण्यास वेळ लागणं, मूत्राशय पूर्ण रिकामा न झाल्याची भावना, वारंवार लघवी लागणं आणि रात्री अनेकदा उठावं लागणं अशी लक्षणं दिसू शकतात.”
“यूरेथ्रल स्ट्रिक्चरचा (मूत्रनलिका अरुंद होणं किंवा तिला दुखापत) संशय विशेषतः तरुण पुरुषांमध्ये किंवा ज्यांना पूर्वी कॅथेटर, शस्त्रक्रिया, दुखापत किंवा संसर्ग झाला असेल त्यांच्यात येतो. त्यांच्यामध्ये लघवीची धार अधिकाधिक बारीक होत जाते किंवा फवाऱ्यासारखी किंवा दोन भागांत विभागलेली दिसू शकते.”
“प्रोस्टेटचा दाह (Prostatitis) असल्यास पेल्व्हिकमध्ये किंवा जननेंद्रियांच्या आसपास वेदना, लघवी करताना दुखणं, वारंवार लघवी लागणं किंवा अचानक लघवीची तीव्र भावना निर्माण होऊ शकते. मात्र दीर्घकालीन प्रोस्टाटायटिसमध्ये नेहमीच तीव्र वेदना असतात असं नाही.
ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये, लघवीची अचानक आणि तीव्र गरज व वारंवार लघवी जाणं ही लक्षणं अधिक ठळक असतात. तर कमकुवत ब्लॅडर स्नायूंमध्ये, लघवीची धार कमकुवत असते, मूत्राशय पूर्ण रिकामा होत नाही आणि लघवी केल्यानंतरही मूत्राशयात बरीच लघवी शिल्लक राहते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ प्रोस्टेटचा आकार पाहून लक्षणांचं कारण ठरवता येत नाही.”
लघवीच्या समस्या असल्यास कोणत्या तपासण्या करतात?
लघवीची धार कमकुवत असणे किंवा लघवी करण्यात अडचण असल्यास कोणत्या तपासण्या केल्या जातात? याबद्दल सांगताना डॉ. श्याम वर्मा म्हणाले, “या तपासणीची सुरुवात सविस्तर वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणीपासून होते. प्राथमिक तपासण्यांमध्ये लघवीची तपासणी, क्लिनिकल तपासणी (गरजेनुसार प्रोस्टेट तपासणीसह), युरोफ्लोमेट्री, मूत्रमार्ग आणि प्रोस्टेटचा अल्ट्रासाऊंड, तसेच पोस्ट-व्हॉइड रेसिड्युअल युरिन मोजणी, पीएसए (PSA) चाचणी अशा चाचण्यांचा समावेश होतो.”
कोणत्या वयापासून लक्ष देणं गरजेचं आहे?
बहुतांशवेळा वय झाल्याशिवाय अशा समस्या उद्भवत नाहीत असं पुरुषांना वाटत असतं. रोजच्या धावपळीत ते अनेक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात यामुळे समस्या वाढू शकते.
फोटो स्रोत, Getty Images
डॉ. श्याम वर्मा सांगतात, “लघवीच्या सवयींवर अचानक लक्ष ठेवायला सुरुवात करावी असं काही विशिष्ट वय नाही. कोणत्याही वयात लघवीच्या पॅटर्नमध्ये सतत बदल दिसल्यास त्याची दखल घ्यायला हवी. तथापि, 40 ते 50 वर्षांनंतर प्रोस्टेटमध्ये सौम्य वाढ अधिक सामान्य होते. त्यामुळे या वयोगटातील पुरुषांनी नवीन लक्षणांकडे ‘हे तर वयामुळेच आहे’ म्हणून दुर्लक्ष करू नये. तरुण पुरुषांमध्ये लघवीची गंभीर अडचण असल्यास यूरेथ्रल स्ट्रिक्चर, ब्लॅडर नेक डिसफंक्शन, संसर्ग किंवा मज्जासंस्थेच्या समस्या यांचा अधिक विचार केला जातो. तसंच, लघवीची लक्षणं आणि प्रोस्टेट कर्करोगाची तपासणी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लक्षणांची तीव्रता पाहून प्रोस्टेट कर्करोग आहे की नाही, हे ठरवता येत नाही.”
दारुमुळे काय परिणाम होतो?
पुरुषांना लघवीबाबत येणाऱ्या समस्यांबद्दल आम्ही डॉ. अजित गुजेला यांना काही प्रश्न विचारले. त्याला त्यांनी सविस्तर उत्तरं दिली.
प्रश्न- कॅफीन, अल्कोहोल आणि काही औषधांचा पुरुषांमध्ये वारंवार किंवा तातडीनं लघवी होण्यावर कसा परिणाम होतो?
डॉ. अजित गुजेला- कॅफीन आणि अल्कोहोलमुळे लघवीचं प्रमाण वाढू शकतं तसेच मूत्राशयाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे वारंवार लघवी होणं किंवा अचानक लघवीची तीव्र इच्छा होणं हे प्रकार जास्त जाणवू शकतात.
काही औषधं, विशेषतः डाययुरेटिक्स (लघवीचं प्रमाण वाढवणारी औषधं) किंवा मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम करणारी औषधांमुळए लघवीच्या पद्धतीत बदल होऊ शकतो.
एखादं औषध सुरू केल्यानंतर लक्षणं सुरू झाली किंवा वाढली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून औषध बंद करू नये.
प्रश्न- लघवीशी संबंधीत समस्यांवर उपचार केला नाही तर भविष्यात काही गुंतागुंतीची स्थिती होते का?
डॉ. अजित गुजेला- काही उपचार न केलेल्या मूत्रविषयक समस्यांमध्ये, विशेषतः लघवीच्या मार्गात लक्षणीय किंवा दीर्घकाळ अडथळा असल्यास, पुढे गुंतागुंत होऊ शकते. यामध्ये वारंवार होणारे मूत्रमार्गाचा संसर्ग, मूत्राशयातील बदल, लघवी अडून राहणं आणि गंभीर परिस्थितीत मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होणं यांचा समावेश होऊ शकतो.
प्रत्येक मूत्रविषयक लक्षणामुळे अशी गुंतागुंत होईलच असे नाही; मात्र, लक्षणं सतत काही काळ राहिल्यास किंवा वाढत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न- ही लक्षणं आपोआप कमी होतात का, याची वाट पाहण्याऐवजी युरोलॉजिस्टचा सल्ला कधी घ्यावा?
डॉ. अजित गुजेला- लक्षणं सतत राहिल्यास, हळूहळू वाढत असल्यास किंवा झोप आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करत असल्यास युरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.
लघवी करण्यास त्रास होणं, वारंवार मूत्रमार्गाला संसर्ग होणं, लघवीत रक्त दिसणं, फार वेदना होणं, लघवी अडून राहणं किंवा लघवीच्या सवयींमध्ये मोठा बदल होणं अशी लक्षणं दिसली तर वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे.
लघवीची तीव्र इच्छा असूनही अजिबात लघवी न होणं ही तर आपत्कालीन स्थिती आहे आणि अशावेळी तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे.
फोटो स्रोत, Getty Images
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




