Home LATEST NEWS ताजी बातमी ‘लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव’; पश्चिम बंगालमधील ख्रिश्चन लोक दहशतीत का आहेत?

‘लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव’; पश्चिम बंगालमधील ख्रिश्चन लोक दहशतीत का आहेत?

8
0

Source :- BBC INDIA NEWS

जुलै 2026 मध्ये, पश्चिम बंगालमधील बारुईपूर इथं बांधकाम सुरू असलेल्या चर्चवर कथित 'हिंदुत्ववादी' समाजकंटकांनी हल्ला केला आणि चर्चवरील क्रॉसची तोडफोड केली.

पश्चिम बंगाल राज्यात ख्रिश्चन समाजाच्या सदस्यांवर हल्ला होण्याच्या अनेक घटना घडल्याचे आरोप आहेत.

पूर्व मिदनापूरमधील पानस्कुरामधील एका ख्रिश्चन कुटुंबानं असा आरोप केला आहे की, विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली आणि शासकीय सुविधा बंद करण्याची धमकी दिली.

हल्ल्यात जखमी झालेल्या पार्वती हेंब्रम सोरेन यांनी बीबीसी न्यूज बांगलाला सांगितलं की, सोमवारी रात्री त्यांचं कुटुंब एकत्र प्रार्थना करण्याची तयारी करत असताना 30 हून अधिक मद्यधुंद व्यक्तींनी त्यांच्या घरात जबरदस्तीनं प्रवेश करून त्यांच्यावर हल्ला केला.

पार्वती सोरेन म्हणाल्या की, “त्यांनी माझे केस पकडून मला मारहाण केली. ते म्हणत होते की ते आम्हाला या घरात राहू देणार नाहीत. ते माझ्या पतीला अत्यंत वाईट पद्धतीने शिवीगाळ करत होते. आमचे नातेवाईकही आमच्यासोबत होते. त्यांनी माझ्या बहिणींनाही मारहाण केली. त्यांनी आमचे फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.”

केस पकडून मारहाण, पतीला शिविगाळ

काही दिवसांपूर्वी, दुर्गा पूजेदरम्यानही काही ख्रिश्चन कुटुंबांवर हल्ला झाल्याचा आरोप आहे. हल्ला करणारे लोक बजरंग दलाचे सदस्य असल्याचाही दावा करण्यात आला. पश्चिम मेदिनीपूरमधील चंद्रकोना इथं ही घटना घडली होती.

यावर्षी मे महिन्यात पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यापासून ख्रिश्चन समाजातील लोकांवर हल्ला होत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याच्या बातम्या येत आहेत.

‘इंडिया हेट लॅब’ या संशोधन संस्थेच्या विश्लेषणानुसार, 13 मे ते 20 सप्टेंबर दरम्यान राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्याच्या एकूण 60 घटनांची नोंद झाली आहे.

हल्ल्यानंतर पानस्कुरा येथील रहिवासी पार्वती हेम्ब्रम सोरेन यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हल्ल्यादरम्यान काय घडलं?

पानस्कुरामधील रहिवासी पार्वती सोरेन यांचा आरोप आहे की, या समाजकंटकांनी यापूर्वीही त्यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्या होत्या.

त्यांच्या म्हणण्यानुसार, 11 ऑक्टोबर रोजी सुद्धा तेच लोक त्याच्या घरी आले होते आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याबद्दल सोरेन कुटुंबाला धमकी दिली होती.

पश्चिम बंगाल राज्यात सत्तांतर झाल्यापासून ख्रिश्चन समाजाच्या सदस्यांवर हल्ले झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत (फाइल फोटो).

त्या म्हणाल्या की, “संध्याकाळी 7 ते 9 च्या दरम्यान, ते चोरांसारखे दारू पिऊन आमच्या घरी आले. त्यावेळी इतका अंधार होता की बाहेरच्या कुणालाही व्हीडिओ रेकॉर्ड करणं अशक्य होतं. मी माझ्या मोबाईलमधून व्हीडिओ रेकॉर्ड केला, पण त्यांनी माझा फोन हिसकावून घेतला आणि तो व्हीडिओ डिलीट केला. अखेरीस, पोलिसांच्या मदतीनं मला माझा फोन परत मिळाला.”

पुढे त्या म्हणाल्या की, “ते आमच्यावर ख्रिस्ती धर्म सोडून हिंदू धर्मात परत येण्यासाठी दबाव टाकत आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या स्वतःच्या इच्छेनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे आणि त्याचं पालन करत आहोत. म्हणूनच आम्हाला मारहाण केली जात आहे.”

सोयी-सुविधा बंद करण्याच्या धमकीचा आरोप

बंगाल ख्रिश्चन सर्व्हिसचे संस्थापक हेरॉड मल्लिक यांनी दावा केला की, जेव्हा हल्लेखोरांनी तक्रारदाराचा फोन हिसकावून घेतला, तेव्हा संस्थेच्या एका वकिलानं प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना फोन केला होता.

विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या हल्लेखोरांनी वकिलाला फोनवरून धमकीही दिली. आपण वकिलाशी बोलत आहोत हे लक्षात येताच त्यांनी फोन कट केला, असाही आरोप आहे.

हल्लेखोरांनी ख्रिश्चन धर्माला ‘अमेरिकन धर्म’ म्हटलं आणि त्या कुटुंबाला हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली, असाही आरोप आहे.

हल्ला झालेल्या कुटुंबातील एका महिलेनं सांगितलं की, हल्लेखोरांनी त्यांची सरकारी मदत बंद करण्याची धमकी दिली.

पार्वती सोरेन यांनी बीबीसी न्यूज बांगलाला सांगितलं की, “ते आमच्या अंगणात तुळशीचा चौथरा आणि मनसा मंदिर बांधण्यासाठी आमच्यावर दबाव टाकत होते. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ख्रिश्चन आहोत आणि ते करणार नाही.”

आता ते आम्हाला काम देण्यापासूनही लोकांना रोखत आहेत. त्यांनी आमचा वीज आणि पाणीपुरवठा, रेशन आणि आयुष्मान भारत योजनेचे लाभ बंद करण्याची धमकी दिली आहे. ते सर्वांना धमक्या देत आहेत, जेणेकरून कुणीही आम्हाला मदत करू नये.

या घटनेच्या वेळी पार्वती सोरेन, त्यांचे पती आणि त्यांची दोन लहान मुलं घरीच होती. त्यांचे तीन नातेवाईकही उपस्थित होते.

‘पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही’

पार्वती म्हणाल्या की, “आमचं प्रार्थनास्थळ जाळण्यात आलं आणि त्याची तोडफोड करण्यात आली. आम्हाला बाहेर ओढून मारहाण करण्यात आली. त्यांनी माझ्यावर हल्ला केला, माझ्या नणंदेला कानशिलात लगावली आणि माझ्या पतीला शिवीगाळ केली.”

त्या म्हणाला की, “हल्लेखोरांनी पुन्हा येऊन हल्ला करण्याची धमकी दिली असून, यावेळी ते 50 ते 100 लोकांना घेऊन येतील असं म्हटलं आहे. आम्ही तक्रार दाखल केली आहे. परंतु, पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.”

सुरक्षेच्या दृष्टीनं पार्वती सोरेन आणि त्यांचं कुटुंब एका नातेवाईकाच्या घरी राहत आहेत.

त्या म्हणाली की, “माझे पती टोटो (ई-रिक्षा) चालवतात. टोटो घेण्यासाठी आम्ही 2 लाख रुपयांचं कर्ज घेतले आहे. या परिस्थितीत आम्ही स्वतःला सुरक्षित ठेवून कर्जाची परतफेड कशी करू, हे मला समजत नाही.”

धर्मांतरांसाठी दबाव आणल्याचे आरोप

या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच, पश्चिम मेदिनीपूरमधील चंद्रकोनामधील अनेक कुटुंबांनीही अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. त्यांनीही बजरंग दलाच्या सदस्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यासोबतच्या या घटना 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान घडल्याची माहिती आहे.

त्यांनी असा आरोप केलाय की, एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, तिचे कपडे फाडण्यात आले आणि तिचं धर्मपरिवर्तन करण्याच्या उद्देशानं तिला जबरदस्तीनं पूजा मंडपात नेण्यात आलं.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी भाजपचे प्रवक्ते देबजित सरकार यांनी दावा केला आहे की, सरकारनं कोणत्याही प्रकारच्या अन्याय किंवा अत्याचारांबाबत झीरो टॉलरन्सचं धोरण स्वीकारलं आहे (प्रातिनिधीक चित्र).

जेव्हा बीबीसी न्यूज बांगलानं चंद्रकोनामधील घटनेबद्दल तक्रार करणाऱ्या महिलेशी फोनवर संवाद साधला, तेव्हा तिनं सांगितलं की हल्ल्यात जखमी झाल्यापासून तिची प्रकृती खूपच खालावली आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत तिनं लिहिलं आहे, “18 ऑक्टोबर 2026 रोजी, दुपारी सुमारे साडेतीन वाजता, बजरंग दलाशी संबंधित काही लोक माझ्या घरी आले. त्यावेळी मी माझ्या कुटुंबासोबत घरी होते. त्यांनी आमच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताप्रती असलेली श्रद्धाभावना सोडण्यासाठी दबाव टाकला आणि आम्हाला धमक्या दिल्या. त्यांनी आम्हाला मारहाणही केली.”

हल्ला होण्याची भीती कायम

या महिलेचा असा आरोप आहे की, त्या दिवशी दंगलखोरांनी तिच्या डोक्यावर आणि कानाखाली मारहाण केल्यामुळे ती बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध असताना तिचे कपडे फाडण्यात आले, असाही तिचा आरोप आहे.

“यानंतर, एका कथित शुद्धीकरण विधीच्या नावाखाली मला सार्वजनिक ठिकाणी स्नान करण्यास भाग पाडण्यात आलं. माझ्या संमतीशिवाय माझे कपडे काढण्यात आले आणि मला या विधीमध्ये सहभागी होण्यास भाग पाडलं गेलं,” असंही तिनं तक्रारीत म्हटलं आहे.

तिनं पुढे असा आरोप केला आहे की, 20 ऑक्टोबर रोजी तिला आणि तिच्या पतीला, इतर चार ख्रिश्चनांसह, त्यांच्या इच्छेविरुद्ध गावातील एका पूजा मंडपात नेण्यात आलं. तिथं त्यांना काही धार्मिक विधी करण्यास भाग पाडण्यात आलं.

तक्रारीत तिनं लिहिलं आहे की, “मी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केल्यास ते मला जिवंत सोडणार नाहीत, अशी धमकी ते अजूनही मला देत आहेत. मी खूप घाबरले आहे आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. कोणत्याही क्षणी माझ्यासोबत किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत काहीतरी गंभीर घडू शकतं, अशी मला सतत भीती वाटते.”

पोलिसांनी सांगितलं, ‘पुराव्याचा अभाव आहे’

दोन्ही घटनांमध्ये कारवाई न केल्याचा आरोप पोलिसांवर आहे.

जेव्हा बीबीसी बांगलानं पानस्कुरा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना लेखी तक्रार मिळाली आहे. परंतु, अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

ते म्हणाले की, “तक्रार मिळाल्याबरोबर एफआयआर नोंदवला जातो असं नाही. माझे तपास अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही सध्या अधिक माहिती देऊ शकत नाही.”

त्याच वेळी, पश्चिम मेदिनीपूरमधील चंद्रकोना घटनेप्रकरणी 20 ऑक्टोबर रोजी एफआयआर दाखल करण्यात आला.

पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका ख्रिश्चन कुटुंबावर झालेल्या कथित हल्ल्यावरून काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनीही भाजपवर निशाणा साधला (फाइल फोटो).

या प्रकरणात, हत्येचा प्रयत्न, महिलेचे वस्त्रहरण करण्याच्या उद्देशानं हल्ला, घरात घुसणं, हेतुपुरस्सर दुखापत करणं, गुन्हेगारी धमकी आणि महिलेचा विनयभंग यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी बांगलाला सांगितलं की, तपास सुरू आहे. परंतु, पुरेशा पुराव्याअभावी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

ते म्हणाले की, “आतापर्यंत सादर केलेल्या जबाबांमध्ये, वैद्यकीय अहवालांमध्ये किंवा इतर कागदपत्रांमध्ये आम्हाला पुरेसे पुरावे आढळले नाहीत, ज्यांच्या आधारे कोणालाही अटक करता येईल.”

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एफआयआरमध्ये नमूद असलेले सर्व 13 आरोपी स्थानिक रहिवासी आहेत.

‘मी सर्व ख्रिश्चनांना हिंदू धर्मात धर्मांतरित करेन’

पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधील विश्व हिंदू परिषदेचे नेते चंद्रनाथ दास यांनी बीबीसी न्यूज बांगलाला सांगितलं की, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेवर ख्रिश्चन समाजाच्या सदस्यांवर हल्ला केल्याचे आरोप खोटे आहेत.

त्याचा दावा आहे की, ही संघटना कुणावरही हल्ला करत नाही किंवा कायदा हातात घेत नाही.

मात्र, त्यांनी सांगितलं की, त्यांची संघटना पश्चिम बंगालच्या गावांमध्ये धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून ख्रिश्चन आणि मुस्लिमांचं हिंदू धर्मात धर्मांतर करण्यासाठी मोहीम राबवत आहे.

बजरंग दल ही सुद्धा विश्व हिंदू परिषदेशी संलग्न असलेली एक युवा संघटना आहे.

चंद्रनाथ दास म्हणाले की, “आमचे कार्य केवळ चंद्रकोना किंवा मिदनापूरमध्येच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. शक्य तितक्या ख्रिस्ती लोकांना हिंदू धर्मात धर्मांतरित करणं हे आमचं ध्येय आहे. आणि ते हिंदू होतील. हेच आमचं ध्येय आहे. कुणीही ख्रिस्ती होणार नाही.”

ते पुढे म्हणाले की, 1964 मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासून धर्मांतर थांबवणं आणि आपला धर्म सोडून इतर धर्मांत धर्मांतर केलेल्यांना परत आणणं हे संघटनेचं उद्दिष्ट राहिलं आहे.

त्यांचा दावा आहे की, पश्चिम बंगालमध्ये दरवर्षी विविध धर्मांतील हजारो लोकांचं “हिंदू धर्मात धर्मांतर” केलं जातं. हे उघडपणे, दिवसाढवळ्या आणि पोलिसांना माहिती देऊनच केलं जातं, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपनं काय म्हटलं?

बंगाल ख्रिश्चन सर्व्हिसचे संस्थापक हेरॉड मल्लिक यांनी बीबीसी न्यूज बांगलाला सांगितलं की, “असे हल्ले सातत्याने होत आहेत. हल्लेखोर अधिकाधिक निर्भय होत आहेत. कदाचित त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे हे घडत असावं. त्यांना एवढं धैर्य कुठून मिळत आहे आणि ते इतके निर्भय का झाले आहेत, हे मला समजत नाही.”

सरकार आपल्या विनंत्यांना प्रतिसाद देत नाहीये आणि या घटनांची योग्य चौकशी केली जात नाहीये, अशीही तक्रार त्यांनी केली. “ज्यांनी या घटना घडवल्या त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाहीये,” असंही ते म्हणाले.

या आरोपांवर, पश्चिम बंगालमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते देबजित सरकार यांनी बीबीसी न्यूज बांगलाला सांगितलं की, भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारनं कोणत्याही प्रकारच्या अन्याय आणि अत्याचारांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’चं धोरण स्वीकारलं आहे.

भाजपचे प्रवक्ते देबजित सरकार म्हणाले की, ज्या लोकांना आपला छळ होत आहे असं वाटतंय, त्यांनी कायदेशीर यंत्रणेकडे दाद मागावी (फाइल फोटो).

ते म्हणाले की, “ज्यांना आपला छळ होत आहे असं वाटतं, त्यांनी कायदेशीर यंत्रणेकडे जाऊन तक्रार दाखल करावी. कायदा त्याचं काम करेल. आम्ही कुणालाही जातीय सवलती देणार नाही, तसेच कुणाचाही जातीय फायदा घेऊ इच्छित नाही.”

ते म्हणाले की, “एखादी व्यक्ती कशी वागेल, कोण कोणता धर्म पाळेल, किंवा कोण कोणत्या समुदायाचा असेल किंवा नसेल, हे ठरवणं आमचं काम नाही. आमच्या राज्यात धर्मांतराला मान्यता नाही.”

काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनीही पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका ख्रिश्चन कुटुंबावर झालेल्या कथित हल्ल्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

चंद्रकोना इथं एका महिलेला नग्न करून जबरदस्तीने ‘शुद्धीकरण’ करण्याच्या कथित विधीमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC