Home LATEST NEWS ताजी बातमी व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरवरून भारत सरकारची ‘मेटा’ला नोटीस; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरवरून भारत सरकारची ‘मेटा’ला नोटीस; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

5
0

Source :- BBC INDIA NEWS

व्हॉट्सअप

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

व्हॉट्सॲप जगभरातील आपल्या 3 अब्ज वापरकर्त्यांना (युजर्स) आता त्यांच्या अकाउंटसाठी युजरनेम निवडण्याची सुविधा देत आहे.

या बदलाचा उद्देश युजर्सची गोपनीयता अधिक सुरक्षित करणं आहे. त्यामुळे मोबाइल नंबर शेअर न करताही लोक एकमेकांशी जोडले जाऊ शकतील, असा दावा करण्यात आला आहे.

‘मेटा’ कंपनीच्या अखत्यारित येणाऱ्या व्हॉट्सॲपने सांगितलं की, युजर्सला स्वतःचा वेगळा (युनिक) युजरनेम राखून ठेवता येणार आहे. हे फीचर या वर्षाच्या अखेरीपर्यंत सुरू करण्याची त्यांची योजना आहे.

व्हॉट्सॲपच्या प्रॉडक्ट हेड एलिस न्यूटन-रेक्स म्हणाल्या की, “युजरनेम फीचरमुळे आपला मोबाइल नंबर कोण पाहू शकेल, यावर युजरचे अधिक नियंत्रण राहील. विशेषतः नवीन लोकांशी संपर्क करताना किंवा एखाद्या ग्रुप चॅटमध्ये सहभागी होताना हे उपयुक्त ठरेल.”

परंतु, पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात व्हॉट्सॲपवर युजरनेम फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारने मेटाला नोटीस बजावली आहे.

पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटाला 3 दिवसांत युजरनेम फीचरची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या विषयावरील चर्चा पूर्ण होईपर्यंत युजरनेम फीचर सुरू करू नये, असेही मंत्रालयाने सांगितलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतासह जगभरात टप्प्याटप्प्याने युजरनेम फीचर सुरू करण्याबाबत व्हॉट्सॲपने केलेल्या घोषणेची दखल मंत्रालयाने घेतली आहे.

व्हॉट्सॲपने स्पष्ट केलं आहे की, हे फीचर सुरू झाल्यानंतर एखादी व्यक्ती पहिल्यांदाच संपर्क साधत असेल, तर तिला समोरच्या व्यक्तीचा मोबाइल नंबर दिसणार नाही. त्याऐवजी अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यायी युजरनेम सेट करता येऊ शकेल.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या फीचर्समुळे ऑनलाइन फसवणूक, फिशिंग आणि डिजिटल अरेस्टसारख्या घोटाळ्यांच्या घटना वाढू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, या फीचरचा गैरवापर करून दुसऱ्याची ओळख वापरण्याचे प्रकारही वाढू शकतात, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.

परंतु, व्हॉट्सॲपने हे फीचर गोपनीयतेच्या दृष्टीने एक मोठी सुधारणा असल्याचे म्हटलं आहे.

व्हॉट्सअप

फोटो स्रोत, Getty Images

एलिस न्यूटन-रेक्स म्हणाल्या की, “जेव्हा तुम्ही नवीन लोकांना भेटता, मग तो वर्गमित्र असो की शेजारी किंवा एखाद्या कार्यक्रमात भेटलेली व्यक्ती असेल. त्यावेळी मोबाइल नंबर शेअर करणे हे एक मोठं पाऊल वाटू शकतं.”

हे फीचर सिग्नलसारख्या प्रतिस्पर्धी मेसेजिंग ॲप्ससारखंच आहे, जिथे लोक मोबाइल नंबरऐवजी युजरनेम्सच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद सुरू करू शकतात.

सामान्यपणे युजरनेम्स सोशल नेटवर्किंग प्रोफाइलशी जोडलेले असतात. न्यूटन-रेक्स यांनी सांगितलं की, व्हॉट्सॲपचे हे फीचर प्रामुख्याने गोपनीयतचे साधन म्हणून तयार करण्यात आले आहे.

उदाहरणार्थ, युजर्सना युजरनेम्सची यादी (युजरनेम डिरेक्टरी) पाहता येणार नाही. एखाद्याशी संपर्क साधायचा असेल, तर त्या व्यक्तीचा अचूक युजरनेम माहिती असणे आवश्यक असेल.

फेसबुक-इन्स्टाग्राम युजरनेमही सुरक्षित करता येणार

बनावट (फेक) ओळख आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी, व्हॉट्सॲपने आरक्षण (रिझर्वेशन) कालावधीत विद्यमान किंवा चालू असलेले फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजरनेम त्यांच्या मूळ वापरकर्त्यांसाठी सुरक्षित किंवा राखून ठेवले आहेत.

न्यूटन-रेक्स म्हणाल्या की, प्रसिद्ध व्यक्ती, सार्वजनिक व्यक्तिमत्त्वे, सेलिब्रिटी आणि सरकारी संस्थांशी संबंधित काही महत्त्वाचे म्हणजेच हाय-प्रोफाइल युजरनेम्स कायमस्वरूपी सुरक्षित ठेवले जाणार आहेत. जेणेकरून कोणीही त्यांचा गैरवापर किंवा बनावट ओळख तयार करू शकणार नाही.

त्या म्हणाल्या की, “व्हॉट्सॲपला तेव्हाच यशस्वी मानलं जाईल, जेव्हा लोकांना अधिक सुरक्षित वाटण्याचा आणखी एखादा मार्ग मिळेल. या फीचरमुळे युजर आपला मोबाइल नंबर गोपनीय ठेवू शकतील आणि हवं असल्यास नवीन लोकांशी विश्वासाने संपर्कही साधू शकतील.”

व्हॉट्सॲपने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की, “समजा आपल्याला आपल्या मुलाच्या फुटबॉल टीमच्या पालकांच्या ग्रुपमध्ये सामील व्हायचं आहे. पण त्या लोकांना आपण आधी कधीच भेटलेले नसतो. अशा वेळी आपण लगेच त्यांना आपला मोबाइल नंबर द्यायचा नाही.”

त्यामुळेच व्हॉट्सॲप युजरनेम फीचर आणत आहे.

व्हॉट्सॲपवर 3 अब्जहून अधिक युजर्स आहेत. त्यामुळे अनेक नावं एकसारखे असू शकतात.

याच कारणामुळे कंपनीने आधीपासूनच युजरनेम आरक्षित करण्याची (रिझर्वेशन) प्रक्रिया सुरू केली आहे, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या पसंतीचा युजरनेम निवडण्याची संधी मिळू शकेल.

प्रसिद्ध व्यक्ती, सार्वजनिक व्यक्तिमत्त्वे, सेलिब्रिटी आणि सरकारी संस्थांशी संबंधित काही महत्त्वाचे म्हणजेच हाय-प्रोफाइल युजरनेम्स कायमस्वरूपी सुरक्षित ठेवले जाणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

बहुतेक लोकांसाठी व्हॉट्सॲपचा युजरनेम असा असावा की, तो वेगळा (युनिक) असेल आणि तो फक्त त्या लोकांनाच माहीत असेल, ज्यांच्याशी त्यांना संपर्क ठेवायचा आहे.

जर युजरनेम निवडण्यात अडचण आली, तर व्हॉट्सॲपने युजरनेम जनरेटरही उपलब्ध करून दिला आहे. हे फीचर तुम्हाला योग्य युजरनेम सुचवण्यास मदत करेल.

व्हॉट्सॲपने म्हटलं आहे की, “कंटेंट क्रिएटर्स, छोटे व्यवसाय आणि संस्थांना आपली ऑनलाइन ओळख सर्व प्लॅटफॉर्मवर एकसारखी ठेवायची इच्छा असते. त्यामुळे त्यांना आपले जुने इन्स्टाग्राम किंवा फेसबुक युजरनेम व्हॉट्सॲपवरही घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे.”

“युजरनेम फीचर हे व्हॉट्सॲपला अधिक खासगी आणि सुरक्षित बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे एक नवीन पाऊल आहे.”

यामध्ये युजरनेमची कोणतीही यादी किंवा डिरेक्टरी नसेल आणि युजरनेम संबंधित कोणत्या सूचनाही दिसणार नाहीत.

एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला तुमचा अचूक युजरनेम माहिती असणे आवश्यक असेल.

व्हॉट्सॲपने एक ऐच्छिक युजरनेम फीचर देखील सादर केलं आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या युजरनेमद्वारे तुमच्याशी कोण संपर्क साधू शकेल हे नियंत्रित करू शकता. इतरांना तुमचे युजरनेम माहिती असेल तरच ते तुम्हाला मेसेज करू शकतील.

हे फीचर सुरू झाल्यानंतर, तुम्ही युजरनेम सक्रिय केला असेल, तर कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यवसायाला पहिल्यांदा मेसेज करताना त्यांना तुमचा मोबाइल नंबर दिसणार नाही.

युजरनेम रिझर्व्ह करण्यासाठी केवळ काही सेकंद लागतील.

यासाठी व्हॉट्सॲपच्या लेटेस्ट (नवीन) व्हर्जनमध्ये जाऊन सेटिंग्ज > अकाऊंट > युजरनेम वर जावं लागेल.

व्हॉट्सॲपने हे फीचर हळूहळू सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून दिले आहे.

व्हॉट्सॲप युजरनेमबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी

युजरनेम हा तुमच्या फोन नंबरला एक पर्याय आहे, ज्यामुळे लोक तुम्हाला शोधू शकतात आणि मेसेजही पाठवू शकतात.

युजरनेमसोबतच एक पर्यायी चार अंकी सुरक्षा कोडही (ऐच्छिक असेल) असेल, जो पहिल्यांदाच संपर्क करणाऱ्या लोकांसाठी सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर म्हणून काम करेल.

युजरनेम एका ‘हँडल’प्रमाणे काम करतं.

तुम्ही हा युजरनेम इतरांसोबत शेअर करू शकता, त्यामुळे ते तुमचा मोबाइल नंबर माहिती नसतानाही व्हॉट्सॲपवर तुम्हाला शोधू शकतील आणि तुमच्याशी संपर्क साधू शकतील.

युजरनेम हा तुमच्या फोन नंबरला एक पर्याय आहे, ज्यामुळे लोक तुम्हाला शोधू शकतील.

फोटो स्रोत, Getty Images

व्हॉट्सॲपवर कोणतीही सार्वजनिक डिरेक्टरी नसल्यामुळे, कोणालाही तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमचा अचूक युजरनेम माहिती असणे गरजेचं असेल.

हा सिक्युरिटी कोड एका पिनसारखं काम करेल.

जर तुम्ही हे फीचर सुरू केलं, तर केवळ तुमचा युजरनेम माहिती असूनही कोणताही अनोळखी व्यक्ती तुम्हाला मेसेज करू शकणार नाही.

पहिल्यांदा तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्या व्यक्तीला तुमचा युजरनेम आणि चार अंकी सुरक्षा कोड हे दोन्ही माहिती असणं आवश्यक असेल.

जर तुम्ही हा सुरक्षा कोड सुरू केला, तर ज्यांनी तुम्हाला आधी कधीच मेसेज केलेला नाही, त्यांना पहिल्यांदा संपर्क साधण्यासाठी तुमचा युजरनेम आणि चार अंकी सुरक्षा कोड दोन्हींची गरज भासेल.

जेव्हा तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीने तुमच्याशी संपर्क साधावा असं वाटतं, तेव्हा तुम्ही तुमचा युजरनेम आणि चार अंकी सुरक्षा कोड दोन्ही शेअर करू शकता.

हा सुरक्षा कोड केवळ त्या लोकांसाठी लागेल, जे पहिल्यांदाच तुमच्या युजरनेमद्वारे तुमच्याशी संपर्क साधत आहेत.

या लोकांना तुमच्या पिनची गरज भासणार नाही

या लोकांना तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी युजरनेमची गरज भासणार नाही:

  • ज्या लोकांनी तुमचा फोन नंबर आधीच सेव्ह करून ठेवला आहे.
  • ज्या लोकांशी तुम्ही आधीच चॅट केले आहे.
  • जे तुमच्यासोबत एखाद्या सामायिक (जॉइंट) ग्रुपमध्ये आहेत.
  • ज्यांनी तुमचा QR कोड स्कॅन केला आहे.
  • ज्यांना तुम्ही यापूर्वी मेसेज पाठवला आहे.

जर तुम्हाला युजरनेम की तयार करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचे मोबाईल डिव्हाईस वापरावे लागेल.

तुमच्या युजरनेम कीसाठी तुम्ही स्वतः कोणताही खास कोड निवडू शकत नाही. हा कोड WhatsApp स्वतः जनरेट करेल. तुम्हाला हवे असल्यास, ‘वेगळी की मिळवा’ (Get a Different Key) या पर्यायावर टॅप करून नवीन की जनरेट करू शकता.

युजरनेम की पूर्णपणे ऐच्छिक आहे. तुम्ही कधीही तुमची की जोडू शकता, बदलू शकता किंवा हटवू शकता.

जर तुम्ही तुमचे WhatsApp खाते अशा Meta खात्याशी जोडले असेल ज्यामध्ये तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी दाखवलेले असेल, तर तुमच्या गोपनीयतेच्या सुरक्षेसाठी युजरनेम की डीफॉल्टने सुरू (चालू) असेल.

तथापि, तुम्ही ती कधीही बदलू शकता.

युजरनेम की तयार केल्याने तुमच्या सध्याच्या संभाषणांवर कोणताही परिणाम होणार नाही.

ज्या लोकांशी तुम्ही आधीच चॅट केले आहे, ते की नसतानाही तुम्हाला मेसेज पाठवू शकतात.

एखाद्या व्यक्तीकडे तुमची की नसेल आणि तो/ती तुमच्या युजरनेमद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नसेल, तर त्याबाबत तुम्हाला कोणतीही सूचना मिळणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC