Source :- BBC INDIA NEWS

शंकरन नायर

फोटो स्रोत, Raghu Palat

शंकरन नायर हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होते. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायाविरोधात उभं राहून जालियनवाला बाग हत्याकांडाच्या न्यायासाठी ऐतिहासिक लढा दिला. त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे जालियनवाला बाग प्रकरण जगासमोर आलं आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक नवा अध्याय लिहिला गेला.

“त्या दिवशी मी माझ्या आजोबांसोबत जालियनवाला बागेत गेलो होतो. तिथे अचानक गोळीबार सुरू झाला, माझे आजोबा मला उचलून सैनिकांपासून दूर असलेल्या भिंतीकडे पळू लागले. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही, हे लक्षात येताच त्यांनी मला सात फूट उंच भिंतीच्या पलीकडे फेकून दिलं.”

“खाली पडल्यामुळं माझा हात मोडला, पण मी ती गोष्ट सांगण्यासाठी जिवंत राहिलो. त्या वेदनेतही आम्ही अनेक दिवस रुग्णालयात गेलो नाही, कारण आमच्यावर आणखी अत्याचार केला जाईल, अशी आम्हाला भीती होती.”

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेतील या हत्याकांडाच्या वेळी भरपूर सिंग हे अवघ्या 4 वर्षांचे होते. 2009 मध्ये झालेल्या एका संभाषणात भरपूर सिंग यांनी त्यांच्यावर बेतलेल्या प्रसंगाची माहिती दिली होती.

गोळीबार करण्याचे आदेश ब्रिगेडियर जनरल डायरने दिले होते आणि त्याच्यासोबत सार्जंट अँडरसन होता, तर मायकेल ओडवायर त्यावेळी पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर जनरल होते.

परंतु, सुरुवातीच्या काळात एवढ्या मोठ्या हत्याकांडाची फारशी चर्चाही झाली नाही.

जालियनवाला बागेचा ऐतिहासिक न्यायालयीन खटला

पण एका भारतीयाने ब्रिटनमध्ये जाऊन आपल्या हिमतीवर जालियनवाला बाग हत्याकांडासंदर्भात न्यायालयात एक ऐतिहासिक खटला लढला होता, जो साडेपाच आठवडे चालला.

जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश ब्रिगेडियर जनरल डायरने दिले होते.

फोटो स्रोत, partition museum

या खटल्यामुळेच जगाला जालियनवाला बागेची कहाणी सविस्तरपणे कळाली होती.

त्या व्यक्तीचे नाव होते सर चेट्टूर शंकरन नायर आणि अक्षय कुमारचा नवीन चित्रपट केसरी-2 त्यांच्यावरच आधारित आहे.

त्या वेळचे गुलाम भारतातून ब्रिटनमध्ये जाऊन तिथल्या न्यायालयात केस लढणं, हे भारतीयासाठी अत्यंत धाडसी आणि अनोखं पाऊल होतं. परंतु, शंकरन नायर यांनी हे केलं आणि इतिहास रचला.

कोण होते शंकरन नायर?

शंकरन नायर यांच्या नावावर भारतीय इतिहासात अनेक नोंदी आहेत. शंकरन नायर यांचा जन्म 1857 मध्ये पलक्कड येथील एक श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांच्या जन्मावेळीच भारतामध्ये स्वातंत्र्यासाठीची पहिली लढाई लढली जात होती.

पेशाने वकील असलेले नायर 1897 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही काम केलं. 1915 मध्ये व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत सदस्य म्हणून त्यांची नियुक्त झाली. त्यांना ‘सर’ ही उपाधी मिळाली होती.

जालियनवाला बाग हत्याकांडाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. व्हाईसरॉय कौन्सिलचे सदस्य असल्याने, शंकरन नायर यांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार कसा झाला याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ऐकायला सुरुवात केली.

पंजाबमधील घटनांमुळे ते खूप निराश झाले आणि त्यांनी व्हाईसरॉयच्या कौन्सिलचा राजीनामा दिला. ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकात लिहिलेल्या एका घटनेतून त्यांच्या कडवटपणाचे उदाहरण समोर येते.

शंकरन नायर यांनी 1922 मध्ये लिहिलेल्या त्यांच्या 'गांधी अँड अनार्की' या पुस्तकात इंग्रजांनी पंजाबमध्ये केलेल्या अत्याचार आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचे सविस्तर वर्णन केलं आहे.

फोटो स्रोत, Raghu Palat

शंकरन नायर यांचा नातू रघु पलट आणि त्यांची पत्नी पुष्पा पलट यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

ते लिहितात, “व्हाईसरॉय कौन्सिलचा राजीनामा दिल्यानंतर, व्हाईसरॉय चेम्सफोर्ड यांनी त्या पदासाठी सर शंकरन नायर यांना ते एका भारतीयाचं नाव यासाठी सुचवू शकतात का?, असा सवाल केला.

सर नायर यांना समजलं की व्हाईसरॉयला भारतीयांचा सल्ला घेण्यात थोडीही रुची नाही. तो प्रश्न केवळ औपचारिकता होती. नोकरीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला टोमणा मारण्यात कसूर केली नाही.

“सर शंकरन नायर गंभीरपणे म्हणाले की हो, मी नाव सुचवू शकतो. आणि त्यांनी दारात पगडी घालून उभ्या असलेल्या द्वारपाल राम प्रसादकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, तुम्ही त्याला का घेत नाही, तो उंच, देखणा आहे आणि तुमच्या ‘हो’ ला ‘हो’ पण मिळवेल, असं म्हणत त्यांनी व्हाईसरॉयशी हस्तांदोलन केलं आणि शांतपणे निघून गेले.”

मायकेल ओडवायरने दाखल केला खटला

झालं असं की, शंकरन नायर यांनी 1922 मध्ये ‘गांधी अँड अनार्की’ नावाचं एक पुस्तक लिहिलं, ज्यात त्यांनी गांधीजींच्या धोरणांशी असहमती दर्शवली आणि पंजाबमधील परिस्थितीबद्दल ब्रिटिश सरकारवर टीकाही केली.

पंजाबमध्ये जे अत्याचार झाले याची माहिती पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर जनरल मायकल ओडवायर यांना होती, याकडं त्यांनी लक्ष वेधलं होतं.

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी मायकेल ओडवायर पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता.

फोटो स्रोत, partition museum

यावर ओडवायरने 1922 मध्ये शंकरन नायर यांच्याविरुद्ध ब्रिटनमध्ये मानहानीचा दावा केला आणि त्यांना माफी मागण्याची, पुस्तक मागे घेण्याची आणि दंड भरण्याची मागणी केली. परंतु, शंकरन नायर यांनी याला स्पष्ट शब्दांत नकार दिला.

हा खटला साडेपाच महिन्यांपर्यंत चालला. या खटल्यात जसजसे पुरावे समोर येऊ लागले, तसतसं जगाला जालियनवाला बाग आणि पंजाबमध्ये झालेल्या अत्याचाराची माहिती झाली.

हा त्या काळातील सर्वात दीर्घ काळ चाललेला दिवाणी खटला होता.

खटल्याच्या एक दिवस आधी नव्हता वकील

‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकात न्यायालयीन प्रकरणाचे तपशीलवार वर्णन केले आहे.

खटला सुरू होण्याच्या एक दिवस आधी शंकरन नायर यांचे वकील सर जॉन सायमन यांनी खटला लढण्यास नकार दिला. अखेरच्या क्षणी त्यांनी सर वॉल्टर यांची नवीन वकील म्हणून नियुक्ती केली.

जालियनवाला बाग हत्याकांडातून काही लोक बचावले होते. उत्तमचंद हेही त्यापैकीच एक होते.

फोटो स्रोत, partition museum

पुस्तकानुसार, “खूप साऱ्या गोष्टी सर शंकरन नायर यांच्या विरोधात होत्या. एक भारतीय, एका इंग्रजाविरोधात इंग्रजांच्याच न्यायालयात खटला लढत होता. ओडवायरच्या साक्षीदारांमध्ये प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित लोकांचा समावेश होता आणि ते न्यायालयात व्यक्तिशः उपस्थित होते.”

“शंकरन नायर यांचे साक्षीदार सामान्य भारतीय होते आणि ते साक्षीदार इंग्लंडमध्ये नव्हे, तर भारतात होते आणि त्यांची साक्ष भारतात घेतली गेली होती.

त्या साक्षी इंग्लंडच्या न्यायालयात फक्त वाचन करून सादर करण्यात आल्या. प्रत्यक्षात साक्ष देतानाचे भाव दिसत नसल्याने या साक्षीचा प्रभाव पडणार नव्हता.”

“शंकरन यांचे फक्त दोनच साक्षीदार इंग्लंडमध्ये साक्ष देऊ शकले, एक गेराल्ड वाथेन, जे 1919 मध्ये खालसा कॉलेजचे प्राचार्य होते आणि दुसरे सर हरकिशन लाल, जे पंजाबमध्ये मंत्री राहिले होते. त्यांना मार्शल लॉ अंतर्गत तुरुंगात टाकण्यात आले होते. ते स्वखर्चानं साक्ष देण्यासाठी लंडनला आले होते.”

गुजरानवालामध्ये बॉम्बस्फोट

पुस्तकानुसार, “खटला सुरू असताना, जालियनवाला बागच्या घटनेनंतर गुजरानवालामध्ये जो बॉम्बस्फोट करण्यात आला, त्याची कबुली जनरल ओडवायरला द्यावी लागली आणि त्यानं मान्य केलं की त्यांच्या आदेशानुसारच विमानं पाठवण्यात आली होती.”

“गुजरानवालाच्या बाहेर निरपराध लोकांवर बॉम्बफेक करणे आणि मशीन गन वापरणं योग्य आहे का? असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर ओडवायर म्हणाला की, हे लोक गुजरानवाला येथून पंजाबमध्ये अशांतता पसरवण्यासाठी जात होते.

ओडवायरला कसूरमधील शालेय विद्यार्थ्यांना मारहाणीबद्दल विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, संपूर्ण शाळा अशांतता निर्माण करण्याच्या कटात सामील होती.”

“लाहोरच्या कडक उन्हात शाळकरी मुलांना 17 मैल चालण्याचा आदेश का देण्यात आला, असं विचारलं असता ओडवायर म्हणाला की, अनेक विद्यार्थी बंडखोर झाले होते.

आपल्या कुटुंबासोबत सी शंकरन नायर

फोटो स्रोत, Raghu Palat

जालियनवाला प्रकरण आलं तेव्हा न्यायाधीशांनी ज्युरींना सांगितलं की, 5 लाख लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काहीशे लोकांना मारण्याचा अधिकार असावा की नाही हा प्रश्न आहे.”

भारत आणि ब्रिटनमधील वृत्तपत्रांनी या खटल्याची दखल घ्यायला सुरुवात केली. त्यामुळं खटल्यादरम्यान पंजाबमधील गोळीबार, हत्या, जालियनवाला बाग हत्याकांड आणि सैन्यात जबरदस्तीने भरती करण्याचे किस्से उघडकीस येऊ लागले.

न्यायाधीशांचा पक्षपातीपणा

न्यायमूर्ती मॅकार्डी यांच्या कथित पक्षपाती वृत्तीबाबत या खटल्यात गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चाही झाली आणि त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.

डेली क्रॉनिकलने या खटल्यातील न्या. मॅकार्डी यांच्यावर टीका केली. वेस्टमिन्स्टर गॅझेटनेही न्यायमूर्तींच्या वर्तनाचा निषेध केला.

डेली न्यूजने या घटना इंग्लंडच्या सार्वजनिक हितासाठी दुर्दैवी असल्याचे वर्णन केले आणि न्यायाधीशांच्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त केला. न्या. मॅकार्डींनी नंतर आत्महत्या केली होती.

या प्रकरणात न्यायाधीश न्यायमूर्ती मॅकार्डी यांच्या पक्षपाती वृत्तीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. न्यायाधीश मॅकार्डींनी नंतर आत्महत्या केली होती.

फोटो स्रोत, Raghu Palat

12 सदस्य असलेल्या ज्युरीत सर्व इंग्रज होते. ज्युरीला एकमताने निर्णय घेता आला नाही आणि शंकरन नायर यांच्या विरुद्ध 11-1 असा निकाल लागला.

शंकरन नायर यांनी जर माफी मागितली तर त्यांना दंड आणि खटल्याचा खर्च भरावा लागणार नाही, असा प्रस्ताव मायकेल ओडवायरने दिला होता.

पुस्तकात असं लिहिलं आहे की, 6 जून 1924 रोजी न्यायालयाचा तो दिवस शंकरन नायर यांच्यासाठी कठीण होता. परंतु, नायर यांनी स्पष्ट शब्दांत माफी मागण्यास नकार दिला.

जेव्हा गांधीजींनी शंकरन नायर यांच्यावर लेख लिहिला

पराभूत होऊनही इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या लढाईत हा खटला महत्त्वाचा मानला जातो. या खटल्यामुळं भारतातील स्वातंत्र्य चळवळीला नवसंजीवनी मिळाली आणि महात्मा गांधींच्या जनआंदोलनाला बळ मिळालं.

महात्मा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

गांधीजींनी 12 जून 1924 रोजी यंग इंडियामध्ये लिहिलं होतं – “न्यायाधीशांनी सुरुवातीपासूनच पक्षपातीपणा दाखवला. या खटल्याचा अहवाल रोज वाचणं वेदनादायक होतं. एक ब्रिटिश न्यायाधीश उघडपणे हे सर्व करू शकतो, ज्यासाठी भारतीयाला मात्र किंमत चुकवावी लागते.”

“मायकल ओडवायरचं आव्हान स्वीकारून सर शंकरन नायर यांनी ब्रिटिश राज्यघटना आणि जनतेला कसोटीस लावलं होतं. या पराभवातही सर्व भारतीयांना सर शंकरन नायर यांच्याबद्दल सहानुभूती आहे. मी त्यांच्या धाडसाचं कौतुक करतो, त्यांचं धैर्य प्रशंसनीय आहे.”

लंडनमध्ये आहे शंकरन नायर यांचं पोर्ट्रेट

आजही शंकरन नायर यांच्या सन्मानार्थ जालियनवाला बाग संग्रहालयात एक फलक आहे. लंडनमधील नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीत त्यांचं पोर्ट्रेट आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच 1934 मध्ये शंकरन नायर यांचं निधन झालं होतं.

जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हंटर समितीनुसार, एकूण 370 लोक मारले गेले. परंतु, इतिहासकार मृतांची संख्या 1000 ते 1500 च्या दरम्यान असल्याचं सांगतात.

शंकरन नायर यांच्यावर आधारित ‘केसरी-2’ या चित्रपटाबाबत अक्षय कुमार म्हणतो, “यापूर्वी मलाही या न्यायालयीन खटल्याची माहिती नव्हती. मी हा चित्रपट करत आहे, कारण इतिहास ब्रिटिशांच्या दृष्टीकोनानुसार लिहिला गेला आहे. मला खरा इतिहास लोकांसमोर आणायचा आहे.”

अक्षय कुमारचा नवा चित्रपट केसरी 2 शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे.

फोटो स्रोत, Raghu Palat And X/akshaykumar

जालियनवाला बाग घटनेत दुसऱ्या नावाचा उल्लेख केला जातो, ते म्हणजे जनरल डायर.

नायजेल कोलेट डायरचं चरित्र “द बुचर ऑफ अमृतसर”मध्ये लिहितात, “डायरच्या म्हणण्यानुसार, अमृतसरची परिस्थिती ज्या लोकांना माहीत होती, त्यांनी सांगितलं की मी बरोबर केलं. परंतु, काही म्हणतात की मी चुकीचं केलं. मला फक्त मरायचं आहे आणि माझ्या देवाला विचारायचं आहे की, मी बरोबर होतो की चूक.”

बीबीसीशी बोलताना नायजल कोलेट म्हणाल्या की, जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटनने अधिकृतरित्या माफी मागावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे. परंतु, औपचारिक माफी कधीच मागितली गेली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC