Source :- BBC INDIA NEWS

ख्रिस ब्रूक्स

अठ्ठावीस वर्षीय ख्रिस-ब्रूक्सला पूर्वी शेंगदाण्याचा छोटासा तुकडा देखील खाल्ल्यानं आपला मृत्यू होईल, अशी भीती वाटायची.

दहा वर्षांपूर्वी, एका रेस्टॉरंटमधून इंडियन करी ऑर्डर केल्यानंतर ख्रिसला आयुष्यातील सर्वात भीषण अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनचा सामना करावा लागला होता. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आजही तो प्रसंग त्याच्या स्मरणात आहे.

“पहिला घास खाल्ल्यावरच मला लक्षात आलं की काहीतरी गंभीर घडत आहे,” असं ख्रिस म्हणाला.

“काही सेकंदातच माझ्या ओठांवर पुरळ उठले. काही मिनिटांत मी उलट्या करू लागलो. मला माझा घसा बंद होत असल्यासारखं जाणवलं, बगलेमध्ये सूज आली, मग ती संपूर्ण शरीरावर आली, माझा संपूर्ण चेहरा सुजला.”

हे सांगताना त्याच्या भावना दाटून येतात, हळूहळू तो शांत होतो.

“मी आता मरणार असंच त्यावेळी मला वाटलं होतं.”

त्याच्या शरीरावर झालेल्या रिअ‍ॅक्शन्स किती गंभीर होत्या, हे त्यादिवशी रुग्णालयात काढलेल्या फोटोवरून लक्षात येतं.

ख्रिस म्हणतो, “माझी त्वचा फोडांनी इतकी भरली होती की, मी एखाद्या सोललेल्या टर्कीसारखा दिसत होतो.”

पण सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, त्वचेवर पडलेले लाल चट्टे, ज्यामुळं “जणू माझ्यावर कोणीतरी उकळतं पाणी ओतलंय”, असं वाटत होतं.

ख्रिस

फोटो स्रोत, Chris Brookes-Smith

शेंगदाण्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणं, ही एक अतिशय सामान्य फूड अॅलर्जी आहे. ख्रिस आणि इतर लाखो गंभीर अ‍ॅलर्जी असलेल्या प्रौढांसाठी जीवनशैलीचा हा एक भाग बनला आहे.

अशावेळी बाहेर जेवण करणं, पार्ट्यांना किंवा सोशल गॅदरिंगला जाणं आणि परदेशात प्रवास करणं या सगळ्या गोष्टी चिंता निर्माण करणाऱ्या ठरतात.

एका संस्थेच्या म्हणण्यानुसार, दर 200 प्रौढांपैकी एक आणि दर 50 मुलांपैकी एकाला शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी असते. काही मुलांची ही अ‍ॅलर्जी जसजसं ते मोठे होतात तशी ती कमी होते. पण बऱ्याच जणांची कायम राहते आणि अनेकदा मोठेपणी ती अधिक गंभीर होते.

शेंगदाण्यांमधील प्रथिनांना शरीर शत्रू समजून त्यावर प्रतिक्रिया देते, तेव्हा अ‍ॅलर्जिक प्रतिक्रिया होते आणि त्यामुळं शरीरात अचानक रसायने मुक्त होतात, बाहेर पडतात. याची लक्षणं सौम्य ते अतिशय गंभीर अशा स्वरूपात असू शकतात.

ख्रिस जेव्हा लहान होता. तेव्हा त्याच्या आईने पिनट बटर सँडविच तयार केलं होतं. ते खाल्ल्यानंतर त्याच्या अंगावर पुरळ आले होते. त्यावेळी त्याच्या अ‍ॅलर्जीबाबत पहिल्यांदा लक्षात आलं होतं.

तेव्हापासून त्याला प्रत्येक अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन मागच्या वेळेपेक्षा अधिक तीव्र झाली, त्यामुळं त्याला रोज ‘हाय अलर्ट’ स्थितीत जगण्याची सवय लागली, वाईट काही घडणार नाही या आशेने तो जगत होता.

मित्रांसोबत बाहेर जाणं किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण करणं यासारख्या आनंददायी अ‍ॅक्टिव्हिटी असल्या पाहिजेत, ते तणावपूर्ण आणि जीवघेण्या अनुभवांमध्ये बदलतात.

प्रवासाची आवड असूनही, इटलीच्या प्रवासात तीनदा अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन आल्यामुळे ख्रिसने दक्षिण-आशियासारख्या शेंगदाणे जास्त वापरल्या जाणाऱ्या देशांमध्यं जाणं टाळलं.

ख्रिस जसजसा मोठा होत होता तसतसं त्याचं कुटुंब सतत त्याच्याबद्दल काळजी करत होतं. पण नंतर त्याच्या आईने गाईज आणि सेंट थॉमसच्या एनएचएस फाउंडेशन ट्रस्ट आणि किंग्ज कॉलेज लंडन येथे सुरू असलेल्या क्लिनिकल चाचणीबद्दल ऐकलं, त्यामुळं त्यांच्या मुलाचं आयुष्य बदलून जाणार होतं.

ही चाचणी हे तपासणार होती की, शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी असलेल्या ख्रिससारख्या प्रौढांना त्यांच्या शरीराला थोड्याफार प्रमाणात सहनशक्ती निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देऊन त्या अ‍ॅलर्जीपासून मुक्त करता येईल का?

‘खूप नर्व्हस’ असतानाही, ख्रिसने साइन अप करण्यासाठी सहमती दर्शवली.

मिलिग्रॅमपासून ते संपूर्ण दाण्यापर्यंत

डॉक्टरांच्या देखरेखीखाली, ख्रिसने दह्यासोबत शेंगदाण्याची पूड एक मिलिग्रामच्या अंशात खायला सुरुवात केली. शेंगदाण्याचं प्रमाण हळूहळू वाढवलं गेलं. ज्यामुळं ख्रिस शेंगदाण्याच्या तुकड्यापासून ते पूर्ण शेंगदाणा खाण्यास सक्षम झाला.

नऊ महिन्यांच्या या अभ्यासाच्या अखेरीस, 21 पैकी 14 रुग्ण पाच शेंगदाणे खाऊ शकले, त्यांना कोणतीही अ‍ॅलर्जी झाली नाही. यात ख्रिसचा देखील समावेश होता.

प्रोफेसर स्टीफन टिल, ज्यांनी या संशोधनाचं नेतृत्व केलं, ते म्हणतात की या उपचारामध्ये “रुग्णांच्या जीवनावर वास्तविक प्रभाव टाकण्याची क्षमता आहे”.

“सर्वात गंभीर रिअ‍ॅक्शन्स सहसा चुकांमुळे उद्भवतात, सामान्यतः दुसऱ्या कोणाच्या चुकांमुळे आणि चुकीच्या संवादामुळे. त्यामुळं ही उपचार पद्धती त्यांना त्याविरुद्ध संरक्षण देते.”

“त्यांनी आता त्यांच्या शेंगदाण्याच्या अ‍ॅलर्जीवर नियंत्रण मिळवलं आहे.”

ही पद्धत – ज्याला ‘ओरल इम्युनोथेरेपी’ असं म्हटलं जातं. हे परागकण, कीटक किंवा मधमाशांच्या डंखावरील अ‍ॅलर्जीवर कार्यक्षम असल्याचं सिद्ध झालं आहे.

ही पद्धत गेल्या 20 वर्षांपासून अन्नाच्या अ‍ॅलर्जीवर वापरली जात आहे, आणि मुख्यत: लहान मुलांमध्ये, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती अजून विकसित होत आहे. प्रौढांची अ‍ॅलर्जी बदलणं अधिक कठीण मानलं जातं.

“शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी लहान मुलांमध्ये खूप सामान्य आहे आणि ती जवळपास कधीच दूर होत नाही,” असं प्रोफेसर टिल म्हणतात.

“ही तरुण मुलं पुढे जाऊन प्रौढ बनणार आहेत, त्यामुळे आपल्याला प्रौढांसाठीही उपचारांची गरज आहे.”

‘अ‍ॅलर्जी’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या चाचणीमध्ये असं दिसून आलं आहे की गंभीर अ‍ॅलर्जी असलेल्या प्रौढ व्यक्ती शेंगदाण्याचं सहनशील प्रमाण 100 पट वाढवू शकतात.

शेंगदाणा पूड

नॉर्थहॅम्प्टनशायरमध्ये राहणाऱ्या ख्रिसला शेंगदाण्याचा अगदी थोडा अंश खाल्ला तरी त्याचं शरीर कसा प्रतिसाद देईल याची कल्पना नव्हती. दररोज स्वेच्छेनं त्या मात्रेचा वाढता डोस घेणं, ही कल्पनाही त्याच्यासाठी अशक्य वाटणारी गोष्ट होती.

“पहिल्यांदा जेव्हा मी तिथं गेलो आणि हे मिश्रण घेतलं, तेव्हा माझं हृदय अक्षरशः लाखो मैलांच्या वेगानं धडधडत होतं,” असं तो म्हणतो. “सर्वात मोठी भीती वाटली ती तेव्हा, जेव्हा शेंगदाण्याच्या काही अंश पावडरपासून ते थेट पूर्ण शेंगदाण्यापर्यंतचा टप्पा गाठणं.”

परंतु, त्याला एका गोष्टीने दिलासा मिळाला होता की, त्याच्यासोबत डॉक्टर आणि नर्सेसची एक टीम सतत उपस्थित होती. गंभीर, जीवघेणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ वापरण्यासाठी ॲड्रेनालाईनसारखी औषधंही तयार ठेवली होती.

“तुझ्यावर शंभर डोळे लक्ष ठेवून आहेत, काहीच वाईट होणार नाही.”

कोणीही घरी स्वतःहून हे करण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे गंभीर अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन होण्याचा धोका असतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

‘अद्भुत भावना’

सर्वच लोकांना या उपचारामुळे प्रतिकारक्षमता मिळाली नाही. अधिक लोकांवर मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्यानंतरच हे समजेल की, असं का झालं.

“काही लोकांमध्ये रिअॅक्शन्स होत्या आणि त्यामुळं आम्हाला गती कमी करावी लागली किंवा एक पाऊल मागं जावं लागलं,” असं प्रो. टिल स्पष्ट करतात.

“पण याचा संदेश असा आहे की, आपण प्रौढांना शेंगदाण्यांपासून प्रतिकारक्षम बनवू शकतो आणि भविष्यामध्ये त्यांच्यावर अधिक लक्ष दिलं पाहिजे.”

शेंगदाणे सुरक्षितपणे खाण्यास सक्षम असल्याने ज्यांनी भाग घेतला त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला, असं संशोधकांचं म्हणणं आहे. यामुळे त्यांना प्रवास करण्याचे स्वातंत्र्य मिळाले, बाहेर जेवताना त्यांची चिंताही कमी झाली आणि खाद्य पदार्थांबद्दलची भीती दूर झाली.

ख्रिस

फोटो स्रोत, Chris Brookes-Smith

एनएचएसवर या उपचाराला व्यावहारिक बनविणं हे आणखी एक आव्हान आहे. प्रथम, मोठ्या प्रमाणावर चाचण्या आवश्यक आहेत, ज्यामुळं हे सिद्ध होईल की हे अधिक लोकांसाठी प्रभावी ठरू शकतं.

ख्रिस आता त्याच्या नाश्त्यातील ग्रॅनोला सोबत दररोज चार शेंगदाणे खातो, जेणेकरून त्याची अॅलर्जी नियंत्रणात राहील. त्याला हे त्याच्या डॉक्टरांनी सुचवलं आहे.

त्याला या चाचणीमध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्याबद्दल तो आभार मानतो आणि त्याला आशा आहे की, गंभीर शेंगदाण्याच्या अ‍ॅलर्जी असलेल्या अनेक लोकांना देखील या उपचार पद्धतीचा फायदा होईल.

तो मान्य करतो की, त्याला अजूनही शेंगदाण्यांची चव आवडत नाही, पण तो सांगतो की, ज्यामुळं एकेकाळी माझं शरीर ‘न्यूक्लियर मेल्टडाउन’ होत होतं, आता तो पदार्थ मी खाऊ शकतो, या विचारानेच माझं जीवन बदललं आहे.

“ही एक अद्भुत भावना आहे,” असं ख्रिस म्हणतो. “मला आता मरणाची भीती वाटत नाही.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC