Home LATEST NEWS ताजी बातमी ‘शेताजवळ कॅनल, पण पाणी मिळत नाही’; जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनी काय सांगितलं?

‘शेताजवळ कॅनल, पण पाणी मिळत नाही’; जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनी काय सांगितलं?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

पालकमंत्री पंकज भोयर यांनी तुमसर तालुक्यात काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीकपाहणी केली होती. यावेळी राजेंद्र सपाटे यांनी त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला होता.

“अनेक वर्ष झाली आमच्या शेतात कॅनलचं पाणी येत नाही. बाबा फाईल देऊन देऊन थकले होते. पण, कोणी लक्षच दिलं नाही. परवा पालकमंत्र्यांनाही बोलले, पण काहीच झालं नाही. शेवटी माझ्या बाबांनी टोकाचं पाऊल उचललं. आज माझे बाबा गेले. उद्या कोणाचेही बाबा जाऊ नये.”

निकिता सपाटे ही तरुणी रडत रडत बोलत होती. निकिताचे वडील राजेंद्र सपाटे यांनी दुष्काळामुळे पीक करपल्यानं 8 ऑक्टोबरला जीवन संपवलं. ते भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील धोप या गावचे आहेत.

राजेंद्र यांच्याकडे 4 एकर शेती आहे. यामध्ये भातपीक (धान) होतं. यावर्षीही त्यांनी भातपीक लावलं. पण, पाऊस नसल्यानं ते करपलं.

त्यांच्या शेताजवळून कॅनल जातो. पण, त्याचंही पाणी त्यांनी मिळत नाही. त्यासाठी त्यांनी वारंवार प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्यानंतरही त्यांच्या मागणीकडे कोणीच लक्ष दिलं नाही, असं त्यांची मुलगी निकिता बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाली.

पालकमंत्री पंकज भोयर यांनी 3 ऑक्टोबरला भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली होती.

यावेळी धोप येथील हेच राजेंद्र सपाटे यांनी त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचला होता. त्याचा व्हीडिओ देखील समोर आला होता.

त्यात सपाटे म्हणाले होते, “पाणी भेटत नाही साहेब. आम्ही करायचं काय? आता जीव द्यायची वेळ आली आहे. माझी मुलं बाहेर शिकतात साहेब. साहेब मी लिहून देईन, पण माझ्या समस्येचं समाधान करतील का? माझ्या फाईलीच्या फाईली फेकल्या साहेब.”

तक्रारी सांगून ते पालकमंत्र्यांसमोर रडले होते. पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर 4 दिवसातच त्यांनी आपलं जीवन संपवलं.

राजेंद्र सपाटे कुटुंबासमवेत

राजेंद्र यांना मुलांच्या शिक्षणाची चिंता होती. त्यांची मुलगी निकिता नाशिकला बीएससी नर्सिंग करतेय, तर मुलगा अकोल्याला शिकतो.

यावर्षी पीक पूर्ण करपलं. आता मुलांचं शिक्षण कसं करायचं? अशी चिंता त्यांना होती, असं ग्रामस्थ सांगतात.

मुलगी निकिता सांगतेय, “बाबांचा मृत्यू झाला हे आम्हाला सांगण्यात आलं नव्हतं. फक्त तब्येत ठीक नाही असं सांगितलं होतं. मी गावी आल्यानंतर समजलं की, बाबांनी जीव दिलाय.”

“माझे बाबा नेहमी म्हणायचे की, फक्त मीच एक शेतकरी नाही की ज्याला पाणी मिळत नाही. आपल्यासारखे खूप आहेत. खूप शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.”

“आमच्या शेतात जायला नीट रस्ता सुद्धा नाही. बाबा सगळ्यांसाठी लढत होते. पण, आज माझे बाबाच गेले. उद्या कोणाचे जाऊ नये. त्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं,” अशी भावना निकिताने व्यक्त केली.

निकिताचा भाऊ वैभवला वडिलांच्या जाण्यानं धक्का बसलाय, तर निकिता आईला धीर देतेय. पण, आता पुढे शिक्षणाचं कसं होणार? याची चिंता निकिता बोलून दाखवते.

‘पालकमंत्र्यांनी वेळीच आदेश दिले असते, तर ही वेळ आली नसती’

राजेंद्र 4 एकर शेतीच्या भरवशावर कुटुंबाचा गाडा हाकायचे. पण, आता तेच नाहीत.

“आम्ही जेव्हाही पैशांसाठी फोन करत होतो. तेव्हा बाबा म्हणायचे की, पैसे पाहिजे असेल, तर 4-5 दिवसाआधी सांगायचं. इतक्यात नेहमीच असं बोलायचे. इकडून तिकडून घेऊन आम्हाला पैसे देत होते”, असं बोलून निकिता रडायला लागली.

राजेंद्र यांनी जीवन संपवल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. यावेळी पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासमोर व्यथा मांडूनही सरकारी व्यवस्थेला जाग का आली नाही? असा प्रश्न परिसरातील शेतकरी उपस्थित करत आहेत.

राजेंद्र सपाटे मुलगा वैभवबरोबर

धोप गावातील शेतकरी तुलसी मोहतुरे सांगतात, “पालकमंत्र्यांनी त्यावेळी अधिकाऱ्यांना आदेश दिले असते आणि आमच्या समस्या सुटल्या असत्या, तर आज राजेंद्रवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. त्याच्यावर 7-8 लोकांचं कर्ज होतं. सरकारनं विचार केला तर काहीही करू शकते. मृताच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी.”

यासंदर्भात आम्हील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी संपर्क केला. पण, त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC