Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, PTI
ऑगस्ट महिन्यात राज्याच्या अनेक भागांत पावसाने जवळपास दडीच मारली. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाअभावी पिकं करपू लागली, शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि दुष्काळाच्या शक्यतेची चर्चाही सुरू झाली.
अशा परिस्थितीत आता सप्टेंबर महिन्यात पाऊस परत सक्रिय होणार का, कोणत्या भागांना सर्वाधिक दिलासा मिळू शकतो आणि पुढच्या चार आठवड्यांत महाराष्ट्रात पावसाचं चित्र नेमकं कसं असेल?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस आणि संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पावसाचं स्वरूप टप्प्याटप्प्याने बदलण्याची शक्यता आहे.
पाहूया, पुढील चार आठवड्यांचा सविस्तर हवामान अंदाज आणि तुमच्या जिल्ह्यातील पावसाची शक्यता.
पुढच्या 4 आठवड्यांचा हवामान अंदाज
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
दुसरा आठवडा म्हणजे 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात पाऊस मध्यम ते सामान्य राहू शकतो.
17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या तिसऱ्या आठवड्यात मराठवाडा आणि आसपासच्या भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आणि चौथ्या आठवड्यात 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
मध्य प्रदेशच्या ईशान्य दिशेला आणि लगतच्या भागावर एक सुस्पष्ट कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे. ही हवामान प्रणाली पुढच्या 24 तासात उत्तर प्रदेशच्या दक्षिणेला आणि मध्य प्रदेशातून उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे.
त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाच्या सरी बरसण्याची चिन्हे आहेत.
कुठे कोणता अलर्ट?
आज म्हणजे 3 सप्टेंबरला विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे पावसाच्या यलो अलर्टवर आहेत. यासोबतच धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, पुणे आणि साताऱ्याचा घाट परिसर या भागांमध्ये सुध्दा तुरळक ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
फोटो स्रोत, IMD
4 तारखेला 3 तारखेच्या तुलनेने पावसाचा जोर कमी असेल. धुळे, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया विदर्भातील या तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तर, नंदूरबार, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, परभणी, सोलापूर आणि सांगली इथे तुरळक पावसाची शक्यता आहे. उर्वरीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही.
5 सप्टेंबरला नाशिक, धुळे, नंदूरबार व नांदेड या जिल्ह्यात रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. हे जिल्हे वगळता उर्वरीत महाराष्ट्रात मात्र पावसाचा कोणताही अलर्ट नाही.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना मोकळ्या जागेत किंवा झाडांखाली थांबणं टाळण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




