Home LATEST NEWS ताजी बातमी समुद्राच्या मधोमध तब्बल 16 तास अडकले वडील आणि दोन मुलं; थायलंडमध्ये नेमकं...

समुद्राच्या मधोमध तब्बल 16 तास अडकले वडील आणि दोन मुलं; थायलंडमध्ये नेमकं काय घडलं?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

या मुलांचे वडील पाण्यात तरंगत बचाव पथकाकडे बघून हात हलवताना दिसले.

थायलंडच्या समुद्रात जेट स्की उलटल्याने एक फ्रेंच कुटुंब तब्बल 16 तास अडकून पडलं होतं.

थायलंडच्या एका बेटावर फिरायला गेलेले वडील (वय वर्षे 50) आणि त्यांची दोन मुलं समुद्रात अडकली होती. अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

स्थानिक माहिती अधिकारी अमोर्न सोमचॉय यांनी एएफपीला सांगितलं, “या तिघांना वाचवण्यात आलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाले होते आणि समुद्राचं पाणी प्यायल्याने ते थकलेले दिसत होते.”

तिघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

थायलंडमध्ये कोह सामुई हा परिसर पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. हे एक बेट आहे.

बँकॉक पोस्टच्या बातमीनुसार, हे कुटुंब गुरुवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता जेट स्की घेऊन समुद्रात सफरीसाठी गेलेलं होतं. त्यांनी 45 मिनिटांसाठी ही सफारी घेतली होती. ठरलेल्या वेळेत जेट स्की परत न आल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.

यानंतर कोह सामुई आणि जवळच्या कोह फांगन परिसरात स्पीडबोट आणि अतिरिक्त जेट स्कीच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र अंधार पडल्यानंतर शोध थांबवण्यात आला. थायलंडमधील माध्यमांच्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी हे कुटुंब समुद्रात सापडलं.

एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक अधिकाऱ्यांनी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास समुद्रात अडकलेल्या या वडील आणि मुलांची ओळख पटवली.

बँकॉक पोस्टच्या बातमीनुसार, समुद्रात अडकलेल्या या मुलांच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की, मोठ्या लाटांचा तडाखा बसल्यानंतर जेट स्कीचं इंजिन बंद पडलं आणि त्यानंतर ते समुद्रात अडकले.

दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकाऱ्यांनी या कुटुंबाचा शोध घेतला आणि त्यांची सुटका केली.

बचावकार्यादरम्यानच्या व्हीडिओमध्ये एक मुलगा जेट स्कीच्या पुढच्या भागावर बसलेला दिसून आला. जेट स्कीचा मागचा भाग मात्र पाण्यात बुडालेला होता. मुलांचे वडील पाण्यात तरंगताना बचाव पथकाकडे बघून हात हलवत होते.

‘नेशन थायलंड’च्या वृत्तानुसार, या तिघांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आलं, तेव्हा त्यांची आई आणि मोठी बहीण समुद्रकिनाऱ्यावर त्यांची वाट पाहत होत्या. या घटनेनंतरही हे कुटुंब थायलंडमध्येच राहिलं आणि त्यांनी आपली सुट्टी पुढे सुरू ठेवली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी एएफपीला दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC