Home LATEST NEWS ताजी बातमी ‘समुद्र हेच आमचं घर’; अनेक महिने जहाजावर राहणाऱ्या खलाशांचं आयुष्य कसं असतं?

‘समुद्र हेच आमचं घर’; अनेक महिने जहाजावर राहणाऱ्या खलाशांचं आयुष्य कसं असतं?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

मर्चंट नेव्ही

फोटो स्रोत, N.Srinu

जगभरातील देशांमध्ये मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवर लाखो भारतीय काम करतात.

सागरी क्षेत्रात यांना ‘सीफेअरर्स’ (Seafarers) किंवा ‘मरीनर्स’ (Mariners) असं म्हटलं जातं.

सध्या जगभरातील विविध जहाजांवर सुमारे 3 लाख भारतीय खलाशी काम करत आहेत. विशेष म्हणजे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलगू भाषिक राज्यांतील लोकांची संख्या खूप मोठी आहे.

जागतिक नौदल कर्मचाऱ्यांमध्ये 17 टक्के वाटा भारतीयांचा असून जगातील प्रत्येक पाच खलाशांपैकी एक जण भारतीय आहे.

9 जून 2026 रोजी ओमानच्या किनारपट्टीजवळ ‘सेट्टेबेलो’ या व्यावसायिक जहाजावर अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाला.

यामध्ये विशाखापट्टणमचे मुख्य अभियंता पटनला सुरेश यांचाही समावेश होता. या दुर्दैवी घटनेमुळे समुद्रात काम करणाऱ्या खलाशांचे जीवन नेमकं कसं असतं यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

जागतिक व्यापाराचा कणा मानल्या जाणाऱ्या या नोकरीच्या मागे नेमके कसे आयुष्य दडलेले असते?

याविषयी बीबीसीने काही तेलगू सीफेअरर्सशी संवाद साधला. मर्चंट नेव्हीमधील नोकरी ही एखाद्या “युद्धावर जाण्यासारखीच” असते अशी प्रतिक्रिया निवृत्त सीफेअरर शावुकरी नागेश्वरराव यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केली.

नऊ महिने समुद्रातच मुक्काम

चांगला पगार, जग फिरण्याची सुवर्णसंधी, घरच्यांना आर्थिक आधार याच काही मुख्य गोष्टींमुळे अनेक तरुण या क्षेत्राकडे आकर्षित होतात.

सीफेअरर्सनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ट्रेनी म्हणून काम करताना महिन्याला 40 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपये सहज मिळतात.

मर्चंट नेव्ही

फोटो स्रोत, N.Srinu

जसजसा अनुभव वाढतो तसा हा पगार एक लाख रुपयांच्या पुढे जातो. तर काही मोठ्या पोस्टवर महिन्याला 2 लाख 35 हजार रुपयांपेक्षाही अधिक कमाई करण्याची संधी असते.

मात्र, या घसघशीत उत्पन्नासाठी एकदा जहाजावर पाऊल ठेवले की, तब्बल 6 ते 9 महिने समुद्रातच व्यतीत करावे लागतात.

समुद्र हेच त्यांचे विश्व

“सीफेअरर्ससाठी समुद्र हेच त्यांचे घर असते,” अशी प्रतिक्रिया अर्जाला चंटी यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

चंटी हे श्रीकाकुळम जिल्ह्यातील पोलाकी मंडळातील कोथारेवू या किनारी भागातील रहिवासी आहेत.

केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चंटी यांनी सांगितलं की, मर्चंट नेव्हीमधील नोकरीमुळेच ते आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या एक चांगले जीवन देऊ शकले.

एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करताना हे खलाशी अनेक आठवडे आणि महिने समुद्रातच घालवतात.

अशा परिस्थितीत बाहेरील जगात काय चाललं आहे याची माहिती मिळवण्यासाठी त्यांना पूर्णपणे इंटरनेटवरच अवलंबून राहावं लागतं.

मर्चंट नेव्ही

मर्चंट नेव्ही जहाजांवर सीफेअरर म्हणून काम करणारे अर्जाला चंटी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “बाहेर काय घडत आहे हे आम्हाला केवळ इंटरनेटच्या माध्यमातूनच समजतं. आम्ही 24 तास जहाजावरच असतो.”

बहुतांश जहाजांवर सॅटेलाईट इंटरनेटची सुविधा उपलब्ध असते. पण त्याचीही एक मर्यादा असते. सीफेअरर्सच्या म्हणण्यानुसार, अनेक कंपन्या एका महिन्यासाठी कर्मचाऱ्यांना केवळ 8 ते 20 जीबी डेटाच पुरवतात.

चंटी यांनी पुढे स्पष्ट केलं की, “म्हणूनच आम्ही इंटरनेटचा वापर अत्यंत मर्यादित आणि काळजीपूर्वक करतो. मर्यादा ओलांडून डेटा संपवला तर तो पुन्हा मिळत नाही. अत्यंत गरज असली तरीही दुसरा माणूस आपला डेटा देत नाही. त्यामुळे स्वतःच्या वाट्याला आलेला डेटा सोन्यासारखा जपावा लागतो.”

वादळे, लाटा आणि धोके

समुद्रातील जीवन म्हणजे केवळ प्रवास नसून वादळे, प्रचंड मोठ्या लाटा आणि अनपेक्षित आव्हाने या सगळ्याचा सामना करावा लागतो.

आपले अनुभव सांगताना निवृत्त सीफेअरर नागेश्वरराव यांनी आठवण करून दिली की, एकदा ते सलग 18 दिवस समुद्रातील प्रचंड लाटांच्या वेढ्यात अडकले होते.

मर्चंट नेव्ही

फोटो स्रोत, M. Vasudevarao

त्या भीषण परिस्थितीचे वर्णन करताना ते म्हणाले की, “त्या दिवसांत आम्हाला नीट जेवणही करता आले नाही. कारण जहाजावरील भांडी एका जागी स्थिर राहत नव्हती. अगदी स्वतःच्या केबिनमध्ये बसलो तरी आपण कधीही पडू अशी अवस्था झाली होती.

याविषयी बोलताना अर्जाला चंटी यांनी सांगितलं की, “आपल्या अवतीभवती अथांग समुद्राशिवाय दुसरे काहीच दिसत नसल्यामुळे मनात एक अनामिक भीती नेहमी दाटलेली असते.”

समुद्रापेक्षा जहाजच अधिक धोकादायक

धोका फक्त समुद्रातील वादळांमुळेच येतो असं नाही तर जहाजावरही अंतर्गत धोके असतात. आपले अनुभव सांगताना नागेश्वरराव यांनी आठवण करून दिली की, एकदा ते जहाजावरील एका मोठ्या टँकमध्ये कोसळले होते.

तसेच दुसऱ्या एका प्रसंगी, दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक आग लागल्याने ते अगदी थोडक्यात बचावले होते.

मर्चंट नेव्ही

फोटो स्रोत, N.Srinu

याच कारणास्तव या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी प्रत्येकाला विशेष प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये आग लागल्यास करायच्या उपाययोजना, जहाज बुडत असताना घ्यायची काळजी आणि आपत्कालीन बचाव कार्य यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा उपाययोजनांचे प्रशिक्षण घेणे प्रत्येकासाठी बंधनकारक असल्याचं त्यांनी सांगितलं.

आजारी पडल्यास काय होते?

अनेक महिने समुद्रात राहणाऱ्या सीफेअरर्सना आरोग्याच्या समस्या आल्यास विशेष व्यवस्था उपलब्ध असतात. जहाजावरील अधिकारी कंपनीच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करतात.

आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णाला हेलिकॉप्टरद्वारे हलवण्याची सोयही असते असे सीफेअरर्स सांगतात. सीफेअरर अर्जाला चंटी यांनी बीबीसीला सांगितलं की, “आमच्यासाठी कंपनीचे डॉक्टर्स असतात.

काही त्रास झाला की आम्ही जहाजावरच्या सेकंड ऑफिसरला सांगतो आणि ते लगेच कंपनीला तसा ईमेल करतात. काहीही असले तरी कंपनीला माहिती द्यावी लागते. स्वतःहून कोणताही निर्णय घेता येत नाही. अत्यंत आणीबाणीची परिस्थिती असल्यास हेलिकॉप्टर मागवले जाते. जहाजावरून जवळच्या पोर्टवर बंदरात आणले जाते आणि तिथून रुग्णालयात हलवले जाते.”

मर्चंट नेव्ही

फोटो स्रोत, N.Srinu

जगातील अनेक सागरी मार्गांवर समुद्री लुटारूंचा (पायरेट्स) धोका आजही पूर्णपणे संपलेला नाही. याबद्दल बोलताना निवृत्त सीफेअरर नागेश्वरराव म्हणाले की, “काही भागांत लुटारूंनी जहाजांवर ताबा मिळवण्यासाठी जवळ येण्याचा प्रयत्न केल्याचे प्रसंग घडले आहेत.

अशा वेळी जहाजाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाते.” विशेषतः आफ्रिकेच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या काही भागांत पूर्वी समुद्री लुटारूंचे हल्ले खूप मोठ्या प्रमाणावर व्हायचे, असे सीफेअरर्स सांगतात.

नागेश्वरराव यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्या. ते म्हणतात की, जहाजांच्या जवळ येण्यासाठी हे समुद्री लुटारू सहसा छोट्या नौका किंवा बोटींचा वापर करायचे.

निवृत्त सीफेअरर नागेश्वरराव

“अशा धोक्याच्या ठिकाणांवरून जाताना जहाजांवर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या जातात. यामध्ये डॅकच्या (जहाजाच्या वरच्या भागाच्या) सभोवताली विशेष अडथळे निर्माण करणे, 24 तास चोख देखरेख ठेवणे आणि सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात करणे यांसारख्या उपाययोजनांचा समावेश असतो. कोणताही धोका दिसताच तत्परतेने जवळच्या देशांच्या तटरक्षक दल आणि नौदलाला माहिती देणारी यंत्रणाही जहाजावर सज्ज असते. तरीही समुद्राच्या मध्यभागी एकट्याने प्रवास करताना समुद्री लुटारूंच्या धोक्याचा विचार मनात आल्यास भीती वाटणे स्वाभाविक आहे,” असे सीफेअरर्स सांगतात.

यावर निवृत्त सीफेअरर शावुकरी नागेश्वरराव यांनी स्पष्ट केलं की, “भीती नक्कीच वाटते परंतु तिथे सुरक्षा व्यवस्थाही तितकीच चोख असते.”

जहाजावरचं आयुष्य कसं असतं?

अनेक महिने समुद्रात राहावं लागत असलं तरी हे सीफेअरर्स जहाजावरच आपलं एक छोटंसं जग तयार करून राहतात. कामाची वेळ संपल्यानंतर आराम करण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा किंवा मानसिक ताण दूर करण्यासाठी जहाजावर मनोरंजनाच्या वेगवेगळ्या सोयी असतात. बऱ्याच जहाजांवर जिम, टेबल टेनिस आणि स्विमिंग पूलची सोय असते.

याशिवाय तिथे बार्बेक्यू पार्ट्या आणि लहान-सहान कार्यक्रमही आयोजित केले जातात. चंटी आणि नागेश्वरराव यांनी सांगितलं की, काही जहाजे इतकी मोठी असतात की त्यावर ते चक्क क्रिकेट मॅचेसही खेळतात.

जहाजावरच्या वातावरणाबद्दल बोलताना चंटी म्हणतात, “शिपवर प्रत्येकाला स्वतःची वेगळी केबिन मिळते. संध्याकाळी आम्ही जिममध्ये जातो. मेस रूममध्ये पार्ट्या करतो. एवढंच नाही तर दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा जहाजावर मस्त बार्बेक्यू पार्टी रंगते.”

मर्चंट नेव्ही

फोटो स्रोत, N. Srinu

रिकाम्या वेळेत हे लोक आपल्या सहकाऱ्यांसोबत गप्पा मारतात, सिनेमे पाहतात किंवा व्यायाम करून वेळ घालवतात. काही खास प्रसंगी जसे की वाढदिवस किंवा सणांचे सेलिब्रेशनही जहाजावर मोठ्या उत्साहात केले जाते.

याबद्दल सांगताना चंटी आणि नागेश्वरराव म्हणाले, “आमच्या मोठ्या शिपवर आम्ही प्रत्येक शनिवारी क्रिकेट खेळायचो. तिथे जिम, स्विमिंग पूल आणि टेबल टेनिससारख्या सगळ्या सोयी होत्या. जेव्हा प्रवास खूप मोठा असतो तेव्हा दर 15 दिवसांनी जहाजावर बार्बेक्यू पार्टी ठेवली जाते.” आजूबाजूला शेकडो किलोमीटरपर्यंत जमीन कुठेच दिसत नसली तरी या जहाजालाच ते आपले दुसरे घर मानतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मर्चंट नेव्ही

फोटो स्रोत, N. Srinu

समुद्रात कर्तव्य बजावणारा पती आणि किनाऱ्यावर वाट पाहणारे कुटुंब

समुद्रात काम करणाऱ्या माणसाचं आयुष्य जितकं खडतर असतं तितकंच किनाऱ्यावर त्यांच्यासाठी डोळे लावून बसलेल्या कुटुंबीयांचं जगही भावनांनी भरलेलं असतं.

निवृत्त सीफेअरर नागेश्वरराव यांच्या पत्नी उषाराणी यांनी जुने दिवस आठवत सांगितलं की, पूर्वीच्या काळात तर दोन-दोन महिने त्यांची काहीच खबरबात मिळायची नाही.

आता व्हिडिओ कॉल आणि इंटरनेट आल्यामुळे परिस्थिती नक्कीच सुधारली आहे. पण तरीही कुटुंबापासून इतके महिने लांब राहिल्यामुळे येणारी एकटेपणाची भावना अजूनही तशीच आहे.

उषाराणी

“घराचा मुख्य आधार असणारे पती जर घरी नसतील तर संसाराचा गाडा हाकताना खूप त्रास होतो. पण आम्ही त्या सगळ्या परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला,” असं उषाराणी यांनी सांगितलं.

उषाराणी आणि नागेश्वरराव यांनी आपल्या दोन्ही मुलांना याच क्षेत्रात आणण्यासाठी सीफेअररचे प्रशिक्षण घ्यायला लावले होते.. आज त्यांचा एक मुलगा गेल्या 7 वर्षांपासून समुद्रात नोकरी करत आहे.

तर दुसऱ्या मुलाने सीफेअरर म्हणून जॉईन केल्यावर अवघ्या 3 महिन्यांतच ती नोकरी सोडून दिली. कारण त्याला ते काम आवडले नाही आणि आता तो सॉफ्टवेअर क्षेत्रात चांगला सेटल झाला आहे.

पैसा खूप आहे, पण…

धोका, भयंकर एकटेपणा आणि अनेक महिने घराबाहेर राहणे इतके सगळे त्रास असूनही हजारो लोक या नोकरीला पसंती देतात. कारण या नोकरीमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो.

नागेश्वरराव म्हणतात, “मर्चंट नेव्हीमध्ये होतो म्हणूनच आज मी इतकं सुखी आयुष्य जगतोय.” स्वतःचं दोन मजली घर, दारात उभी असलेली कार आणि एनफिल्ड बुलेट गाडी दाखवत ते म्हणाले की, हे सगळं मर्चंट नेव्हीमुळेच शक्य झालं.

शेवटी अगदी एकाच वाक्यात त्यांनी या संपूर्ण नोकरीचं वास्तव मांडलं. ते म्हणाले की, “इथे कुटुंबापासून दूर राहावं लागतं आणि पैसा अफाट मिळतो. शेवटी या दोन्ही गोष्टींची आपल्याला सवय करून घ्यावी लागते.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC