Home LATEST NEWS ताजी बातमी सांगलीची स्मृती बनली भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार, जाणून घ्या तिचा इथपर्यंतचा...

सांगलीची स्मृती बनली भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार, जाणून घ्या तिचा इथपर्यंतचा प्रवास

6
0

Source :- BBC INDIA NEWS

स्मृती मंधाना

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू हरमनप्रीत कौर हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारामधील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यांनंतर महाराष्ट्राची लेक असलेल्या स्मृती मंधाना हिच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टीम इंडियाकडून स्मृती मंधानाकडं कर्णधारपद सोपवल्याची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली. हरमनप्रीत कौरनं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत या निर्णयाची अधिकृत घोषणा केली होती.

हरमनप्रीत कौरने आपल्या पोस्टमध्ये लिहिलेय, “आज मी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय सोपा नव्हता. यात अनेक वर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि आयुष्यभर सोबत राहणारे क्षण गुंतलेले आहेत.”

स्मृती मंधानानं यापूर्वी आयपीएलमध्ये नेतृत्वाचे गुण असल्याचं दाखवून दिलं होतं. यावर्षी झालेल्या वुमन्स आयपीएल स्पर्धेत तिच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघानं विक्रमी धावसंख्या यशस्वीपणे पार करत आपले दुसरे विजेतेपद जिंकले.

त्याशिवाय भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीतही स्मृती कामगिरी अत्यंत खास राहिली आहे. भारतानं जिंकलेल्या महिला विश्वचषकाच्या संपूर्ण स्पर्धेत स्मृतीची कामगिरी जोरदार राहिल्याचं पाहायला मिळालं.

स्मृतीच्या कर्णधारपदाच्या निमित्तानं तिच्या प्रवासावर एक नजर टाकूयात.

सांगलीची स्मृती बनली भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार

महिला विश्वचषकात जोरदार कामगिरी

नुकत्याच जिंकलेल्या महिला विश्वचषकामध्ये भारतीय संघाची आघाडीची सलामीवीर स्मृती मंधानानं जोरदार कामगिरी बजावली होती.

वन डेत एकाच वर्षात 1000 धावा करणारी स्मृती पहिली महिला फलंदाज ठरली होती.

स्मृती मंधानानं विशाखापट्टणममध्ये महिला विश्वचषकाच्या सामन्यात 80 धावांची खेळी केली आणि त्यादरम्यान हा विक्रम रचला होता.

स्मृती मंधाना

स्मृतीनं ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कचा 907 धावांचा विक्रम मोडला होता. यासह स्मृती वनडेत 5000 धावा करणारी पाचवी आणि सर्वात युवा फलंदाज ठरली आहे.

तसंच ऑस्ट्रेलियाच्या विरोधात झालेल्या कसोटीतही शतकी खेळी करत स्मृतीनं या प्रकारातही तिचं कौशल्य दाखवून दिलं होतं.

भावाच्या कपड्यांपासून बनवली जर्सी

भाऊ क्रिकेट खेळतो म्हणून स्मृतीची तिची या खेळाशी ओळख झाली. भाऊ करतोय ते आपणही करावं, असं तिला वाटू लागलं.

ती इतकी लहान होती की तिच्या मापाचे क्रिकेटचे कपडेही उपलब्ध नव्हते.भावाच्या क्रिकेट पोशाखातूनच तिच्या मापाचे कपडे आईने तयार केले. हा कस्टमाइज्ड युनिफॉर्म परिधान करून तिने बॅट हातात घेतली.

भावाची प्रॅक्टिस झाली की तिला बॅटिंग मिळत असे. दोघांचाही बॅटिंग स्टान्स एकसारखाच. जन्मगावी मुंबईत सुरू झालेलं हे वेड मंधाना कुटुंब सांगलीत स्थायिक झालं, तेव्हाही कायम राहिलं.

स्मृती मंधाना

आधी टीममधली लिंबूटिंबू खेळाडू म्हणून तिची गणना व्हायची. पण ही क्रिकेटची आवड अवखळ नाही, हे आईबाबांच्या लक्षात आलं होतं. मग इतर मुलींबरोबर क्रिकेट खेळणं सुरू झालं.

अव्वल दर्जाच्या क्रिकेटची झलक दाखवण्यासाठी म्हणून वडिलांनी मेरठमध्ये झालेल्या U19 स्पर्धेला स्मृतीला नेलं. मोठ्या वयाच्या मुलींचं क्रिकेट आणि त्यातील धोके पाहून ती क्रिकेट सोडेल, असा पालकांचा होरा होता.

पण झालं उलटंच. तिचं क्रिकेटचं वेड आणखी पक्कं झालं. आणि अभ्यासाच्या बरोबरीने सुरू झाला व्यावसायिक क्रिकेटपटू होण्याचा प्रवास.

224 धावांची मॅरेथॉन खेळी

वयाच्या अकराव्या वर्षीच महाराष्ट्राच्या U19 संघात तिची निवड झाली. मात्र अंतिम अकरात खेळायला मिळेल, या प्रतीक्षेतच दोन वर्ष गेली.

खेळायला मिळालं. मात्र त्याचवेळी तिच्यासमोर दोन पर्याय होते. सायन्समध्ये करिअर किंवा क्रिकेट. सायन्सकडे वळलं तर क्रिकेटला वेळ मिळणार नाही याची जाणीव आईला होती. स्मृतीने क्रिकेटची निवड केली आणि भारतीय महिला क्रिकेट संघाला युवा तारा मिळाला.

त्याच वर्षी बडोदा इथं महिला आंतरराज्य U19 क्रिकेट स्पर्धेत स्मृतीने गुजरात संघाविरुद्ध 224 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.

स्मृती मानधना

या खेळीने स्मृतीचं नाव क्रिकेटवर्तुळात चमकलं. हाच सूर अन्य दोन स्पर्धांमध्ये कायम राखत स्मृतीने चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात स्थान पटकावलं.

मोठ्या शहरातील समकालीन खेळाडू चांगल्या मैदानांवर, उत्तम सोयीसुविधांसह सराव करत असताना स्मृती सांगलीत काँक्रीट पिचवर अनंत तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती.

सकाळी सराव, मग शाळा आणि संध्याकाळी पुन्हा सराव, हे शिस्तबद्ध आयुष्य स्मृती शालेय वर्षांमध्ये जगली.

या सगळ्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे 2013 मध्ये भारतीय संघात तिची पहिल्यांदा निवड झाली.

क्रिकेटसाठी बारावीची परीक्षा बुडाली

2014 मध्ये ICC महिला T20 म्हणजेच महिला क्रिकेटच्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकपसाठी स्मृतीची भारतीय संघात निवड झाली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्मृतीला बारावीची परीक्षा सोडावी लागली.

वर्ल्डकपनंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर जायचं असल्याने स्मृतीचं अभ्यासाचं अख्खं वर्ष जाणार होतं. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम तिला खुणावत होता, मात्र इंग्लंड दौऱ्यात तिला करिअरची रेसिपी गवसली.

भारतीय महिला संघाने इंग्लंड दौऱ्यात टेस्ट मॅच जिंकली. आठ वर्षांनंतर भारतीय महिला संघाने हा पराक्रम केला होता. या टेस्टमध्ये स्मृतीने अर्धशतक झळकावत नैपुण्याची झलक सादर केली.

स्मृती मंधाना

दोन वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्मृतीने होबार्ट इथं खणखणीत शतक झळकावलं. 2017 मध्ये झालेल्या वर्ल्डकपपूर्वी स्मृती गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे पाच महिने क्रिकेटपासून दूर होती. ती वर्ल्डकप खेळू शकणार का, याविषयी साशंकता होती.

मात्र फिजिओंच्या मार्गदर्शनाखाली तिने पुनरागमनसाठी कठोर मेहनत घेतली. मात्र तरीही तिला वर्ल्ड कप क्वॉलिफायर आणि चौरंगी मालिकेत खेळता आलं नाही.

वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत, दमदार संघाविरुद्ध थेट उतरण्याचं धाडस स्मृतीने दाखवलं. पहिल्याच मॅचमध्ये यजमान इंग्लंडविरुद्ध स्मृतीने 90 धावांची दिमाखदार खेळी साकारली.

पाच दिवसांनंतर स्मृतीने वेस्ट इंडिजच्या दर्जेदार माऱ्यासमोर खेळताना 106 धावांची सुरेख खेळी साकारली. भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली, मात्र जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली. या स्पर्धेतील प्रदर्शनाने स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठामपणे स्वत:चं स्थान निर्माण केलं.

स्मृती मंधाना

भारतात परतल्यानंतर स्मृतीसह भारतीय महिला संघाच्या खेळाचं यथोचित कौतुक झालं. या स्पर्धेच्या निमित्ताने महिला क्रिकेटचे सामने टीव्हीवर पाहण्यासाठी उत्साह पाहायला मिळाला.

सातत्यपूर्ण खेळासह टेस्ट आणि वनडे संघात स्थिरावलेली स्मृती हळूहळू ट्वेन्टी-20 संघाचा अविभाज्य भाग झाली.

क्रिकेट समजायला लागलं, तेव्हा स्मृतीला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनसारखं खेळायचं होतं.

क्रिकेटमध्ये मोठं होत असताना तिच्या स्वप्नातल्या हेडनची जागा श्रीलंकेच्या कुमार संगकाराने घेतली. कदाचित म्हणूनच संगकाराच्या खेळात असलेला आक्रमकता आणि नजाकत यांचा सुरेख मिलाफ स्मृतीच्या बॅटिंगमध्ये अनुभवायला मिळतो.

सांगलीशी नाळ कायम

स्पर्धांच्या निमित्ताने देशविदेशात संचार करणाऱ्या स्मृतीची सांगलीशी नाळ तुटलेली नाही.

सांगलीतली प्रसिद्ध संभा भेळ तिला प्रचंड आवडते. चीज गार्लिक ब्रेड आणि वडापाव हेही तिला खुणावतात, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं असल्याने डायटची कठोर बंधनं तिला पाळावी लागतात. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया कार्यक्रम ती आवर्जून पाहते.

तंत्रशुद्ध फलंदाजीचा आधारस्तंभ आणि खेळाडू म्हणून कारकीर्दीनंतर प्रशिक्षक या नात्याने युवा खेळाडूंची फौज घडवणाऱ्या राहुल द्रविड यांनी स्वाक्षरी केलेली बॅट स्मृतीच्या किटचा भाग बनली.

स्मृती मंधाना

स्मृतीच्या भावाला द्रविड यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आठवणीने बहिणीसाठी द्रविड यांच्याकडून बॅटवर स्वाक्षरी घेतली. स्मृतीने याच बॅटने द्विशतक झळकावलं. पुढची अनेक वर्ष स्मृती याच बॅटने खेळत होती. चारवेळा दुरुस्ती झालेली ही बॅट आता स्मृतीच्या घरी दिमाखात विराजमान आहे.

भाऊ क्रिकेट खेळतो, त्याचे फोटो पेपरमध्ये येतात अशी तक्रार स्मृती करायची असं तिचे आईबाबा सांगतात. गेल्या काही वर्षात स्मृतीच्या बातम्यांनी पेपरचे रकाने भरून गेले आहेत.

स्मृतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यपूर्ण प्रदर्शनासह ठसा उमटवायचा आहे असं तिचे वडील श्रीनिवास यांनी बीबीसीला सांगितलं. आयसीसी पुरस्कारासाठी स्मृतीची निवड झाली तो अत्यंत अभिमानाचा क्षण होता. स्मृतीने असंच खेळत राहावं आणि देशाला वर्ल्डकप जिंकून द्यावा असं स्मृतीच्या आईने सांगितलं.

स्मृती आणि पलाशच्या लग्नाचा वाद

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं नातं चांगलंच चर्चेत होतं. त्यांचा विवाह ठरला होता पण ऐनवेळी विवाह सोहळा तूर्त रद्द करण्यात आल्याची माहिती लग्नाच्या दिवशी अचानक देण्यात आली होती.

स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांची तब्येत बिघडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल याच्यासोबत स्मृतीचा विवाह 23 नोव्हेंबरला साडेचार वाजता पार पडणार होता. त्यासाठी सांगलीतील समडोळमधील मंधाना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारीही सुरू होती. या दरम्यानच त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडली.

त्यानंतर, तूर्तास लग्न सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती या लग्नाचं नियोजन पाहणारे तोहीन मिश्रा यांनी दिली होती.

स्मृती आणि पलाश

स्मृती मंधानानं याबाबत बोलताना म्हटलं होतं की, “मला हा विषय इथेच संपवायला आवडेल आणि तुम्हीही तसंच करावं असं मला वाटतं. दोन्ही कुटुंबांचा खासगीपणा जपाल आणि आम्हाला आमच्या गतीनं यातून बाहेर पडण्यासाठी वेळ द्याल अशी विनंती करते.”

तर संगीतकार पलाश मुच्छल यांनी त्यांचं लग्न मोडल्यानंतर, “हा माझ्या आयुष्यातला अतिशय कठीण काळ आहे आणि मी माझ्या तत्वांना धरून त्यातून मार्ग काढेन. मला आशा आहे की एक समाज म्हणून आपण कुणाविषयी मत बनवण्यापूर्वी थोडं थांबायला शिकू. आपले शब्द कल्पनाही करता येणार नाही, अशा वेदना निर्माण करू शकतात”, असं म्हटलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC