Source :- BBC INDIA NEWS

सुलोचनाबाई डोंगरे

फोटो स्रोत, BBC/Puneet Barnala

(एप्रिल महिना हा दलित हिस्ट्री मंथ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने बीबीसी मराठी आंबेडकरी विचार आणि दलित इतिहासांचा मागोवा घेत आहे. या लेखात आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या सुलोचनाबाई डोंगरे यांचे सामाजिक योगदान आपण पाहणार आहोत.)

“पूर्वी आपणास नेता नव्हता. परंतु आता डॉ. आंबेडकरांसारखा नेता लाभला हे आपले भाग्य आहे. ते आकाशपाताळ एक करून अस्पृश्यतेचा राक्षस नष्ट करू पाहात आहेत. या कठीण कामात त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.”

1942 च्या जुलै महिन्यात नागपूरमध्ये झालेल्या ‘अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट महिला परिषदे’च्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेल्या सुलोचनाबाई डोंगरे. त्यांचं भाषण सुरू झालं.

स्वातंत्र्यासाठी उठावाचा तो काळ होता, पण अखिल भारतीय महिला परिषदेतल्या दलित महिलांसोबत भेदभाव झाला आणि त्या वागणुकीचा निषेध करत तयार झालेल्या या नव्या महिला परिषदेसाठी हा काळ समतेसाठीच्या टोकदार लढ्याचा होता.

अस्पृश्यांची स्वतंत्र राजकीय संघटना असावी या हेतूने अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना या तीन दिवसांच्या अधिवेशनात झाली. पहिल्या दिवशी फेडरेशनची परिषद रावबहादूर एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यासाठी देशभरातून आलेले 70 हजार लोक उपस्थित होते.

दुसरा दिवस महिला अधिवेशनाचा होता. अध्यक्ष सुलोचनाबाई व्यासपीठावर पुढे आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत हे अधिवेशन होत होतं. भारतभरातून जवळपास 25 हजार महिला प्रतिनिधी या अधिवेशनाला आल्या होत्या.

सुलोचनाबाई डोंगरे

फोटो स्रोत, Maharashtra Government Press

समोर हजारोंच्या संख्येनी जमलेल्या समुदायासमोर त्या म्हणाल्या, “शिक्षणाच्या बाबतीत आपण खूप मागासलेले आहोत. आजची बालिका उद्याची माता आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणून मुलींना शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. मुलांचे संगोपन कसे करावे हे मुलीला आले पाहिजे. शिक्षण नसले तर सद्गुणाचा विकास शक्य नाही. धार्मिक बाबतीत आपण हिंदू धर्माच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

“सर्व जिल्हा-तालुका लोकल बोर्डात आमच्या स्त्रियांना प्रतिनिधित्व हवे. एकूण 20 आमदारांत अनेक अशिक्षित आहेत, यापैकी काही जागा आमच्या सुशिक्षित स्त्रियांना दिल्या असत्या तर आमची सुधारणा करता आली असती.”

अशिक्षित आणि मजूर स्त्रियांच्या परिस्थितीचे वर्णन करुन स्त्रियांना विशिष्ठ परिस्थितीत घटस्फोट करण्याचा अधिकार असावा, बहुपत्नीकत्वास कायद्याने प्रतिबंध करावा, कुटुंब नियोजनाचा दलित स्त्रियांनी स्वीकार करावा. अस्पृश्य स्त्री शिक्षणासाठी सर्वत्र महिला वसतिगृहे काढण्यात यावीत, असे मुद्दे त्यांनी मांडले.

अधिवेशनातले ठराव

या अधिवेशनात मंजूर झालेल्या ठरावांमधील काही मुद्दे आजच्या काळाशीही सुसंगत वाटतात.

सरकारने घटस्फोटाचा कायदा करावा, बहुपत्नीकत्वाची पद्धत कायद्याने बंद करावी, मजूर आणि कष्टकरी स्त्रियांच्या हक्कांविषयी धोरण आखण्याची मागणी या महिलांनी केली. स्वतंत्र भारतात सरकारने यावर कायदे केलेले दिसतात.

कामगार महिलांच्या हक्कांसाठीचे ठरावही यात होते.

“हिंदुस्थानातील गिरणी मजूर स्त्रिया, विडी मजूर स्त्रिया, म्युनिसिपल व रेल्वे कामगार स्त्रिया यांना त्यांच्या कारखान्यात काम करत असताना, इतर नोकरांना ज्याप्रमाणे वर्षातून एकवीस दिवसांची किरकोळ रजा व एक महिन्याची हक्काची पगारी रजा; काम करत असताना, दुखापत झाल्यास वाजवी नुकसान भरपाई मिळावी.

तसेच, वीस वर्षे नोकरी झाल्यानंतर कमीत कमी दरमहा पंधरा रुपये पेन्शन त्या संस्थेकडून देववण्याची योजना कायद्याने करण्याची तरतूद असावी अशी आग्रहाची विनंती ही परिषद नामदार व्हाईसरॉय यांच्या कार्यकारी मंडळातील नेक नामदार मजूरमंत्री यांना करते.”

सरकारने ठिकठिकाणी मुलींसाठी वसतिगृह बांधावे, अस्पृश्य वर्गातील मुलींना शिष्यवृत्ती जाहीर करावी, तसेच महिलांसाठी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना अंमलात आणावी या मागण्या ठरावांमधून केल्या.

ठरावांमध्ये कष्टकरी महिलांच्या सुरक्षेविषयीही महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला. ‘गिरण्यांत काम करणाऱ्या स्त्री कामगारांवर देखरेख करण्याकरता पुरुष नेमले जात असल्याने अनेक प्रसंगी महिलांना अत्याचार व जुलूम सोसावे लागतात. म्हणून गिरण्या किंवा इतरत्र गटाने काम करणाऱ्या स्त्री कामगारांवर देखरेख करण्यासाठी स्त्री कामगारच नेमले जातील अशी तजबीज सरकारने कायद्याने करावी अशी मध्यवर्ती सरकारास विनंती.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, Dhananjay Keer

आजही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची काहीशी हीच स्थिती आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून कायद्याची तरतूद केलेली आहे. पण असंघटित क्षेत्र सोडा, संघटित क्षेत्रातील कार्यालयांमध्ये पूर्णपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.

‘डॉ. आंबेडकरांनांही वाटले महिलांचे कौतुक’

डॉ. आंबेडकरांच्या संघटनेचे कार्यकर्ते राजकीयदृष्ट्या किती प्रगल्भ होते याची झलक या ठरावांवरुन येते.

बाबासाहेबांचा सहवास लाभलेले बळवंत हणमंतराव वराळे आपल्या ‘डॉ. आंबेडकरांचा सांगाती’ या पुस्तकात लिहितात- “महिला परिषदेच्या अध्यक्षा सुलोचनाबाई डोंगरे ह्या अत्यंत मनमिळावू व कर्तव्यदक्ष अशा होत्या. सभेच्या पहिल्याच दिवशी महिला सभेची व्यवस्था करीत असताना, महिला सभेचे ठराव लिहून काढण्यासाठी इतर महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्व रात्र जागत असताना त्यांना मी पाहिले. ज्या हॉलमध्ये आमची राहण्याची सोय केली होती त्या हॉलच्या कोपऱ्यात बसून बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे या सर्व महिला आपल्या परिषदेचा आराखडा तयार करीत होत्या.

“स्त्रियांच्या मनातदेखील समाजाच्या चळवळीची व समाजाच्या उद्धाराची जागृती निर्माण झालेली पाहून कोणालाही त्या वेळी एक प्रकारचे समाधान व कौतुक वाटले असेल.”

महिला कार्यकर्त्यांसोबत बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, Vijay Surwade’s collection

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तर या परिषदेतील महिलांचे कौतुकच वाटलं, त्यांच्या भाषणातून अधोरेखित होतं.

बाबासाहेबांचं या महिला परिषदेतलं भाषण ऐकायला सगळे उत्सुक होते. “दलित वर्गाच्या प्रगतीची व कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या माणसाला हा स्त्रियांचा समुदाय पाहून जेवढा आनंद होईल त्यापेक्षा अधिक आनंद दुसऱ्या कोणत्याही प्रसंगी होणार नाही. तुम्ही इतक्या संख्येने येथे उपस्थित राहाल ही गोष्ट 10 वर्षांपूर्वी कल्पना करण्यासारखी नव्हती.

“स्त्रियांच्या संघटनेवर विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात, हे मी जाणतो.

“दलित वर्गामध्ये काम करण्यास जेव्हापासून मी सुरूवात केली तेव्हापासून पुरुषांसोबत स्त्रियाही सहभागी झालेल्या दिसतात. म्हणूनच आपल्या परिषदा मिश्र परिषदा आहेत. स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरुन एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असतो,” असे डॉ. आंबेडकर या प्रसंगी म्हणाले होते.

दलित स्त्रियांच्या चळवळीला 1942 साली प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर दलित स्त्रियांच्या स्वतंत्र सभा होऊ लागल्या. संघटनेच्या माध्यमातून राजकीय सत्तेसाठीचा महिलांचा प्रवास सुरू झाला.

‘आम्हीही इतिहास घडवला’

सुलोचनाबाईंबाबत फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीचं एक छोटेखानी प्रकरण लेखिका उर्मिला पवार आणि मिनाक्षी मून यांनी ‘आम्हीही इतिहास घडवला’ या पुस्तकात लिहिलं आहे. हे पुस्तक आंबेडकरी चळवळीत स्त्रियांच्या सहभागावर प्रकाश टाकतं.

सुलोचनाबाईंच्या राजकीय जडणघडणीची सुरुवात घरापासूनच झाली. त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1919 साली यवतमाळ जिल्ह्यातल्या नागापूर खेडेगावात बनसोडे पाटील कुटुंबात झाला. वडील सधन शेतकरी होते.

घरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा राबता असल्याने साहजिकच वातावरण भारावलेलं होतं. वडिलांना गोरगरिबांसाठी मदत करताना त्या लहानपणापासून पाहात होत्या.

राजकीय सभा, बैठका पाहात, चर्चा ऐकत त्या मोठ्या होत होत्या. नागापुरे गावात शाळा नव्हती म्हणून त्याचं शिक्षण इंदोरच्या मामांकडे म्हणजे जी. डी. बोरकर यांच्याकडे झालं. बोरकर हे ब्राम्हो-सोशलिस्ट या सुधारणावादी चळवळीचे अनुयायी होते. शालेय शिक्षणासोबत सुलोचनाबाईंवर नकळतपणे या विचारांच्या उच्चवर्गातल्या लोकांशीही ओळख होत होती.

महिला चळवळीचा महत्वाचा दस्तावेज असणारं पुस्तक

फोटो स्रोत, Sugava Publication, Pune

त्या काळाच्या प्रथेप्रमाणे आठवीत शिकत असताना त्यांचा विवाह सदाशिव डोंगरे यांच्याशी 1934 मध्ये झाला. पुढे शिकण्याची इच्छा असल्याने सासरकडून सुलोचनाबाईंना कसलीच आडकाठी नव्हती. पती फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते तर सुलोचनाबाईंनी मॅट्रिकनंतर नागपूरमध्ये शिक्षण सुरू ठेवलं.

नागपूरमधील गोकुळ पेठेतल्या ‘डिप्रेस्ड क्लासेस गर्ल्स होस्टेल’चं काम त्यांनी पाहिलं. तथाकथित उच्च वर्गाकडून अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मुलींची मदत करीत. शिक्षणासाठी प्रोत्साहन देत. बाबासाहेबांच्या सभा-कार्यक्रमांना जात. सामाजिक कार्यात सहभाग वाढला तसं त्यांचं नेतृत्वही ठसठशीतपणे पुढे येऊ लागलं.

मिनाक्षी मून आणि उर्मिला पवार लिहितात- “सुलोचना या दिसण्यास नाजूक, देखण्या होत्या. त्यांची राहणीही चांगली होती. त्यांचे पती रिक्रुटिंग ऑफिसर होते. त्यांचे भाऊ जयराम बनसोडे हे ‘समता सैनिक दला’मध्ये कार्य करत असत. सुलोचना यांना दोन मुली व एक मुलगा. त्यांची घरसंसार सांभाळून सामाजिक कार्य करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल.

त्या सामाजिक कार्यकर्त्या आणि पहिल्या दलित मुख्याध्यापक जाई चौधरी ह्यांच्यासोबत सभा-भाषणांना जात असत. “त्यांचे विचार भाषणात कणखरपणे स्पष्टपणे मांडत. त्यांचा प्रभाव श्रोत्यांवर पडत असे. सुलोचना यांची वृत्ती परोपकारी, स्वावलंबी व स्वाभिमानी होती. त्यांच्यामध्ये बाबांच्या चळवळीच्या कार्यात पडून आत्मविश्वास निर्माण झाला होता व बाबांच्या कानावर त्यांची कीर्ती पोचली होती. म्हणूनच त्यांना 1942 मध्ये अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले.”

अधिवेशनाच्या भाषणांनंतर सुलोचनाबाईंना अनेक ठिकांणाहून सभेची आमंत्रणं येऊ लागली. सुलोचना यांची भाषणे समाजप्रबोधन करणारी असत. त्या कानपूर महिला अधिवेशनासाठी 1944 साली गेल्या होत्या.

1945 मध्ये दोन दिवसांच्या अल्पशा आजारानंतर त्यांचं निधन झालं, तेव्हा त्याचं वय अवघं 26 होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC