Source :- BBC INDIA NEWS
22 मिनिटांपूर्वी
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूनं हल्ला झाला. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास घरात शिरलेल्या चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात त्याला दुखापत झाली आहे.
सध्या सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरा हा हल्ला झाला. त्यावेळी सैफबरोबरच त्याचे कुटुंबीयही घरात होते. सैफव्यतिरिक्त इतर सर्वजण सुरक्षित आहेत.
सैफ अली खानच्या कुटुंबाने त्याचं आयुष्य आणि कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पटौदी कुटुंबात जन्मलेला सैफ कायम शाही थाटात जगला आणि त्यामुळं त्याच्याभोवती कायम एक ग्लॅमरही राहिलं.
सैफ अली खानची आई शर्मिला टागोर प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तर त्याचे वडील मन्सूर अली खान पटौदी हे स्टार क्रिकेटपटू होते. दोघांचाही सैफच्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला.
राजकारण, धर्म आणि वैयक्तिक आयुष्याबाबत उघडपणे बोलणाऱ्या कलाकारांमध्ये सैफ अली खानचं नाव घेतलं जातं.
बॉलिवूडचा ‘छोटे नवाब’
सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान हे प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू होते. तसंच ते पटौदी घराण्याचे वारसही होते. त्याची आई शर्मिला टागोर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीबरोबरच नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या नातेवाईक आहेत.
स्वातंत्र्यानंतरही, मन्सूर अली खान यांना 1971 पर्यंत ब्रिटिश काळातील पटौदी संस्थानाचे नवाब ही पदवी कायम ठेवण्याची परवानगी होती. यानंतर भारत सरकारनं सर्व संस्थानं खालसा केली.
पटौदी कुटुंबाचा इतिहास 200 वर्षांहून अधिक जुना आहे. गुरुग्रामपासून सुमारे 30-35 किलोमीटर अंतरावर पटौदीमध्ये बांधलेला पांढरा महाल पटौदी कुटुंबाचं प्रतिक म्हणून ओळखला जातो.
2011 साली मन्सूर अली खान यांचं निधन झालं. त्यानंतर हरियाणाच्या पटौदी गावात सैफ अली खानला गादीवर बसवण्यात आलं. सैफ अली खान हा पटौदीचा दहावा नवाब ठरला.
सैफ आता पटौदी कुटुंबाचा ‘नवाब’ आहे. हे औपचारिक पद नसलं तरी सैफला बॉलिवूडमध्ये ‘छोटे नवाब’ म्हटलं जातं.
शर्मिला टागोर यांचा प्रभाव
1960 च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेल्या मन्सूर अली खान पटौदी यांनी भारतासाठी 47 कसोटी सामने खेळले. 40 सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं.
मन्सूर अली खान पटौदी यांना वयाच्या 21 व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनवलं गेलं. त्यांचे वडील, म्हणजेच सैफ अली खान यांचे आजोबा, इफ्तिखार अली खान पटौदी हे स्वातंत्र्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचे सदस्य होते.
पाकिस्तानच्या सैन्यात सेवा बजावलेले मेजर जनरल शेर अली खान पटौदी हे सैफ अली खानचे नातेवाईक आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान हेही सैफ अली खानचे नातेवाईक होते.
मन्सूर अली खान यांनी 27 डिसेंबर 1969 रोजी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केले. सैफ अली खानचा जन्म 16 ऑगस्ट 1970 रोजी झाला. त्याचं बालपण क्रिकेट आणि चित्रपटांच्या सहवासात गेलं.
हिमाचल प्रदेशातील द लॉरेन्स स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतलेल्या सैफ अली खानने इंग्लंडमधील विंचेस्टर कॉलेजमध्येही शिक्षण घेतलं.
द ग्रेट इंडियन कपिल शो-2 च्या एका भागात, सैफ अली खानने दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा असूनही क्रिकेटला करिअर न बनवण्याबद्दल भाष्य केलं होतं.
सैफची आई शर्मिला टागोर यांच्यामुळे तो क्रिकेटपटू झाला नसल्याचं त्यानं सांगितलं. शर्मिला टागोर यांनी आराधना, अमर प्रेम असे अनेक उत्तम चित्रपट केले होते.
सैफ म्हणाला होता की, “मला आई शर्मिला टागोरकडून अभिनयाचे गुण वारशाने मिळाले आहेत.”
वडील मन्सूर अली खान पटौदी यांच्या क्रिकेट करिअरचा आदर करत असल्याचं तो म्हणाला. पण, त्याची आई शर्मिला टागोर यांचा चित्रपटसृष्टीवरील प्रभाव एवढा होता की, त्याला त्यामुळे अभिनयाची आवड निर्माण झाली.
याआधीही सैफने म्हटले होते की, तो क्रिकेटकडे गेला नाही कारण त्याला वाटत होते की तो त्याच्या वडिलांसारखा खेळू शकत नाही.
कारकिर्दीतील चढ-उतार
चित्रपटांमध्ये सुमारे तीन दशकांहून अधिक काळ काम केलेल्या सैफ अली खानने अनेक चढ-उत्तर बघितले आहेत. ‘परंपरा’ या चित्रपटातून 1993 मध्ये सैफने पदार्पण केलं. मात्र पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही.
त्यानंतर सैफला अनेक फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला. ‘आशिक आवारा’ चित्रपटात त्याने केलेल्या अभिनयाचं कौतुक झालं आणि त्यानंतर त्याला फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं.
सैफ अली खानच्या अभिनय क्षमतेवर अनेकांनी शंकाही व्यक्त केल्या होत्या.
एका मुलाखतीत सैफला विचारण्यात आलं की, त्याच्या आई-वडिलांनाही लहान वयात यश मिळाले पण त्याला स्वतःला यशासाठी खूप संघर्ष करावा लागला.
यावर सैफ म्हणाला होता, “याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण मला वाटतं प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो. मला किमान माहिती आहे की, मी योग्य काम निवडलं आहे. काम करताना मला खूप मजा येते. मला यश मिळेल की, मी अपयशी होईल हे माहीत नाही. पण मला आशा आहे की, हा योग्य निर्णय आहे आणि सध्या मी खूप आनंदी आहे.”
हळूहळू सैफ अली खानने चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली. त्याने अभिनयाचे अनेक मार्ग धुंडाळले.
नव्वदच्या दशकात तो रोमँटिक अॅक्शन हिरो म्हणून चित्रपटांमध्ये दिसला. 2000 नंतर त्याने दाखवून दिले की, तो विनोदी भूमिकाही करू शकतो. 2001 मध्ये ‘दिल चाहता है’ मध्ये त्याने स्वतःला पूर्णपणे सिद्ध केलं.
हा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण मिळालं.
2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओमकारा’ चित्रपटातील सैफ अली खानच्या अभिनयाने त्याला गंभीर कलाकारांच्या यादीत स्थान मिळवून दिलं. सैफने सिद्ध केलं की, तो विनोदासोबतच गंभीर भूमिकाही करू शकतो.
पण, यानंतर त्याने हमशकल्स आणि हॅपी एंडिंग्ज सारखे चित्रपट केल्यान त्याला खूप टीकेचा सामनाही करावा लागला.
तो काही काळ चित्रपटांपासून दूर राहिला आणि नंतर ‘रंगून’ चित्रपटातून त्याने पुनरागमन केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही पण सैफला कौतुकाची थाप मिळाली.
त्यानंतर 2018 मध्ये, सैफ अली खाननं सेक्रेड गेम्स या वेब सिरीजमध्ये पदार्पण केलं. त्यानं केलेल्या पोलीस अधिकारी सरताज सिंगच्या भूमिकेचं कौतुक झालं.
स्पष्टवक्ता सैफ
सैफ अली खान स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. त्यानं अनेकदा अध्यात्मिक भूमिका मांडली आहे. 2021 मध्ये, सैफ अली खानचा ‘भूत पोलीस’ चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा त्यानं तो चित्रपट आध्यात्मिक आहे पण धार्मिक नाही, असं म्हटलं होतं.
तो म्हणाला, “मला धर्माचा खूप जास्त त्रास होतो.”
देव आणि भूतांबद्दल बोलताना, सैफ अली खान म्हणाला होता की, “प्रत्यक्ष आयुष्यात मी नास्तिक आहे. मी धर्मनिरपेक्ष आहे कारण धर्म मला जास्त त्रास देतो. धर्म जगण्यापेक्षा मृत्यूवर जास्त भर देतो म्हणून मला धर्म ही संकल्पनाच आवडत नाही.”
“मला वाटतं की धर्माचा अतिरेक हा एका संघटनेसारखा असतो, आणि यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कुणाचा देव श्रेष्ठ यावरून अनेकजण वाद घालत बसतात.”
सैफ म्हणाला होता, “मी प्रार्थना करतो आणि माझी ऊर्जा माझ्या कामावर केंद्रीत करतो. मी अधिक आध्यात्मिक आहे.”
2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या आदिपुरुष चित्रपटातील त्याच्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला होता. तसंच तांडव या वेब सीरिजमधल्या त्याच्या पत्रावरूनही वाद निर्माण झाला होता. सैफ अली खाननं आदिपुरुष चित्रपटात लंकेश्वर (रावण)ची भूमिका साकारली होती, ती अनेकांना आवडली नव्हती.
वैयक्तिक आयुष्यावरही रंगल्या चर्चा
सैफ अली खानने 1991 मध्ये अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केलं होतं. त्यावेळी अमृता त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. त्यामुळं या लग्नाची खूप चर्चा झाली.
पण 13 वर्षांनंतर, 2004 मध्ये यादोघांचा घटस्फोट झाला. 2012 मध्ये सैफने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केले.
2016 मध्ये करीना आणि सैफ यांना पहिला मुलगा तैमूर अली खान झाला. हे नाव माध्यमांना कळताच मोठा वाद निर्माण झाला. या नावाला विरोध करणारे म्हणत होते की, एका आक्रमण करणाऱ्या विदेशी शासकाचं हे नाव आहे.
मात्र, जेव्हा सैफला या वादाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, “मला हे नाव आवडलं. मी या नावाच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल जास्त विचार केला नाही.”
अलिकडेच सैफनं कपूर कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत, पंतप्रधान मोदींनी तिसऱ्या पिढीतील सदस्यांना का आणलं नाही, असं त्याला विचारलं होतं?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC