Source :- BBC INDIA NEWS
AFP via Getty Images
वाचन वेळ: 5 मिनिटे
जगातील विविध शेअर बाजारांमध्ये विक्रीचा दबाव आणि कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 117 डॉलरपर्यंत पोहोचल्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी सोनं आणि चांदीच्या किमतींवर त्याचा परिणाम दिसून आला.
देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव प्रति किलोसाठी दोन लाख रुपयांनी खाली घसरला.
जागतिक बाजारात कॉमेक्सवर सोन्याचा फ्युचर्स भाव सुमारे 4,030 डॉलर प्रति औंस, तर चांदी सुमारे 54 डॉलर प्रति औंस अशा दराने व्यवहार सुरू होते.
देशांतर्गत बाजारात मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा फ्युचर्स भाव सुमारे 1,42,300 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा फ्युचर्स भाव सुमारे 1,96,000 रुपये प्रति किलो अशा दराने व्यवहार होत होते.
सलग दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे.
ब्लूमबर्गशी बोलताना टीडी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी रणनीतिकार रायन मॅके म्हणाले, “तेलाच्या किमती, व्याजदर आणि फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेबाबतच्या चिंतांचा दबाव सोन्यावर आहे. त्याशिवाय बाजारातील गुंतवणुकीचा कलही नकारात्मक आहे.”
ब्लूमबर्ग मधील माहितीनुसार, “मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये या आठवड्यात सुमारे चार टक्के घसरण होण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरुवातीपासूनची ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरू शकते. मॅके यांच्या मते, सध्या जोखीम टाळण्यासाठी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या व्यापक विक्रीमुळे सोन्यावर परिणाम झाला आहे.”
त्यांच्या मते, “मध्य-पूर्वेतील नव्या तणावामुळे ऊर्जेच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. तर कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समधून पैसा बाहेर पडत असल्यानं गुंतवणूकदार अमेरिकन बाँडकडे वळत आहेत. त्यामुळे अमेरिकन ट्रेझरी बाँडवरील परतावा वाढला आहे आणि त्यामुळे सोन्यावरचा ताण वाढला आहे. साधारणपणे बाँडवरील परतावा वाढला की सोन्याच्या किमती कमकुवत होतात.”
Getty Images
ईटीएफमध्ये मात्र सोन्याची खरेदी कायम
बाजाराच्या एका विभागात मात्र सोन्यावर तितका परिणाम दिसून आलेला नाही. तो विभाग म्हणजे एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मधील सोन्याचं होल्डिंग.
ब्लूमबर्ग ज्या गोल्ड ईटीएफवर लक्ष ठेवते, त्यामध्ये सलग 14 आठवड्यांपासून सोन्याची आवक होत आहे. सोन्याच्या किमती घसरत असताना दिसणारा हा कल त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
सॅक्सो बँक ए/एसमधील कमोडिटी रणनीती प्रमुख ओले हान्सेन लिहितात, “दीर्घकालीन गुंतवणूकदार भूराजकीय जोखमींपासून तसेच चलनाची क्रयशक्ती घटण्याच्या धोक्यापासून रक्षण करण्यासाठी ईटीएफच्या माध्यमातून सोन्याची खरेदी सुरू ठेवत आहेत.”
चांदीच्या किमतींमध्ये सलग घसरण
शुक्रवारी चांदीच्या किमतींमध्ये 7.5 टक्क्यांची घसरण झाली होती. ऑगस्टमधील 2,48,800 रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकापासून चांदीचा भाव 56,000 रुपयांनी खाली आला आहे.
4,20,048 रुपये प्रति किलो या सर्वोच्च विक्रमी पातळीच्या तुलनेत चांदीची किंमत आता निम्म्याहून अधिक घसरली आहे.
2025 मध्ये चांदीच्या किमतींमध्ये 170 टक्क्यांची उसळी आल्यानंतर ही तीव्र घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतींमध्येही मोठी घसरण नोंदवली गेली आहे. ऑगस्टमधील 1,64,773 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकापासून सोनं सुमारे 23,000 रुपयांनी स्वस्त झालंय.
AFP via Getty Images
तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईबाबत चिंता कायम आहे आणि व्याजदर वाढीच्या शक्यतांनाही अधिक बळ मिळाले आहे.
झाय कॅपिटल मार्केट्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी नईम अस्लम लिहितात, “आमच्या मते अलीकडील घसरणीमागे अमेरिकन ट्रेझरी बाँडवरील वाढता परतावा, डॉलरची मजबुती आणि ब्रेंट क्रूडचा भाव 110 डॉलर प्रति बॅरलपेक्षा वर गेल्यामुळे वाढलेल्या महागाईच्या चिंता कारणीभूत आहेत.”
बाँडवरील उच्च परतावा आणि मजबूत अमेरिकन डॉलर यांचाही सोन्याच्या किमतींवर दबाव कायम आहे.
यामुळे सोन्यासारख्या मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणुकीचं आकर्षण कमी होतं, कारण त्यातून नियमित व्याज उत्पन्न मिळत नाही.
गेल्या वर्षाच्या तुलनेत सोनं अजूनही महाग
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव कुमार जैन यांच्या मते, गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्यानं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अद्याप कायम आहे.
ते एएनआयशी बोलताना म्हणाले, “सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळी जवळ आल्याने लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. जुनं सोनं पुनर्वापरासाठी (रीसायकल) देण्याचं प्रमाणही लक्षणीय म्हणावं असं वाढलं आहे.”
AFP via Getty Images
त्यांच्या मते, गेल्या वर्षी दसऱ्याच्या काळात सोन्याचा भाव 1,16,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर यावर्षी दसऱ्याच्या वेळी तो 1,49,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला.
कुमार जैन म्हणाले, “किमतींमधील या वाढीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.”
ते पुढे म्हणाले, “लग्नसराईचाही हंगाम जवळ येत आहे. दागिने बनवण्यासाठी लोक सोनं खरेदी करत आहेत. त्यामुळे मागणी वाढण्याचे हे एक महत्त्वाचं कारण आहे.”
मात्र, चांदीबाबत लोकांचे अनुभव बऱ्यापैकी निराशाजनक राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढं काय होऊ शकतं?
केंद्रीय बँकांची खरेदी आणि गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मधील मजबूत मागणी यांनी सोन्यातील घसरण मर्यादित ठेवण्यास मदत केली आहे.
XS.comच्या बाजार विश्लेषक लिन ट्रान लिहितात, “सोन्याची खरेदी आणि उच्च व्याजदरांचा दबाव यामधील समतोल साधण्याचा बाजार प्रयत्न करत आहे. विक्रीचा दबाव काहीसा कमी झाला असला, तरी सध्याची मागणी इतकी मजबूत नाही की किमतींना नवी दिशा मिळेल.”
अस्लम म्हणतात, चांदीचा वापर उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं उत्पादन क्षेत्रातील मंदीचा परिणाम तिच्या किमतींवरही होतो, त्यामुळे चांदीवर अतिरिक्त दबाव निर्माण होतो.
AFP via Getty Images
ते सांगतात, चांदीच्या किमतींची पुढील दिशा ही औद्योगिक मागणीत होणारी सुधारणा आणि प्रत्यक्ष चांदीच्या पुरवठ्यातील मर्यादा या घटकांवर अवलंबून असेल, अशी झाय कॅपिटलला अपेक्षा आहे. हे घटक अमेरिकेच्या कठोर चलनविषयक धोरणामुळे निर्माण होणाऱ्या दबावावर मात करू शकतात का, यावरही पुढील कल ठरेल.
फॉरेक्स डॉट कॉमचे बाजार विश्लेषक फवाद रजाकजादा म्हणतात, महागाईचा सोन्यावर दुहेरी परिणाम होतो.
ते म्हणाले, “सैद्धांतिकदृष्ट्या पाहिले तर किमतींमधील सातत्यपूर्ण वाढ ही मूल्य साठवणुकीचं सुरक्षित साधन म्हणून सोन्याची मागणी वाढवू शकते.”
तेलाच्या किमतींचा परिणाम
तेलाच्या किमती सोनं आणि चांदीच्या भावांवर प्रामुख्याने अप्रत्यक्ष परिणाम करतात. हा परिणाम महागाई, व्याजदर आणि आर्थिक वाढ यांच्या माध्यमातून दिसून येतो.
मात्र, तेल महाग झालं तर मौल्यवान धातूंचे भाव हमखास घसरतील, असा कोणताही ठोस नियम नाही.
तेलाचे दर वाढले की इंधन, वाहतूक आणि उत्पादनाचा खर्च वाढतो. त्यामुळे महागाई दीर्घकाळ उच्च पातळीवर राहू शकते, अशी चिंता बाजाराला वाटू लागते.
गुंतवणूकदारांना वाटू लागते की केंद्रीय बँका व्याजदरांमध्ये कमी कपात करतील किंवा ते जास्त काळ उच्च पातळीवर ठेवतील. अशा परिस्थितीत बाँडवरील परतावा वाढतो. त्यामुळे सोन्याचे आकर्षण कमी होऊ शकतं, कारण सोन्यातून व्याज मिळत नाही.
मात्र दुसरी परिस्थितीही शक्य असते. तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी आल्यास महागाई आणि भूराजकीय तणावाबाबत चिंता वाढू शकते. अशा वेळी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे वळू शकतात.
अशा स्थितीत व्याजदरवाढीचा दबाव मर्यादित राहिला, तर सोन्याच्या किमतींना आधार मिळू शकतो.
AFP via Getty Images
चांदी ही मौल्यवान धातू असण्याबरोबरच औद्योगिक कच्चा मालदेखील आहे. तिचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, सौर पॅनेल आणि इतर उत्पादन क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. 2024 मध्ये जागतिक चांदीच्या एकूण मागणीपैकी सुमारे 56 टक्के हिस्सा औद्योगिक वापराचा होता.
त्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आणि उत्पादन क्षेत्र कमकुवत झालं, तर चांदीसाठी आणखी एक धोका निर्माण होऊ शकतो, म्हणजे औद्योगिक मागणीत घट होण्याची शक्यता असते.
जेव्हा बाजाराला एकाच वेळी कठोर चलनविषयक धोरणाची आणि मंद आर्थिक वाढीची भीती वाटते, तेव्हा त्यामुळे चांदीच्या किमती सोन्याच्या तुलनेत अधिक दबावाखाली येऊ शकतात.
तथापि, हा मागणीशी संबंधित संभाव्य धोका आहे.
तेलाच्या किमती मौल्यवान धातूंचे भाव थेट नियंत्रित करत नाहीत.
तेलाच्या किमती वाढल्यानं व्याजदरांच्या अपेक्षांवर, महागाईचं नियोजन करुन मिळणाऱ्या बाँड परताव्यावर आणि विशेषतः चांदीच्या बाबतीत औद्योगिक हालचालींवर काय परिणाम होतो, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




