Home LATEST NEWS ताजी बातमी सोनिया गांधी : राजकारणात येण्यापासून पंतप्रधानपद नाकारण्यापर्यंत; आत्मचरित्रातून नेमकं काय उलगडेल?

सोनिया गांधी : राजकारणात येण्यापासून पंतप्रधानपद नाकारण्यापर्यंत; आत्मचरित्रातून नेमकं काय उलगडेल?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

सोनिया गांधी या भारताच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक मानल्या जातात.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

1998 मध्ये सोनिया गांधी भारतातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या, तेव्हा त्या भारतीय राजकारणात नवख्या आणि फारशा परिचित नसलेल्या नेत्या होत्या.

इटलीत जन्मलेल्या आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी असलेल्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हाती घेण्यापूर्वी अनेक वर्षे राजकारणापासून स्वतःला दूर ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात दीर्घकाळ वर्चस्व गाजवलेल्या काँग्रेस पक्षाची जबाबदारी स्वीकारली.

सोनिया गांधी राजकारणात आल्याच्या सुरुवातीच्या काळात इंडिया टुडे मासिकाने त्यांचं वर्णन ‘काँग्रेसमधील नेत्यांसाठीही एक कोडं’ अशा शब्दांत केलं होतं. त्या फारशा बोलत नसत, कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे सामान्य लोकांपासून त्या दूर होत्या. ‘परकीय हेल असलेल्या सोनिया मोजक्याच आणि ठराविक शब्दांतच’ बोलत असत.

पण कमी बोलण्यामागे सत्ता कशी वापरायची, हे शिकणाऱ्या एक राजकारणी मात्र त्यांच्यात दिसत होत्या, हे त्या मासिकाने ओळखलं होतं. त्या वेगवेगळी किंवा परस्परविरोधी मतं ऐकून घेत, माहिती गोळा करत आणि त्यानंतर स्वतः निर्णय घेत.

या मासिकाने म्हटलं होतं की, निर्णय घेताना कोणालाही बाजूला ठेवलं जात नाही आणि कोणाचं मत किंवा आवाज दाबला जात नाही. पण अंतिम निर्णय सोनिया गांधींचाच असतो.

साधारण तीन दशकांनंतर, काँग्रेससारख्या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षात ‘बाहेरची व्यक्ती ते सर्वात शक्तिशाली नेत्या’ असा प्रवास करणाऱ्या सोनिया गांधी आता या संपूर्ण राजकीय प्रवासाची आपली कहाणी सांगत आहेत.

पुस्तकात काय आहे?

79 वर्षीय सोनिया गांधींना आयुष्यात अनेक मोठ्या वैयक्तिक संकटांना सामोरं जावं लागलं. इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडल्यानंतर सोनिया त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेल्या. त्यानंतर अवघ्या 7 वर्षांनी आत्मघातकी हल्लेखोराने राजीव गांधी यांची हत्या केली. त्यावेळी सोनिया यांनी त्यांचं पार्थिव घरी आणलं.

‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे सोनिया गांधींचं आत्मचरित्र नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अल्फ्रेड ए नॉफ आणि ब्रिटनमध्ये विल्यम कॉलिन्स या प्रकाशकांकडून प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक भारतातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या राजकीय पुस्तकांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.

‘अल्फ्रेड ए. नॉफ’ यांच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनात सोनिया गांधी म्हणतात की, माझ्या आयुष्यात आलेले सुखाचे क्षण आणि गडद अंधाराचे दिवस यांचा हा भावनिक प्रवास या आत्मचरित्रातून मांडायचा आहे.

सोनिया गांधींचं आत्मचरित्र नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होत आहे.

फोटो स्रोत, William Collins

विल्यम कॉलिन्स यांच्या माहितीनुसार, या पुस्तकाची सुरुवात 1965 मध्ये केंब्रिज येथून होते. त्यावेळी 19 वर्षांच्या इटालियन विद्यार्थिनी सोनिया माइनो या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नातू राजीव गांधी यांच्या प्रेमात पडल्या.

या आत्मचरित्रातून सोनिया गांधी आपल्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगत आहेत. प्रकाशकांच्या मते, त्यांच्या आयुष्यातील प्रेम, देशाबाहेर राहण्याचे दिवस, राजकारण आणि आयुष्यात आलेले मोठे दुःख यांचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे.

इटलीतील एका छोट्या शहरातील बालपणापासून भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचण्यापर्यंतचा त्यांचा अनपेक्षित प्रवास यात मांडण्यात आला आहे.

या आत्मचरित्रातून काय समोर येणार?

सोनिया गांधींच्या या आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून भारतात आधीच वाद सुरू झाला आहे.

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने पुस्तकातील काही भागांमध्ये बदल सुचवल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्या. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की, सरकारवर टीका करणारे काही भाग बदलण्यासाठी प्रकाशकावर राजकीय दबाव आणला गेला होता.

परंतु, पेंग्विनने हा आरोप फेटाळून लावला. प्रकाशकाने सांगितलं की, चर्चा सुरू असतानाही ते हे पुस्तक प्रकाशित करण्यास तयार होते.

पण, वाचकांना केवळ एका तरुण परदेशी महिलेनं भारतातील सर्वात शक्तिशाली राजकीय घराण्यात लग्न केल्याची कहाणी जाणून घ्यायची नाही. या कथेपेक्षाही अधिक काहीतरी ते शोधत असतील.

सोनिया गांधी 19 वर्षांच्या विद्यार्थिनी असताना केंब्रिजमध्ये त्यांची राजीव गांधी यांच्याशी भेट झाली होती.

फोटो स्रोत, Keystone/Getty Images

त्यांना आधुनिक भारतीय राजकारणातील काही अत्यंत महत्त्वाच्या अशा अनुत्तरित प्रश्नांची उत्तरंही जाणून घ्यायची आहेत. सोनिया गांधी राजकारणात का आल्या? आणि तब्बल 8 वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर 2004 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आली, त्यावेळी पडद्यामागे नेमकं काय घडलं होतं?

नोव्हेंबर 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजीव गांधी, त्यांची मुलगी प्रियांका आणि पत्नी सोनिया गांधी उपस्थित होते.

फोटो स्रोत, Getty Images

सर्वात मोठं गूढ कदाचित हेच आहे की, काँग्रेस आणि मित्रपक्षांचा पाठिंबा असूनही सोनिया गांधींनी पंतप्रधानपद का स्वीकारलं नाही? किंवा त्यांनी नकार का दिला? त्याऐवजी त्यांनी भारताच्या आर्थिक बदलांना नवी दिशा देणारे, उदारीकरणाचे शिल्पकार मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून निवड का केली?

सोनिया गांधींना आपल्या परदेशी जन्मामुळे आपल्या सरकारच्या कामावर कायमस्वरूपी परिणाम होईल, अशी भीती वाटत होती का?

“मला वाटतं, आजही हा सर्वात मोठा अनुत्तरित प्रश्न आहे. सोनिया गांधी सहजपणे पंतप्रधान होऊ शकल्या असत्या. काँग्रेस आणि मित्रपक्षांचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. राष्ट्रपती भवनानेही त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देणारं पत्र तयार ठेवलं होतं,” असं पत्रकार आणि लेखिका नीरजा चौधरी सांगतात.

माजी काँग्रेस नेते आणि परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, सोनिया गांधींनी पंतप्रधान होऊ नये, याला त्यांचा मुलगा राहुल गांधी यांचाच ‘ठाम’ विरोध होता. आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांच्यासारखीच अवस्था आईचीही होईल, अशी त्यांना भीती होती.

नटवर सिंह यांच्या मते, या प्रकरणाला निर्णायक वळण आलं, जेव्हा राहुल गांधींनी आईला पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी ‘काहीही करण्याची’ तयारी असल्याचं म्हटलं होतं.

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातून या निर्णयामागची खरी कहाणी समोर येईल का? किंवा पडद्यामागे नेमकं काय घडलं, याची वेगळीच बाजू त्या सांगतील का?

विरोधकही आश्चर्यचकित

कारण काहीही असो, सोनिया गांधींच्या त्या निर्णयामुळे भारताचं राजकारण बदललं. पण त्याहून मोठा प्रश्न अजूनही कायम आहे- सोनिया गांधी मुळात राजकारणात आल्याच का?

सोनिया गांधी अनेक वर्षे सक्रिय राजकारणात येण्यास टाळाटाळ करत होत्या. 1991 मध्ये राजीव गांधींची हत्या झाल्यानंतरही त्या राजकारणापासून दूरच राहिल्या. परंतु, 1990 च्या दशकात काँग्रेसची स्थिती कमजोर होत गेली. अखेर 1997 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या एका वर्षाच्या आत त्या पक्षाच्या अध्यक्षाही झाल्या.

त्यावेळी सोनिया गांधींच्या राजकीय क्षमतेला त्यांच्या विरोधकांनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. डिसेंबर 1998 मध्ये इंडिया टुडेने लिहिलं होतं की, सुरुवातीला काही मोठे विरोधी नेते त्यांना फक्त एक ‘गृहिणी’ किंवा ‘इटालियन वंडर’ म्हणून हिणवत होते.

परंतु, काही महिन्यांतच सोनिया गांधींनी काँग्रेसमध्ये बदल घडवायला सुरुवात केली. काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्यानेही मान्य केलं, “ही महिला इतकी मोठी कामगिरी करून दाखवेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं.”

1985 मध्ये व्हाईट हाऊसमधील एका खास शासकीय मेजवानीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि त्यांच्या पत्नी नॅन्सी रेगन यांच्यासमवेत राजीव गांधी आणि सोनिया गांधी.

फोटो स्रोत, Universal Images Group via Getty Images

मासिकाला तेव्हाच जाणवलं होतं की, सोनिया गांधी राजकारणात प्रभावीपणे काम करू शकतात. त्यांचं वर्णन ‘वरून शांत, पण आतून कणखर’ अशा नेत्या म्हणून करण्यात आलं. ‘मोठमोठ्या नेत्यांचा अहंकार बाजूला ठेवून त्यांना आपल्या पद्धतीने काम करायला लावण्याची’ क्षमता सोनिया गांधींमध्ये असल्याचंही मासिकाने म्हटलं होतं.

यानंतर सोनिया गांधींच्या राजकीय कारकिर्दीला आकार देणाऱ्या काही मोठ्या दुःखद घटना घडल्या.

1991 मध्ये पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या अंत्यसंस्कारावेळी सोनिया गांधी मुलगी प्रियंका आणि मुलगा राहुल यांच्यासोबत.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर सोनिया गांधींनी आपल्या कुटुंबातील मोठे बदल जवळून पाहिले. त्यानंतर 7 वर्षांनी आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधींचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी भारतीय राजकारणाची दिशा बदलली आणि सोनिया गांधींचं आयुष्यही बदलून टाकलं.

या काळाबद्दल सोनिया गांधी आत्मचरित्रात काय सांगणार? ज्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवातीला तीव्र विरोध केला होता, त्या राजीव गांधींच्या राजकीय प्रवासाबद्दल त्या काय बोलणार? आपल्या मुलांच्या सुरक्षेबद्दल त्यांना कोणत्या चिंता होत्या? आणि गांधी घराण्याची राजकीय परंपरा अशीच सोडून देता येणार नाही, असा निर्णय त्यांनी कधी आणि का घेतला?

याशिवाय काही अस्वस्थ करणारे प्रश्नही आहेत.

त्यांच्या इटलीतील जन्मामुळे झालेल्या वादाबद्दल त्या काय सांगणार?

अनेक वर्षे सोनिया या परदेशी असल्याने भारताचे नेतृत्व करण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी टीका होत होती. दिल्लीतही काही लोकांकडून त्यांची ‘इटालियन आया’ म्हणून खिल्ली उडवली जात असत.

2004 मध्ये भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटलं होतं की, परदेशात जन्मलेली व्यक्ती पंतप्रधान होणं म्हणजे देशाचा अपमान आहे. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर आपण राजीनामा देऊ, मुंडन करू, पांढरे कपडे घालू आणि संन्यासी जीवन जगू, असंही त्यांनी जाहीर केलं होतं.

सरकारवर सोनियांचा प्रभाव?

“1999 मध्येच काँग्रेसमधील काही नेत्यांनीही त्यांच्या परदेशी जन्माबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी सोनिया गांधींनी भारत सोडून जाण्याचा विचार केला होता का?” असा सवाल पत्रकार आणि लेखक रशीद किडवाई यांनी केला आहे.

राजकीय निरीक्षकांना हे पुस्तक 2004 ते 2014 या काळातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमधील अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींवरही प्रकाश टाकेल, अशी अपेक्षा आहे.

परंतु, दुसऱ्या कार्यकाळात काँग्रेस सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी, निर्णय घेण्यात होणाऱ्या विलंबामुळे आणि पक्षावर त्याच्याच नेतृत्वाचा प्रभाव वाढल्याच्या टीकेमुळे अडचणीत आलं.

1991 मध्ये राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर सोनिया गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला, याबाबत फ्रान्सच्या 'लिबरेशन' वृत्तपत्राने दिलेलं पहिल्या पानावरील वृत्त.

फोटो स्रोत, Universal Images Group via Getty Images)

सोनिया गांधींचे टीकाकार त्यांना सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ म्हणत. मनमोहन सिंग यांच्या निर्णयांवर सोनिया गांधींचा किती प्रभाव किंवा वर्चस्व होतं, असा सवालही केला जात होता.

परंतु, त्यांच्या समर्थकांच्या मते, अनेक पक्षांच्या आघाडीचं सरकार एकत्र ठेवण्यात सोनिया गांधींची भूमिका महत्त्वाची होती.

आणि मग राहुल गांधींचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.

सोनिया गांधींनी अखेर 2017 मध्ये काँग्रेसचं नेतृत्व मुलगा राहुल गांधी यांच्याकडे सोपवलं. पण, राहुल गांधींना काँग्रेसला पुन्हा मजबूत करता आलं नाही, असं अनेकांचं मत आहे. गांधी घराण्याचा राजकीय प्रभाव कमी होण्यामागे हेही एक महत्त्वाचं कारण असल्याचं म्हटलं जातं.

2004 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारलं आणि मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून निवड केली होती.

फोटो स्रोत, Getty Images

1994 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘राजीव’ या पुस्तकात सोनिया गांधींनी लिहिलं होतं की, राजीव गांधींनी राजकारणात येऊ नये यासाठी त्यांनी ‘वाघिणीसारखा लढा दिला.’ पण, पुढे त्यांनी गांधी घराण्याची हीच राजकीय परंपरा, वारसा मुलगा राहुल गांधी यांच्याकडे सोपवला.

राहुल गांधींचा राजकीय प्रवासही फारसा सोपा राहिलेला नाही. सुरुवातीला त्यांना राजकारणात येण्याची फारशी इच्छा नसलेला नेता म्हणून हिणवलं गेलं. विरोधकांनीही त्यांची अनेकदा ‘गैरहजर राहणारा नेता’ म्हणून खिल्ली उडवली.

“राहुल गांधींची राजकीय शैली आणि त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सोनिया गांधींना कसा वाटतो? त्या राहुल यांच्या राजकारणाचं किती समर्थन करतात? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून मिळतील, अशी मला आशा आहे,” असं रशीद किडवाई म्हणतात.

आणखी एक प्रश्न म्हणजे, गांधी घराण्याची राजकीय परंपरा पुढे नेण्यासाठी सोनिया गांधींनी अधिक लोकप्रिय आणि करिष्माई मुलगी प्रियांका यांच्याऐवजी राहुल गांधींची निवड का केली? तसेच, प्रियांका राजकारणात येणार अशी चर्चा अनेक वर्षे सुरू असतानाही त्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात 2019 मध्येच प्रवेश का केला?

“राजकारणात यायचं की नाही, हा निर्णय माझ्या मुलांनीच घ्यायचा आहे, असं सोनिया गांधी नेहमीच म्हणायच्या”, असं रशीद किडवाई सांगतात.

याशिवाय आणखी एक मोठा प्रश्नही आहे- ज्या भारताच्या राजकारणावर सोनिया गांधींचा प्रभाव राहिला, त्या भारताविषयी त्यांना नेमकं काय वाटतं?

1980च्या दशकात सोनिया गांधी उत्तर प्रदेशात पती राजीव गांधी यांच्या प्रचारासाठी फिरताना.

फोटो स्रोत, Sygma via Getty Images

सोनिया गांधींच्या नेतृत्वाच्या काळात भारतीय राजकारणात मोठे बदल झाले. आघाडीची सरकारं आणि आर्थिक उदारीकरणाच्या काळातून देश नरेंद्र मोदी यांच्या भाजपच्या आणि हिंदुत्वाच्या प्रभावी राजकारणाच्या दिशेने गेला.

पण कदाचित सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, सोनिया गांधी आपल्या आत्मचरित्रात काय सांगणार आणि काय सांगणार नाहीत. पत्रकार नीरजा चौधरी यांच्या मते, याचं उत्तर पुस्तकाच्या ‘बिलॉन्गिंग’ या शीर्षकात दडलेलं असू शकतं.

“सोनिया गांधींना नेहरू-गांधी घराण्याचा वारसा आपल्याकडे आला आहे, याची जाणीव आहे. हा वारसा पुढेही कायम ठेवला पाहिजे, असं त्यांना वाटत होतं,” असं नीरजा चौधरी सांगतात.

त्यांच्या मते, या आत्मचरित्रात गांधी घराणं आणि त्याचा इतिहास याबद्दल माहिती असेल. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, या घराण्याचा भाग असल्याची सोनिया गांधींची भावना आणि काँग्रेस अध्यक्ष म्हणून हा राजकीय वारसा पुढे नेण्याची त्यांची भूमिका याबद्दलही त्या सांगतील अशी अपेक्षा आहे.

हा वारसा मात्र आता सततच्या टीकेला आणि विरोधाला सामोरा जात आहे.

सत्ताधारी भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला आहे. तर काँग्रेसचे टीकाकार पक्षाच्या विरोधातील लढा हा घराणेशाहीच्या राजकारणाविरोधातील लढा म्हणून पाहण्यावर भर देत आहेत.

काँग्रेसला वारंवार निवडणुकांमध्ये पराभव सहन करावा लागला आणि अनेक नेत्यांनी पक्ष सोडून विरोधकांची साथ धरली. त्यामुळे आता प्रश्न केवळ गांधी घराणं काँग्रेसला पुन्हा मजबूत करू शकेल का, इतकाच राहिलेला नाही; तर ते पक्षाला एकत्र ठेवू शकतील का, हाही मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे.

हा प्रश्न सोनिया गांधींना त्यांच्या आत्मचरित्रातून नेमकं काय सांगायचं आहे, याच्या मुळाशी जातो.

“माझ्या कुटुंबाबद्दल खूप काही लिहिलं गेलं आहे. पण त्यांच्या निर्णयांमागची कारणं, त्यांनी केलेल्या गोष्टी आणि त्यांच्या मानवी चुका किंवा उणिवा याबद्दल फार कमी माहिती समोर आली आहे. हे पुस्तक त्यांच्या माणूसपणाला, मानवी पैलूला समर्पित आहे,” असं सोनिया गांधींनी या पुस्तकाबद्दल म्हटलं आहे.

त्यामुळे सोनिया गांधींचं आत्मचरित्र हे राजकारणाचा हिशेब मांडण्यापेक्षा, गांधी घराण्याशी असलेलं त्यांचं नातं आणि या घराण्याचा वारसा त्यांच्यासाठी का महत्त्वाचा आहे, हे सांगणारं किंवा स्पष्ट करणारं अधिक असू शकतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC