Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, stefano Guidi/Getty Images)
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे
महिलांच्या शरीरातील बाह्य जननेंद्रिय आणि योनीभोवती हजारो वर्षांपासून समाजात सातत्याने चर्चा सुरू आहे.
प्राचीन काळात हा अवयव जननक्षमतेचे प्रतीक मानला जायचा. पण जसा काळ बदलला तशी त्याभोवती भीती, लाज आणि तो लपवून ठेवण्याची मानसिकता तयार झाली.
आज महिलांच्या याच जननेंद्रियांना लक्ष्य करून एक भलामोठा उद्योग उभा राहिला आहे. योनीचे सौंदर्य वाढवणे आणि ती तरूण करण्याच्या नावाखाली प्लास्टिक सर्जरी तसेच कॉस्मेटिक ट्रिटमेंट्सचा बाजार मांडला गेला आहे.
त्याच वेळी अनेक कलाकार आपल्या कलाकृतींमधून या अवयवाला समोर आणत आहेत, तर सामाजिक कार्यकर्ते अन्यायाविरुद्धच्या आंदोलनांमध्ये याला प्रतीकात्मक स्वरूप देत आहेत.
दुसरीकडे प्रत्येक महिलेच्या शरीराची आणि तिच्या जननेंद्रियांची नैसर्गिक रचना ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळीच असते, हे पटवून देण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत.
अशा वेळी प्रश्न पडतो की, मानवी शरीराचा हा भाग कधी काळी पूजनीय मानल्या गेलेल्या जननक्षमतेच्या प्रतीकावरून थेट लज्जास्पद गोष्टीपर्यंत आणि पुढे सौंदर्याच्या बाजारापासून राजकीय आंदोलनांच्या प्रतीकापर्यंत कसा पोहोचला?
दुसरीकडे ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून पॉर्न आणि सोशल मीडियाचा या संपूर्ण मानसिकतेवर किती खोल परिणाम झाला आहे, हे समोर आले.
या दोन्ही वृत्तपत्रांच्या वृत्तांतावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, महिलांच्या शरीराविषयीची ही चर्चा केवळ एका अवयवापुरती मर्यादित राहिलेली नाही तर तिचा थेट संबंध सत्ता, लाज, सौंदर्याच्या आणि स्वतःच्या शरीरावर स्वतःचाच असलेला हक्क या साऱ्यांशी जोडलेला आहे.
पुनरुत्पादन क्षमतेचे प्रतीक
कोणत्याही लाज किंवा संकोचाशिवाय स्त्रीच्या बाह्य जननेंद्रियाला कलाकृतींमध्ये उघडपणे दाखवणे, आजच्या काळात अशक्यच वाटते.
पण हजारो वर्षांपूर्वीचे लोक जेव्हा स्त्रीचे रेखाचित्र काढायचे किंवा शिल्प घडवायचे, तेव्हा ते या जननेंद्रियाच्या भागाला खास प्राधान्य द्यायचे.
फ्रान्समधील अश्मयुगीन ‘ला फेरासी’ आणि जगातील सर्वात प्राचीन गुहाचित्रे लाभलेल्या ‘शोव्हे गुहे’मध्ये याचे ठोस पुरावे आढळले आहेत.
यात आणखी एक रंजक बाब आढळते. ‘व्हीनस ऑफ माँपाझिए’ या लहान शिल्पाचे उदाहरण घेतले तर त्यात स्त्रीची जननेंद्रिये मुद्दाम आकाराने मोठी कोरलेली दिसतात.
फोटो स्रोत, Getty Images
महिलांची प्रजनन क्षमता अधोरेखित करण्यासाठीच पूर्वजांनी असा आकार दिला असावा, असा अंदाज आहे.
अगदी प्राचीन मेसोपोटेमियाच्या संस्कृतीतही स्त्री लैंगिकतेबद्दल कसलाही संकोच किंवा लाज बाळगली जात नव्हती. तिथल्या एका प्राचीन ग्रंथात इश्तार देवी आपल्या प्रियकराला सांगताना आढळते, “माझ्या प्रियतमा… माझ्या योनीमध्ये बीजाची पेरणी कर.”
पण पुढे काळ बदलला आणि हा दृष्टिकोन पूर्णपणे उलटा झाला.
प्राचीन इतिहासकार क्रिश्चियन-जॉर्जेस श्वाँत्सेल यांनी ‘ल मोंद’शी बोलताना स्पष्ट केलं की, प्राचीन ग्रीस आणि त्यानंतर रोमन साम्राज्यात स्त्रीच्या लैंगिकतेला धोका मानलं जाऊ लागलं तिथूनच या मोठ्या बदलाची सुरुवात झाली.
यांच्या मते, “ग्रीस आणि रोममध्ये स्त्रीच्या बाह्य जननेंद्रियाला घृणेची वस्तू मानलं गेलं.”
यातूनच आपल्या इच्छा व्यक्त करणाऱ्या स्त्रीला दाबून ठेवलं पाहिजे आणि तिच्यावर नियंत्रण मिळवलं पाहिजे, अशी मानसिकता समाजात रुजवली गेली. हीच विचारसरणी पुढे कित्येक शतकं कायम राहिली.
अगदी प्राचीन काळापासून ते आजच्या युगापर्यंत स्त्रियांना ज्या नजरेतून दाखवलं गेलं त्यामागे मुळात “स्त्री जननेंद्रियांबद्दलची एक सुप्त भीती” कार्यरत होती, असं निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञ सारा पियाझा नोंदवतात.
सौंदर्याच्या नावाखाली दडलेलं नियंत्रण
महिलांच्या जननेंद्रियांचा बाह्य आकार बदलण्याची मानसिकता ही काही केवळ आजच्या आधुनिक युगाची देणगी नाही.
जगातील अनेक संस्कृतींमध्ये जननेंद्रियांचा ठराविक भाग काढून टाकण्याच्या किंवा त्यांचा आकार बदलण्याच्या अनिष्ट प्रथा पूर्वीपासूनच चालत आल्या आहेत.
आजच्या आधुनिक कॉस्मेटिक सर्जरीचा जन्म होण्याआधीपासूनच जननेंद्रियांच्या आतील भागाचा आकार लहान करणाऱ्या शस्त्रक्रियांचा उल्लेख युरोपीय वैद्यकीय साहित्यात आढळतो.
फोटो स्रोत, Getty Images
आजच्या काळात महिलांना स्वतःच्या शरीरावर निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नक्कीच आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की, स्त्रीचं ‘परफेक्ट’ शरीर कसं असावं हे जर अजूनही समाजच ठरवत असेल, तर मग हे स्वातंत्र्य खरं मानायचं का?
विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर स्त्रीच्या बाह्य जननेंद्रियांचा असा एकच कोणताही ‘योग्य’ आकार असू शकत नाही.
जननेंद्रियांच्या रूपासाठी असे कोणतेही वैद्यकीय निकष किंवा प्रमाण ठरलेलं नाही, यावर लैंगिकतज्ज्ञ जोएल मिन्यो यांनी भर दिला आहे.
पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही या अवयवांचा आकार आणि रचनेमध्ये अनेक प्रकारच्या भिन्नता असतात, असं त्यांनी सांगितलं.
तरीसुद्धा स्वतःचं शरीर पूर्णपणे सामान्य असूनही आपल्यात काहीतरी दोष आहे या अनाठायी चिंतेत अनेक महिला अडकलेल्या दिसतात.
‘आदर्श बाह्य रूप’ ही संकल्पना नेमकी कोणी निर्माण केली?
गेल्या काही दशकांत पॉर्न इंडस्ट्री, सोशल मीडिया, कॉस्मेटिक सर्जरीच्या जाहिराती आणि प्युबिक हेअर म्हणजे जननेंद्रियावरील केस पूर्णपणे साफ करण्याचा वाढता ट्रेंड, यामुळे हा अवाजवी दबाव आणखी वाढला.
या साऱ्यातून ‘आदर्श स्त्री शरीरा’ची एक खोटी व्याख्या तयार करण्यात आली, ज्यानुसार हे अवयव अगदी मऊ, पूर्णपणे केस नसलेले, सुरकुत्या नसलेले, गुलाबी आणि कोणत्याही नैसर्गिक वासाशिवाय असले पाहिजेत.
स्त्रीरोगतज्ज्ञ सोफी बर्विले या ट्रेंडला 2000 च्या दशकात तयार केलेला एक ‘गोल्ड स्टँडर्ड’ (खोटा निकष) म्हणतात.
फोटो स्रोत, Getty Images
प्रत्येक महिलेच्या शरीराची ही रचना नैसर्गिकरीत्याच वेगळी असते, हे वास्तव आजची तरुण पिढी समजून घेण्यात कमी पडत आहे, हाच मूळ प्रश्न असल्याचं ‘द गार्डियन’चं म्हणणं आहे.
ऑस्ट्रेलियात 2024 मध्ये झालेल्या एका संशोधनाचा संदर्भ देत ‘द गार्डियन’नं स्पष्ट केलं की, 18 ते 24 वयोगटातील तब्बल 23 टक्के तरुणींना आपल्या जननेंद्रियांच्या दिसण्याबद्दल लाज किंवा भीती वाटते. आणि यातील निम्म्या तरुणी त्यावर शस्त्रक्रिया करण्याचा विचार करत आहेत.
अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर या रुग्णांचं मानसिक आरोग्य आणि लैंगिक आयुष्य दोन्ही सुधारल्याचं त्या सांगतात. त्यामुळे इथं प्रश्न ‘योनीची शस्त्रक्रिया करून घ्यावी की नाही’ हा नाही. मुख्य बाब ही आहे की, संबंधित व्यक्तीने या शस्त्रक्रियेतील धोके आणि दुष्परिणाम पूर्णपणे समजून घेतले आहेत का आणि तो निर्णय स्वतःचा आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
इंटरनेट आणि पोर्नोग्राफीच्या प्रभावामुळे लोक आपले नैसर्गिक शरीर स्वीकारू शकत नाहीत, असा इशारा अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट्सने (ACOG) दिला आहे.
यातच या अवयवावर केल्या जाणाऱ्या अनेक कॉस्मेटिक उपचारांची सुरक्षितता आणि त्यांचे नेमके फायदे याबद्दल पुरेसे वैद्यकीय पुरावे अजूनही समोर आलेले नाहीत, हेही संस्थेनं स्पष्ट केलं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
इथूनच या प्रवासाला एक वेगळं वळण मिळतं.
ज्या शरीराला शतकानुशतके लपवण्याचा प्रयत्न झाला, तेच शरीर पुढे उघड आंदोलनांचे एक प्रमुख केंद्र बनले.
1969 मध्ये म्युनिक शहरातील एका चित्रपटगृहात ऑस्ट्रियन कलाकार व्हॅली एक्स्पोर्ट एका अनोख्या पेहरावात पोहोचल्या.
स्त्रीच्या शरीराकडे फक्त पुरुषांच्या नजरेतून पाहण्याच्या मानसिकतेला आव्हान देणं आणि यावर उघड चर्चा सुरू करणं, हाच त्यांच्या या कृतीमागचा हेतू होता.
पडद्यावर स्त्रीला केवळ लैंगिक आकर्षणाची वस्तू बनवण्याऐवजी, एका खऱ्या स्त्रीचं वास्तव रूप त्यांनी लोकांसमोर ठेवलं.
1970 च्या काळात अनेक स्त्रीवादी कलाकारांनी महिलांचे अधिकार, त्यांचे शरीर आणि स्वतःचे निर्णय घेण्याच्या अधिकाराबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी आपल्या कलाकृतींमध्ये स्त्री जननेंद्रियांचा थेट वापर करण्यास सुरुवात केली.
या संपूर्ण मोहिमेमध्ये जुडी शिकागो यांच्यासारख्या कलाकारांनी आघाडीची भूमिका घेतली होती.
कला समीक्षक सिंडी नेमसर यांनीही या वैचारिक चळवळीचे खुलेपणानं समर्थन केलं होतं.
काळाच्या ओघात हा विषय केवळ कलेपुरताच मर्यादित राहिला नाही. 2019 मध्ये प्रसिद्ध कलाकार देबोरा दि रॉबर्टिस यांनी युरोपीय संसदेबाहेर विवस्त्र उभं राहून निदर्शने केली. महत्त्वाच्या पदांवर महिलांना योग्य ती जागा दिली जात नसल्याचा हा थेट निषेध होता.
याच दरम्यान, शरीराविषयीचा संकोच दूर करून वैज्ञानिक ज्ञान वाढवणारे नवनवीन उपक्रम आकाराला आले.
फोटो स्रोत, Getty Images
महिलांच्या शरीररचनेतील नैसर्गिक विविधता जगासमोर आणण्यासाठी 2011 मध्ये जेमी मॅककार्टनी या कलाकाराने 400 महिलांच्या जननेंद्रियांचे साचे तयार केले आणि ‘द ग्रेट व्हजायना वॉल’ ही अनोखी कलाकृती जगासमोर ठेवली.
2016 मध्ये महिलांच्या बाह्य जननेंद्रियांचे नैसर्गिक वैविध्य चित्रांद्वारे समजावून सांगणारा ‘द व्हल्व्हा गॅलरी’ हा ऑनलाइन उपक्रम सुरू झाला. यापाठोपाठ 2019 मध्ये लंडनमध्ये जगातील पहिल्या “व्हजायना म्युझियम”ची सुरुवात झाली.
स्त्रीचं शरीरशास्त्र, महिलांचं आरोग्य आणि त्यांच्या शरीराविषयी समाजात असणाऱ्या धारणा याविषयी लोकांना माहिती देण्याचे काम हे संग्रहालय करते.
आज स्त्रीचं शरीर पुन्हा एकदा उघड चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे पण यावेळचं कारण पूर्णपणे वेगळे आहे. स्वतःच्या स्वातंत्र्याचा हक्क मागण्यासाठी ते आता अभिव्यक्तीचं एक साधन बनलं आहे.
समाजात या अवयवाविषयी असणारी लाज किंवा संकोच संपवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येकाला आपल्या शरीरावर पूर्ण अधिकार आहे आणि ते एक सामर्थ्य आहे, हे दाखवून देण्यासाठी कलाकृतींमध्ये या माध्यमाचा वापर केला जातो आहे.
आता “स्त्रीचं बाह्य जननेंद्रिय कसं दिसावं?” हा प्रश्नच मागे पडला आहे.
ही जननेंद्रिये अनेक रूपांत आणि वेगवेगळ्या आकारांत असतात आणि अशी विविधता असणे ही पूर्णपणे स्वाभाविक गोष्ट आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




