Source :- BBC INDIA NEWS
चीनमधील स्वस्त तयार माल, वेळेवर होणारा मालाचा पुरवठा, चीनमधून विविध उद्योगांना येणारा कच्चा माल, यामुळे गेल्या काही दशकात चीन जगाचं उत्पादन केंद्र बनला आहे. जगातील कोणत्याही उत्पादनांचा कोणत्या तरी टप्प्यावर चीनशी संबंध येतोच. मात्र हे सर्व जिथे तयार होतं, ते चिनी कारखाने आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची स्थिती याबद्दलदेखील जगभरात बोललं जातं आहे.
तयार कपड्यांच्या जागतिक बाजारपेठेत चिनी कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्या अतिशय स्वस्तात नवनव्या फॅशनचे कपडे विकतात. या कंपन्या आणि त्यांना पुरवठा करणाऱ्या स्थानिक कारखान्यांमधील कामगार यांची अवस्था मात्र कठीण आहे.
एकीकडे जगभरात व्यवसाय असणाऱ्या बलाढ्य चिनी कंपन्या, त्यांचे प्रचंड आर्थिक उत्पन्न आणि दुसऱ्या बाजूला त्यात काम करणाऱ्या कामगारांचा जीवन संघर्ष असा हा विरोधाभास आहे. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची दिनचर्या, त्यांना मिळणारं वेतन, कामाच्या ठिकाणची परिस्थिती यावरचा बीबीसीचा हा विशेष ग्राऊंड रिपोर्ट.
ग्वानझौच्या काही भागात शिलाई मशीनचा आवाज सतत ऐकू येत असतो. ग्वानझौ हे दक्षिण चीनमधील पर्ल नदीवरील एक समृद्ध बंदर आहे.
कारखान्यांच्या उघड्या खिडक्यांमधून हे आवाज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ऐकू येत असतात. या कारखान्यांमध्ये टी-शर्ट्स, शॉर्ट्स, ब्लाऊज, पँट आणि स्विमवेअर तयार केले जातात. 150 हून अधिक देशांमधील ग्राहकांसाठी हे कपडे पाठवले जातात.
“शीन व्हिलेज” म्हणून परिचित असलेल्या पान्यू परिसरात शीन (Shein) या जगातील सर्वांत मोठ्या फास्ट फॅशन रिटेलर कंपनीसाठी कपडे तयार करण्याचे अनेक कारखाने आहेत.
शीन ही फास्ट फॅशनच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवरची चिनी ई-कॉमर्स कंपनी आहे. ही कंपनी महिला, पुरुष यांचे कपडे, मुलांचे कपडे, बूट, बॅग आणि फॅशनच्या इतर वस्तूंचं उत्पादन करते.
“जर एका महिन्यात 31 दिवस असतील तर मी ते सर्व 31 दिवस काम करेन,” असं या कारखान्यांमधील एका कामगारानं बीबीसीला सांगितलं.
इथे काम करणाऱ्या बहुतांश कामगारांनी सांगितलं की त्यांना महिन्यातून फक्त एकच दिवस वीकली ऑफ म्हणजे सुट्टी असते.
बीबीसीची टीम शीन व्हिलेजमध्ये
बीबीसीची टीम इथं अनेक दिवस राहिली. आम्ही 10 कारखान्यांना भेट दिली. आम्ही चार कारखान्याच्या मालकांशी आणि 20 हून अधिक कामगारांशी बोललो. त्याचबरोबर आम्ही कामगारांचा पुरवठा करणाऱ्या बाजारात आणि कापडाच्या पुरवठादारांसोबतही वेळ घालवला.
हे सर्व करताना आम्हाला आढळलं की शिलाई मशीनवर बसून काम करणारे चीनी कामगार हे या कापड साम्राज्याचं धडधडणारं हृदय आहेत. चीनमधील कामगार कायद्यांचं उल्लंघन होत हे कामगार आठवड्याचे जवळपास 75 तास काम करत असतात.
ग्वानझौ किंवा चीनमध्ये इतके तास काम करणं ही काही असामान्य किंवा वेगळी बाब नाही. अधिक उत्पन्नाच्या शोधात असलेल्या ग्रामीण भागातील कामगारांसाठी गुआंगझाऊ हे एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चीन हा जगाचा एक अद्भूत कारखाना बनला आहे.
अजूनही ही कंपनी खासगी मालकीची आहे. म्हणजेच अद्याप शेअर बाजारात तिची नोंदणी झालेली नाही. 2023 मध्ये भांडवल उभारणीच्या फेरीत या कंपनीचं बाजारमूल्य जवळपास 54 अब्ज पौंड (66 अब्ज डॉलर्स) इतकं होतं.
अतिशय वेगानं शीन या कंपनीची वाढ झाली आहे. मात्र कामगारांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल आणि त्यांच्याकडून जबरदस्तीनं काम करून घेण्याच्या आरोपांमुळे ही कंपनी वादग्रस्तदेखील ठरली आहे.
या कंपनीच्या व्यवस्थापनानं किंवा संचालक मंडळानं बीबीसीला मुलाखत देण्यास नकार दिला.
मात्र बीबीसीला दिलेल्या एका निवदेनात त्यांनी सांगितलं की, “कंपनीच्या सर्व पुरवठा साखळीत (कंपनीला मालाचा पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्या) सर्व कामगारांना योग्य आणि सन्मानजनक वागणूक देण्यासाठी शीन कंपनी कटिबद्ध आहे. तसंच कंपनीचं व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी आणि नियमांचं पालन करण्यासाठी कंपनी लाखो डॉलर्सची गुंतवणूक करते आहे.”
कंपनीनं पुढे सांगितलं की, “कामगारांच्या वेतनासंदर्भातील सर्वोत्तम मानकं तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तसंच आम्हाला मालाचा आणि इतर वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांनी आमच्या मूल्यांचं आणि नियमांचं पालनं केलं पाहिजे. त्याशिवाय, ऑडिटर्सच्या माध्यमातून कंपनीत नियमांचं पालन होत असल्याची खातरमजा करण्यासाठी शीन कंपनी काम करते.”
शीनचा व्यवसाय आणि कारखान्यातील कामगार
शीन कंपनीचं यश मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आणि उत्पादनांच्या किंमतीत मोठी सूट देण्यात आहे. कंपनीची ऑनलाईन इन्व्हेंटरी लाखोंमध्ये असते.
कंपनी अतिशय कमी किंमतीत उत्पादनांची विक्री करते. 10 पौंडात ड्रेस, 6 पौंडात स्वेटरची विक्री केली जाते. शीन कंपनीची उत्पादनं सरासरी 8 पौंडांपेक्षा कमी किंमतीत असतात.
एचअँडएम, झारा आणि युकेतील प्रायामार्क सारख्या फॅशन आणि कपड्यांच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शीन कंपनीचा महसूल वाढला आहे. कमी किंमतीत उत्पादनांच्या विक्रीमागे शीन व्हिलेज आहे.
शीन व्हिलेजमध्ये कपड्यांचे जवळपास 5,000 कारखाने आहेत. यातील बहुतांश कारखाने शीन कंपनीला माल पुरवतात.
शिलाई मशीन, कापडाचे गठ्ठे किंवा रोल आणि कापडाच्या तुकड्यांनी भरलेल्या पिशव्या यांच्यासाठी कारखान्यांच्या इमारती आतून मोकळ्या आहेत. अव्याहतपणे सुरू असलेला उत्पादनांचा पुरवठा आणि कच्चा मालाची साठवणूक यासाठी इमारतीच्या तळघरांचे दरवाजे नेहमीच उघडे असतात.
जसजसा दिवस पुढे जातो, तसतसे वेअरहाऊस किंवा गोदामात साठवण्यासाठी स्पष्टपणे पाच अक्षरी नाव लिहिलेल्या उत्पादनांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या वाढत जातात.
मात्र रात्री 10:00 वाजल्यानंतरदेखील कामाचा ओघ थांबत नाही. शिलाई मशीन सुरूच राहतात आणि त्यामागे बसलेले, वाकून काम करणाऱ्या कामगारांचं काम सुरूच असतं.
कारण ट्रकभरून कापडाचे नवीन रोल किंवा गठ्ठे येत राहतात. हे ट्रक मालानं इतके खच्चून भरलेले असतात की कधीकधी त्यातील कापडाच्या गुंडाळ्या किंवा रोल कारखान्याच्या जमिनीवर पडतात.
नोकरीचा शोध आणि दिवसाचे कित्येक काम
“सर्वसाधारणपणे आम्ही रोजचे 10, 11 किंवा 12 तास काम करतो. रविवारी आम्ही रोजच्यापेक्षा जवळपास तीन तास कमी काम करतो,” असं एक 49 वर्षांच्या महिला कामगार सांगतात. त्या जिआंगशीच्या आहेत. अर्थात त्या स्वत:चं नाव मात्र सांगत नाहीत.
एका गल्लीत त्या आहेत. तिथे डझनभर लोकांनी एका नोटीस बोर्ड किंवा फलकाभोवती गर्दी केली आहे.
त्या फलकावर काम किंवा नोकरीसंदर्भातील जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्या फलकाभोवती गुंडाळलेल्या चिनोज म्हणजे पँटवरील शिवणकाम पाहत ती माणसं त्या जाहिराती वाचत आहेत.
ही शीन कंपनीची पुरवठा साखळी म्हणजे मालाचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत. शीन कंपनी या छोट्या कारखान्यांना ऑर्डरनुसार काही छोटे, काही मोठे कपडे बनवण्याचं कंत्राट देते. जर चिनोज (पॅंटचा प्रकार) लोकप्रिय झाल्या, तर ऑर्डर्सशी संख्या वाढेल आणि त्यामुळे अर्थातच उत्पादनदेखील वाढेल.
त्यानंतर मग ही वाढलेली मागणी या कारखान्याचं कायमस्वरुपी कामगार पूर्ण करू शकत नाहीत. अशावेळी कारखाने तात्पुरत्या स्वरुपाचे कामगार नियुक्त करून मालाची मागणी पूर्ण करतात.
जिआंगशीमधून इथं स्थलांतरित झालेली ती महिला कामगार छोट्या कालावधीच्या कंत्राटी कामाच्या शोधात आहे. चिनोज (पँट्स)चं शिवणकाम हा त्यासाठीचा एक पर्याय आहे.
“आम्ही फार थोडे पैसे कमावतो. इथलं राहणीमान खूप खर्चिक आहे,” असं त्या महिला कामगार सांगतात. घरी त्यांची दोन मुलं आजी-आजोबांसोबत राहतात. त्या पुढे म्हणाल्या की मुलं आणि घरच्यांना पैसे पाठवण्याइतपत कमाई होईल अशी त्यांना आशा आहे.
त्यांची कमाई कशाप्रकारे होते किंवा त्यांना मजूरी कशी मिळते याबद्दल त्या सांगतात, “प्रत्येक कापड किंवा पोशाखासाठी आम्हाला पैसे मिळतात. तो पोशाख किंवा उत्पादन शिवण्यास किती कठीण आहे यावर मजूरी ठरते. टी-शर्टसारखी सोपी गोष्ट शिवण्यास प्रत्येक टी-शर्टमागे एक किंवा दोन युवान (एक डॉलरहून कमी) मिळतात. एका तासात मी जवळपास डझनभर टी-शर्ट्स शिवू शकते.”
चिनोज शिवण्याचं काम हाती घ्यायचं की नाही हा निर्णय घेण्यासाठी त्यावरील शिवणकाम बारकाईनं पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्याआधारेच किती मजूरी मिळणार, ती मजूरी परवडणार की नाही आणि दिवसभरात किती काम होऊ शकेल याचा अंदाज बांधता येतो.
त्यांच्याभोवती त्या फलकावरील जाहिरात पाहत असलेले कामगार त्यांना प्रत्येक कपड्यासाठी किती पैसे मिळतील आणि एका तासात ते किती पैसे कमावू शकतील याचा हिशोब करत आहेत.
कामगारांच्या बाबतीत कायदे आणि मानवाधिकारांचं उल्लंघन
पान्यूमधील गल्ल्याच मनुष्यबळ पुरवण्याचं केंद्र म्हणून काम करतात. सकाळच्या वेळेस या गल्लीत लोडगाड्यांवरून विकला जाणारा नाश्ता, वाफाळत्या सोयाबीनचं दुधाचे कप आणि चिकन आणि बदकाची अंडी विकणारे शेतकरी यांच्यासमोर कामगार गर्दी करतात, तेव्हा या गल्ल्या फुलून गेलेल्या असतात.
इथल्या कारखान्यांमधील कामाचे सर्वसाधारण तास सकाळी 8:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत असतात, असं बीबीसीला आढळलं.
त्यांना आढळलं की या कारखान्यांमधील अनेक कामगार खूप जास्त प्रमाणात ओव्हरटाईम म्हणजे अतिरिक्त वेळ काम करत होते. तिथे ओव्हरटाईमशिवाय असणारं मूळ वेतन 2,400 युआन (265 पौंड; 327 डॉलर) इतकं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
एशिया फ्लोअर वेज अलायन्सच्या म्हणण्यानुसार तिथे “जगण्यासाठी आवश्यक असलेले वेतन” 6,512 युआन आहे. प्रत्यक्षात कामगारांना त्यापेक्षा कितीतरी कमी वेतन मिळतं आहे. मात्र आम्ही ज्या कामगारांशी बोललो ते अतिरिक्त वेळ काम करून दर महिन्याला 4,000 ते 10,000 युआनची कमाई करत होते.
“कामाचे इतके तास असणं ही काही अपवादात्मक बाब नाही. ते नेहमीचंच आहे. मात्र हे बेकायदेशीर आहे आणि त्यातून मूलभूत मानवाधिकारांचं हनन होतं आहे, हे मात्र स्पष्ट आहे. ही अत्यंत टोकाची पिळवणूक किंवा शोषण आहे. ते समोर आलं पाहिजे,” असं पब्लिक आय संस्थेचे डेव्हिड हॅचफिल्ड म्हणाले.
चीनमधील कामगार कायदे आणि या कारखान्यांमधील परिस्थिती यात बरंच अंतर आहे. चीनमधील कामगार कायद्यांनुसार एका आठवड्याला सरासरी 44 तासांपेक्षा अधिक काम असू नये.
त्याचबरोबर या कायद्यांमध्ये असंही म्हटलं आहे की कामगार, कर्मचारी यांना आठवड्यातून किमान एक दिवस सुट्टी मिळावी याची काळजी त्या कंपनी किंवा कारखान्यानं घेतली पाहिजे.
जर एखादा कारखाना किंवा कार्यालयाला जर कामाचे तास वाढवायचे असतील तर त्यासाठी काहीतरी विशेष कारण असलं पाहिजे.
शीन कंपनीचं मुख्यालय आता सिंगापूरमध्ये असलं तरी कंपनीची बहुतांश उत्पादनं मात्र चीनमध्येच तयार केली जातात.
चिनी कंपन्यांबद्दल अधिकाधिक सावध होत असलेल्या अमेरिकेचं लक्ष शीनच्या या प्रचंड यशानं वेधलं गेलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र सचिवपदावर निवड केलेल्या मार्को रुबिओ जून महिन्यात म्हणाले होते की, शीन कंपनीचे “पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाबरोबर असलेल्या घनिष्ठ संबंधांची” त्यांना “गंभीर स्वरूपाची नैतिक चिंता” वाटते.
“कामगारांना गुलामासारखं राबवणं, स्वेटशॉप्स आणि व्यापारी क्लृप्त्या ही शीनच्या यशामागची घाणेरडी रहस्यं आहेत,” असं मार्को यांनी लिहिलं होतं.
स्वेटशॉप म्हणजे कामाचं असं ठिकाण जिथे कामगार, कर्मचारी अतिशय दाटीवाटीनं काम करतात, तिथली परिस्थिती वाईट असते, ते बेकायदेशीर असतं आणि तिथे कामगाराना कोणत्याही साध्या सुविधादेखील न देता त्यांच्याकडून भरपरू काम करून घेतलं जातं.
मार्को रुबिओ यांनी शीनला मालाचा पुरवठा करणाऱ्या कारखान्यांमधील परिस्थितीचं वर्णन करताना जे शब्द वापरले आहेत, त्याच्याशी प्रत्येकजण सहमत असेलच असं नाही.
मात्र मानवाधिकार संस्था किंवा गटांचं म्हणणं आहे की कारखान्यांमधील कामाचे भरपूर तास, अन्याय्य आणि कामगारांचं शोषण करणारे आहेत. ग्वानझौमधील अनेकांसाठी हा आता जगण्याचा एक मार्ग झाला आहे.
शिवणकाम करणारी यंत्रं कामगारांच्या जीवनाचा मोठा भाग झाली आहेत. कामगारांचा दिवसाची सूत्रं किंवा त्याचं नियंत्रण शिवणकाम करणाऱ्या यंत्राकडे असतं.
कामगार जेव्हा दुपारचं आणि रात्रीचं जेवण घेण्यासाठी ब्रेक घेतात आणि धातूच्या थाळ्या, चॉपस्टिक्स घेऊन कॅंटिनमध्ये अन्न खरेदी करण्यासाठी जातात तेव्हाच ही यंत्रं थांबतात.
जर कँटिनमध्ये बसण्यासाठी जागा नसेल तर ते रस्त्यावर उभं राहूनच जेवतात.
“मी या कारखान्यांमध्ये 40 वर्षांहून अधिक काळापासून काम करते आहे,” असं एका महिला कामगारानं सांगितलं. त्यांनी फक्त 20 मिनिटांत त्यांचं जेवण उरकलं. त्यांच्यासाठी हा रोजच्यासारखाच आणखी एक दिवस होता.
आम्ही ज्या कारखान्यांना भेट देत होतो, ते अरुंद नव्हते. कामगारांसाठी तिथे पुरेसे लाईट आणि औद्योगिक क्षेत्रात वापरतात तशा आकाराचे पंखे होते.
तिथे कोणी अल्पवयीन कामगार किंवा बालमजूर काम करत असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी कामगारांना उद्युक्त करण्यासाठी मोठाले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. गेल्या वर्षी शीनला मालाचा पुरवठा करणाऱ्या कारखान्यांमध्ये दोन बालमजूर आढळल्यानंतर बहुधा हे पोस्टर्स लावण्यात आले असावेत.
लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीची तयारी आणि शिनचं व्यवसायाचं गणित
लवकरच लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीची नोंदणी करून शेअर्स गुंतवणुकादारांसाठी खुले करण्याची शीन कंपनीची योजना असल्यामुळे, कंपनी पुरवठादारांवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं बीबीसीला माहित आहे.
शीनचा आयपीओ लवकरच लंडनच्या शेअर बाजारात येणार आहे. त्याबद्दल डेलावेअर विद्यापीठात फॅशन आणि पोशाख अभ्यासाचे प्राध्यापक असणारे शेंग लू म्हणतात,
“ही बाब त्यांच्या प्रतिष्ठेची आहे. जर शीनचा आयपीओ (कंपनी शेअर बाजारात नोंदणी करून शेअर्स गुंतवणुकदारांसाठी खुले करते) यशस्वी झाला, तर त्याचा अर्थ एक चांगली कंपनी म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे असा होईल. मात्र जर त्यांना गुंतवणुकादारांचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल तर त्यांना काही जबाबदारी घ्यावी लागेल.”
शिनजिआंग प्रांताच्या मुद्दा असा आहे की एकेकाळी या प्रांतातील कापडाची गणना जगातील सर्वोत्तम कापडांमध्ये व्हायची. मात्र शिनजिआंगमधील कापसाचं उत्पादन अल्पसंख्याक असलेल्या उइघुर मुस्लिम समुदायाकडून जबरदस्तीनं करवून घेत असल्याचा आरोप झाल्यानंतर या कापडाची मागणी कमी झाली. अर्थात चीननं सातत्यानं हा आरोप फेटाळला आहे.
या टीकेतून मार्ग काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पारदर्शकता वाढवणे, असं प्राध्यापक शेंग म्हणतात.
“जोपर्यंत तुम्ही तुमच्या पुरवठादार कारखान्यांची पूर्ण यादी जाहीर करत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमची पुरवठा साखळी लोकांसाठी अधिक पारदर्शक करत नाही, तोपर्यंत मला वाटतं की शीनसाठी ही बाब खूपच आव्हानात्मक ठरणार आहे.”
ते पुढे सांगतात, शीनच्या बाजूनं असलेली सर्वांत मोठी बाब म्हणजे शीनला पुरवठा करणारे सर्व कारखाने चीनमध्येच आहेत.
ते म्हणाले, “फार थोड्या देशांमध्ये एखाद्या कंपनीला लागणारा सर्व माल पुरवणारे सगळे कारखाने असतात. चीनचं हे बलस्थान आहे आणि कोणीही त्याची स्पर्धा करू शकत नाही.”
शीनसारख्या चिनी कंपन्यांचं बलस्थान
कपड्यांच्या बाजारपेठेत व्हिएतनाम आणि बांगलादेश सारखे चीनचे स्पर्धक होऊ पाहत आहेत. मात्र कपडे बनवताना ते त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात चीनमधूनच करतात. त्याउलट हे चीनी कारखाने सर्व गोष्टींसाठी पूर्णपणे स्थानिक स्त्रोतांवरच अवलंबून असतात.
अगदी कापड, झिपरपासून ते बटणांपर्यंत सर्वकाही स्थानिक कारखानेच पुरवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार करणं सोपं आहे. तसंच ते या कपड्यांचं उत्पादन वेगानं देखील करू शकतात.
ही गोष्ट विशेषकरून शीनच्या फायद्याची आहे. शीनचा अल्गोरिदम ऑर्डर्स ठरवतो. जर ग्राहक किंवा खरेदीदारानं वारंवार एखाद्या विशिष्ट ड्रेसवर क्लिक केलं किंवा एखादं लोकरी स्वेटर पाहण्यात बराच वेळ घालवला तर कंपनी पुरवठादार कारखान्यांना या गोष्टींचं उत्पादन वेगानं वाढवण्यास सांगते.
ग्वानझौमधील कामगारांसाठी ही एक आव्हानाची बाब असू शकते.
“शीनचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. चांगली गोष्ट म्हणजे शीनची ऑर्डर खूप मोठी असते. मात्र त्यातून मिळणारा नफा कमी असतो आणि तोही निश्चित स्वरूपाचा असतो,” असं शीनला पुरवठा करणाऱ्या एका कारखान्याच्या मालकानं आम्हाला सांगितलं.
शीनचा कपड्यांच्या बाजारपेठेतील विस्तार मोठा आहे. शीनची बाजारपेठ प्रचंड आहे. साहजिक कंपनीचा आकार आणि त्यांचा प्रभाव लक्षात घेता, शीन त्यांना पुरवठा करणाऱ्या कारखान्यांशी मालाच्या किंमतीबाबात अत्यंत घासाघीस करते. किंमतीच्या पातळीवर शीनबरोबर सौदा करणं तसं कठीण आहे.
त्यामुळेच शीनला पुरवठा करणाऱ्या कारखान्यांच्या मालकांना इतर खर्चात कपात करावी लागते. त्याचा परिणाम होत अनेकदा कामगारांना कमी वेतन मिळतं.
शीनचा पुरवठादार असलेल्या आणि तीन कारखान्यांच्या मालकानं सांगितलं, “शीनचा बाजारात जम बसण्यापूर्वी आम्ही स्वत:च कपड्यांचं उत्पादन करायचो आणि आम्हीच ते बाजारात विकायचे. त्यामुळे आम्हाला कपड्यांच्या उत्पादनाच्या खर्चाचा अंदाज बांधता येत होता.”
“आम्ही कपड्यांची किंमत ठरवू शकत होतो आणि नफ्याचं गणितदेखील मांडू शकत होतो. आता मात्र कपड्यांची किंमत शीन ठरवते आणि उत्पादन खर्च कमी करण्याचे पर्याय तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात.”
जेव्हा ऑर्डर्स शिखरावर असतात, अर्थात ते अतिशय फायद्याचं असतं. शिपमॅट्रिक्स या लॉजिस्टिक्स कन्सल्टन्सी कंपनीच्या आकडेवारीनुसार, शीन दररोज सरासरी दहा लाख पॅकेजेसची डिलेव्हरी करते.
“शीन ही कंपनी फॅशन उद्योगाचा आधारस्तंभ आहे,” असं गुओ किंग ई म्हणाले. ते शीनचे पुरवठादार आहेत.
ते पुढे म्हणाले, “शीनची जेव्हा सुरूवात झाली होती तेव्हाच मीदेखील सुरूवात केली होती. शीनचा विस्तार, उदय याचा मी साक्षीदार आहे. खरं सांगायचं तर, शीन ही चीनमधील अद्वितीय कंपनी आहे. मला वाटतं ही कंपनी आखणी मोठी, मजबूत होईल. कारण ती वेळेवर पैसे देते. त्यामुळेच शीन सर्वात विश्वासार्ह आहे.”
त्यांनी सांगितलं, “जर 15 तारखेला आमच्या मालाचे पैसे येणे असतील, तर मग ते कितीही लाख किंवा कोटी असोत, त्या दिवशी आमचे मिळतातच.”
शीनमध्ये कामाचे तास खूप कष्टाचे असतात आणि तिथे कधीकधी कमी वेतन मिळतं. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या कामगारांसाठी ते कदाचित सोयीचं नसतं. मात्र त्यातील काहीजणांसाठी शीनमध्ये काम करणं ही अभिमानाची बाब आहे.
“आम्ही चिनी लोक जगासाठी हे योगदान देऊ शकतो,” असं 33 वर्षांच्या एका महिला सुपरवायझर म्हणाल्या. त्यांनी त्यांचं नाव मात्र सांगितलं नाही. त्या ग्वांगडोंगच्या आहेत.
बाहेर अंधार पडला आहे आणि कामगार त्यांच्या रात्रीच्या जेवणानंतर त्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यातील कामासाठी कारखान्यात कामासाठी परत येत आहेत. त्या ही बाब मान्य करतात की तिथे कामाचे तास खूप जास्त आहेत.
मात्र त्या म्हणतात, “आम्ही इथे एकमेकांशी चांगलं वागतो. आम्ही एखाद्या कुटुंबासारखे आहोत.”
काही तासांनी, बरेचसे कामगार रात्री घरी परतल्यानंतरदेखील अनेक इमारतींमधील लाईट्स सुरूच राहतात.
काही कामगार मध्यरात्रीपर्यंत काम करतात, असं एका कारखान्याच्या मालकानं आम्हाला सांगितलं. त्यांना अधिक पैसे कमवायचे असतात, असं ते म्हणाले.
सरतेशेवटी, लंडन, शिकागो, सिंगापूर, दुबई आणि इतर असंख्य ठिकाणी, कोणीतरी त्यांच्या पुढील सौद्यासाठी शोध घेतं आहे.
एकीकडे जगभरात विस्तार झालेल्या बलाढ्य चीनी कंपन्या, त्यांचा अतिशय वेगानं वाढत असलेला व्यवसाय आहे. तर दुसरीकडे त्याच कंपन्यांच्या किंवा त्यांना पुरवठा करणाऱ्या कारखान्यांमध्ये अतिशय कमी वेतनात दिवसाचे कित्येक तास काम करणारे कामगार आहेत.
स्थानिक पातळीवर कामगारांचं होणारं प्रचंड शोषण आणि त्याच जोरावर चीनी कंपन्यांची जगभरातील नेत्रदीपक प्रगती असं हे भयावह वास्तव आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC