Source :- BBC INDIA NEWS

नकदू उर्फ नंदलाल गेल्या 34 वर्षांपासून युपी पोलिसांत होमगार्ड म्हणून काम करत होता.

फोटो स्रोत, Manav Shrivastava

उत्तर प्रदेशात 34 वर्षांपासून होमगार्ड म्हणून काम करत असलेल्या नंदलालला पोलिसांनी एका तक्रारीच्या आधारावर आजमगढमध्ये अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, 1988 पासून जिल्ह्यातील राणी की सराय पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डमध्ये हिस्ट्रीशीटर म्हणून त्याच्या नावाची नोंद होती. त्याच्यावर ओळख बदलून होमगार्डची नोकरी मिळवल्याचा आरोप आहे.

सदर व्यक्तीवर हत्या, दरोडा या सारखे गंभीर गुन्हे होते. 34 वर्षं तो ओळख लपवून राहत होता.

दरम्यान, नंदलालचे त्याच्या नातेवाईकाशी भांडण झाले होते. याप्रकरणी नातेवाईकाने तक्रार नोंदविली ज्यानंतर नकदू उर्फ नंदलालचं प्रकरण उघडकीस आलं.

पोलिसांनी काय सांगितलं?

नंदलालचं पूर्वीचं नाव नकदू होतं. परंतु, 1988 पासून जिल्ह्यातील राणी की सराय पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड्समधील हिस्ट्रीशीटमध्ये त्याच्या नावाची नोंद होती.

तो तुरुंगाबाहेर नाव बदलूनच राहण्यातच यशस्वी ठरला नाही तर त्याने होमगार्डची नोकरीही मिळवली.

आझमगढचे पोलीस अधीक्षक हेमराज मीणा यांनी सांगितले की, नंदलाल उर्फ नकदू हा मूळचा राणी की सराय येथील रहिवासी असून 1990 पासून तो मेहनगर पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून ड्युटी करत होता.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

दरम्यान, 1984 ते 1989 या काळात त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यावरुन पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण मेहनगर पोलीस ठाणे आणि राणी की सराय पोलीस ठाण्यातील अंतर फक्त 15 किलोमीटर आहे.

पोलिसांच्या मते, नंदलाल उर्फ नकदूवर गँगस्टर अॅक्ट अंतर्गतही कारवाई झाली होती.

अन् हिस्ट्रीशीटर नंदलालच आरोपी नकदू निघाला

आरोपी नंदलालची ओळख उघड होण्याची, त्याला अटक होण्याची कहाणी तसेच इतकी वर्षं त्याने लपवून ठेवलेली ओळख, त्याची जीवनशैली जितकी रंजक आहे तितकीच मनोरंजकही आहे.

तब्बल 34 वर्षांपर्यंत हिस्ट्रीशीटर नंदलाल आपली खरी ओळख लपवण्यात यशस्वी ठरवा. पण, सत्य कितीही लपवलं तरी कधी ना कधी बाहेर येतेच तसंच काहीसं घडलं, काही काळापूर्वी एका मारहाणीच्या घटनेनंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

आरोपीच्या पुतण्याने तत्कालीन डीआयजी वैभव कृष्णा यांना अर्ज देऊन आरोप केला होता की ‘नंदलालच हिस्ट्रीशीटर नकदू आहे.’ त्यानंतर, डीआयजी यांच्या आदेशावरून केलेल्या तपासात पोलिसांना आरोप खरे असल्याचे आढळून आले, आणि नंदलालचं बिंग फुटलं. त्यानंतर आरोपी नंदलालला अटक करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी नकदू उर्फ नंदलालने त्याचे नाव बदलले, हळूहळू कागदपत्रांमध्येही आपलं नाव बदलण्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर 1990 साली तो होमगार्ड म्हणून भरती झाला आणि तेव्हापासून तो होमगार्ड म्हणून आपलं कर्तव्य बजावत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, नकदूने कागदपत्रांमध्येही आपलं नाव बदलून घेतलं होतं.

फोटो स्रोत, Manav Shrivastava

आरोपी नंदलाल उर्फ नकदूचं चौथीपर्यंत शिक्षण झालं आहे. पोलीस अधीक्षक हेमराज मीणा यांच्या मते, बनावट कागदपत्रांच्या आधारावरच आरोपीनं नोकरी मिळवली. सध्या आरोपी नंदलाल तुरुंगात असून उर्वरित तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

34 वर्षांच्या कार्यकाळात तो कुठे-कुठे तैनात होता, आणि आपली खरी ओळख लपवण्यात कसा यशस्वी ठरला याचाही पोलीस तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात पोलीस विभाग किंवा होमगार्ड विभागाकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळल्यास, जबाबदार असलेल्यांविरुद्धही चौकशी केली जाईल.

तपासादरम्यान जे काही तथ्य समोर येतील, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. सध्या आरोपीला निलंबित करण्यात आलं आहे आणि त्याच्या बडतर्फीसाठी होमगार्ड विभागाला सूचित करण्यात आलं आहे, अशी माहिती हेमराज मीणा यांनी दिली.

नातेवाईकाशी भांडण झालं आणि बिंग फुटलं

ऑक्टोबर महिन्यात नकदू उर्फ नंदलाल आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये भांडण झालं होतं.

नकदूच्या भाच्याने नंदलालविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली, त्यापाठोपाठ इतर नातेवाईकांनीही तक्रार नोंदवली.

तक्रारदाराने आरोप केला होता की, नकदू नामक गेल्या 34 वर्षांपासून आपलं नाव बदलून पोलिसांची दिशाभूल करत होमगार्डची नोकरी करतोय.

आरोपीविरुद्ध 1984 साली हत्या प्रकरणात एक गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय इतर अनेक प्रकरणांत आरोपीचं नाव समोर आल्यानंतर 1988 मध्ये त्याच्याविरुद्ध ‘गँगस्टर ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदलालचे त्याच्या नातेवाईकाशी भांडण झाले होते, ज्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

फोटो स्रोत, Getty Images

1988 मध्ये आझमगडमधील राणी की सराय पोलीस ठाण्यात आरोपीची हिस्ट्रीशीट उघडण्यात आली. इतिहासही उघडण्यात आला. क्रमांक 52 ए क्रमांची ही हीस्ट्रीशीट सन 1988 पासून सत्यापित केली जात आहे.

आरोपीविरुद्ध 2024 मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 319 (2) आणि 318 (4) अंतर्गत ओळख लपवणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1990 पासून करतोय होमगार्डची नोकरी

पोलीस अधीक्षक हेमराज मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 1984 मध्ये वैयक्तिक वादातून एका व्यक्तीची गोळी मारून हत्या केली होती.

या गुन्ह्यानंतर आरोपीचे नाव दरोड्यासह इतर अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये पुढे आले.

आरोपी 1988-89 मध्ये पोलिसांच्या रडारवरून गायब झाला आणि नंतर बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्याने होमगार्डची नोकरी मिळवली.

नोंदींनुसार, आरोपीचं शिक्षण चौथीपर्यंत झालं आहे मात्र, त्याने नोकरीसाठी आठवीची गुणपत्रिका सादर केली होती. यात त्याचं नाव नंदलाल पुत्र लोकई यादव असं नमूद केलं आहे.

पोलीस सध्या त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करत आहेत ज्यांनी नंदलालला चरित्र्य प्रमाणपत्र देण्यात मदत केली किंवा व्यवस्थित तपासणी न करता प्रमाणपत्र जारी केलं.

आरोपी सध्या 57 वर्षांचा असून लवकरच निवृत्त होणार आहे, त्याचवेळी हे प्रकरण उघडकीस आलं असून इतकी वर्षं आरोपीनं आपलं गुपित कसं कायम ठेवलं, याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

उत्तर प्रदेश पोलीस, गुन्हेगारी आणि चकमक

2021 साली उत्तरप्रदेशातील 29 पोलिसांविरुद्ध खंडणी, खोट्या प्रकरणात अडकवण्यापासून ते हत्येप्रकरणापर्यंतचे गुन्हे दाखल झाले होते.

तर, 2024 मध्ये सरकारने खंडणीच्या आरोपाखाली एसओसह 18 पोलिसांना निलंबित केलं होतं. हे सर्व पोलीस बलियात तैनात होते.

2020 मध्ये कानपूरच्या बिकरू येथे गँगस्टर विकास दुबेसोबत झालेल्या चकमकीत एक उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात अनेक पोलिसांवर हलगर्जीपणाचे आरोपही झाले होते. तर, काही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गँगस्टर विकास दुबेला मदत केल्याच्या आरोपांचीही चौकशी करण्यात आली. त्यावेळी कानपूरच्या चौबेपुर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती.

गेल्या काही वर्षांत युपी पोलिसांवर अनेक आरोप लागले असून अनेक प्रकरणांमध्ये कारवाईही झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर प्रदेशात 2017 पासून भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मार्च 2017 ते सप्टेंबर 2024 पर्यंत उत्तर प्रदेशात सुमारे 12,964 पोलीस चकमकी झाल्या असून, यात 207 लोकांचा मृत्यू झाला आहे.

या काळात 27 हजार 117 गुन्हेगारांना गुन्हेगारांना अटक करण्यात आली आणि 6 हजार लोक जखमी झाले. याच कालावधीत 1,601 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये बिकरू घटनेत मृत्यू झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

एसटीएफचे एडीजी अमिताभ यश यांच्या मते, गेल्या साडेसात वर्षांत एसटीएफने 7 हजार गुन्हेगारांना अटक केली आहे, त्यापैकी 49 जणांचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे.

या गुन्हेगारांवर 10 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC