Source :- ZEE NEWS

Hrithik Roshan US Tour: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दिनेश कानेरियाने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनबद्दल धक्कादायक दावा केला आहे. हृतिक नुकताच अमेरिका दौऱ्यावर होता. याच दौऱ्यासंदर्भात कानेरियाने हृतिक रोशनने खसित्तानी विचाराचे कट्टरतावादी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचा आरोप केला आहे. भारत सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या व्यक्ती उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला हृतिकने हजेरी लावल्याचा आरोप कानेरियाने केला आहे.

सर्वच स्तरामधून संताप

हृतिक रोशन उपस्थित असलेल्या या कार्यक्रमादरम्यान ‘गोमांसा पार्टी’ही झाली आणि या ठिकाणी हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप कानेरियाने केला आहे. भारतामधील प्रसिद्ध गायक शान हा पुढील महिन्यामध्ये याच ग्रुपबरोबर कार्यक्रम करणार असल्याने याबद्दलही कानेरियाने चिंता व्यक्त केली आहे. कानेरियाने केलेल्या दाव्यांमुळे सर्वच स्तरामधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.

काय म्हटलं आहे या पाकिस्तानी खेळाडूने?

हृतिकच्या कार्यक्रमाबद्दल चिंता व्यक्त करताना कानेरियाने, “त्याने कट्टरतावाद्यांबरोबरच भारत सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या लोकांसोबत कार्यक्रम आयोजित केलेला. त्या ठिकाणी बीफ पार्टी झाली आणि भारतीय देवी-देवतांचा प्रचंड अपमान करण्यात आला. पुढील महिन्यात याच ग्रुपबरोबर शान कार्यक्रम सादर करणार आहे. मी भारतीय गृहमंत्रालयाकडे या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी करतो,” असं म्हणत पोस्ट केली आहे. 

दोन्ही स्टार्सकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही

कानेरियाने केलेल्या दाव्यावर हृतिक किंवा शान किंवा त्यांच्यावतीने कोणीही कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. कानेरिया हा हिंदू धर्मीय असून पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून खेळणारा तो केवळ दुसरा आणि बिगरमुस्लीम सातवा खेळाडू आहे.

अमेरिका दौरा वादात

याच महिन्याच्या सुरुवातीला हृतिक रोशनच्या अमेरिका दौऱ्यावरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलेली. या दौऱ्याच्या नियोजनामध्ये अनेक त्रुटी  होत्या. अनेकांनी तिकिटांसाठी 1.2 लाख रुपये भरल्यानंतरही हृतिकला भेटून देण्याचं आश्वासन असताना साधं त्याला पाहताही आलं नाही असंही म्हटलेलं. 

बीफ समोसे आणि मद्यविक्री

या कार्यक्रमाच्या ठिकाणी गोमांस आणि मद्य विक्री करण्यात आल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केलेला. 10 एप्रिल रोजी स्तंभलेखक विवेक बन्सलने या कार्यक्रमाच्या ठिकाणचे फोटो शेअर केलेले ज्यामध्ये बीफ समोसा दिसत होता. तसेच मद्यविक्रीचा व्हिडीओही त्याने पोस्ट केलेला.

रंगोत्सव नावाने होस्टनमध्ये राम नवमीनिमित्त 6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हृतिकने हजेरी लावलेली. 

SOURCE : ZEE NEWS