Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
-
Published
-
वाचन वेळ: 7 मिनिटे
एका 68 वर्षीय महिलेसाठी रुग्णालयात दाखल होणं ही केवळ उपचारांची सुरुवात नव्हती, तर अनेक जीवघेण्या वैद्यकीय संकटांविरुद्धच्या लढाईची सुरुवात होती.
ॲट्रियल फिब्रिलेशन, गंभीर हृदयविकार आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या महिलेला उपचारादरम्यान स्ट्रोक आला.
त्यानंतर मेंदूला होणारा रक्तपुरवठा पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आलं, मात्र काही दिवसांतच हृदयविकाराच्या झटक्यांशी झुंज द्यावी लागली. अखेरीस 15 हून अधिक इलेक्ट्रिक शॉक आणि अनेक आपत्कालीन उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर करण्यात आली.
रुग्णाला नेमकं काय झालं होतं?
68 वर्षीय पद्मा (नाव बदललं आहे) यांना 11 जून 2026 रोजी श्वास घेण्यास त्रास, सततचा खोकला आणि हृदयाचे ठोके वेगानं जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना आधीपासून उच्च रक्तदाब, ॲट्रियल फिब्रिलेशन (AF) आणि दीर्घकाळ किडनीचा आजार होता.
तपासणीत त्यांच्या हृदयाची पंपिंग क्षमता (Ejection Fraction) केवळ 20 ते 25 टक्के असल्याचं आढळलं. निरोगी व्यक्तींमध्ये ही क्षमता साधारणपणे 50 टक्क्यांहून अधिक असते.
याशिवाय त्यांच्या फुप्फुसांमध्ये द्रव साचल्याचंही निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते.
उपचार सुरू असतानाच त्यांच्यामध्ये काही न्यूरोलॉजिकल लक्षणं दिसू लागली. तपासणीत मेंदूच्या उजव्या भागातील महत्त्वाच्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्याचं आढळलं.
डॉक्टरांच्या मते, हृदयात तयार झालेली रक्ताची गुठळी रक्तप्रवाहातून मेंदूपर्यंत पोहोचल्यानं हा कार्डिओएम्बोलिक स्ट्रोक झाला होता.
रक्तप्रवाह पूर्ववत करण्यासाठी आपत्कालीन मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी करण्यात आली. (ही मेंदूतील रक्तवाहिनीत अडकलेली रक्ताची गुठळी विशेष उपकरणांच्या मदतीने काढून टाकण्याची आपत्कालीन प्रक्रिया असून, त्यामुळे मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह पुन्हा सुरू होतो.)
मात्र, संकट इथंच थांबलं नाही. स्ट्रोकच्या उपचारांदरम्यान काही दिवसांनी त्यांच्या हृदयाची लय अचानक बिघडली आणि हृदय प्रभावीपणे रक्त पंप करेनासं झालं.
ही जीवघेणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांना दीर्घकाळ सीपीआर द्यावा लागला आणि 15 हून अधिक वेळा इलेक्ट्रिक शॉक (डिफिब्रिलेशन) द्यावे लागले. काही गंभीर व्हेंट्रिक्युलर ॲरिदमियामध्ये रुग्णाला अनेक वेळा डिफिब्रिलेशन द्यावं लागू शकतं. हे प्रमाण रुग्णानुसार बदलतं.
(ॲरिदमिया -Arrhythmia म्हणजे हृदयाच्या ठोक्यांच्या लयीत किंवा गतीत होणारा बिघाड. व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया आणि व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन हे ॲरिदमियाचे प्रकार असून त्यामध्ये हृदयाची लय धोकादायकरित्या बिघडते आणि शरीराला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही.)
फोटो स्रोत, Getty Images
या संपूर्ण उपचार प्रक्रियेत वाशी इथल्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. समीर काळे आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखालील टीम सहभागी होती.
रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर भविष्यात हृदयाच्या लयीत होणाऱ्या अशा जीवघेण्या बदलांपासून संरक्षण मिळावं म्हणून त्यांच्या शरीरात AICD (Automatic Implantable Cardioverter Defibrillator) हे उपकरण बसवण्यात आलं.
त्यानंतर प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली. फिजिओथेरपी, रक्त पातळ करणारी औषधं आणि हृदयाच्या उपचारांसह त्यांनी हालचाल करण्याची क्षमता पुन्हा मिळवली. सुमारे महिनाभर उपचार घेतल्यानंतर 7 जुलै 2026 रोजी त्यांना घरी सोडण्यात आलं.
बीबीसी मराठीनं या महिलेवर करण्यात आलेल्या उपचारांची तसेच अशा रुग्णांनी कोणत्या तपासण्या करणं गरजेचं आहे याची माहिती तज्ज्ञांकडून घेतली. यात पद्मा यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर तसेच तपासणी प्रयोगशाळांनी सखोल उत्तरं दिली.
ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणजे काय?
ॲट्रियल फिब्रिलेशन (AF) हा हृदयाच्या लयीचा विकार आहे. या स्थितीत हृदयाच्या वरच्या कप्प्यांचं आकुंचन नियमित होत नाही.
परिणामी हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि काही वेळा हृदयात रक्त साचून राहू शकतं. त्यामुळे रक्ताची गुठळी तयार होण्याची शक्यता असते. ही गुठळी मेंदूपर्यंत पोहोचल्यास स्ट्रोक येऊ शकतो.
फोटो स्रोत, Getty Images
या रुग्णावर उपचार करणारे डॉ. प्रशांत पवार यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, “या रुग्णामध्येही हृदयातून निघालेली रक्ताची गुठळी मेंदूपर्यंत पोहोचली आणि उजव्या मिडल सेरेब्रल आर्टरीमध्ये अडथळा निर्माण झाला. या रुग्णामध्ये हृदयाच्या कार्यक्षमतेत झालेली गंभीर घट आणि हृदयातील विद्युत अस्थिरता (इलेक्ट्रिकल इन्स्टॅबिलिटी) यामुळे व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया आणि व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनसारखे जीवघेणे ॲरिदमिया निर्माण झाले. अशा परिस्थितीत हृदय शरीरात प्रभावीपणे रक्तपुरवठा करू शकत नाही आणि कार्डियाक अरेस्ट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तातडीने सीपीआर आणि डिफिब्रिलेशनची गरज भासते.”

या रुग्णाला 15 शॉक का द्यावे लागले? असं विचारल्यावर डॉ. पवार म्हणाले, “या रुग्णामध्ये व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया आणि काही वेळा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन विकसित झालं होतं. हे दोन्ही हृदयाच्या लयीचे अत्यंत धोकादायक विकार आहेत. अशा वेळी हृदय महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा करू शकत नाही आणि कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. त्यामुळे हृदयाची सामान्य लय पुन्हा सुरू करण्यासाठी दीर्घकाळ सीपीआर आणि 15 हून अधिक इलेक्ट्रिक शॉक द्यावे लागले. एवढंच नव्हे, तर आपत्कालीन प्रक्रियेसाठी कॅथलॅबकडे नेत असतानाही रुग्णाला पुन्हा एकदा कार्डियाक अरेस्ट आला.”
आता उपचारादरम्यान एकाचवेळेस मोठा स्ट्रोक आणि वारंवार जीवघेणे ॲरिदमिया होणं किती आव्हानात्मक? असतं ते पाहू.
गंभीर स्ट्रोक आणि वारंवार जीवघेणे ॲरिदमिया एकाच वेळी हाताळणं अत्यंत आव्हानात्मक असतं. अशा रुग्णांची प्रकृती सतत अस्थिर राहू शकते आणि आवश्यक प्रक्रिया सुरक्षितपणे करणंही कठीण होतं.
फोटो स्रोत, Getty Images
डॉ. प्रशांत पवार म्हणाले, “या रुग्णाला कॅथलॅबच्या प्रवेशद्वारावरच पुन्हा कार्डियाक अरेस्ट आला होता. आणखी एक आव्हान म्हणजे AICD बसवण्यासाठी रक्त पातळ करणारी औषधं काही काळ थांबवावी लागतात. मात्र कार्डिओएम्बोलिक स्ट्रोकनंतर लगेच अँटिकोॲग्युलेशन थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे हृदय आणि मेंदूच्या तज्ज्ञांना समन्वयानं निर्णय घ्यावे लागले.”
(रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ नयेत म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधोपचारांना अँटिकोॲग्युलेशन म्हणतात.)
रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यातून काय धडे घ्यावेत?
या प्रकरणातून ॲट्रियल फिब्रिलेशन आणि हृदयाची कार्यक्षमता कमी असलेल्या रुग्णांमध्ये नियमित तपासणी आणि फॉलो-अप किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट होतं. योग्य अँटिकोॲग्युलेशनमुळे कार्डिओएम्बोलिक स्ट्रोकचा धोका कमी होतो, तरीही उच्च जोखमीच्या रुग्णांमध्ये गुठळी तयार होण्याची शक्यता पूर्णपणे टळत नाही.
फोटो स्रोत, Getty Images
डॉ. पवार सांगतात, “स्ट्रोकची किंवा हृदयाचं कार्य बिघडल्याची लक्षणं दुर्लक्षित करू नयेत. अशा लक्षणांवर वेळेत उपचार मिळाल्यास मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमीसारखे जीव वाचवणारे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. गंभीर हृदयविकार आणि जीवघेणे ॲरिदमिया असलेल्या रुग्णांमध्ये AICD सारखी उपकरणंही संरक्षण देऊ शकतात. याशिवाय किडनीचं कार्य, इलेक्ट्रोलाइट्स, औषधं आणि अँटिकोॲग्युलेशन यांचं नियमित निरीक्षण करणं तितकंच महत्त्वाचं आहे.”
स्ट्रोकची लक्षणं दिसल्यास कोणत्या तपासण्या महत्त्वाच्या ठरतात?
स्ट्रोकची लक्षणं दिसल्यावर कोणत्या चाचण्या तातडीनं केल्या पाहिजेत याची माहिती रुग्णाच्या कुटुंबीयांना असणं आवश्यक असतं. याबद्दल बीबीसी मराठीनं न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे उपाध्यक्ष डॉ. सागर शाह यांच्याकडून अधिक माहिती घेतली. डॉ. शाह यांनी बीबीसी मराठीच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली.
ते म्हणाले, “ॲट्रियल फिब्रिलेशन असलेल्या रुग्णामध्ये अचानक अशक्तपणा, बोलण्यात अडचण, चेहरा वाकडा होणं किंवा गोंधळल्यासारखं वाटणं यांसारखी लक्षणं दिसल्यास तातडीने निदान करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा वेळी रक्तातील साखरेची तपासणी केली जाते, कारण कमी रक्तशर्कराही काहीवेळा स्ट्रोकसारखी लक्षणं निर्माण करू शकते. याशिवाय कम्प्लीट ब्लड काउंट (CBC), प्लेटलेट काउंट आणि PT/INR, aPTT यांसारख्या रक्त गोठण्याशी संबंधित चाचण्या रक्तस्रावाचा धोका आणि रुग्ण रक्त पातळ करणारी औषधं घेत आहे का, हे समजण्यासाठी उपयुक्त ठरतात. किडनीची कार्यक्षमताही तपासली जाते कारण ती औषधांचं प्रमाण आणि उपचारांवर परिणाम करू शकते. मात्र स्ट्रोकचं निदान प्रामुख्यानं न्यूरोलॉजिकल तपासणी आणि सीटी किंवा एमआरआयसारख्या ब्रेन इमेजिंगवर अवलंबून असतं. रक्त तपासण्या या निदानाला पूरक ठरतात.”
फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न- ॲट्रियल फिब्रिलेशन असलेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळीचा धोका कसा तपासला जातो?
डॉ. सागर शाह- “ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये रक्ताच्या गुठळीचा धोका एका रक्तचाचणीवरून निश्चित होत नाही. डॉक्टर त्या रुग्णाचे वय, उच्च रक्तदाब, मधुमेह, यापूर्वीचा स्ट्रोक किंवा TIA, हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांचे आजार यांसारख्या घटकांचा विचार करून एकूण धोक्याचा अंदाज घेतात.”
“प्रयोगशाळेच्या दृष्टीने किडनी आणि यकृताची कार्यक्षमता, CBC आणि रक्त गोठण्याच्या चाचण्या महत्त्वाच्या असतात. ईसीजीमुळे हृदयाची लय निश्चित होते, तर इकोकार्डिओग्राफीद्वारे हृदयाचे कप्पे, पंपिंग क्षमता आणि इतर संरचनात्मक बदल तपासता येतात. काही प्रकरणांमध्ये हृदयातील रक्तगुठळी तपासण्यासाठी ट्रान्सओसोफेजियल इकोकार्डिओग्राफीही केली जाते.”
फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न- डी-डायमर आणि इतर रक्तचाचण्या किती उपयुक्त असतात?
डॉ. सागर शाह- “D-dimer, रक्त गोठण्याच्या चाचण्या आणि प्लेटलेट काउंट उपयुक्त असले तरी त्यांचा अर्थ रुग्णाच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. D-dimer हा रक्तातील फायब्रिन तुटण्याचा निर्देशक आहे. रक्तगुठळी झाल्यास तो वाढू शकतो, पण संसर्ग, सूज, वाढतं वय, कर्करोग किंवा गर्भधारणा यांसारख्या इतर कारणांमुळेही त्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे AF मुळे स्ट्रोक झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी ही स्वतंत्र चाचणी पुरेशी नसते.
त्यासाठी PT/INR आणि aPTT रक्त गोठण्याची क्षमता मोजण्यासाठी उपयुक्त असतात, विशेषतः वॉरफरिनसारखी औषधं घेत असलेल्या रुग्णांमध्ये उपयुक्त असतात. मात्र निदान करताना या चाचण्यांचा विचार लक्षणं आणि इमेजिंगच्या निष्कर्षांसोबतच केला जातो.”
प्रश्न- नियमित रक्तचाचण्या स्ट्रोकचा अंदाज देऊ शकतात का?
डॉ. सागर शाह- “रक्तचाचण्यांना स्ट्रोकचा अचूक इशारा देणारी प्रणाली म्हणून पाहू नये. CBC, रक्तातील साखर, किडनीची कार्यक्षमता आणि रक्त गोठण्याच्या चाचण्या महत्त्वाची माहिती देतात, पण त्या स्ट्रोक होणार आहे हे सांगू शकत नाहीत. AF असलेल्या रुग्णांमध्ये स्ट्रोक प्रतिबंध हा मुख्यतः त्यांना असलेल्या एकूण जोखमीवर, इतर आजारांवर, रक्तस्रावाच्या धोक्यावर आणि योग्य अँटिकोॲग्युलेशनवर अवलंबून असतो. रक्तचाचण्या या उपचार सुरक्षित आणि प्रभावी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.”
फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न- वारंवार ॲरिदमिया झाल्यास कोणत्या तपासण्या केल्या जातात?
डॉ. सागर शाह- “अशा वेळी रक्तातील इलेक्ट्रोलाइट्स, ग्लुकोज आणि किडनीची कार्यक्षमता तपासली जाते. परिस्थितीनुसार थायरॉईडची तपासणी, रक्तातील वायूंचं विश्लेषण, औषधांच्या पातळ्या, संसर्ग किंवा सूज दर्शवणाऱ्या चाचण्या आणि ट्रोपोनिनसारखे बायोमार्कर्सही तपासले जाऊ शकतात. मात्र या सर्व तपासण्यांचा विचार ईसीजी, रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि इमेजिंगसोबत केला जातो.”
म्हणजेच स्ट्रोक आणि गंभीर हृदयविकार असलेल्या रुग्णांचं मूल्यांकन एका चाचणीवरून होत नाही. CBC, प्लेटलेट काउंट, रक्तातील साखर, इलेक्ट्रोलाइट्स, किडनी व यकृताचं कार्य, रक्त गोठण्याच्या चाचण्या आणि ट्रोपोनिन किंवा BNP यांसारखे बायोमार्कर्स या रक्तचाचण्या केल्या जातात.
फोटो स्रोत, Getty Images
ईसीजीद्वारे हृदयाची लय तपासली जाते, तर इकोकार्डिओग्राफीद्वारे हृदयाची रचना आणि कार्यक्षमता पाहिली जाते. रक्तगुठळीचा संशय असल्यास ट्रान्सओसोफेजियल इकोकार्डिओग्राफी केली जाऊ शकते. स्ट्रोकची लक्षणं आढळल्यास सीटी किंवा एमआरआय आणि रक्तवाहिन्यांचं इमेजिंग तातडीने केलं जातं. या सर्व तपासण्या, रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि डॉक्टरांचं क्लिनिकल मूल्यांकन यांचा एकत्रित विचार केल्यानंतर रुग्णाच्या जोखमीचं अधिक अचूक मूल्यांकन करता येतं.
(महत्त्वाचे- या लेखातील वैद्यकीय माहिती तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीसह उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे सादर करण्यात आली आहे. हा लेख केवळ माहितीपर असून वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. प्रत्येक रुग्णाची प्रकृती, आजारांचा इतिहास आणि उपचारांची गरज वेगळी असू शकते. स्ट्रोक, हृदयविकार किंवा इतर कोणतीही गंभीर लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




