Source :- ZEE NEWS

Salmonella Outbreak US: अमेरिकेत काही काळापासून अंड्यांच्या किमतीत मोठी वाढ दिसून आलीय. रोगामुळे मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे ही समस्या उद्भवली. आता पुन्हा एकदा अंड्यांशी संबंधित समस्या येथे परत आलीय. यावेळी अंड्यांना बॅक्टेरियाची लागण झाल्याचे म्हटलं जातंय. यामुळे अमेरिकेतील अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

अंड्यांमध्ये आढळला साल्मोनेला 

अमेरिकेत टोमॅटो, कांदे आणि काकडीनंतर आता अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियाची प्रकरणे समोर आली आहेत. देशातील विविध राज्यांच्या अंड्यांमध्ये हा बॅक्टेरिया आढळलाय. ज्यामुळे अधिकाऱ्यांची झोप उडलीय. या अंड्यांमध्ये साल्मोनेला आढळल्यानंतर दुकानांना सुमारे 17 लाख अंडी परत पाठवण्यास सांगण्यात आले आहे.

आजारी पडतायत लोक

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही विषारी अंडी खाल्ल्यानंतर कॅलिफोर्नियासह 7 राज्यांमध्ये सुमारे 80 लोक आजारी पडले आहेत. यातील काही प्रकरणे खूप गंभीर आहेत. आतापर्यंत 21 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सरकारने लोकांना खबरदारी घेण्यास सांगितले असून संक्रमित अंडी फेकून द्यावीत किंवा ती दुकानात परत पाठवावीत असे आवाहन करण्यात आलंय. दुकानांनी परत पाठवलेली अंडी कंपनीकडून निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी पाठवली जाणार आहेत.

साल्मोनेला म्हणजे काय?

संसर्ग टाळण्यासाठी आपले हात पूर्णपणे धुण्याचा सल्ला प्रशासनाने लोकांना दिलाय. तसेच ताप किंवा डिहायड्रेशन सारखी गंभीर लक्षणे दिसल्यास त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगण्यात आलंय. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार साल्मोनेला हा एक हानिकारक सूक्ष्मजीव आहे. जो आपल्या शरीरात पोहोचल्यानंतर 12 ते 72 तासांच्या आत अतिसार, ताप आणि पोटात पेटके येऊ शकतात. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना आणि वृद्धांवर याचा जास्त परिणाम होत असल्याचे दिसून आलंय.

‘टोमॅटो अजिबात खाऊ नका’, अमेरिका सरकारचा नागरिकांना इशारा

साल्मोनेला बॅक्टेरियाने संक्रमित टोमॅटो आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतात. यामुळे उच्च ताप, पोटदुखी, उलट्या, अतिसार आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती एफडीएच्या अहवालात देण्यात आलीय मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना सर्वाधिक धोका असतो. 28 मे रोजी एफडीएने या संसर्गावर उच्चस्तरीय इशारा जारी केला. याचे गांभीर्य ओळखून त्याला वर्ग-1 श्रेणीत ठेवले गेले. कोणत्याही अन्न उत्पादनासाठी सर्वात गंभीर इशारा मानला जातो.विशेषतः जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना आणि दक्षिण कॅरोलिना येथून टोमॅटो परत मागवण्यात आले आहेत. या क्षेत्रात टोमॅटोचे उत्पादन आणि वितरण मोठ्या प्रमाणात केले जाते. समोर आलेल्या अहवालांनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीपासून अमेरिकेतील अनेक शेतांनी स्वेच्छेने टोमॅटो परत मागवण्यास सुरुवात केली.

अमेरिकेची गणना जगातील सर्वात मोठ्या टोमॅटो उत्पादक देशांमध्ये होते. येथे 20 हून अधिक राज्यांमध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. ज्यामध्ये फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया हे सर्वात मोठे केंद्र आहेत. 2023 मध्ये अमेरिकेत 2.5 लाख एकरमध्ये टोमॅटोची लागवड करण्यात आली होती, एका एकरातून सरासरी 50 टन टोमॅटोचे उत्पादन झाले होते. एकूणच त्या वर्षी अमेरिकेने सुमारे 715.6 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 6150 कोटी रुपये) किमतीचे टोमॅटो उत्पादन केले.

SOURCE : ZEE NEWS