Source :- BBC INDIA NEWS

दिगंबर इलामे

फोटो स्रोत, BBC/NiteshRaut

  • Author, नितेश राऊत
  • Role, बीबीसी मराठीसाठी
  • 8 जानेवारी 2025

    अपडेटेड 8 मिनिटांपूर्वी

बुलढाण्यातील शेगाव तालुक्यातल्या 6 गावांमधील लोकांना अचानक केसगळतीचा त्रास सुरू झाल्यानं राज्यभरच एकच खळबळ उडाली होती.

या घटनेची प्रसारमाध्यमांनी दाखल घेतल्यानंतर राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत हालचालींना वेग आला. विविध पथकं गावात दाखल झाली खरी, पण ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसतेय.

आधी केवळ सहा गावांमध्ये अचानक केसगळतीचा त्रास दिसत होता, मात्र आता गावांची संख्या 11 वर पोहोचलीय. तसंच, केसगळती झालेल्या ग्रामस्थांची संख्या 139 पर्यंत पोहोचलीय.

या वाढत्या संख्येमुळे या भागातील गावांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येतंय.

आरोग्य विभागनं काय सांगितलं?

अचानक केसगळतीच्या घटना समोर आल्यानंतर आतापर्यंत काय काय पावलं उचलली गेली? याबाबत बुलढाण्याच्या वैद्यकीय विभागानं सविस्तर पत्रक काढून माहिती दिलीय.

त्यानुसार केसगळतीच्या घटना दिसत असलेल्या गावांमधील विहीर, नदी, तलावाचं पाणी तपासणीकरता भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलं होतं. तसंच, आर्सेनिक, लीड, मक्युरी आणि कॅडमियम इत्यादींचे प्रमाण पाण्यात आहे का, हे तपासण्यासाठीही नाशिकच्या खासगी प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले होते.

बुलढाणा आरोग्य विभागानं काढलेलं पत्रक

या तपासणीचा अहवाल 11 जानेवारीला प्राप्त झाला. त्यानुसार आर्सेनिक, लीड, मक्युरी, कॅडमियम यातलं काहीच पाण्यात आढळलं नाही. मात्र, 31 पैकी 14 नमुन्यांमधअेय नायट्रेडचं प्रमाण जास्त आढळलं. त्यामुळे ज्या गावातील पाण्यात हे नायट्रेड आढळलं, त्या गावांना पिण्यासाठी हे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आलीय.

 केसगळतीचे रुग्ण

फोटो स्रोत, BBC/NiteshRaut

दुसरीकडे, 11 जानेवारीला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही या गावांना भेट दिली. त्यांनी केंद्र सरकारच्या अख्त्यारातील ICMR संस्थेतील तज्ज्ञांना तपासणी आणि सर्वेक्षणासाठी या गावात येणअयास सांगितलं आहे. हे तज्ज्ञ पुढील आठवड्यात या गावांमध्ये येणार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील त्वचारोग तज्ज्ञांनी यापूर्वीच केसगळती झालेल्यांची पाहणी करून, प्राथमिक निदान फंगल इन्फेक्शन असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार उपचारही सुरू केले. मात्र, त्यानंतर अकोला इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्कीन बायोप्सी टेस्टिंगसाठी 8 जानेवारीला नमुने पाठवण्यात आले. या तपासणीचा 11 जानेवारीला अहवाल आला, त्यानुसार सर्व संबंधित बाधितांच्या केसाचे, नखाचे, डोक्याच्या कातडीचे नमुने तपासले असता, कोणतेही फंगल इन्फेक्शन नसल्याचे सकृत दर्शन दिसून आले.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनीही या गावांमधील किराणा दुकनांमधील साबण, केसाला लावण्याचा तेल, शाम्पू यांचे नमुने विश्लेषणासाठी नेले आहेत.

आता ICMR च्या पथकाद्वारे तपासणी आणि सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांच्या अहवालानुसार पुढील पावलं उचलली जाणार आहेत.

केसगळतीचा त्रास झालेले रुग्ण काय म्हणाले?

शेगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये हा त्रास प्रामुख्याने आढळून आल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अनेक नागरिकांनी केसगळतीची तक्रार केल्यानंतर भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वचारोगतज्ञ आणि इतर डॉक्टरांनी पाहणी केली.

या रुग्णालयात डोक्याच्या त्वचेचे नमुने देण्यासाठी आलेल्या रुग्णांनी त्यांचे अनुभव सांगितले.

काहीजणांनी काही विशिष्ट कंपन्यांचे शाम्पू वापरल्यानंतर हा त्रास सुरु झाल्याचं सांगितलं आहे. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अहवाल येईपर्यंत नेमकं कारण सांगता येणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

वानखडे ग्रामीण आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी आदरट यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, “मी या गावांमधील सात ते आठ रुग्णांची तपासणी केली आहे. बाकीचे रुग्ण तपासणीसाठी स्वतःहून तयार झाले नाहीत. मी ज्या रुग्णांची तपासणी केली त्यांच्या टाळूवर काही पॅचेस होते आणि रुग्णांच्या डोक्याला खाज सुटली होती.”

“नव्वद टक्के रुग्णांनी डोकं खाजवत असल्याची तक्रार केली होती. अशी बहुतांश रुग्णांना हिवाळ्यामध्ये होणाऱ्या टीनिया कॉर्पोरीस, टीनिया कॅपेटीस, पिटिरीयासीसी कॅपेटीस अशा आजारांची लागण झाल्याचं दिसून आलं. यासोबतच आम्ही या गावांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळे पाठवले आहेत.”

डॉ. आदरट म्हणाले, “आम्ही रुग्णांच्या त्वचेची तपासणी करणार आहोत. त्यामध्ये रुग्णांच्या डोक्याच्या त्वचेचा 3मिलीमीटरचा तुकडा काढून तपासणीसाठी पाठवला जातो. त्या तपासणीचा निकाल आल्यानंतर आम्ही उपचार करणार आहोत. माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असं घडलं आहे त्यामुळे तपासणीचे अहवाल आल्याशिवाय नेमकं कारण सांगता येणार नाही. बऱ्याचदा कुटुंबात एकच टॉवेल, कंगवा वगैरे वापरल्यामुळे हा आजार पसरतो.”

डॉ. बालाजी आदरट

फोटो स्रोत, BBC/NiteshRaut

ज्या रुग्णांना हा त्रास झाला त्यापैकी काही जणांनी त्यांच्या त्वचेचे नमुने दिले आहेत.

केसगळीतचा त्रास झालेले भोनगावचे रहिवासी दिगंबर इलामे म्हणाले, “माझे केस चालले म्हणून दवाखान्यात दाखवण्यासाठी आलो. मी एक दिवस पांढऱ्या रंगाच्या पॉकेटमधला शाम्पू लावला होता त्यामुळे केस चालले होते. मला दुसऱ्या कोणत्या कारणामुळे केस चालले आहेत असं वाटत नाही. याआधी कधीच आमच्या गावात अशा पद्धतीने केसगळती झाली नाही.”

“आमच्या गावात सुमारे 25 लोकांना हा त्रास होतो आहे. पहिल्यांदा एक दिवस डोक्याला खाज सुटते आणि मग केस गळू लागतात. मला मोठं टक्कल पडलं होतं पण आता पुन्हा केस येऊ लागले आहेत. आमच्या गावात खारट पाणी येतं, त्यामुळेही असं होऊ शकतं. डॉक्टरांनी अजून याचं कारण शोधून काढलेलं नाही. पाण्याचे नमुने घेऊन दहा दिवस झाले पण अजून रिपोर्ट आला नाही.”

केसगळीतला घाबरून काहीजणांनी थेट टक्कल करण्याचा निर्णय घेतला. टक्कल केल्यानंतर डोक्याची खाज कमी झाली आणि पुन्हा केस नियमित वाढू लागले असंही एका रुग्णाने सांगितलं.

केसगळतीचा त्रास सुरु झाल्यानंतर टक्कल केलेले मारुती इलामे म्हणाले, “आठ ते दहा दिवसांपूर्वी मला केसगळतीचा त्रास सुरु झाला. डोकं खाजवू लागलं आणि मग मी टक्कल केलं. केस एवढे गळत होते की, केसाचं पुंजकच हातात येत होतं.”

“आता डोक्याची खाज बंद झाली आहे आणि पुन्हा केस वाढत आहेत. टक्कल केल्यापासून डोक्याला कसलाही त्रास नाही. मी कसलाच शाम्पू वापरत नाही, आता हे पाण्यामुळे झालं की काय काय माहिती? आता डॉक्टरच काय ते सांगतील. गावातील वीसेक लोकांना हा त्रास होतोय. “

पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त

भोनगाव येथील पाण्याचे नमुने तपासल्यानंतर बोलताना बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते म्हणाले, “प्राथमिक तपास केल्यानंतर आम्ही या गावांमधले पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. सामान्यतः पाण्यातील नायट्रेटचं प्रमाण हे दहाच्या आत असायला पाहिजे. परंतु जे पाणी आम्ही पाठवलं त्यामध्ये तब्बल 54 मिलिग्रॅम प्रति लिटर एवढं जास्त प्रमाण आढळून आलं आहे.”

“पाण्यातील लीड आणि अर्सेनिकच्या तपासणीसाठी आम्ही ते नमुने पुणे इथे पाठवले आहेत. आठ ते दहा दिवसांमध्ये त्याचेही निकाल येतील. पाण्यातील रसायनांचं प्रमाण एवढं असल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळे आजार दिसून येतायत.”

 डॉ. अमोल गीते

केसगळतीबाबत बोलताना गीते म्हणाले, “आता केसगळती यामुळेच झाली असं म्हणता येणार नाही. आम्ही वैद्यकीय तपासणीत फंगल इन्फेक्शनमुळे हे झाल्याचं दिसत आहे. या ठराविक भागामध्येच हा संसर्ग कसा पसरला हेही आम्ही तपासणार आहोत. ज्यांचे केस गेले होते त्यांचे केस उगवायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.”

“नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं गीते म्हणाले. या गावांमध्ये राहणाऱ्या महिलांना जास्त भीती वाटत होती मात्र आम्ही त्यांना समजावून सांगितलं आहे. या भागातील नागरिकांनी पाणी शुद्ध करून प्यायला हवं. असं दूषित पाणी पिल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे हे पाणी आहे तसं पिण्यासाठी आयोग्य आहे असाच अहवाल माझ्याकडे आला आहे,” असं डॉ. गीते यांनी सांगितलं.

गावात गोडं पाणीच नाही

भोनगाव हे गाव खारपाणपट्ट्यात येतं. त्यामुळे या गावात गोड्या पाण्याचे साठे कमी आहेत. याबाबत बोलताना सरपंच रामा पाटील थारकर म्हणाले, “गेल्या 10 दिवसांपासून माझ्या गावात एक अजब आजार पसरलेला आहे. आधी एका कुटुंबातल्या व्यक्तीला या आजाराची लागण झाली, त्यानंतर त्याचं कुटुंब आणि आता गावभर हा आजार पसरला आहे. लोकांची केसगळती होत आहे.”

“या आजारामुळे गावात भीतीच वातावरण आहे. गावातील जवळपास वीस रुग्णांना टक्कल पडलं आहे. एकदा केसगळती सुरु झाली की पाच ते सहा दिवसांमध्ये पूर्ण टक्कल पडत आहे. याबाबत आम्ही आरोग्य विभागाला पत्र दिलेलं आहे.”

थारकर म्हणाले, “हे गाव खारपाणपट्ट्यातलं आहे त्यामुळे गावात गोडं पाणी येत नाही. रोजच्या वापरासाठी आम्ही ट्यूबवेल खणल्या आहेत आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवावे लागतात. खाऱ्या पाण्यामुळे अनेकांना किडनीचे आजार झाले आहेत.

आम्ही तात्काळ उपचार सुरु केले आहेत, नेमकं काय झालंय ते तपासणीनंतरच कळेल

 सरपंच सरपंच रामा पाटील थारकर

फोटो स्रोत, BBC/NiteshRaut

शेगाव तालुक्यातील सहा गावांनी या आजाराची तक्रार केल्यानंतर. बुलढाण्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी अमोल गीते यांनी यापैकी काही गावांना भेटी दिल्या. प्राथमिक पातळीवर फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे हा त्रास झालेला असू शकतो असं ते म्हणाले.

अमोल गीते

फोटो स्रोत, BBC/NiteshRaut

या सगळ्या गावांमध्ये सध्या भीतीच वातावरण आहे. मात्र काही रुग्णांनी हा त्रास कमी झाल्याचंही सांगितलं आहे. गावातल्या नागरिकांमध्ये कोरोनासारखा एखादा विषाणूमुळे हा आजार पसरल्याच्या किंवा विशिष्ट कंपनीचा शाम्पू वापरल्यामुळे टक्कल पडत असल्याचा चर्चा सुरु आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC