Source :- ZEE NEWS
Seat 11A Mystery: अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या एआय-171 या विमानाचा अपघात झाला. हे विमान लंडनला जात होते. उड्डाणानंतर अवघ्या 30 सेकंदात विमान मेघानी नगर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं. या विमान अपघातात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1 प्रवाशी आश्चर्यकरित्या बचावला. हा प्रवासी 11 ए या सीटवर बसला होता. तसं पाहायला गेलं तर ही 11ए ही सीट अनलकी म्हटली जाते. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे सीट नंबर 11A याआधीही एका व्यक्तीसाठी भाग्यवान ठरली होती. सुमारे 27 वर्षांपूर्वी थाई स्टार रुआंगसाक जेम्स लोयचुसाकदेखील अशाच एका मोठ्या विमान अपघातातून सुरक्षित बचावले होते.
1998 मध्ये थाई एअरवेजच्या विमान अपघातात रुआंगसाक जेम्स हे थोडक्यात बचावले होते. त्या भीषण अपघातात 101 लोकांचा जीव गेला होता. या अपघातावेळी रुआंगसाक जेम्स लोयचुसाक हे 11A सीटवर बसले होते. अहमदाबाद दुर्घटना आणि रमेश विश्वासकुमार यांच्याबद्दल कळताच अंगावर काटा आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या सीट 11 एचे रहस्य काय अशा चर्चा रंगल्यात.
11 डिसेंबर 1998 रोजी रुआंगसाक जेम्स हे 20 वर्षांचे होते तेव्हा ते थाई एअरवेजच्या फ्लाइट क्र TG261 मधून प्रवास करत होते. दक्षिण थायलंटमध्ये विमानाच्या लँडिगदरम्यान अचानक विमान दलदलीच्या भागात कोसळले. या विमानात तेव्हा 146 प्रवासी होते त्यापैकी 101 जणांचा मृत्यू झाला होता. तर 45 जणांचा जीव वाचला होता. रमेश विश्वकुमार यांचा सीट नंबर पाहिल्यानंतर आपले अंगावर काटा आला असे ते म्हणाले.
लोयचुसाक यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे, ते म्हणाले, “भारतातील विमान दुर्घटनेत वाचलेला एकमेव प्रवासी माझ्याच सीट नंबर 11A वर बसला होता. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला.” रुआंगसाक यांनी सांगितले की, ते विमानाच्या अपघातातून थोडक्यात बचावले असले तरी त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. 10 वर्षे त्यांना विमानात बसण्याची भीती वाटत होती. ते लोकांपासून दूर राहायचे आणि ढग पाहून घाबरून जायचे. मी कोणाशीही बोलणे टाळायचो आणि नेहमी खिडकीबाहेर बघत राहायचो. खिडकी कोणालाही बंद करू देत नव्हतो, जेणेकरून मला सुरक्षित वाटेल. जर मला बाहेर काळे ढग किंवा वादळ दिसत असेल, तर मला खूप वाईट वाटायचे. जणू काही मी नरकातच आहे, असं त्यांनी पोस्टमध्ये मांडलं आहे.
सीट 11 एचे रहस्य?
एअर इंडियाच्या विमानांमध्ये सर्वात पुढे बिझनेस क्लासच्या सीट्स असतात तर त्यानंतर इकॉनोमी क्लास सुरू होतो. या क्लासच्या दरम्यान एक दरवाजा आहे. दरवाजाच्या बाजूलाच सीट 11 ए आहे. हा दरवाजा आत्पकालीन परिस्थितीत वापरता येतो. येथूनच विश्वास हे बाहेर पडले होते.
SOURCE : ZEE NEWS