Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
34 मिनिटांपूर्वी
अनुराग कश्यप आणि वाद यांचं जुनं नातं आहे. अनुराग कश्यप हे एक उत्तम चित्रपट दिग्दर्शक आहेत असं अनेकांचं मत असलं तरी ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. त्यांची रोखठोक भूमिका, अनेक मुद्द्यांबाबतचा स्पष्टवक्तेपणा, परखडपणा यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होतात.
आता ‘फुले’ चित्रपटातील काही दृश्यांबाबत काही संघटना आणि सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या भूमिकेनंतर अनुराग कश्यप यांनी काही वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा वाद पेटला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्यांच्या एका जातीय वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे.
या वक्तव्यानंतर अनुराग कश्यप यांनी दावा केला की त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना विविध धमक्या दिल्या जात आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी माफीदेखील मागितली आहे.
अनुराग कश्यप यांच्या वक्तव्यावर काही प्रसिद्ध लोकांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज मुंतशिर यांनी तर अनुराग कश्यप यांना उघड आव्हानदेखील दिलं आहे.
मात्र अनुराग कश्यप वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीदेखील ते अनेक वादांमध्ये सापडले आहेत.
याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे ते नेहमीच रोखठोक, स्पष्टवक्तेपणानं बोलतात. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सच्या ‘अडोलसेंस’ या वेबसेरीजवरून देखील अनुराग कश्यप यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
अनुराग कश्यप यांनी अनेकदा सेन्सॉर बोर्डावर टीका केली आहे. त्यामुळे ‘उडता पंजाब’ (2016) हा चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डात बराच संघर्ष झाला होता.
वादांशी अनुराग कश्यप यांचं जुनंच नातं आहे. रोखठोक वक्तव्यं करणं असो की सोशल मीडियावरील पोस्ट असो की कौटुंबिक नातेसंबंध असो की चित्रपट कंपनीतील भागीदाराबरोबरचं भांडण असो, अनुराग कश्यप अनेकदा वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत.
सध्याचा वाद काय आहे?
हा वाद ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरू झाला होता.
प्रसारमाध्यमांमधील काही बातम्यांमध्ये हा दावा करण्यात आला होता की ‘फुले’ चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं कात्री चालवली आहे. त्यानंतर अनुराग कश्यप यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती.
त्यात त्यांनी लिहिलं होतं, “धडक-2″ चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळेस सेन्सॉर बोर्ड म्हणालं होतं, मोदींनी भारतात जातीव्यवस्था संपवून टाकली आहे. त्याच आधारे ‘संतोष’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नाही.”

अनुराग कश्यप म्हणाले, “आता ब्राह्मणांना ‘फुले’ चित्रपटाबद्दल अडचण आहे. भाऊ, जर जातीव्यवस्था नाही तर मग ब्राह्मण कसे काय आहेत. जर जातीव्यवस्था नव्हती तर मग ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई का झाल्या होत्या?”
त्यांच्या या पोस्टबद्दल एका युजरनं आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. त्यावर अनुराग कश्यप यांनीदेखील प्रतिक्रिया दिली.
हा वाद अनुराग कश्यप यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून होतो आहे. अर्थात नंतर त्यांनी या प्रकरणात माफीदेखील मागितली.
‘मी टू’ वादातदेखील अडकले होते अनुराग कश्यप
‘मी टू’ आंदोलनाच्या वेळेस एका महिलेनं चित्रपटकार विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
ही महिला फँटम फिल्म प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करायची. अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, मधु मंतेना आणि विकास बहल फँटम प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक होते.
महिलेनं आरोप केला होता की लैंगिक शोषणाची तक्रार त्यांनी अनुराग कश्यप यांच्याकडेदेखील केली होती. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
महिलेच्या या तक्रारीला दुजोरा देत अनुराग कश्यप यांनी हफिंगटन पोस्टच्या वृत्तात म्हटलं होतं की जे घडलं ते चुकीचं होतं.
त्यानंतर अनुराग कश्यप यांनी फँटम प्रॉडक्शन हाऊस बंद करण्याची घोषणा केली होती.
लैंगिक शोषणाचे झाले होते आरोप
2020 मध्ये अभिनेत्री पायल घोष यांनी अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
त्यांनी अनुराग कश्यप यांना एक्सवर (तेव्हाचं ट्विटर) टॅग करत लिहिलं होतं की अनुराग कश्यप यांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली.
पायल घोष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीचं आवाहन केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की अनुराग कश्यप यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली पाहिजे आणि देशाला सत्य कळलं पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
पायल घोष यांच्या आरोपांना पाठिंबा देत अभिनेत्री कंगना रनौत यांनी अनुराग कश्यप यांच्या अटकेची मागणी केली होती.
अनुराग कश्यप यांनी मात्र हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले होते की ते कोणत्याही महिलेशी असं वर्तन करत नाहीत आणि अशाप्रकारचं वर्तन कधीही सहन करणार नाहीत.
चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवरील वक्तव्य
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर ‘चित्रपटसृष्टीतील नेपोटिझम’ म्हणजे घराणेशाहीच्या वादावर बरीच चर्चा झाली होती.
त्यावेळेस अनुराग कश्यप यांनी या मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता की ही चर्चा फक्त अभिनेत्यांपर्यंत मर्यादित का राहते? वास्तविक, एक चित्रपट तयार करण्यासाठी शंभरहून अधिक लोक घाम गाळतात, कष्ट घेतात.
या चर्चेत अनेक कलाकार आणि इतर लोकांनीदेखील नेपोटिझमवर वक्तव्यं केली होती.
कंगना रणौतसह इतर काही कलाकार जे स्वत:ला ‘चित्रपटसृष्टीबाहेरचे’ म्हणवतात, ते या विषयावर उघडपणे बोलले होते.
कंगना रणौत आणि रणवीर शौरीबरोबरचा वाद
चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर झालेल्या वादादरम्यान कंगना रणौत आणि अनुराग कश्यप यांनी एकमेकांवर वक्तव्यं केली होती.
त्यावेळेस अनुराग कश्यप म्हणाले होते की कधीकाळी कंगना रणौत त्यांची खूप चांगली मैत्रीण होती. मात्र आता जी नवी कंगना दिसते आहे, ते तिला ओळखत नाहीत.
अनुराग कश्यप असंही म्हणाले होते की ‘ही कंगना मला सहन होत नाही.’

फोटो स्रोत, Getty Images
दोघांमध्ये झालेल्या वादामध्ये अभिनेते रणवीर शौरी यांनीदेखील उडी घेतली होती. त्यानंतर अनुराग कश्यप त्यांच्यावर चिडले होते. त्यांनी रणवीर शौरी यांना योग्य प्रकारे बोलण्याचा सल्ला दिला होता.
रणवीर शौरी म्हणाले होते की अनेक स्वतंत्र आणि चित्रपट बंडखोर मुख्य प्रवाहातील बॉलीवूडचे चमचे झाले आहेत. हे तेच लोक आहेत, ज्यांना जोपर्यंत मुख्य प्रवाहातील बॉलीवूडच्या महत्त्वाच्या प्रॉडक्शन हाऊसकडे एंट्री मिळाली नाही, तोपर्यंत ते चोवीस तास, सातही दिवस व्यवस्थेविरोधात सातत्यानं बोलायचे.
रणवीर शौरी यांच्या या ट्वीटनंतर दोघांनी एकमेकांना उत्तर देत ट्वीट केलं होतं आणि अनेक वक्तव्यं केली होती.
‘उडता पंजाब’ चित्रपटावरून सेन्सॉर बोर्डाशी संघर्ष
अनुराग कश्यप यांचा ‘उडता पंजाब’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डानं अनेक आक्षेप घेतले होते आणि चित्रपटातील दृश्ये कापण्याच्या सूचना केल्या होत्या.
सेन्सॉर बोर्डाच्या या सूचना अनावश्यक असल्याचं अनुराग कश्यप म्हणाले होते.
त्यांचं म्हणणं होतं की पहलाज निहलानी (सेन्सॉर बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष) नियम-कायदे धाब्यावर बसवून सेन्सॉर बोर्ड चालवत आहेत.

फोटो स्रोत, Shahid Kapoor Twitter
अनुराग कश्यप यांचं हेदेखील म्हणणं होतं की निहलानी त्यांचे विचार सगळ्या जगातील चित्रपटांवर लादू इच्छितात.
तर त्यावर पहलाज निहलानी म्हणाले होते की ‘उडता पंजाब’ चित्रपटावर घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता.
ते म्हणाले होते, “केंद्र सरकारनं कधीही सेन्सॉर बोर्डावर दबाव टाकलेला नाही. या निर्णयावर कोणताही राजकीय दबाव नव्हता.”
त्याचबरोबर निहलानी यांनी अनुराग कश्यप हे ‘डिक्टेटर’ (हुकुमशहा) असल्याचं म्हटलं होतं.
अर्थात, नंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं होतं. न्यायालयानं एक दृश्य कापून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा असा निकाल दिला होता.
‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या वादाच्या वेळेस उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं की सेन्सॉर बोर्ड ही चित्रपटाचं प्रदर्शन थांबवणारी किंवा दृश्य कापणारी संस्था नाही. तर ती फक्त प्रमाणपत्र देणारी संस्था आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC