Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
अन्न पुन्हा गरम केल्यानं आरोग्यास धोके उद्भवू शकतात जे आपल्या सहज लक्षात येत नाहीत.
पण जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचं अन्न खराब होणार नाही आणि अन्नामुळे होणाऱ्या आजारांचा धोकाही कमी होईल.
अन्न गरम करण्याशी संबंधित कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आपण जाणून घेऊयात.
अन्न गरम करण्याची योग्य पद्धत
1. अन्न जास्त वेळ बाहेर ठेऊ नका
घरातील सामान्य तापमानात (रुम टेंप्रेचर) अन्न दोन ते चार तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका.
शिजवलेला तांदूळ तर फक्त एक तास बाहेर ठेऊ शकता. कारण भातामध्ये बॅसिलस सेरियस नावाचे बॅक्टेरिया लवकर वाढतात.
तसेच बाहेरून मागवलेला भात पुन्हा गरम करू नका. कारण हॉटेलमधून मागवलेला भात बनताना आधीच गरम झालेला असतो. तो पुन्हा गरम करणं हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे असा भात बाहेरून मागवल्यानंतर लगेच खाणं चांगलं असतं.
2. घरी शिजवलेलं अन्न जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नका.
उरलेलं अन्न 24 ते 48 तासांच्या आत वापरावं. जर तुम्ही ते लवकरच खाण्याचा विचार करत नसाल, तर ते गोठवून ठेवणं चांगलं.
3. कोमट पाण्यानं चिकन डिफ्रॉस्ट करू नका.
जर मांस फ्रीजरमध्ये ठेवले असेल आणि ते गोठलेल्या अवस्थेत असेल, तर ते कधीही कोमट पाण्यानं डीफ्रॉस्ट म्हणजे सामान्य तापमानास आणू नये.
कारण तसं केल्यानं मांसाचे काही भाग गोठलेल्या अवस्थेत असतानाच, काही भाग ‘धोकादायक तापमान’ गाठू शकतात.
याचा परिणाम म्हणजे मांसामध्ये असलेले कॅम्पिलोबॅक्टर नावाचे बॅक्टेरिया पोटदुखी, उलट्या आणि गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते.
काय करावं?
1. अन्न नेहमी फ्रीजमध्ये ठेवावं. संशोधनातून असं दिसून आलं आहे की, जर अन्न रेफ्रिजरेटरमध्ये (5 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमानात) ठेवलं तर हानिकारक जीवाणूंची होणारी वाढ रोखली जाते.
2. फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी अन्न थंड करावं. कारण गरम अन्न थेट फ्रीजमध्ये ठेवलं तर ते फ्रिजचं तापमान वाढू शकतं. त्यामुळे उर्वरित अन्नावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि बॅक्टेरिया वाढतात.
सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रथम अन्न खोलीच्या तापमानावर थंड होऊ देणं आणि नंतर ते लगेच फ्रीजमध्ये ठेवणं. गरम वातावरणात अन्न जितकं कमी वेळ बाहेर राहील तितकं ते चांगल्या स्थितीत राहील.
3. धोके वेळीच ओळखा. कारण 8 अंश सेल्सियस ते 63 अंश सेल्सियस तापमानात बॅक्टेरिया खूप वेगाने वाढतात.
जर रेफ्रिजरेटरचं तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवलं तर अन्नातून होणारी विषबाधा टाळता येते.
-18 अंश सेल्सिअस तापमानात अन्न गोठवल्यानं जीवाणूंची क्रिया थांबते, मात्र त्यामुळे ते मरत नाहीत. अन्न डिफ्रॉस्ट होताच ते पुन्हा सक्रिय होऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
4. अन्न फ्रीजरमध्ये ठेवा जेणेकरून तुम्ही ते नंतर डीफ्रॉस्ट करू शकाल.
कोणताही अन्नपदार्थ ‘वापराच्या तारखेपर्यंत’ गोठवता येतो, जसे की ब्रेड गोठवण्यास सोपा असतो आणि बराच काळ टिकतो.
5. पुन्हा गरम करण्यापूर्वी गोठलेले अन्न पूर्णपणे डीफ्रॉस्ट करा.
अन्न 24 तासांपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून ते डीफ्रॉस्ट करता येते, मात्र हे अन्नाच्या प्रमाणावर देखील अवलंबून असतं. उदाहरणार्थ, मांस जास्त असेल तर ते सामान्य तापमानावर यायला जास्त वेळ घेईल तर थोडं मांस लवकर सामान्य तापमानावर येईल.
काही वस्तू मायक्रोवेव्हमध्ये देखील डीफ्रॉस्ट करता येतात, परंतु पॅकेटवरील सूचनांचं पालन करणं कधीही चांगलंच.
फ्रीजमध्ये गोठवलेलं अन्न ‘धोकादायक तापमानाला’ पोहोचत नाही, म्हणून ही सर्वात सुरक्षित पद्धत आहे.
स्वयंपाक करण्यापूर्वी ते पूर्णपणे सामान्य तापमानाला आले आहे का याची खात्री करावी.
जर अन्न अर्धवट डिफ्रॉस्ट केलं तर ते व्यवस्थित शिजणार नाही आणि त्यात असलेले हानिकारक बॅक्टेरिया देखील राहू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
6. उरलेला भात 24 तासांच्या आत पुन्हा गरम करा आणि खा.
भातामध्ये बॅसिलस सेरियस नावाचे बॅक्टेरिया असू शकतात, जे शिजवल्यानंतरही जिवंत राहतात.
तांदूळ शिजवल्यानंतर लवकर थंड करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला तर असा भात खराब होण्याचा धोका कमी होतो, परंतु नंतर त्या भाताला फक्त एकदाच गरम करावं.
शिजवलेला भात गोठवल्यानं या जीवाणूंची वाढ देखील थांबते.
7. कमकुवत आरोग्य असलेल्या लोकांनी अन्न गरम करताना अधिक काळजी घ्यावी
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना, जसे की वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला किंवा ज्यांना आधीच आजार आहेत, त्यांनी अन्न पुन्हा पुन्हा गरम करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.
कारण त्यांना अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो.
अन्न पुन्हा गरम करताना ते सर्व बाजूंनी पुर्णपणे गरम झालं आहे आणि त्यातून वाफ येत आहे याची खात्री करावी.
जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करत असाल तर ते मध्ये मध्ये एकदा ढवळत राहा जेणेकरून ते पुर्णपणे गरम होईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC