Source :- ZEE NEWS

Chatrapati Shivaji Maharaj Statue In Japan: पुण्यातून जपानमध्ये स्थायिक झालेल्या एका व्यक्तीने आपल्या जपानमधील घरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती जपानमधील आमदार आहे. या व्यक्तीचा प्रवास खरोखरच थक्क करणारा असून एका मराठमोळ्या व्यक्तीने नुकतीच त्यांना जपानमध्ये भेट दिली त्यावेळी त्यांना आलेला अनुभव त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत या आमदाराचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठी शिकवण्याचा जपानमध्ये आग्रह

विजय मंगल दत्तात्रय गाढवे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली असून या पोस्टमध्ये एक इसम जपानमधील त्याच्या घराबाहेर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या बाजूला उभा असल्याचं दिसत आहे.

या पोस्टमध्ये गाढवे यांनी, “काल मी आणि माझी फॅमिली जपानमधील टोकियोमध्ये कसाई भागात एका मराठी अवलियाला भेटायला गेलो. पुण्यात शनिवार पेठेत जुनी पोलीस चौकी येथे त्यांचा वाडा होता. तो माणूस 1995 ला जपानची स्कॉलरशिप घेऊन जपानला येतो काय आणि तिथे एका प्रायव्हेट शाळेचा प्रिन्सिपल होतो. आई तिथे पुरण पोळी ते साबुदाणा खिचडीपर्यंत व सर्व भारतीय चटण्या तसेच भारतीय पोशाख शिवते व भारतीय रेस्टोरंट चालवते. हा माणूस स्वतः तीन मजली प्रचंड मोठ घर बांधतो व संपूर्ण घर मराठी पुस्तकं व तसेच मराठी भाषा शिकवण्याचे कलासेस व सर्व जपानी शाळांना आग्रह धरणारा व्यक्ती ठरतो,” असं म्हटलं आहे.

10 लाख रुपयांचा खर्च करुन पुण्यातून नेला पुतळा

“जपानमध्ये भारतीय माणूस नंतर तिथं आमदार होतो. अजून बरंच काही आहे. सगळ्यावर कळस म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला. तो जपानला विमानाने 10 लाख रुपये फक्त वाहतूक खर्च करुन आणला व 8 मार्च 2025 ला उभारला. सुमारे 900 भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे सुमारे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली 300 हस्तलिखित पत्रांचा खजिना आहे. त्यांनी आम्हाला सर्व घर दाखवून सुमारे 2 तास आमच्याशी गप्पा मारल्या आणि एक अंकल्पित दिवस साजरा झाला. त्या माणसाचं नांव आहे योगेंद्र पुराणिक,” असंही गाढवे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

ही व्यक्ती आहे तरी कोण?

योगेंद्र पुराणिक हे जपानमधील आमदार आहे. त्यांचा जन्म 3 जून 1977 साली झाला आहे. ज्यांचे टोपणनाव योगी असे आहे. योगेंद्र यांची जपानमधील ओळख भारतीय वंशाचे जपानी राजकारणी अशी आहे. जपानमध्ये निवडणूक जिंकणारे योगेंद्र हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत. एप्रिल 2019 मध्ये ते टोकियोच्या एडोगावा सिटी असेंब्लीवर सिटी कौन्सिलर म्हणून निवडून आले. त्यांना जपानच्या कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा दिला होता.

एप्रिल 2022 मध्ये, पुराणिक यांची इब्राराकी प्रीफेक्चरमधील त्सुचिउरा फर्स्ट हायस्कूलचे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे योगेंद्र हे जपानमधील सार्वजनिक (सरकारी) शाळेतील पहिले परदेशी वंशाचे प्राचार्य आणि जपानमधील पहिले भारतीय वंशाचे राजपत्रित प्रशासकीय सेवा अधिकारी ठरले. या शाळेत हायस्कूल, ज्युनियर हायस्कूल आणि नाईट स्कूल आहे. योगेंद्र यांच्या नेतृत्वाखालील शाळेत एकूण 1100 हून अधिक विद्यार्थी आणि 100 शिक्षक आहेत. ही शाळा जपानमधील सर्वोच्च दर्जाच्या शाळांपैकी एक आहे. 

SOURCE : ZEE NEWS