Source :- BBC INDIA NEWS
पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये वडिलांनीच स्वतःच्या नऊ वर्षीय मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात मुलाचं डोकं भिंतीवर आपटून खून केला.
याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सागर चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील होळमध्ये राहणाऱ्या पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षांच्या मुलाचा त्याच्या वडिलांनीच खून केला आहे.
मुलगा अभ्यास करत नाही म्हणून संतापलेल्या विजय भंडलकर यांनी पियुषचं डोकं भिंतीवर आपटून आणि गळा दाबून खून केला.
मंगळवारी (14 जानेवारी) दुपारी ही घटना घडली. विजय भंडलकर यांच्या राहत्या घरी हा खून झाला.
या खुनानंतर हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला.
मात्र, बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलगडवत वडील विजय गणेश भंडलकर, मृत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला.
आजीकडून घटना लपवण्याचा प्रयत्न, दिली खोटी माहिती
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पियुषचे वडील विजय भंडलकर यांनी पियुषला, ‘तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो. तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणार दिसतोय’, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. नंतर त्यांनी रागाच्या भरात मुलाचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले. यात मुलगा पियुषचा मृत्यू झाला.
पियुषची आजी शालन भंडलकर या तिथे उपस्थित होत्या. मात्र, त्यांनी त्यांच्या मुलाला अडवण्याचा प्रयत्नही केला नाही. तसेच मुलगा विजय यांच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येऊन पडल्याची माहिती दिली. यातून त्यांनी हा खून लपवण्याचा प्रयत्न केला.
संतोष भंडलकर याने डाॅ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तिथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली.
डॉक्टरांनी पियुषला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी मुलाला तेथे नेले नाही. तसेच गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही याबाबत माहिती दिली नाही. त्यांनी नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृताचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली.
पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुषचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला. यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी या प्रकरणाचा पोलीस तपास करत असल्याचं सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC