Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
( सूचना – या बातमीतील मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)
“मी तुझ्यावर बलात्कार करतोय. गेली कित्येक वर्षं मी तुला भूल देतोय आणि तुझे फोटोही काढतोय.”
एका संध्याकाळी केट त्यांच्या नवऱ्यासोबत गप्पा मारत बसल्या होत्या. सहज गप्पांमध्ये त्यांचा नवरा हे वाक्य बोलला, तेव्हा केट यांच्या पायाखालची जमिनच सरकली.
अक्षरश: केट (नाव बदललेले) यांची वाचाच बंद झाली. त्या तिथेच गोठल्यासारखं बसून राहिल्या. आपला नवरा नेमकं काय सांगतोय हे त्यांच्या पचनीच पडत नव्हतं.
“आपण उद्या रात्री जेवणाला स्पेगेटी खाऊया, तू ब्रेड आणशील का असं काहीतरी जितक्या सहजतेनं सांगतात तसं त्याने मला सांगितलं,” केट म्हणाल्या.
बंद दाराआड अनेक वर्षं त्यांच्या नवऱ्यानं त्यांच्यावर अत्याचार केले होते, हिंसा केली होती आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्यांचा चुकीचा वापर केला होता.
कित्येकवेळा नवरा लैंगिक संबंध ठेवत असतानाच अचानक केट यांना झोपेतून जाग यायची. त्या संबंधांत त्यांची संमती विचारातही घेतली नव्हती. तो बलात्कारच होता, असं त्या सांगतात.
त्यांनंतर अतिशय पश्चाताप झाल्याचं सांगून केट यांचा नवरा त्यांना समजावायचा की, कसे तो पण झोपेत असायचा आणि नेमकं काय घडत होतं ते त्याच्याही लक्षात आलं नाही. त्यालाच काहीतरी आजार असला पाहिजे असं तो म्हणत.
केट यांनी त्याला आधार दिला. डॉक्टरची मदत घ्यायला सांगितली. त्या त्याच्यासोबत होत्या.
पण त्या झोपल्या की, त्यांच्यावर बलात्कार करता यावा यासाठी त्यांचा नवराच त्यांच्या रात्रीच्या चहामध्ये झोपेचं औषध टाकत, याची केट यांना कल्पनाही नव्हती.
कबुलीजबाब दिल्यानंतर केट यांनी पोलिसांकडे जाऊ नये, अशी विनंती त्यांचे पती करत राहिले. त्या पोलिसांत गेल्या तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून केट यांनी ते टाळलं.
तो फक्त त्यांचा नवराच नाही, तर त्यांच्या मुलांचा वडीलही होता. खरंतर ज्याच्यासोबत त्यांनी आयुष्य घालवलं तोच माणूस इतक्या जखमा देऊ शकतो हे मान्य करायला केट यांचंच मन राजी होत नव्हतं.
पण नवऱ्यानं ज्या गोष्टीची कबुली दिली त्याचे शरीरावर झालेले भयंकर परीणाम पुढच्या काहीच महिन्यात दिसू लागले.
केट सांगतात की, त्यांचं वजन अचानक उतरलं, त्या आजारी पडल्या आणि त्यांना पॅनिक अटॅकही येऊ लागले.
त्यांच्या नवऱ्यानं सगळं मान्य केल्यानंतर जवळपास एक वर्षांनी एकदा पॅनिक अटॅक आला असताना केट यांनी आपल्या बहिणीला सारं काही सांगितलं.
त्यांच्या बहिणीनं दोघींच्या आईला बोलावून घेतलं. आईने पोलीस बोलावले. केट यांच्या नवऱ्याला अटक झाली आणि त्यांची चौकशी केली गेली.
पण चार दिवसानंतर केट यांनी स्वतःच डेवन आणि कटर्नवॉल पोलिसांना फोन करून तक्रार मागे घेण्याची विनंती केली.
“माझ्या मनाची तयारीच झाली नव्हती,” त्या म्हणतात. “मनात दुःख होतं. फक्त माझ्यासाठी नाही, तर माझ्या मुलांसाठीसुद्धा. त्यांनी विचार केल्याप्रमाणे त्यांचे वडील नव्हते.”
पण केट यांना त्यांचे पती घरात नको होते. त्यामुळे ते वेगळे राहू लागले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर नेमकं काय झालं याचा त्या अधिक स्पष्टपणे विचार करू लागल्या. सहा महिन्यानंतर, केट पुन्हा पोलिसांकडे गेल्या.
आणि यावेळी डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल माईक स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली तपासही सुरू झाला.
केट सांगतात की, त्या एका गंभीर गुन्ह्यामधल्या पीडिता आहेत हे या डिटेक्टिव्ह पोलिसांनीच त्यांना समजून घ्यायला मदत केली. “त्यांनी मला माझी ताकद परत मिळवून दिली. ती माझ्याकडून काढून घेतली होती हे मी जाणूनबुजून लक्षात घेत नव्हते. माझ्यासोबत जे झालं तो बलात्कार होता हे त्यांनी मला समजावलं.”
त्यांच्या नवऱ्याच्या वैद्यकीय माहितीने महत्त्वाचे पुरावे पुरवले. त्यानं केटसमोर सगळं मान्य केल्यानंतर तो गुपचूप मानोसोपचारतज्ज्ञांना भेटत होता.
त्याच्या एका सत्रातही त्यानं मानोसोपचारतज्ज्ञांना बायको झोपली असताना तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी अमली पदार्थ दिल्याचं सांगितलं होतं. ते मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवूनही घेतलं.
नार्कोटिक्स अनॉनिमस या संस्थेतील काही लोकांसमोर आणि ते दोघं जात होते त्या चर्चमधील काही मित्रांसमोरही नवऱ्यानं कबुल केलं असल्याचं केट म्हणाल्या.
या प्रकरणातील पोलीस अहवाल नंतर क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसकडे (सीपीएस) पाठवण्यात आला, पण त्यांनी आरोप दाखल न करण्याचा निर्णय घेतला.
असं का ते केट यांना कळालं नाही. “नवऱ्याला दोषी ठरवण्यासाठी माझ्या तक्रारीसोबत पुरेसे पुरावे मिळाले आहेत असं मला वाटत होतं. स्वतः गुन्हेगारानेच ते कबुल केलं होतं. मग बाकी कुणाचा संबंध येतोच कुठे?” त्या म्हणाल्या.
त्या कोलमडून पडल्या. त्यांनी सीपीएसच्या निर्णायची अधिकृत समीक्षा करणारा अर्ज केला.
त्यात ‘आमच्या अधिकाऱ्यांचा मूळ निर्णय चुकीचा होता’ हे मान्य केलं गेलं.

फोटो स्रोत, University of Bristol School for Policy Studies
“आमचे बहुतांश निर्णय पहिल्यावेळीच बरोबर लागतात. मात्र या प्रकरणात असं झालं नाही. यामुळे पीडितेला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.” सीपीएसच्या एका प्रवक्ताने बीबीसीच्या ‘फाईल ऑन 4 इन्व्हेस्टिगेट्स’ला सांगितलं.
केट यांच्या नवऱ्यानं त्यांच्यासमोर मान्य केल्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 2022 ला कोर्टात खटला उभा राहिला.
सुनावणी सुरू असताना केट यांच्या नवऱ्याने असा दावा केला की, केट झोपल्या असताना त्यांना बांधून ठेवणं आणि त्या उठल्यावर त्याच अवस्थेत त्यांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवणं ही केट यांचीच लैंगिक आवड होती.
त्यानं केट यांना अमली पदार्थ दिले हे मान्य केलं. पण ते त्यांचे हातपाय बांधताना त्या उठू नयेत म्हणून. त्यात केट यांच्यावर बलात्कार करायचा काही हेतू नव्हता, असं तो म्हणाला. पण न्यायाधीशांचा त्याच्यावर विश्वास नव्हता.
“मला ते फार विसंगत वाटलं,” डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल स्मिथ सांगत होते. “हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत त्रासदायक अनुभव होता. पण त्यांचा नवरा त्या स्वतःच कुठल्यातरी लैंगिक विकृतीत सहभागी होत्या असं सांगणारं चित्र रंगवत होता.”
एक आठवडा खटला चालल्यानंतर केट यांच्या पतीला बलात्कार करणं, लिंगप्रवेश करून लैंगिक अत्याचार करणं आणि काही विशिष्ट हेतूने अमली पदार्थ देणं या गुन्हाखाली दोषी ठरवलं गेलं.
शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी त्याचं वर्णन “आत्ममग्न, सतत स्वतःच्या गरजांना प्राधान्य देणारा” असं केलं. “त्याने आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल खऱ्या अर्थाने पश्चात्ताप दाखवलेला नाही,” असंही कोर्टाने म्हटलं.
त्यांना 11 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली गेली आणि आयुष्यभरासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा आदेश देण्यात आला.
या बातमीत दिलेल्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास झाला असेल तर त्याबद्दल अधिक माहिती आणि मदत ‘बीबीसीच्या ॲक्शन लाईन’वर सापडेल.

फोटो स्रोत, PA Media
आज तीन वर्षांनंतर केट त्यांच्या मुलांसोबत आयुष्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आलेल्या धक्कादायक अनुभवांमुळे आघातानंतरचा तणाव विकार म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर आणि एका मज्जासंस्थेसंबंधीच्या आजाराशी केट लढतायत.
काही दिवसांपुर्वी समोर आलेली, फ्रान्सच्या गीझेल पेलिकॉट यांच्याबाबत घडलेली घटनाही आपल्यासोबत घडलेल्या घटनेसारखीच होती, असं केट यांना वाटतं.
गीझेल यांच्याही पुर्वीच्या नवऱ्यानं त्यांना अमली पदार्थ देऊन त्यांच्यावर बलात्कार केला होता आणि इतर अनेक पुरुषांनाही त्यांचा छळ करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं.
“मला आठवतं गीझेल यांना गरजेची मदत आणि आधार मिळावा अशीच प्रार्थना मी तेव्हा करत होते,” केट सांगत होत्या.
घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात औषधांचा हत्यार म्हणून वापर केला गेला असेल, तर त्याला ‘रासायनिक नियंत्रण’ असा शब्दप्रयोग आता केला जातो.
“आपल्याला वाटतं त्यापेक्षा फार जास्त प्रमाणात त्याचा वापर होत असावा,” असा इशारा ब्रिस्टोल विद्यापीठातील लिंगभाव आणि हिंसा संशोधन केंद्रातील प्राध्यापिका मारियान हेस्टर यांनी दिला आहे.
मी नेहमी या गोष्टीकडे छळ करणाऱ्याच्या साधनसंचाच्या दृष्टिकोनातून पाहते,” त्या म्हणतात. “घरात अशी काही औषधं असतील, तर गुन्हेगार ती छळासाठी वापरत नाही ना हा प्रश्न मला सतत सतावतो.”
“एखाद्याला अमली पदार्थ देणे या गुन्ह्यांची नोंद कमी प्रमाणात होते. यामागचं एक कारण म्हणजे पोलीस गुन्ह्यांची नोंद कशी करतात त्यात झालेले बदल,” असं इंग्लंड आणि वेल्समधील घरगुती हिंसाचार आयुक्त डेम निकोल जेकब्स सांगतात.
“त्यांनी केलेल्या उपाययोजनांनी महिलांवर आणि मुलींवर होणारे अत्याचार पुढच्या दशकात निम्म्यावर यावेत असं मंत्र्यांना वाटत असेल तर पोलिसांकडे नोंद होणाऱ्या सगळ्या घरगुती हिंसाचारासंबंधीच्या गुन्ह्यांचं आपण अचूक मोजमाप करायला हवं,” डेम पुढे म्हणतात.
हे गुन्हेगारांना जाब विचारण्यासाठीच नाही तर पीडितांना गरजेची मदत मिळावी आणि अत्याचारानंतर त्यांचं पुनर्वसन करता यावं यासाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

फोटो स्रोत, PA Media
एखाद्या गुन्ह्याचा भाग म्हणून अमली पदार्थ देण्यात आली असतील, तर ते ओळखण्यासाठी एक सॉफ्टवेअर निर्माण करत असल्याचं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.
संसदेत प्रस्तावित केलेल्या विधेयकात, सरकार एका नवीन आणि आधुनिक गुन्ह्याचा समावेश करत आहे.
क्राइम अँड पोलिसिंग विधेयकाअंतर्गत, सरकार एक नवीन आणि ‘आधुनिक’ गुन्हा तयार करत आहे. त्यानुसार, विशेषतः सुयांचा वापर करून एखाद्याला अमली पदार्थ देणं बेकायदेशीर असेल.
पीडितांनी पोलिसांकडे येऊन तक्रार करावी हा यामागचा हेतू आहे.
एखाद्याला अमली पदार्थ देणं हा इंग्लंडमध्ये आताही गुन्हा आहेच. त्यासाठी 1861 च्या ‘ऑफेन्सेस अगेन्स्ट पर्सन ॲक्ट’सारखे अनेक कायदेही केले आहेत.
पण इंग्लंड आणि वेल्समध्ये लागू होणाऱ्या या नवीन कायद्यातंर्गत गुन्हेगाराला 10 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
न्याय मंत्रालयाचं म्हणणं आहे की, स्पायकिंगसाठी स्वतंत्र गुन्हा तयार केल्यामुळे पोलीस अधिक चांगल्या प्रकारे या गुन्ह्यांची नोंद ठेवू शकतील आणि त्यामुळे अधिक पीडित व्यक्तींना पुढे येऊन तक्रार नोंदवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
महिला आणि मुलींवरील हिंसा आणि संरक्षण विषयक मंत्री जेस फिलिप्स फाईल ऑन 4 इन्व्हेस्टिगेस्टला दिलेल्या एका निवेदनात म्हणतात की, अमली पदार्थ देण्याचा गुन्हा अतिशय घृणास्पद आहे. त्याने पीडितेचा आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची जाणीवही नष्ट होते.
हा कायदा उत्तर आयर्लंडपर्यंत लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहेत.
स्कॉटलंड सरकारचा सध्या या संदर्भात स्वतंत्र गुन्हा तयार करण्याचा कोणताही तातडीचा विचार नाही. मात्र परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
शेवटी, केट यांना न्याय मिळालाच. पण ज्यांना तक्रारीत तथ्य नाही असं वाटलं होतं त्या क्राऊन प्रॉसिक्यूशन सर्विसच्या विरोधात त्यांनी लढा दिला नसता, तर त्यांचा कधीच नवरा तुुरूंगात गेला नसता.
“माझ्यासोबत नक्की काय झालं आणि त्याचे माझ्यावर काय परिणाम झाले हे मी अजूनही समजून घेेते आहे.”
“पण मला वाटतं अत्याचार हे तुम्हाला वाटतात त्यापेक्षा फार शांततेनं घडत असतात हे लोकांनी समजून घ्यायला हवं,” केट म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC