Source :- ZEE NEWS
USA Former House Speaker Melissa Hortman And Her Husband Killed : अमेरिकेतली मिनेसोटामध्ये असलेल्या ब्रुकलिन पार्क आणि चॅम्पलिनमध्ये शनिवारी दोन डेमोक्रेटिक संसद सदस्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. ज्यात एकाची हत्या झाली आहे, तर दुसऱ्याची अवस्था गंभीर आहे. यात माजी हाऊस स्पीकर मेलिसा हॉर्टमॅन आणि त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले. या प्रकरणात मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्ज यांनी सांगितलं की राज्याची माजी हाऊस स्पीकर मेलिसा हॉर्टमॅन आणि त्यांची पतीची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात सीनेटर जॉन हॉफमॅन आणि त्याची पत्नी येवेट यांना देखील दुखापत झाली आहे. टिम वॉल्जनं या गोळीबाराला राजकारणी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. मात्र, अजून सत्य काय आहे हे समोर आलेलं नाही.
कोण होत्या मेलिसा हॉर्टमॅन?
मेलिसा हॉर्टमॅन मिनेसोटा राज्याच्या हाउस स्पीकर होत्या आणि डेमोक्रेटिक पार्टीच्या वरिष्ठ नेत्या होत्या. 2004 मध्ये पहिल्यांदा विधानसभा सदस्यची त्यांनी निवड केली होती. त्या मिनेसोटाच्या राजकारणात प्रभावशाली असलेल्या लोकांपैकी एक होत्या. इतकंच नाही तर त्या उत्तर मिनियापोलिस क्षेत्राचं प्रतिनिधित्व करायच्या. त्या मिनेसोटा डेमोक्रेटिक-शेतकरी-श्रम पार्टीच्या सदस्य देखील होत्या.
हल्ल्यात सीनेटर जॉन हॉफमॅन यांना दुखापत
स्टेट सीनेटर जॉन हॉफमॅन आणि त्यांच्या पत्नीला देखील या हल्ल्यात गोळी लागली आहे. हॉफमॅन 2012 मध्ये सीनेटमध्ये होते आणि त्यांनी आधी मिनेसोटाच्या सगळ्यात मोठ्या स्कूल डिस्ट्रिक्ट एनोका-हेनपिनच्या स्कूल बोर्डमध्ये सेवा केली होती. त्यांची एक सल्लागार कंपनी असून त्याचं नाव हॉफमॅन स्ट्रेटिजिक एडवायजर्स आहे. हॉफमॅन आणि त्यांच्या पत्नीला दोन मुली आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हॉफमॅन आणि त्यांच्या पत्नीची सर्जरी ही यशस्वी झाली आणि ते सध्या धोक्यातून बाहेर आहेत.
मिनेसोटाच्या ब्यूरो ऑफ क्रिमिनल अप्रीहेन्शन (बीसीए) च्या प्रमुख ड्रयू इवांसनं सांगितलं की पोलिसांना एका व्यक्तीवर संशय असून त्याचा शोध घेतला जो पोलिसांच्या वर्दीत होता. सार्वजनिक सुरक्षा आयुक्त बॉब जॉनसन यांनी सांगितलं की ‘ही व्यक्ती कायदा आणि सुव्यवस्थेचा बनावट चेहरा बनून लोकांच्या विश्वासासोबत खेळते. आमच्या सेवेचे आणि संरक्षणाचे प्रतीक असलेल्या वर्दीचा गैरवापर करणे खूप चिंताजनक आहे.’ इव्हान्स म्हणाले की मेलिसा हॉर्टमॅन आणि तिच्या पतीचा मृत्यू गोळ्या लागून झाला आहे. त्यांच्या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालातून याची पुष्टी होईल. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे आणि संशयिताचा शोध सुरू आहे.
एका संशयिताला अटक, दुसरा फरार
या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. मात्र, तो कोण आहे त्याची ओळख अजून उघड केलेली नाही. दुसरा संशयित फरार आहे. सध्या पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी कारवाई सुरु केली आहे. अधिकाऱ्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास लगेच तक्रार 911 वर करण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प याविषयी बोलताना म्हणाले, ‘मिनेसोटात झालेल्या या भयानक गोळीबाराची माहिती मला मिळाली आहे, स्पष्टपणे राज्याच्या नेत्यांनावर निशाणा साधण्यात आला आहे. अमेरिकेत असा हिंसाचार सहन केला जाणार नाही.’ त्याशिवाय त्यांनी एफबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत.
SOURCE : ZEE NEWS