Source :- BBC INDIA NEWS
20 जानेवारी 2025 रोजी म्हणजे आज डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील.
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला. अमेरिकन मतदारांनी ट्रम्प यांच्यावर विश्वास दाखवला.
ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये फक्त अमेरिकन नाहीत, तर भारतीय वंशाच्या लोकांची संख्याही लक्षणीय आहे आणि त्यात वाढही झालीय.
अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे बहुतांश लोक उदारमतवादी डेमोक्रॅटिक पक्षाशी जोडलेले आहेत. वर्षोनवर्ष ही मतं एकगठ्ठा डेमोक्रॅटिक पक्षाकडे जातात. पण या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतांमध्ये फूट पाहायला मिळाली.
डेमोक्रॅटिक पक्षाचे काँग्रेसमन (खासदार) श्री ठाणेदार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतांचं विभाजन झालं. जवळपास 60 ते 65 टक्के भारतीय वंशाच्या लोकांनी ट्रम्प यांना मतदान केलं.”
अमेरिकेत एकूण मतदारांच्या संख्येत भारतीय वंशाचे फक्त एक टक्का मतदान आहे. पण रिपब्लिकन पक्षाला वाढणारं मतदान पाहता ट्रम्प यांच्या विजयात भारतीय वंशाच्या मतदारांचा खारीचा वाटा आहे, हे निश्चित.
इमिग्रेशनबाबत ट्रम्प यांची कठोर भूमिका सर्वश्रृत आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे मतदार इमिग्रेशनला पूरक असणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षाला झुकतं माप देतात. मग या निवडणुकीत भारतीय वंशाचे लोक ट्रम्प यांच्या पाठीशी का उभे राहिले? हे बीबीसी मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
भारतीय लोक ट्रम्प यांच्या पाठीशी का उभे राहिले?
2024 च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आव्हान होतं कमला हॅरिस यांचं. हॅरिस मूळ भारतीय वंशाच्या. त्यामुळे हॅरिस यांना ही मतं सहज मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण तसं झालं नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने कल देणाऱ्या भारतीयांनी यंदा वेगळा विचार केला होता.
अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डिट्रॉइटचे काँग्रेसमन (खासदार) श्री ठाणेदार या बदललेल्या समीकरणाला दुजोरा देतात. बीबीसी मराठीशी बोलताने ते म्हणाले, “भारतीय वंशाच्या लोकांचा कल हा नेहमीच डेमोक्रॅटिक पक्षाकडे होता. डेमोक्रॅटीक पक्षाची धोरणं भारतीय वंशाच्या लोकांना पटतात. पण यंदाच्या निवडणुकीत हे चित्र बदललं.”
अमेरिकन लोकांमध्ये ट्रम्प यांचं आकर्षण खूप जास्त आहे. ट्रम्प यांनी या निवडणुकीत महागाई, अवैध इमिग्रेशन, अर्थव्यवस्था यांसारखे मुद्दे उचलले. अमेरिकेला गतवैभव पुन्हा मिळवून देईन, (Make America Greate Again) ट्रम्प यांची मेगा ही घोषणा लोकांपर्यंत चांगलीच पोहोचल्याचं निवडणुकीदरम्यान दिसून आलं.
भारतीयांचा कल ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाकडे झुकणं हे अचानक झालं का? भारतीय मतांमध्ये फूट का पडली? वॉशिंगटन डीसीमधील वरिष्ठ भारतीय पत्रकार ललित झा बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, “हे अचानक झालेलं नाही. गेल्या दोन निवडणुकांपासून भारतीय वंशाच्या लोकांची मतं रिपब्लिकन पक्षाकडे जास्त संख्येने झुकताना दिसून आली आहेत.”
ललित झा यांच्या मते भारतीय वंशाच्या लोकांची मतं ट्रम्प आणि पर्यायाने रिपब्लिकन पक्षाकडे झुकण्याची तीन प्रमुख कारणं आहेत.
1) ट्रम्प यांची सीमा सुरक्षा आणि अवैध पद्धतीने अमेरिकेत येणाऱ्यांबाबत भूमिका कठोर आहे. या मुद्यावर भारतीय वंशाचे लोक ट्रम्प यांच्यासोबत दिसून आले. भारतीयांना वाटतंय की, वैध पद्धतीने अमेरिकेत येणाऱ्यांसोबत भेदभाव केला जातोय. अवैध पद्धतीने येणाऱ्यांना ग्रीन कार्ड, नागरिकत्व पटकन मिळतं. पण वैध पद्धतीने येणाऱ्यांना या गोष्टी मिळत नाहीत.
2) भारतीय अमेरिकन्सना वाटतं की, ट्रम्प यांचे भारतासोबत संबंध चांगले राहतील. मोदी आणि ट्रम्प यांच्यातील मैत्रीमुळे हे संबंध अधिक चांगले होतील.
3) ट्रम्प बिझनेस-फ्रेंडली आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देणारे मानले जातात. त्यामुळे आयटी सेक्टरमधील भारतीयांचा एक गट ट्रम्प यांच्याकडे झुकलेला आहे.
या निवडणुकीत भारतीय वंशाच्या नागरिकांचं मतदान युनिफॉर्मल दिसून आलं नाही. भारतीय वंशाच्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आवडीनुसार किंवा आपल्याला पटणाऱ्या मुद्यावर मत दिलं. निवडणुकीदरम्यान लोकांशी बोलताना आढळून येत होतं की, युवा भारतीय-अमेरिकन्स आणि महिलांना हॅरिस यांना सपोर्ट केला, तर पुरुषांचा कल ट्रम्प यांच्याकडे होता.
डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांचं याबाबत काय मत?
अमेरिकेतील भारतीयांना उदारमतवादी डेमोक्रॅटीक पक्षाची धेय्य-धोरणं पटतात. इमीग्रेशन रिफॉर्मबाबत खुला विचार करणारा डेमोक्रॅटिक पक्ष नेहमीच भारतीयांना आपला वाटत आलाय. सामाजिक विषयांवर डेमोक्रॅटिक पक्षाची विचारसरणी भारतीयांशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे वर्षोनवर्ष भारतीय वंशाचे लोक डेमोक्रॅट्सना मतदार करतात. मग भारतीयांची विचारसरणी बदलतेय का?
भारतीय लोकांचा कल ट्रम्प यांच्याकडे वळण्याची तीन प्रमुख कारणं डेमोक्रॅटीक काँग्रेसमन श्री ठाणेदार सांगतात,
1) अमेरिकेच्या सीमा बंद करून अवैध पद्धतीने येणाऱ्यांना येऊ देउ नका. या ट्रम्प यांच्या भूमिकेबाबत भारतीय वंशाच्या लोकांचं मत जुळलं.
2) बायडेन यांच्या काळात विविध योजनांवर अमाप पैसा खर्च करण्यात आला. ट्रम्प या मताचे आहेत की, सरकारने अमाप खर्च करू नये आणि वित्तीय तूट वाढवू नये. भारतीय वंशाच्या लोकांना त्यांचं हे मत पटलं.
3) प्रचंड वाढलेली महागाई आणि डबघाईला जाणारी अर्थव्यवस्था हे प्रश्न ट्रम्प चांगल्या पद्धतीने हाताळू शकतील असा भारतीय वंशाच्या लोकांना असलेला विश्वास.
अमेरिकेत गेल्याकाही वर्षात कोट्यावधी लोक अवैध पद्धतीने शिरले आहेत. या लोकांना चांगली वागणूक दिली जाते. डेमोक्रॅट्सना त्यांच्याबाबत सहानुभूती आहे. पण वैध पद्धतीने अमेरिकेत कामासाठी किंवा शिकण्यासाठी येणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. हा त्रास भारतीयांना चागलाच माहिती आहे. त्यामुळे अवैध इमीग्रेशनबाबत ट्रम्प यांची कठोर भूमिका भारतीयांना जास्त योग्य वाटते.
श्री ठाणेदार पुढे म्हणाले, डेमोक्रॅटिक पक्षाने भारतीय वंशाच्या लोकांकडे या निवडणुकीत दुर्लक्ष केलं होतं.
डेमोक्रॅटिक पक्षाकडून किती टक्के भारतीय दुरावले?
रिपब्लिकन पक्षाकडे वाढणाऱ्या भारतीय वंशाच्या मतदानाचा अंदाज 2024 च्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून दिसून येत होता. कार्नेगी एंडोमेंट सर्व्हेच्या आकड्यांवरून ट्रम्प यांच्याकडे भारतीयाचं माप झुकतंय हे स्पष्ट होत होतं.
कार्नेगी एंडोमेंट सर्व्हेच्या माहितीनुसार :
1) 2020 मध्ये 56 टक्के भारतीय स्वत:ला डेमोक्रॅट मानत होते. तर 2024 हा आकडा 9 टक्क्यांनी घसरून 47 टक्क्यांपर्यंत खाली आला.
2) 2020 च्या निवडणुकीत 22 टक्के लोक रिपब्लिकन पक्षाला मत देण्यासाठी इच्छुक होते. हा आकडा वाढून 2024 मध्ये 31 टक्क्यांपर्यंत पोहोचला.
3) 22 टक्के महिलांनी सर्व्हेत ट्रम्प यांना मत देण्याची इच्छा दर्शवली, तर पुरुषांमध्ये ही संख्या 39 टक्के होती.
वॉशिंगटन डीसीमधील वरिष्ठ भारतीय पत्रकार ललित झा सांगतात, “2024 निवडणुकीत किती टक्के भारतीयांनी ट्रम्प यांना मतदान केलं याचे आकडे सांगणं कठीण आहे. पण ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाला मत देणाऱ्या भारतीयांची संख्या 30-35 टक्क्यांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय.”
एप्रिल आणि मे 2024 मध्ये करण्यात आलेल्या Nationalwide Survey of Asian Americans मध्ये दिसून येत होतं की, डेमोक्रॅटीक पक्षाची पारंपारिक वोटबँक असणाऱ्या एशियन अमेरिकन मतदारांचा टक्का हळूहळू कमी होत होता. 2020 मध्ये 65 टक्के भारतीय वंशाच्या मतदारांनी जो बायडेन यांना सपोर्ट करण्याची इच्छा दर्शवली तर, जुलै 2024 मध्ये ही संख्या 46 टक्क्यांपर्यंत खाली आली.
IT सेक्टरमध्ये काम करणारे प्रमोद पत्की अमेरिकेतील सेंट लुईसमध्ये रहातात. ते स्वत: इमिग्रंट आहेत. प्रमोद म्हणतात, “मला अर्थव्यवस्था, अवैध इमीग्रेशन याबाबत रिपब्लिकन पक्षाची भूमिका आणि निर्णय पटतात. “2016-2020 रिपब्लिकन पक्ष सत्तेत असताना अस्थव्यवस्थेची स्थिती चांगली होती. नोकऱ्या उपलब्ध होत्या आणि महागाईवर नियंत्रण होतं. रिपब्लिकन पक्षाने पॉलिटीकली योग्य आहे का नाही याचा विचार न करता कोणत्याही गोष्टी शूगर कोट किंवा चांगल्या वाटतील म्हणून सांगितल्या आणि केल्या नाहीत.
“व्यापारी तूट असो किंवा दहशतवाद याबाबत जनतेला योग्य माहिती देणं. सरकार याबाबत काय पावलं उचलतंय हे वेळोवेळी जनतेला सांगण्याचं काम रिपब्लिन सरकारने केलं.”
ते पुढे म्हणाले, “रिपब्लिकन सरकारने अवैध इमीग्रेशनला आळा घालण्यासाठी योग्य पावलं उचलली. या गोष्टी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. या प्रमुख कारणांमुळे मी डेमोक्रॅट्सपेक्षा रिपब्लिन पक्षाला समर्थन करतो.”
रिपब्लिकन पक्षाचं मत
राजकीय विश्लेषकांच्या मते, भारतीय वंशाचे लोक डेमोक्रॅट्सना समर्थन करत असले, तरी रिपब्लिकन पक्षाला बऱ्याच वर्षांपासून हे माहित आहे की, अर्थव्यवस्था, सामाजिक विषय आणि भारत-अमेरिका संबंध या मुद्द्यांवर ही मतं आपल्याकडे वळू शकतात. त्यामुळे या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने भारतीय वंशाच्या लोकांवर चांगलाच फोकस केला होता.
भारतीय वंशाचे डॉ. संपत शिवांगी रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आणि रिपब्लिकन इंडियन काउंसिलचे संस्थापक सदस्य आहेत. जुलै 2024 मध्ये झालेल्या रिपब्लिकन नॅशलन कन्व्हेन्शनसाठी त्यांची ऑफिशिअल डेलिगेट म्हणून निवड करण्यात आली होती.
बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. शिवांगी म्हणाले, “जो बायडेन सत्तेत असताना भारताबद्दल एक पूर्वग्रह तयार करण्यात आला होता. दुसरीकडे ट्रम्प यांचा भारताबाबतचा दृष्टीकोन सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत होण्यास मदत मिळेल.” हे भारतीय वंशाचे लोक ट्रम्प यांना समर्थन देण्याचं प्रमुख कारण आहे.
रिपब्लिकन नेत्यांच्या माहितीनुसार, हळूहळू भारतीय वंशाच्या लोकांमध्ये ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाबाबत पूर्वग्रह बदलू लागलंय. त्यामुळे 20-22 टक्के रिपब्लिकन पक्षासोबत असणारा भारतीय समुदाय आता 35 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढलाय.
“कमला हॅरिस मूळ भारतीय वंशाच्या. असं असून सुद्धा त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाही. यामुळे इंडियन-अमेरिकन्सन नाराज झाले,” असं डॉ. शिवांगी पुढे म्हणाले.
न्यूयॉर्कमध्ये रहाणारे शरणजीत सिंह थिंड रिपब्लिकन पक्षाशी जोडलेले आहेत. 2021 मध्ये त्यांची न्यूयॉर्कच्या न्यासू काउंटी रिपब्लिकन पार्टीचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
ते म्हणतात, “डेमोक्रॅट्सकडून रिपब्लिकन हा भारतीय वंशाच्या लोकांचा प्रवास अचानक झालेला नाही. लोक रिपब्लिकन पक्षाकडे हळूहळू झुकत आहेत. हा प्रवास काही वर्षांपासून सुरू झाला होता. याचं प्रमुख कारण आहे ट्रम्प यांनी दिलेली आश्वासनं. बॉर्डर सिक्युरीटी, अर्थव्यवस्था, नोकऱ्या हे मुद्दे भारतीयांना जास्त जवळचे वाटतात.”
काही नेते नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, रिपब्लिकन पक्षापेक्षा ट्रम्प यांच्यावर भारतीय वंशाच्या लोकांना जास्त विश्वास वाटतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
भारतीय लोक शिकून, कष्ट करून अमेरिकेत आले. त्याउलट सीमा ओलांडून अवैध पद्धतीने लाखो लोक अमेरिकेत येत आहेत. त्यामुळे भारतीयांनी ट्रम्प यांच्याकडे पाहून मत दिलंय.
भारतीय वंशाच्या लोकांना ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाबाबत नेहमीच शंका असते. मग असं असूनही इंडियन-अमेरिकन्स ट्रम्प यांना का समर्थन देत आहेत, याबाबत माहिती देताना शरणजीत सिंह थिंड सांगतात, “भारतीयांच्या मनात ट्रम्प यांच्याबाबत नक्कीच शंका राहील. भारतीय समुदाय त्यांच्या निर्णयांकडे लक्षपूर्वक पहात आहे. त्यांनी आश्वासनं पाळली नाहीत, तर आम्ही त्यांना जाब विचारू.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC