Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
“घरात आता एकही बाई राहिली नाही. माझी पत्नीही गेली आणि आईदेखील. आता काय करावं, कसं करावं काहीच समजत नाही. घरात बाईच राहिली नाही, तर संसार कोणत्या पद्धतीनं करावा? माझी लहान लहान मुलंही रडतात.”
वाघाच्या हल्ल्यात एकाचवेळी आपली पत्नी आणि आईला गमावलेले मनोज चौधरी कंठ दाटलेल्या आवाजात बोलत होते.
मनोज चौधरी हे सिंदेवाही तालुक्यातील मेंढा (माल) गावचे रहिवासी आहेत. गेल्या 10 मे रोजी त्यांची पत्नी शुभांगी मनोज चौधरी आणि आई कांताबाई चौधरी यांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
घरात आता फक्त मनोज यांच्यासह त्यांची 8 आणि 10 वर्षांची दोन मुलंच आहेत. आईविना मुलांचं कसं होईल अशी चिंता मनोज यांना सतावते आहे.
शुभांगी आणि कांताबाई यांच्यासह याच गावातील सारिका शालिक शेंडे या महिलेचाही मृत्यू झालाय. सारिका, शुभांगी आणि कांताबाई यांच्यासह 7 महिला तेंदूपत्ता गोळा करायला जंगलात गेल्या होत्या. शुभांगी, सारिका आणि कांताबाई जंगलात एका बाजूला तेंदूची पानं तोडत होत्या, तर त्यांच्याच मागच्या बाजूला त्यांच्यासोबत गेलेल्या इतर महिला होत्या.
मृत सारिका शेंडे यांच्या जाऊबाई माधुरी शेंडे बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाल्या, “आम्ही जावा-जावा आणि आमच्या शेजारी राहणाऱ्या शुभांगी आणि कांताबाई या सासू-सुना जंगलात सकाळीच तेंदूपत्ता तोडायला गेलो होतो. जंगलात गेल्यावर त्या आमच्या मागच्या बाजूला तेंदूपत्ता तोडत होत्या.”
आमचा तेंदू तोडून झाल्यावर त्यांना हाक मारली. पण, आवाजच आला नाही. आम्हाला वाटलं घरी गेल्या असतील. पण, घरीही त्या दिसल्या नाहीत. त्यामुळे माझ्या नवऱ्याला पुन्हा जंगलात पाठवलं. पण, त्यांनाही त्या तिघी दिसल्या नाही.”
मृत शुभांगी यांचे पती मनोज चौधरी सकाळी 11 वाजता कामावरून परत येत होते तेव्हा त्यांना माधुरी यांच्याकडून त्यांची पत्नी आणि आई जंगलातून घरी आली नाही हे समजलं. त्यानंतर ग्रामस्थांना घेऊन त्यांनी जंगलात दुपारी 2 वाजेपर्यंत शोधमोहिम राबवली. शेवटी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आणि त्यांच्या मदतीनं सायंकाळी पाच वाजता जंगलात तिघींचे मृतदेह सापडले.
कुटुंबाकडून मदतीची मागणी
मनोज मिळेल ती मजुरी करतात. पत्नी आणि आईच्या मदतीनं ते घरचा संसार चालवत होते. पण, आता दोघींचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. त्यामुळे मी एकटा सगळं कसं सांभाळणार? अशी चिंता ते बोलून दाखवतात. सोबतच सरकारनं नोकरी द्यावी किंवा माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चा उचलावा अशी मागणीही ते करतात.
ते म्हणतात की, असे हल्ले नेहमीच होतात. त्यात आमच्या गरीब लोकांचा जीव जातो. मोठ्या लोकांना लवकर मदत मिळते. अशा घटना झाल्या की मृतांच्या कुटुंबीयांना कुठलेही कागदपत्रं न मागता थेट मदत द्यायला हवी.
“आपण आपल्या दुःखात असतो आणि मदतीसाठी वनविभागाच्या चकरा माराव्या लागतात. एखादा कागद नाही मिळाला, तर मदत मिळत नाही. कागदपत्रं बनवायला गेलो, तर मुलांना कुठं ठेवायचं हा प्रश्न आहे”, अशी भावना ते व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Bhgyqshree Raut
“आमची आई या हल्ल्यात गेली. आम्हालाही नोकरी द्यावी,” अशी मागणी मृत सारिका शेंडे यांचा 27 वर्षांचा मुलगा आतिश शेंडे करतो.
आतिशच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वी कॅन्सरनं मृत्यू झाला. त्यानंतर आता वाघाच्या हल्ल्यात आईही गमावली. आता घरात फक्त दोन भाऊ आहेत.
आतिश म्हणतो, “वडिलांनंतर आम्ही दोन्ही भाऊ मिळेल ते काम करायला लागलो. आई आणि आम्ही दोन भावंड असं मिळून कसंतरी घर चालवत होतो. पण, आता आई गेली. आम्हाला सरकारकडून आवश्यक ती मदत मिळाली पाहिजे.”
वाघाच्या हल्ल्यात 5 दिवसांत 6 महिलांचा मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या या फक्त तीन महिला नाही, तर गेल्या पाच दिवसांत वाघांच्या हल्ल्यात 6 महिलांचा मृत्यू झालाय. 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यात या तीन महिलांचा मृत्यू झाल्यानंतर वाघांच्या हल्ल्यांत मृत्यूचं सत्रच सुरू झालं.
रविवारी (11 मे) मूल तालुक्यातील महादवाडी इथल्या विमला बुधा शिंदे (68) या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
12 मे रोजी सलग तिसऱ्या दिवशी मूल तालुक्यातील भादूर्णी इथे जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या भूमिका दीपक भेंडारे (वय 30) या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेली पाचवी महिला आहे.

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
पाचव्या दिवशी 14 मे रोजी चिमूर तालुक्यातील पळसगाव इथल्या वनपरीक्षेत्रात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला. कचराबाई अरुण भरडे असं या महिलेचं नाव आहे. कचराबाई त्यांच्या पतीसोबत गेल्या होत्या. दबा धरून बसलेल्या वाघानं कचराबाईंवर हल्ला केला. हे त्यांच्या पतीला समजताच त्यांनी लगेच गावात जाऊन माहिती दिली आणि ग्रामस्थांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना कचराबाईंचा मृतदेह आढळला.
या सहाही महिलांचा मृत्यू एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात झाला आहे.
एआय यंत्रणा अपयशी ठरली का?
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष नवीन नाही. ताडोबात वाघांची संख्या वाढली तेव्हापासून मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत गेला. यावर वनविभागाकडून वेळोवेळी उपायही शोधण्यात आले. काही वर्षांपूर्वीच ताडोबातला मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आर्टीफिशीयल इंटलिजन्सचा वापर करण्यात आला.
गाव आणि जंगलाच्या सीमेवर एआय कॅमेरा बसवून वन्यप्राणी गावाजवळ आल्यानंतर त्याचा अलर्ट ग्रामस्थांना दिला जातो. पण, हा उपाय करूनही वाघांच्या हल्ल्यांमध्ये पाच दिवसांत सहा महिलांचा मृत्यू झालाय. त्यामुळे ही एआय यंत्रणा अपयशी ठरली का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
पण, एआय कॅमेरे हे गावाच्या सीमेवर बसवण्यात आले आहेत आणि हे सगळे मृत्यू जंगलात झालेले आहेत. लोक जंगलात दूरवर जाऊन तेंदू तोडतात त्याठिकाणी हे एआय कॅमेरे नाहीत.
वाघ गावाजवळ आले, तर एआय सिस्टम अलर्ट देते. त्यामुळे एआय यंत्रणेला दोष देता येणार नाही. ही यंत्रणा आपलं काम करत आहे, असं मत चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षण डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केले.
मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यासाठी वनविभाग काय करतंय?
एप्रिल 2025 मध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या वाघांच्या संख्येबद्दल माहिती दिली होती.
त्यांनी म्हटलं होतं की, 2025 ला 446 वाघ महाराष्ट्रात आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या आतल्या कोअर झोनपेक्षा बफरमध्ये वाघांची संख्या जास्त झाली आहे. एकूणच वाघांची संख्या वाढली आहे. जमीन तेवढीच आहे पण वाघांची आणि मानवांची संख्या वाढली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चंद्रपुरात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र आहे. पण हे कमी करण्यासाठी वनविभाग नेमक्या काय उपाययोजना करतंय याबद्दल डॉ. रामगावकर सांगतात, “आता झालेले सगळे अपघाती मृत्यू आहेत. या महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी वनपरिक्षेत्रात या घटना घडलेल्या आहेत. आता या 6 घटना ज्या परिसरात घडल्या तिथं वाघिण आणि चार बछड्यांचं वास्तव्य आहे.”
“लोकांना समूहानं तेंदूपत्ता गोळा करायला जा, अशा सूचना देण्यात येतात. त्यांना ‘प्रायमरी रिस्पॉन्स टीम’च्या मदतीनं वाघ असेल त्या भागात जाऊ नका असा अलर्ट दिला जातो. पण, अनेकदा लोक एकएकटे तेंदूपत्ता गोळा करायला जातात. लोक अचानक वाघाच्या अधिवासात पोहोचल्यानंतर वाघ हल्ला करतो.”
“ज्या भागात या घटना घडल्या आणि जिथं वाघाचा अधिवास जास्त आहे अशी ठिकाणं तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी बंद केले आहेत. पण, तेंदूपत्त्यावर पूर्णपणे बंदी घालू शकत नाही. कारण, एकट्या चंद्रपुरात 32 हजार लोकांचा उदरनिर्वाह तेंदूपत्त्यावर चालतो. त्यामुळे आम्ही कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना वाघांच्या हालचालींच्या सूचना देतो. त्यानुसार ग्रामस्थांना अलर्ट राहायला सांगतो.”
“एआय कॅमेरा लावलेला आहे. पण, हा कॅमेरा वाघ गावाच्या सीमेजवळ आला तेव्हा अलर्ट देतो. पण, लोक जंगलात जातात त्याठिकाणी एआय कॅमेरा नाही आहे. त्यामुळे एआय कॅमेरा सिस्टम अयशस्वी ठरतेय असं म्हणता येणार नाही”, असंही रामगावकर नमूद करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC