Source :- BBC INDIA NEWS
दहावीत शिकणाऱ्या मुलाची मोबाईल आणि इतर शालेय साहित्याची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून शेतात जाऊन मुलानं आत्महत्या केली. त्यानंतर सकाळी शेतकामासाठी शेतात गेल्यानंतर बापानं मुलाचा मृतदेह पाहिला आणि ते दु:ख सहन न झाल्यानं तिथेच स्वत:चंही आयुष्य संपवलं.
कुणाही संवेदनशील माणसाचं हृदय पिळटून टाकणारी घटना घडलीय नांदेडच्या बिलोली तालुक्यातील मिनकी गावात.
नांदेडच्या या पैलवार कुटुंबातील बापलेकानं आत्महत्या करून जीवन संपवल्यानं मिनकी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बीबीसी मराठीनं या गावात जाऊन पैलवार कुटुंबाशी बातचित करून संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला.
नेमकं काय घडलं?
शंभरच्या पटीत लोकसंख्या असलेल्या मिनकी या छोट्याशा गावातलं पैलवार हे शेतकरी कुटुंब. वडिलोपार्जित जेमतेम असणारी शेती पैलवार कुटुंबातील राजेंद्र आणि हनुमंत हे भाऊ कसत होते.
या कुटुंबातील 46 वर्षीय राजेंद्र पैलवार यांना तीन मुलं.
या तीन मुलांपैकी सर्वात धाकटा ओंकार आणि थोरला श्रीकांत हे लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं आश्रमात राहून शिक्षण घेत होते.
16 वर्षांच्या ओंकारचं यंदाचं दहावीचं वर्ष होतं. तल्लख बुद्धीचा ओंकार शिक्षणात हुशार. पुढच्या महिन्यापासून त्याची बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती. त्याआधी ओंकार आणि श्रीकांत गावाकडे आले होते.
वर्गात असणाऱ्या बऱ्याच मुलांकडं मोबाईल होते, चांगले कपडे घालून ही मुलं शाळेत यायची.
वर्गातील मुलांप्रमाणं आपल्याकडंही मोबाईल फोन असावा, या अपेक्षेनं ओंकारनं आपल्या वडिलांकडं (राजेंद्र पैलवार) मोबाईल घेऊन द्यावा, असा हट्ट धरला.
मात्र, कर्जबाजारी झालेले वडील म्हणाले, “यंदा तू अभ्यासाकडे लक्ष दे, पुढच्या वर्षी आपण मोबाईल घेऊ.”
मात्र, वडिलांच्या आर्थिक परिस्थिती बिकट होती. तरीही ओंकारनं वडिलांकडं मोबाईल आणि शालेय साहित्य घेण्याचा हट्ट धरला. त्यानंतर मात्र वडिलांनी ओंकारला ठणकावून सांगितलं की, पैसे नसल्यानं मोबाईल घेऊ शकत नाही.
या प्रसंगानंतर 8 जानेवारी 2025 च्या रात्री नाराज झालेला ओंकार घरातून बाहेर पडला.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 जानेवारीच्या पहाटे नेहमीप्रमाणे राजेंद्र पैलवार शेतात कामासाठी निघून गेले. तिथं पोहोचताच समोरील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण शेतात ओंकारनं आत्महत्या केल्याचं त्यांना दिसलं.
पोटच्या पोरानं आत्महत्या केलेलेल्या आत्महत्येचं दुःख राजेंद्र पैलवार पचवू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनीही त्याच ठिकाणी आपलंही जीवन संपवलं.
‘जगायची इच्छा राहिली नाही’
आपला नातू (ओंकार) आणि मुलगा (राजेंद्र) गमावलेल्या चंद्राबाई पैलवार यांच्याशी बीबीसी मराठीनं बोलण्याचा प्रयत्न केला.
चंद्रबाई पैलवार म्हणाल्या, “आधी नवरा अकाली गेला आणि आता मुलगा-नातू यांनीही आत्महत्या केल्या. आता जगायची इच्छा राहिली नाही.”
तर ओंकारचा मोठा भाऊ श्रीकांत पैलवार म्हणाला, “ओंकार अभ्यासात अतिशय हुशात होता. शाळेत पहिल्या नंबरने पास व्हायचा. मात्र, शाळेत येणाऱ्या मित्रांकडे मोबाईल असल्यानं त्यालाही मोबाईलची आवड लागली आणि असं होऊन बसलं.”
‘बँकेच्या साहेबांचा वसुलीसाठी तगादा’
बीबीसी मराठीनं राजेंद्र पैलवार यांच्या भावाशीही बातचित केली. राजेंद्र आणि त्यांचे भाऊ हनुमंत पैलवार हे एकत्रितरित्या शेती करत होते.
हनुमंत पैलवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “यावर्षी अतिवृष्टी झाल्यानं हाताशी आलेलं पीक गेलं. बँकेची नोटीस आली होती. बँकेचे साहेब घरी यायचे. शेत विका आणि कर्ज भरा, असा तगादा ते लावायचे. त्याचं टेन्शन भावाला होतं. त्यात मुलानं असा टोकाचा पाऊल उचल्यानं भावानंही जीवन संपवलं.”
याच गावातील तरुण शेतकरी प्रकाश भंडारे म्हणतात की, “मागच्या काही वर्षांपासून या भागात अतिवृष्टी होत आहे. त्यात पैलवार यांचं शेत ओढ्याच्या जवळ आहे, त्यामुळे 12 महिने त्यांचं शेत ओलिताखाली असतं. म्हणून हाताला काही लागत नाही.
“त्यात बँकेचे आणि खासगी सावकाराचे कर्ज आणि त्याच्या नोटिसा येत होत्या. त्यामुळे ते नैराश्यात होतेच. अशा घटना थांबवायच्या असतील तर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव दिला पाहिजे आणि नुकसानभरपाई भरीव करायला पाहिजे.”
प्रशासकीय आश्वासन
नांदेडच्या बिलोली तालुक्याच्या उपविभागीय विभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी पीडित कुटुंबियांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
शासकीय योजनांचा जितका काही लाभ देता येईल, ते पुढील आठवडाभर आम्ही पीडित कुटुंबीयांना देऊ, असं बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे म्हणाल्या.
दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी अशा नाना संकटांनी वेढलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक-मानसिक अवस्था कुठल्या टोकाला पोहचल्या आहेत, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं.
महत्त्वाची सूचना :
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC