Source :- BBC INDIA NEWS
“माझ्या ओळखीतली बाई सवाष्ण म्हणून जेवायला बसली होती. एका बाईनं तिला मूल असलेली सवाष्ण हवी, मूल नसलेली नको असं म्हणून जेवणाच्या ताटावरुन उठवलं. ती बाई घरी जाऊन दरवाजा बंद करून रड रड रडली. ती दरवाजाच उघडत नव्हती. ती स्वत:चं बरं वाईट करून घील म्हणून नवरा लई घाबरला. महिनाभर ती बाई नवर्याला पण बोलत नव्हती. आता ती घराबाहेरच जात नाही,” विमल (अम्मा) तिच्या गावातील एका स्त्रीबद्दल सांगते.
विमल, वय 48, नवऱ्याचे निधन होऊन 20 वर्षे झालेली, मूल न झालेली. पश्चिम महाराष्ट्रातील एका लहानग्या गावची रहिवासी.
विमल पुढे म्हणते, “मूल नसलं की लोक पुरुषाचाही अपमान करतात. ह्याला मूल होत नाही, ‘वासना बरी तर पदरात तुरी,’ म्हणतात. पुरुषाला तर आपलं दु:ख मांडताच येत नाही. तो रडुबी शकत नाही. त्याला हिणवतात. असा पुरुष कुणाबरोबर जास्त बोलत नाहीत, कुणात जास्त मिसळत नाहीत. गावातली इतर पुरुष माणसं त्याला बघून फिदिफिदी हसतात, कशात नीट मिसळून घेत नाहीत.”
“मला रात्र रात्र झोप लागत नव्हती. मी खाणं सोडून दिलं होतं. अचानक झोपेतून दचकून उठायचे, थरथर कापायचे. कुणाशीही बोलायचे नाही. लहान मुलांकडं पाहिलं की टेन्शन यायचं. आपल्यालाच मूल का नाही याचा त्रास व्हायचा. सगळे लोक मला ‘पागल’ झाली बोलायचे. मला दवाखान्यात नेण्यात आलं. सगळ्या टेस्ट झाल्या. डॉक्टर बोलले काही झालेलं नाही. बाळ होत नाही याचा त्रास होतो आहे. मेंटल प्रॉब्लेम हैं,” पन्नाशीकडं झुकलेल्या अम्मा सांगत होत्या.
अम्मांना नवर्यानं मूल असण्याची गरज भागवण्यासाठी मुंबईत पाळणाघर सुरू करून दिलं. आता मात्र अनेक वर्षांनी नवरा त्यांना गावी राहायला घेऊन गेला. त्या अजूनही मूल नसण्याची खंत स्वीकारून जगत आहेत.
“हिला मूल नाही तर हिला माया नसणार म्हणतात. मूल नसलेल्या बाईला बारशाच्या कार्यक्रमाला बोलावणार पण पाळण्याच्या जवळ पण जाऊ देणार नाहीत. बाळाला हातात देणार नाही, घेऊ देणार नाही. आपण आपलं नुसतं लांब राहून उभं राहयचं. अपमान झाल्यासारखा वाटतो. शहरापेक्षा गावाकडं जास्तच त्रास असतोय. मिळून मिसळून घेत नाहीत, मानसन्मान देत नाहीत. एखाद्या बाईला जर बाळ होत नसल तर त्यात तिचा काय दोष?” विमल सहज विचारते.
आपल्या नजरेत नजर घालून जेव्हा हे वाक्य एखादी स्त्री बोलते तेव्हा आपल्याकडं तिच्या प्रश्नाचं उत्तर नसतं.
मूल नसणं मानसिक त्रासाचं कारण
नुकतीच नागपूरला एका दाम्पत्याने आपल्या लग्नाच्या 26 व्या वाढदिवशी आत्महत्या केली. हे दाम्पत्य अनेक वर्षांपासून बाळ होण्यासाठी प्रयत्न करत होतं असं पोलिसांनी सांगितलं होतं.
एकमेकांसोबत आनंदी असताना केवळ आपल्याला मूल होत नाही या विचारानं ते निराश झाले. 2022 मध्येही सातार्यातील वाईमध्येही अशीच एका तरुण जोडप्यांनं आत्महत्या केली होती.
‘शिक्षण, नोकरी, लग्न आणि मूल’ हे भारतात किंवा कदाचित जगभरातील अनेक देशांमध्ये जगण्याचं एक बंदिस्त आणि अलिखित चक्र आहे. या चक्रातील कोणतीही गोष्ट कमी झाली किंवा मागे पुढे केली की समाजाची साखळी मोडल्याचा गुन्हा व्यक्तीच्या माथी लागतो आणि तिला त्रास होतो.
लग्न आणि आणि मूल यांचं यालाही अनेक पदर, अटी. लग्न झालं की पहिल्या वर्षात मूल हवंच कारण लग्नाचा थेट संबंध प्रजोत्पादनाशी. जणू काही अपत्यासाठी सोडून इतर शरीरसंबंध वर्ज्यच किंवा वैध नसावेत आणि केवळ आनंदासाठी तर ते नसावेतच.
फक्त सहवासासाठी लग्न आणि आनंदासाठी मूल ही संकल्पना सगळीकडे रुजलेली नाही. मूल हवं तर ते स्वत:च्या हाडामांसाचं, नवर्याचंच म्हणजे त्याच बीजाचं (म्हणजे आपलं ते शुद्ध बीज, दुसर्याचं ते…), मूल लग्नाच्या आधी नको, विधवा स्त्रीला मूल व्हायला नको, विवाहबाह्य संबंधातील किंवा लग्न न करता झालेलं मूल अनौरस, मुलगा झाला तर स्वागत, मुलगी झाली तर तिचं नाव ‘नकुशी’ ठेवणार.
मूल जन्माला घालण्याचा ताण स्त्रियांवर जास्त
काहीच दिवसांपूर्वी परभणीत पत्नीला तिसरीही मुलगीच झाली म्हणून पतीनं तिला पेटवून दिलं. यावरून स्त्रीला मुलगाच जन्माला घालण्याचा प्रचंड दबाव असतो हे समजून घेता येऊ शकतं.
मुलगा मुलगी जन्मणं हे पुरुषाच्या गुणसूत्रावर अवलंबून असतं, हे सत्य असतानाही “तू मुलाला का जन्म देत नाही” म्हणत स्त्रियांना मारहाण केली जाते, रोज बसता उठता शिव्या दिल्या जातात, रोज घरात भांडणं होतात.
बर्याचदा गर्भलिंगनिदान चाचणी करून मुलींना गर्भातच मारलं जातं. मुलीचा गर्भ पाडत असताना मृत्यू अशा मथळ्याच्या बातम्या आपण वाचत असतो. गर्भाशय स्त्रीकडं असल्यानं त्यासोबत जे काही होईल ते स्त्रीला भोगावं लागतं.
खरं तर मूल होण्याची इच्छा असणार्या प्रत्येक स्त्रीला आनंददायी गर्भारपण आणि सुरक्षित बाळंतपण मिळायला हवं. मात्र, युनायटेड नेशन्स एजन्सींजच्या 2023 मधील आकडेवारीनुसार दर दोन मिनिटांनी एका महिलेचा गर्भधारणा किंवा बाळंतपणादरम्यान मृत्यू होतो. हा अहवाल ‘मातामृत्यूचा ट्रेंड’ प्रकट करतो.
जगातील जवळजवळ बर्याचशा प्रदेशांमध्ये माता मृत्यू वाढला आहे. 2020 मध्ये जगभरात अंदाजे 2 लाख 87 हजार माता मृत्यू झाल्याचे दर्शविते.
निशा कदम. मुलांची आवड असलेली. आपल्याला किमान दोन मुलं असावीत या विचारांची. मात्र नवर्याचा स्पर्म काऊंट कमी आला आणि त्यांनी टेस्ट ट्यूब बेबीसाठी प्रयत्न करायचं ठरवलं. पहिली फेरी यशस्वी झाली नाही म्हणून दुसरी फेरी केली. तीही यशस्वी झाली नाही.
“टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट म्हणजे छळ, नुसतं टॉर्चर. जी इंजेक्शने दिली जायची त्यामुळे वजन वाढलं, शरीरावर काळे डाग आलेले. उलट्या व्हायच्या. गोळ्या खाऊन अॅसिडिटी, थकवा. वेगेवेगळ्या टेस्ट, ब्लीडिंग, सलाईन यामुळे वेदना व्हायचा. वाटायचं, आपल्याला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते आहे. मी प्रचंड डिप्रेशनमध्ये गेले होते,” 2014 ते 2018 या चार वर्षांच्या काळातील अनेक गोष्टी पुन्हा आठवून निशाचा आवाज कापर झाला.
थोडा वेळ ती काहीच बोलली नाही. निशानं या तणावाच्या काळात थेरपी सेशन्स घेतले, मेडिटेशन, प्राणिक हिलिंग, अध्यात्म ऐकलं. अनेक गोष्टी करून परिस्थितीचा स्वीकार केला आणि नवरा बायको दोघांनी एक गोड मुलगी दत्तक घेतली. आता मुलीसोबत सुंदर आयुष्य सुरू आहे पण ट्रीटमेंटचे दिवस आठवावेसे वाटत नाही.
बहुतांश स्त्रियांना टेस्ट ट्यूब बेबी किंवा मूल होण्याच्या तत्सम पद्धती अवलंबल्यानं शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतं. या ट्रीटमेंटमधून जन्माला आलेल्या मुलांकडेही वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं.
“माझ्या नात्यातल्या एकानं टेस्ट ट्यूब बेबी करून बाळ जन्माला घातलं आहे. तर त्या बाळाला सगळे ‘यंत्रावरचं बाळ यंत्रावरचं बाळ’ म्हणतात. त्या बाळाला माणसाचं बाळ समजतच नाहीत,” असं विमल म्हणते तेव्हा त्यावर कसं व्यक्त व्हावं हेदेखील कळत नाही.
काही स्त्रियांना मूल असावच असं वाटत नसलं किंवा ट्रीटमेंटचा त्रास होत असला तरी त्यांना त्यातून जावं लागतं. मूल असण्यावरून (तेही मुलगा) स्त्रीचं स्थान ठरवलं जात असल्यानं स्त्रीला मूल असावं असं वाटू लागतं असंही होतं.
विमल म्हणते, “मी कित्येकदा रात्री ओक्साबोक्सी रडते. मला मूल का नाही याचाही त्रास होतो आणि मी मूल दत्तक का घेतलं नाही याचाही पश्चाताप होतो. नातेवाईकांसाठी कितीही केलं तरी बाईला नवरा आणि मूल नसलं की किंमत नसते. मला एक मूल असतं, अगदी मुलगी जरी असती तरी मला घरच्यांनी असं वागवलं नसतं.
“आपल्याला म्हातारपणी कोण सांभाळणार हा प्रश्न पडला नसता. आपल्याला मूल आणि नवरा नसला की काहीही बोलतात. ‘करून करून भागली, देवपूजेला लागली,’ म्हणतात. हेच मला मूल असतं तर बोलायची हिंमत झाली नसती,” विमलला अजूनही आपल्याला मूल असायला हवा होतं असं वाटतं.
मूल नसण्याचा त्रास पुरुष आणि कुटुंबीयांनाही!
मूल नसल्यावर स्त्रियांना जसा मानसिक, शारीरिक त्रास होतो तसा काही प्रमाणात पुरुषांनाही होतो. वारंवार केल्या जाणार्या टेस्ट्स, त्यासाठी काढाव्या लागणार्या सुट्ट्या हाही भाग असतोच. काही दिवसांनी ट्रीटमेंटचा त्यांना कंटाळा यायला लागतो. आर्थिक ओढाताण होते.
स्त्रिया एकमेकींकडे होणारा त्रास काही प्रमाणात व्यक्त करतात, मात्र पुरुष एकमेकांशी भावनिक गोष्टी कमीच बोलतात किंवा बोलतच नाहीत त्यामुळं ते स्वत:शीच जास्त बोलतात. नवर्यामध्ये काही मेडिकल गुंता असेल तर पुरुष आणखी खचून जातात.
“ज्याच्यात प्रॉब्लेम असतो त्याला जास्त गिल्ट असतो. माझा नवरा जरी या विषयावर काही बोलायचा नाही तरी त्याची नजर देताना जरा वेगळं व्हायचं. त्याला त्रास होतच असणार. त्याला त्रास होतो की नाही यावर ना तो बोलला ना मी,” निशा म्हणाली.
मूल न झालेल्या सर्व महिलांना ‘आपल्यालाच का मूल होऊ नये?” याची टोचणी आयुष्यभर आहे. त्यातल्या काहींनी मुलं दत्तक घेतली आहेत तर काहींनी पन्नाशी गाठल्यानं आता आपण मूल सांभाळू शकणार नाही म्हणून दत्तक मूल घेण्याचा विचार बाजूला ठेवला आहे.
मूल होत नाही याभोवती जसं जोडप्यांचं आयुष्य फिरतं तसं घरातील सदस्यांवरदेखील याचा परिणाम होतो. आपलं लेकरू ज्या शारीरिक आणि मानसिक तणावातून जात असतं तो त्यांनाही असह्य होतो.
शिवाय मूल होत नाही म्हटल्यावर काहीच दिवसात नातेवाईक, घरातले, बाहेरचे सतत विचारत राहतात. काही प्रॉब्लेम आहे का, कुणाच्यात आहे अशा चर्चा घरातल्यांच्या आसपास घडतात, ज्यांना उत्तरं देणं अवघड असतं.
“आई बाबा, सासू सासरे काही म्हणत नव्हते. पण काही नातेवाईक आई बाबांना मला कधी मूल होईल हे विचारत होते. मी बाबांना म्हणालं,” तुम्ही दुर्लक्ष करा. हे तेच नातेवाईक आहेत जे माझं लग्न कधी होईल कधी होईल असं सतत विचारत होते,” निशा वैतागून सांगते.
आई वडिलांना आपल्या मुलीचं किंवा मुलाचं चुकीच्या व्यक्तीशी लग्न करून दिलं याची बोचणी त्यांना लागते आणि त्याचं रूपांतर पश्चातापात होतं. नातेवाईकही काळजीपोटी (?) अनेक सल्ले, डॉक्टरांचे नंबर देतात. जोडपी सगळे डॉक्टर पालथे घालतात, जडीबुटीही खातात.
काही नातेवाईक जोडप्याला बुवा महाराजांकडे घेऊन जातात. काही केसमध्ये तर असे हे भोंदू महाराज स्त्रियांवर बलात्कारदेखील करतात. अनेक केसमध्ये आर्थिक नुकसान होत असतं, त्यामुळे जगण्याचा दर्जा खालावतो. टेस्ट ट्यूब बेबीचा एका वेळचा खर्च अंदाजे 5 लाखाच्या घरात जातो.
मूल होत नसल्याचा नात्यावर होणारा परिणाम
एवढं करूनही जर मूल झालं नाही तर प्रचंड संताप, चिडचिड, नैराश्य, लाज, चिंता, अपराधभाव येतो. आत्मविश्वास, स्वाभिमान कमी होतो. पती पत्नींचे संबंध बिघडतात. शरीरसंबंध अतिशय ‘यांत्रिक आणि नकोशे’ होऊ लागतात, नात्यातला ओलावा कमी होऊ लागतो.
एकमेकांवर आरोप होतात. नवरा बायकोला “तू कसली बाई आहेस जी आई होऊ शकत नाही,” म्हणतो आणि बर्याच केसमध्ये नवरा घटस्फोटदेखील घेतो. (आधीच नात्यात हिंसा असेल तर मूल जन्माला घालणं ही हिंसा वाढवणारी बाब असते खरं तर!) बायकोही नवर्याला , “तू कसला मर्द? मला साधं एक मूल देऊ शकत नाही,” म्हणते.
व्यवस्थित सुरू असलेला संसार ‘मूल’ याभोवती फिरू लागतो आणि नाती बिघडवतो. घरातील मंडळी सुनेला जावयाला सतत दोष देत राहतात.
“माझी सासू म्हणाली की आम्हाला तुझ्या बापानं फसवलं. कणकवर(मूल न होऊ शकणारी) मुलगी आमच्या गळयात बांधली. उलट त्यांनीच मुलगा व्यसनी आणि कफल्लक होता हे लपवलं. तो लग्नाच्या 6 व्या वर्षीच वारला आणि मला माहेरी यावं लागलं,” विमल म्हणाली.
विधवा किंवा एकल महिलांना मूल दत्तक घेण्यासाठी घरातले, बाहेरचे पाठिंबा देतीलच असं नाही. त्यांचा एकटेपणा किंवा मूल असण्याची गरज समजून घेत नाहीत. ‘आपलं ते आपलं. आपण लोकांना किती जीव लावला तरी आपली होत नाहीत,” असं म्हणून बाळ दत्तक घेण्यात खोडा घालतात,” असं विमल म्हणते.
ती पुढं सांगते, “मूल नसलेल्या बाईला जर नवरा नसेल तर आणखी त्रास देतात. बायका घालून पाडून बोलतात. आपल्याकडं जे काही कमावलेलं असल त्याबद्दल म्हणणार की कुणाची धन करतेय. घर बांधण्यापेक्षा बँकेत पैसे ठेवून खायचे. नवरा नाही, मूल नाही, कशाला करून ठेवायचं म्हणतात. एकट्या बाईंनं सुखात राहयचं नाय का?”
“घर, जमीन आमच्या नावावर कर म्हणून नातेवाईक भांडतात. माझ्या सासरकडली जमीन पण घेऊ देत नाहीत मला. ‘बुडंस्थळाची जमीन आहे, घेतली तर त्रास होणार, आमच्या वंशाला हानी होणार’ असं म्हणून मला गप करतात. माझ्या नात्यातील स्त्रिया म्हणतात, ‘तिचा शिव्याशाप घेऊ नका, लेकरं आजारी पडत्यात’. लेकरं नसलेल्या बाईचा शिव्याशाप लागतू म्हंत्यात. खरं हाय व्हय?” कसनुसं तोंड करून विमल बोलली. यावर काय उत्तर देणार?
मूल होत नाही त्याला स्त्रीच दोषी?
स्त्रियांनाच बहुतेक वेळा मूल जन्माला घालण्याच्या दबावाला सामोरं जावं लागतं. मूल झालं नाही तरी पहिला दोष तिलाच तिला जातो. टोमणे मारले जातात. उपचार घेण्यापूर्वी, घेत असताना देखील स्त्रियांचे अबोर्शन होतात, जे शरीर आणि मनाला थकवणारं असतं.
अनेक प्रकारची शारीरिक, मानसिक हिंसा, सामाजिक बहिष्कार आणि इतर बाबींना सामोरं जावं लागतं. “तू असली कसली बाई आहेस जी आई होऊ शकत नाही,” नवरा म्हणतो.
एखाद्या स्त्री किंवा पुरुषाने बाळ होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून किमान 12 महिने संबंध ठेवले असतील आणि जर मूल होत नसेल त्याला वंध्यत्व म्हणतात. वर्ड हेल्थ ऑर्गनाइज़ेशनच्या 2019 च्या आकडेवारीनुसार वंध्यत्व असणार्या स्त्रियांमध्ये 68 टक्के शारीरिक, 60 टक्के लैंगिक आणि 70 टक्के स्त्रिया भावनिक अत्याचाराच्या बळी होत्या.
जोतिबांनी त्या काळी जे केलं ते आजही करण्याची गरज
महात्मा फुले यांच्याबाबतीतील एक गोष्ट ऐकण्यात आली होती. फुले दाम्पत्याला मूल झालेलं नव्हतं, तेव्हा महात्मा फुल्यांना दुसर्या लग्नासाठी सांगितलं गेलं.
ते म्हणाले, “दोष काय फक्त सावित्रीत असू शकतो असं नाही तर तो माझ्यातही असू शकेल. मग त्या न्यायानं सावित्रीचे पण लग्न करून द्यायला हवं.”
जोतिबा त्याकाळी जे करू शकले ते आताही करायची गरज आहे, काही नवरे अशी भूमिका घेतातसुद्धा!
‘मूल कधी होणार?’ या लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला कंटाळलेली प्रिया बापट म्हणते, “मूल होणंच ही प्रत्येक जोडप्याची अपेक्षा नाही, प्रत्येक जोडप्यानं मूल जन्माला घातलं पाहिजे हा अलिखित नियमच मला पटत नाहीये. लोकांची ही अपेक्षा असते की, ह्या जोडप्याचं मूल बघायचंय. पण हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. उद्या जर मला वाटलं की 42 व्या वर्षी मला मूल जन्माला घालायचंय तर मी घालेन जन्माला. हे तेव्हाही नाही वाटलं तर नाही घालणार.”
मूल होण्यासाठी जे काही करावं लागतं त्यामुळं बाईचं करियर मागे पडतं. मूल होत नाही म्हटल्यावर नवरा लक्ष द्यायचं सोडून देतो. आर्थिकदृष्या खालच्या गटात तर नवरा लगेच दुसरं लग्न उरकून टाकतो.
“सुनेमध्ये प्रॉब्लेम असेल तर लगेच मुलाला दुसरं लग्न करण्याबद्दल बोलतात आणि करतातही; पण मुलात काही दोष असेल तर दुसरं लग्न करा हा सल्ला देत नाहीत. स्त्रीचा तिच्या स्वत:च्या शरीरावर, गर्भाशयावर हक्क नाही. एखाद्या स्त्रीला जर मूल नको असेल किंवा उशिरा, एक की अनेक हे पर्याय तिला दिले जात नाहीत. कधीकधी तिला मूल हवं असेल तरी तिला मूल होऊ दिलं जात नाही. मुलाच्या असण्या-नसण्याभोवती स्त्रीचं अस्तित्व गुंडाळलं जातं. स्वत:चं मूल नसण्याची बोचणी सामाजिक असते तशी ती स्वत:ला पण वाटत असते.
“आपल्याला मूल होत नाही याचा त्रास होतच असतो. गरोदर बायका दिसल्या की आपल्याला होत नाही याचं दु:ख असतं. डोहाळजेवणाला बोलावतात बायका, पण मी जात नाही,” एका दत्तक मुलीची आई असलेली निशा सांगते तेव्हा हा मुद्दा किती खोल आहे हे लक्षात येतं.
मूल होऊ न देण्याचा निर्णय घेणारी जोडपी आणि अँटीनेट्यालीजम
महाराष्ट्रातील सर्वांना माहिती असलेली दोन नावं नटरंग फेम अतुल कुलकर्णी आणि ती फुलराणीची अमृता सुभाष.
या दोघांनीही आपआपल्या जोडीदारांसमवेत मिळून मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.
अतुल कुलकर्णी आपली भूमिका मांडताना म्हणतात, “जीवंत असणार्या पिढीनं येणार्या पिढ्यांना खाईत लोटलं आहे, पर्यावरण वाचवायला हवं. मूल जन्माला आलं की वस्तूंचा प्रचंड वापर सुरू होतो. लग्न झालं की मूल हवं हा विचार बदलला पाहिजे.”
अमृता सुभाष म्हणते, “आम्हाला मुलं आवडतात. पण मुल आवडणं आणि मुल वाढवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आम्हाला माहिती आहे आमच्या कामावर आमचं इतकं प्रेम आहे की आम्ही ते कधीच सोडणार नाही. मग त्या बाळाकडे दूर्लक्ष होता कामा नये. आमच्यासारखी या क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील अशी अनेक लोक आहेत जी ठरवत आहेत की आम्हाला बाळ नको पण आम्हाला बाळ आवडतात.”
जगभरात अँटीनेट्यालीजम (anti natalism) नावाची संकल्पना उदयास येत आहे. जे मानतात की मुल जन्म घेताना त्याची सहमती देऊ शकत नाही, शिवाय प्रत्येक जन्माला येणार्या जीवाला बाहेर काही ना काही त्रास हा होतोच; त्यामुळं त्याला जन्म देणं मूल्यांविरोधात आहे.
मुंबईतील एका मुलानं आपल्या पालकांच्या विरोधात “मला माझ्या परवानगीशिवाय का जन्म दिला?” म्हणून कोर्टात केस टाकली. जगात इतर ठिकाणीही अशा केस टाकल्या गेल्या आहेत. यात गुंता वाटत असला तरी सध्याचं वातावरण जीवांच्या जगण्याला पोषक नाही हे सत्य नाकारता येत नाही.
वंध्यत्वावर सहज, स्वस्त उपचार मिळण्याची गरज
जगभरात 4 करोड 80 लाख जोडपी आणि 18 करोड 60 लाख व्यक्तींमध्ये वंध्यत्व आहे. याचं प्रमाण 40-55 टक्के महिला आणि 20-40 टक्के पुरुष असं आहे.
वंध्यत्वासंबंधित बाबी हाताळणे अनेक अंगांनी गरजेचं आहे. अनेक विषमलिंगी, समलिंगी किंवा ज्यांना पालक बनायची इच्छा आहे अशांसाठी हे महत्वाचं आहे.
शिवाय स्त्री पुरुष समतेच्या अंगानं पण याचा विचार करावा लागेल. उपचार घेणार्या केवळ 50 टक्के जोडप्यांना पहिल्यावेळी यश येतं. एका वेळच्या उपचारानेदेखील जोडप्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो.
वंध्यत्वाचे उपचार खासगी असल्यानं महाग आहेत. त्यामुळं काही जोडपी उपचारच घेऊ शकत नाहीत, तर काही जोडप्यांना मूल दत्तक घेता येत नाही. त्यामुळं वंध्यत्वावर सरकारी दवाखान्यात कमीत कमी खर्चात उपचार होणं आवश्यक आहे.
मूल होऊ न शकलेल्या जोडप्यांना आधाराची गरज
मतितार्थ हा आहे की प्रत्येक जोडपं, व्यक्ती, स्त्री प्रचंड त्रासातून जात असते. अशावेळी कुटुंब आणि समाजाकडून हे अपेक्षित आहे की या व्यक्तींना, जोडप्यांना त्यांनी समजून घ्यावं.
अशा व्यक्तींना समुपदेशनाची अत्यंत गरज असते. कधीकधी थेरपी सेशनबरोबर औषधे घ्यावी लागू शकतात. योग्य माहिती किंवा सल्ल्याअभावी व्यक्तींमधील तणाव वाढू शकतो.
त्यातच आर्थिक, कौटुंबिक किंवा कामाच्या ठिकाणी तणाव असेल तर अशा व्यक्ती खोल नैराश्यात जाऊ शकतात. आपल्यामुळे जर कुणी दुखावत असेल किंवा आत्महत्या करत असेल तर माणसांनी माणसांचा विचार करायला हवा.
आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठीची जागा त्यांना हवी असते. आपल्या शरीराची आहे ती स्थिती स्वीकारणं, पालकत्वाच्या किंवा जीवन जगण्याच्या विविध पर्यायांचा विचार करणं, जोडप्यांनी आपापसात बोलणं, तणाव मुक्तीच्या इतर मार्गांचा वापर करणं, ज्या विचारांनी आपण मूल जन्माला घालतो आहोत त्या गोष्टी पूर्ण होतीलच असं नाही(मुलं म्हातारपणी आपली काळजी घेतील)हे समजून घेणं या बाबी महत्वाच्या असतात.
या सगळ्यात उपचार देणार्या वंध्यत्व टीमची जबाबदारीसुद्धा जास्त असते. अशानं अवास्तव अपेक्षा, दोषारोप, स्वत:ला जबाबदार धरणे, निराशावाद या बाबी बर्याच कमी होतील आणि मग कोणत्याही जोडप्याला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्या करायची वेळ येणार नाही.
वंध्यत्वासंबंधीची अपमानास्पद भाषा बदलण्याची गरज
माणसांच्या भावनिक जाणिवा प्रगल्भ करून त्याचे समायोजन करता यायला हवं. खरं तर पालक होणं म्हणजे स्त्रीला ‘परिपूर्ण स्त्रीत्व’ आणि पुरुषाला ‘परिपूर्ण पुरुषत्व’ सिद्ध करावं लागण्याची क्रूर परीक्षा नव्हे, ज्यात नापास होऊन आयुष्य निरर्थक होईल.
आपली भाषा बदलायला हवी. उदा. वांझ हा शब्द वापरातून बाद करायला हवा. शिवाय नवर्याचा ‘दोष’ की बायकोचा, कुणामध्ये ‘कमतरता’ आहे ही वाक्यं शिवाय पुरुषाला ‘नामर्द (?) किंवा कमअस्सल’ ठरवणारे अपमानास्पद शब्द वापरणं पूर्ण बंद करायला हवं.
केवळ मूल असणं म्हणजेच आनंदी आयुष्य नव्हे!
कुटुंब, मूल असणं जसं काहींसाठी आनंदाची, परिपूर्णतेची बाब असूच शकते. मुलं असण्याचा हक्क आपल्याला संविधानानं दिला आहे. एखाद्या विधवेला किंवा लग्न न झालेल्या स्त्री किंवा पुरुषालाही आई वडील होण्याचा नैसर्गिक हक्क आहे.
म्हणून तर जोतिसावित्रीने त्याकाळी विधवांच्या मुलांसाठी बालहत्या प्रतिबंध गृह काढून ब्राह्मण विधवांच्या , मुलांना जन्म देऊन त्यांचे संगोपन केले. यशवंत या अशाच एका ब्राह्मण विधवा स्त्रिच्या मुलाला दत्तक घेऊन आपलं वारस नेमलं.
तसं मूल नसलं तरी आयुष्य समृद्धपणे जगू शकतो, त्यात काहीही कमतरता नाही हे अजून भारतीय जनमानसापर्यंत पोहोचायचे आहे. बर्याचदा केवळ मुलं आहेत म्हणूनही अनेक जोडपी हिंसात्मक नात्यात राहतात किंवा त्यांच्या करियरला अडचणी येतात हेही खरे. शिवाय मुलं आई वडिलांना सांभाळतातच असंही नाही; हीही दुसरी बाजू ध्यानात घ्यायला हवी.
स्वत:चं असं, आपलं, खास, असं मूलच असेल आणि त्याच्याशिवाय आपल्याला प्रेम मिळणार नाही असंही काही नाही. पालक होण्याची भावना खास आणि वेगळी असली तरी आपलं आयुष्य इतर अनेक खास गोष्टी करून जगू शकतो हेही तितकच खरं.
आपल्याला नेमकं मूल कशासाठी हवं आहे याचा विचार, त्याचे नियोजन केलं तर मूल जन्माला घालायचं की नाही हे नीट ठरवता येऊ शकतं आणि कदाचित अनावश्यक मुले आणि पालकत्वही जन्माला येणार नाही. पालक होणं आनंदाची बाब असतेच पण जबाबदारी असल्यानं त्रासही होतोच हे समजून घ्यावं आणि मग निर्णय घ्यावा.
शिवाय सामाजिक पालकत्वही स्वीकारलं पाहिजे, ज्यासाठी मुलांना जन्म देण्याची गरज नाही. प्रत्येक जन्माला येणारं मूल ही फक्त व्यक्ती किंवा कुटुंबाची नव्हे तर समाजाची आणि शासनाचीसुद्धा जबाबदारी असते या अर्थानं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
आपल्यासारखं आपल्या पोटी कुणीतरी जन्माला यावं ही माणसाची नैसर्गिक अंत:प्रेरणा मानली तरी मूल नको वाटणं, होऊ न देणं, प्रयत्न करूनही मूल न होणं, सरोगसी किंवा इतर माध्यमातून मूल होऊ देणं, मूल दत्तक घेणं, ऐच्छिक, समलिंगी पालकत्व या सगळ्या सामान्य बाबी मानल्या गेल्या पाहिजेत.
नवरा बायकोचं एकमेकांवर प्रेम आहे हे सांगण्यासाठी मूल जन्माला घालणं हा त्याचा पुरावा नाही आणि ते आयुष्याचं सार्थकही नाही. कोणतीही परिस्थिती आली तरी मानसिक स्वास्थ्य जपणं, आनंदी राहणं ही प्रत्येक व्यक्तीची प्राथमिकता असायला हवी.
आपल्याला मूल होत नाही ही आपल्यातील कमतरता किंवा दोष अजिबात नाही, तो केवळ एक शारीरिक स्थिती आहे. ती अनेक प्रकारच्या शारीरिक स्थिती असतात अगदी तशी, सामान्य.
त्यामुळं स्वत:ला, स्वत:च्या शरीराला, एकमेकांना दोष देण्यापेक्षा त्यातून मध्यम मार्ग काढणं आणि नात्यातील माया टिकून राहावी, स्वत:मधील प्रेम हरवू नये याची काळजी घेणं आपल्या हाती असतं. शेवटी, आयुष्य सुंदर आहे; मुलांच्या सोबतीनं आणि मुलांशिवायही!
(लक्ष्मी यादव डिजिटल क्रिएटर आणि स्त्री-पुरुष समतेवर प्रशिक्षण देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लेखातील मते लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC