Source :- BBC INDIA NEWS

मुरली नाईक यांचे कुटुंब

फोटो स्रोत, BBCApleshkarkare

  • Author, अल्पेश करकरे
  • Role, बीबीसी मराठीसाठी
  • 9 मे 2025

पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) रात्री जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोटसह पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील भारतीय लष्करी ठिकाणे व नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.

भारताने पाकिस्तानचे हल्ले निकामी केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या हल्ल्यात मुंबई येथील जवानाचा मृत्यू झाला आहे.

मुरली श्रीराम नाईक (वय 23) असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. मुरली नाईक हे घाटकोपर येथील कामराज नगर येथील रहिवासी होते.

मुरली नाईक यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमधील उरी येथे होती. मुरली नाईक अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात भरती झाले होते.

पाकिस्तानने गुरुवारी रात्रीपासून भारतातील लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी पहाटेपर्यंत हे हल्ले सुरू होते.

या हल्ल्यांत शुक्रवारी (9 मे) पहाटे 3.30 च्या सुमारास मुरली नाईक यांचा मृत्यू झाला. मुरली नाईक यांच्या निधनाची बातमी कळताच मुंबईतील घाटकोपर परिसर शोकाकूल झाला आहे.

आई-वडिलांचं काय होणार?

बीबीसी मराठीने मुरली नाईक यांचे मामा लक्ष्मण नाईक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या होत्या.

“आमच्या घरातला हसता खेळता मुलगा देशासाठी लढला. आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा अभिमान आहे. मात्र, मुरलीच्या निधनानं कुटुंबाचा आधार हरपला”, असं ते म्हणाले.

लक्ष्मण नाईक पुढं म्हणाले की, “मुरली अत्यंत शांत आणि आनंदी मुलगा होता. अत्यंत हुशार आणि कमी वयात देशसेवेसाठी रुजू झाला होता. तो लष्करी सेवेत भरती झाल्यानं कुटुंब आनंदात होतं.

मात्र, ही त्याची जाण्याची वेळ नव्हती. त्याच्या घरी फक्त आई-वडील आहेत. आता त्यांना कोणीही नाही, त्यांचं काय होईल?”

मुरली नाईक

फोटो स्रोत, BBCApleshkarkare

मुरली यांचा जन्म मुंबईतच झाला होता. मुरली यांचं कुटुंब आंध्र प्रदेशमधील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील कल्की तांडा येथील आहे.

त्यांचे वडील श्रीराम नाईक आणि आई ज्योतीबाई नाईक हे कामानिमित्त मुंबईत आले होते.

मुंबईतील घाटकोपरमधील कामराज नगर परिसरामध्ये ते राहत होते. श्रीराम नाईक मुंबईत बिगारी काम करायचे, तर आई ज्योतीबाई या घरकाम करतात.

मुरली नाईक यांचा जन्म 23 ऑक्टोबर 2000 साली मुंबईतील राजावाडी रुग्णालयात झाला होता.

मुरली यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण आंध्र प्रदेशमध्ये घेतलं. हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं.

‘आम्ही अनाथ झालो’

मुरली यांचे वडील श्रीराम नाईक म्हणाले की, “सकाळी 9 वाजता एका अधिकाऱ्याने फोन केला. जम्मू आणि काश्मीर सीमेवर पाकिस्तानी गोळीबारात गोळी लागल्याने मुरलीचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं.”

ते पुढं म्हणाले की, “आम्ही मुंबईत राहत होतो. मुरली तीन महिन्यांपूर्वी घरी आला.तो 20 दिवसांनी पुन्हा ड्युटीवर गेला. मुलगा देशासाठी लढला. आम्हाला एकच मुलगा आहे, आम्ही त्याच्यावर अवलंबून होतो. आता तो नाही, मी आणि माझी पत्नी अनाथ झालो.”

माझी एकच इच्छा आहे. माझ्या मुलाचा पुतळा जिल्ह्यात बसवावा. त्याला कोणीतरी अभिवादन करताना पाहिलं तर मला आनंद होईल, असंही ते म्हणाले.

तर, मुरली यांच्या आई ज्योतीबाईंनीही मुलगा गेल्याचं दुःख व्यक्त केलं.

“तो कालच व्हीडिओ कॉलवर बोललला होता. ठिक आहे का? जेवण केलं का? अशी विचारपूस त्यानं केली होती. पण, माझा एकुलता एक मुलगा गेला,” असं बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.

मुरलीचा मृतदेह शनिवारी त्यांच्या गावी जाणार आहे.

अग्निवीर अंतर्गत सैन्यदलात

मुरली नाईक डिसेंबर 2022 मध्ये अग्निवीर योजनेंतर्गत सैन्यदलात भरती झाले होते. त्यानंतर नऊ महिने त्यांनी नाशिक येथील देवळालीमध्ये ट्रेनिंग घेतलं.

ट्रेनिंग झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांची पोस्टिंग आसाममध्ये करण्यात आली होती.

आसाममध्ये काही महिने सेवा दिल्यानंतर पंजाब येथे ते रूजू झाले होते. काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये त्यांची पोस्टिंग करण्यात आली होती.

मुरली नाईक बंजारा समाजातील होते. त्यांच्या निधनाची बातमी येताच घाटकोपरमधील मुत्तू मारी अम्मा मंदिरामध्ये समाजबांधवांनी आणि घाटकोपरकवासीयांनी गर्दी केली होती.

मुत्तू मारी अम्मा मंदिरामध्ये मुरली नाईक यांच्यासाठी जमलेली गर्दी

फोटो स्रोत, BBCApleshkarkare

यावेळी नाईक यांचे शेजारी आणि निकटवर्तीयांनी मुरली नाईक यांच्या आठवणी सांगत भावना व्यक्त केल्या.

मुत्तू मारी अम्मा मंदिराचे पुजारी आणि बंजारा समाजाचे प्रमुख पी. रवी नाईक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, “मुरली हा अत्यंत हुशार आणि कुटुंबवत्सल मुलगा होता. लहानपणापासून तो शिक्षणासाठी आंध्र प्रदेशात होता. मुंबईत तो सुट्टी निमित्ताने यायचा. त्यावेळी या मंदिर परिसरामध्ये खेळायचा.

जेव्हा तो लष्करात भरती झाला होता, तेव्हा आम्हाला आनंद झाला होता. आज त्याच्या निधनानं खूप दुःख झालं आहे.”

आई-वडील यात्रेसाठी मूळ गावी

मुरली नाईक यांचे वडील श्रीराम नाईक हे गेल्या 40 वर्षापासून मुंबईतील घाटकोपरमध्ये कुटुंबासह राहत आहेत.

ते राहत असलेल्या कामराज नगरमधील त्यांची वस्ती काही महिन्यांपूर्वीच पुनर्विकासासाठी गेली. त्यामुळं ते दुसऱ्या वस्तीत भाड्यानं राहतात.

मुरली यांचे आई-वडील काही दिवसांपूर्वीच मूळ गावी एका कार्यक्रमानिमित्ताने गेले आहेत.

पाकिस्तानच्या हल्ल्यात मुरली नाईक यांचा मृत्यू झाल्याचं सैनिक महामंडळाकडून आणि भारतीय नौदलाच्या वतीने कुटुंबाला कळवण्यात आलं आहे.

मुरली नाईक यांच्यासाठी लावलेले बॅनर

फोटो स्रोत, BBCApleshkarkare

लग्नासाठी मुलगी पाहणे सुरू होते

जवान मुरली नाईक यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच घाटकोपर येथील त्यांचे शेजारी सतीश नाईक यांना धक्का बसला.

बीबीसी मराठीशी बोलताना सतीश नाईक म्हणाले की, “नाईक यांचं कुटुंब मेहनती आहे. मुलगा, आई आणि वडील या तिघांनी खूप स्वप्नं पाहिली होती.

दोन महिन्यापूर्वीच मुरली मुंबईत घरी आला होता. मात्र असं काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं.”

पुढे सतीश नाईक म्हणाले की, “लवकरच त्याचं लग्न करण्याचं नियोजन कुटुंबीयांनी केलं होतं. त्यासाठी मुलगी शोधण्याचा कार्यक्रम देखील आई-वडिलांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी हाती घेतला होता.

मात्र त्यापूर्वीच अशी घटना घडल्याने फार दुःख झाले आहे.”

‘आमचं लेकरु गेलं’

मुरलीचे आणखी एक शेजारी तिप्पा नाईक भावूक झाले होते.

ते म्हणाले की, “आमचं लेकरू गेलं, यावर विश्वास बसत नाही. तो अत्यंत शांत, हसतमुख होता. लहानपणापासून आम्ही त्याला खेळताना, शिकताना पाहिलं.”

मुरली नाईक कुटुंबिय आणि नातलग

फोटो स्रोत, BBCAlpeshkarkare

“आज त्याला देशासाठी मरण पत्करावं लागलं आहे, याचा अभिमान आहे, पण काळीज तुटलंय. त्याच्या आई-वडिलांचं दुःख शब्दांत सांगता येणार नाही.

आम्ही सगळे घाटकोपरवासीय त्यांच्या पाठीशी आहोत. आज आमचं घर शून्य झालंय आणि आमचं मनही.” असंही पुढं ते म्हणाले.

चंद्राबाबू नायडूंकडून शोक व्यक्त

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्वविट करुन जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाईक हे मूळचे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील होते.

मुरली नाईक यांना नायडू यांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो असं म्हटलं आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

फोटो स्रोत, Getty Images

तसेच राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांनी आणि अनेक मान्यवरांनी मुरली नाईक यांना सोशल मीडियाच्या माध्यमांतून श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर आंध्र प्रदेश येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC