Source :- BBC INDIA NEWS

ISWOTY

1 तासापूर्वी

बीबीसी ‘इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर’च्या पाचव्या पर्वासाठी नामांकनांची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा झाली.

यात गोल्फपटू अदिती अशोक, नेमबाज मनू भाकर आणि अवनी लेखरा, क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पैलवान विनेश फोगाट या पाच जणींना नामांकित करण्यात आलं आहे.

2024 मधील भारतीय क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

नामांकनं मिळालेल्या या क्रीडापटूंना आता व्होटिंगच्या प्रक्रियेचा सामना करावा लागेल. त्यासाठी 31 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11.30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

नवी दिल्लीमध्ये एका खास सोहळ्यात सोमवारी 17 फेब्रुवारी 2025 रोजी विजेत्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा केली जाईल.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयरच्या पाचव्या पर्वाबाबत एक पत्रकार परिषद झाली.

कार्यक्रमानिमित्त आलेल्या दिग्गज हॉकी प्रशिक्षक प्रीतम सिवाच यांनी यावेळी पत्रकारांशीही बातचीत केली. त्यावेळी त्यांनी क्रीडा क्षेत्रात महिलांना आणि विशेषकरुन महिला प्रशिक्षकांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं हे देखील सांगितलं.

महिला प्रशिक्षकांबाबत असलेल्या पूर्वग्रहांमुळे अनेक वेळा विदेशी प्रशिक्षकाला संधी दिली जाते पण भारतीय महिला प्रशिक्षकाला ही संधी मिळत नसल्याची खंत सिवाच यांनी बोलून दाखवली.

या पत्रकार परिषदेत क्रीडा पत्रकारांनी याठिकाणी उपस्थित असलेल्या द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या कोच प्रीतम सिवाच आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या पॅरा अॅथलिट सिमरन शर्मा यांना काही प्रश्नही विचारले. त्यांची उत्तरं खूपच खास होती.

पत्रकारांनी काय प्रश्न विचारले?

कृती शर्मा, वेबदुनिया

पतीच्या यशामागे पत्नीचा हात असतो, पण पत्नीच्या यशातही पतीचा मोलाचा वाटा असतो. तुमचे पती आर्मीमध्ये आहेत. त्यांनीही तुम्हाला खूप ट्रेन केलं आहे. एकत्र ट्रेनिंग करण्याची ही प्रक्रिया कशी आणि केव्हा सुरू झाली?

सिमरन : 2017 मध्ये आमचं लग्नं झालं तेव्हा त्यांनी (पतीने) मला जीवनात काय करायचं आहे? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी म्हटलं होतं की, मला टी-शर्टवर इंडिया लिहिलेलं पाहायचं आहे. मी तर असंच म्हटलं होतं. पण ते म्हणाले की, त्यासाठी तुला खूप परिश्रम घ्यावे लागतील.

पण मुलं एवढे गंभीर असतात हे मला माहिती नव्हतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी मला म्हटलं की, तयार हो आपल्याला जिममध्ये जायचं आहे.

सिमरन शर्मा त्यांच्या पतीसोबत

माझ्या हातावर मेंदी रंगलेली होती आणि मी ट्रॅक सूट घालून पतीबरोबर जिममध्ये गेले. घरी आले तर ‘मुंह दिखाई’च्या विधीसाठी घरी आलेले लोक, सून आणि मुलगा कुठे आहे असं विचारत होते? तेव्हा मीच आहे असं मी सांगितलं. तिथूनच हा संघर्ष सुरू झाला होता.

त्यावेळी लोकांनी माझ्या सासूला बरंच ऐकवलं. मी कसे कपडे घालते? सून कोण-मुलगी कोण हे कळतच नाही? तुमची सून पदराने चेहरा झाकत नाही, ती काय वेगळी आहे का? असं लोकांनी ऐकवलं.

त्यावेळी माझे पती म्हणाले की, माझी पत्नी वेगळीच आहे आणि ती ऑलिम्पिकमध्ये जाईल तेव्हा शॉर्टस् घालून, तेव्हा तुम्ही पाहणार नाहीत का?

ग्राफिक्स

मी हसू लागले तर त्यांनी हसतेय का असं विचारलं? मी म्हटलं की, तुम्ही ऑलिंपिकबद्दल बोलताय. मला ते टीव्हीवर पाहूनच घाम फुटतो. त्यावर माझा नवरा म्हणाला की, तुला कदाचित जमणार नाही असं वाटत असेल, पण मी तुझ्याकडून करून घेईल.

माझ्यात खरं तर तेव्हा एवढा धाडस नव्हतं, पण ते (माझे पती) त्यावेळी सगळं काही करून घेण्यासाठी पूर्णपणे तयार होते.

लग्नानंतरचे दोन-तीन वर्ष फार कठीण होते. त्यांच्याकडं एक प्लॉट होता, तो त्यांनी विकला. कारण अशा प्रकारच्या खेळाच्या तयारीला खर्च लागतो.

क्रीडा प्रवासावर काय म्हणाल्या प्रशिक्षक प्रीतम सिवाच ?

नॉरेस प्रीतम, खेल पत्रकार

प्रीतम तुम्ही राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या तेव्हा तुमचा मुलगा 7 महिन्यांचा होता. आता तोही खेळतो, की तुम्ही त्याला सांगितलं आहे, तू बस फक्त मीच खेळेल असं?

प्रीतम सिवाच : माझी दोन्ही मुलं हॉकी इंडिया लीगमध्ये खळतात. तसंच मी जिथं प्रशिक्षण देते, तिथली 11 मुलंही खेळत आहे.

यांनी (सिमरनने) सांगितलं तसंच, आमची कहाणी अगदी सारखीच आहे.

सिमरन तरी आजच्या काळात आहे. माझी कहाणी तर 20-25 वर्षे जुनी आहे. त्यावेळी खूप अडचणी आल्या होत्या. असं सर्व होतंच, पण त्याचा सामना करावा लागतो.

प्रीतम सिवाच

फोटो स्रोत, ANI

समाजातील लोकांना जागरूक करायचं आहे. त्यामुळं मलाही वाटलं की, मीही टीम बनवावी. मी जेवढा संघर्ष केला, तेवढा लोकांना करावा लागू नये, असं मला वाटतं. माझ्यात उत्साहही होता. चांगली बाब म्हणजे, मला अर्जुन पुरस्कार मिळाला आणि द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला.

त्यामुळं असा विचार केला की, एवढी वर्ष खेळल्यानंतर आपणही समाजाची परतफेड करावी. त्यामुळं मी 20 वर्षांपासून प्रशिक्षण देत आहे. द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेली मी हॉकीतील एकमेव महिला आहे.

लाल रेष
लाल रेष

महिला प्रशिक्षक किती गरजेच्या आहेत? खेळात आणखी काय कमतरता आहेत?

शारदा उगरा, क्रीडा पत्रकार

प्रीतम तुम्ही म्हणाल्या की, महिला द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या तुम्ही एकमेव महिला आहात. मग महिला प्रशिक्षकांची क्रीडा क्षेत्रात किती कमतरता आहे आणि त्याचं कारण काय आहे? महिला प्रशिक्षकांबाबत परिस्थिती बदलली आहे का?

प्रीतम सिवाच: हा चांगला प्रश्न आहे. पुरुषांना वाईट वाटायला नको. आपल्या समाजात आणि भारतात पुरुषांना प्राधान्य आहे, असं मला दिसतं.

असं म्हणतात की, महिला खूप पुढे निघून गेल्या आहेत. माझ्या भागातील अनेक पत्रकारांनीही मला खेळताना पाहिलं आहे, माझं संपूर्ण करिअर पाहिलं आहे.

मी संपूर्ण जीवन क्रीडा क्षेत्रासाठी अर्पण केलं आहे. मी आधी 20 वर्षं खेळासाठी आणि नंतरची 20 वर्ष प्रशिक्षणासाठी खर्ची घातली.

प्रीतम सिवाच

आजही मला द्रोणाचार्य पुरस्कार मिळालल्यानंतरही एक महिला भारतीय संघाची प्रशिक्षक बनू शकते का? असा विचार केला जात नाही.

आजवर त्यांना एवढा विश्वास निर्माण झालेला नाही. विदेशी प्रशिक्षक आणतील, पण भारतीय नाही. त्यांना वाटतं त्या करू शकतात ते आम्ही करू शकत नाही.

हे खूप मोठं सत्य आहे. विशेषतः प्रशिक्षणाच्या बाबतीत असा विचार केला जातो. आमचे प्लेयर्स बसलेले आहेत, तेही सांगतील. पण त्यांनी विश्वास ठेवायला हवा. आम्ही प्राथमिक पातळीवरून खेळाडू घडवून पाठवत आहोत, तर आम्ही वरच्या पातळीवर का काम करू शकणार नाही?

ग्राफिक्स

त्यासाठी विश्वास ठेवावा लागेल. हे पुरस्कार मिळायचे तेव्हा मी दोन वर्षे माझं नाव पाठवलं होतं. त्यावेळी महिलेला हा पुरस्कार मिळू शकतो का? असं विचारण्यात आलं.

तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की, महिला आहे म्हणून मिळू शकत नाही का? मी मिळवून दाखवेन. मी आव्हान स्वीकारलं. प्रत्येक महिलेनं असं करावं असं मला वाटतं.

अनेक महिला त्यांना पुढं जाऊच दिलं जाणार नाही, असा विचार करून माघार घेतात. पण जोवर आपण पुढं येणार नाही, स्वतःसाठी लढणार नाही, तोपर्यंत आपल्याला काहीही मिळणार नाही.

त्यामुळं मी खूप लढा दिला आहे. सर्वांनीच लढायला हवं. महिलांनी प्रशिक्षणाच्या आणि प्रत्येक क्षेत्रातच पुढं यायला हवं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC