Source :- ZEE NEWS

Child Marriage: येत्या काही वर्षांमध्ये भीषण तापमानवाढ हे संकट आणखी भयावह रुप धारण करणार असून, त्यामुळं याचा थेट परिणाम मानवी जीनशैलीवर होणार असा इशारा फार आधीच देण्यात आला होता. ज्याचे परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली असून अतिशय भयंकर अशा संकटामध्ये अनेक देश सापडताना दिसत आहेत. वर्षानुवर्षापासूनचा दुष्काळ आणि उपासमार यांमुळं जगातील अनेक देश झगडत असून नाईलाजानं या देशांमधील नागरिकांना आपल्याजवळ आहे नाही ते सारंकाही पणाला लावायला लागत आहे. 

जगातील अशाच एका देशात ही परिस्थिती इतक्या भीषण वळणावर पोहोचली आहे की इथं नागरिक उंट आणि बकऱ्यांच्या बदल्यात चक्क लग्नाच्या कारणासाठी मुलींची विक्री करण्यास भाग पडत आहेत. हवामान बदलांमुळं या देशातील नागिक नाईलाजानं हा निर्णय घेत असून, इथं महिला सुरक्षा आणि महिलांच्या अधिकारांवर गंभीर सावट आल्याची बाब साऱ्या जगाची चिंता वाढवत आहे. हा देश म्हणजे केनिया. 

‘अल जजिरा’च्या वृत्तानुसार केनियातील मार्साबित क्षेत्रामध्ये दुष्काळानं भीषण रुप धारण केलं आहे की इथं अन्नपाण्याअभावी नागरिकांना जगणंही कठीण होताना दिसत आहे. या भागांमध्ये पाळीव प्राण्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्यानं प्राण्यांवर ज्यांची उपजिवीका अवलंबून आहे त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी उंट आणि बकऱ्यांच्या बदल्यात एक व्यवहार म्हणून मुलींची लग्न लावून देण्याचा अंतिम पर्याय अवलंबला आहे. इथं कमी वयातच मुलींची लग्न लावून दिली जात असून कमी वयातच गर्भधारणा होऊन झालेल्या बाळासह या मुलींचीसुद्धा उपासमार होत असून केनियामध्ये जगण्याचा गंभीर संघर्ष सुरू असल्याचं दाहक वास्तव समोर आलं आहे. 

केनियामध्ये पाण्यासाठी तासन् तास नागरिकांना वाट पाहावं लागत असून काही भागांमध्ये तर पाणी खरेदी करण्यासाठी नागरिक त्यांच्याकडे असणारे प्राणीसुद्धा विकत आहेत. इथल्या कैक नागरिकांची उपासमार होत असून त्यांच्याकडे अन्नपाणी सोडा, औषधासाठीसुद्धा पैसे उरलेले नाहीत. एकिकडे निसर्ग कोपलेला असतानाच केनियामध्ये गरिबीनंही नागरिकांच्या जगण्याचा संघर्ष आणखी आव्हानात्मक केल्याचं पाहायला मिळत आहे. 

स्थानिक संघटनांच्या माहितीनुसार केनियामध्ये फक्त हवामान बदलानं नागरिकांना फक्त आर्थिक संकटांमध्ये लोटलं नसून इछं महिलांविरोधातील गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाण्यच्या शोधात दूरवर जाणाऱ्या अनेक महिला इथं अत्याचार आणि हिंसेला बळी पडत आहेत. तर, काही भागांमध्ये 15 वर्षांच्या मुलींचीसुद्धा अज्ञात इसमांशी लग्न लावून देत नव्या संकटांमध्ये लोटलं जात आहे. 

SOURCE : ZEE NEWS