Source :- ZEE NEWS
Donald Trump Tariff War : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यामध्ये आयातशुल्कासंदर्भातील निर्णय जाहीर करत संपूर्ण जगाची चिंता वाढवली. 180 हून अधिक देशांवर ट्रम्प सरकारनं Deducted Reciprocal Tariff हा कर लागू करत एकिकडे अमेरिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूनं कार्यरत राहत दुसरीकडून मात्र त्यांच्या याच घोषणेनं जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना हादरा बसला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेनंतर जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण असतानाच अनेकांना 1929 मधील जागतिक महामंदीचे दिवस आठवले.
जवळपास 96 वर्षे मागे वळून पाहिल्यास एक असं पर्व समोर येतं जेव्हा सारं जग आर्थिक संकटात सापडलं होतं. 1928 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली. ‘आपण आज अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच गरिबीवर अंतिम विजय मिळवण्याच्या अगदी जवळ आहोत’, असं ते म्हणाले आणि त्यांच्या या मताशी बरेच नागरिक सहमत झाले. याहून चांगलं आयुष्य आपण कधीच जगलो नाही अशी सामान्यांची भूमिका होती कारण तेव्हा बेरोजगारी दर 4 टक्के असून दर 100 तील 96 व्यक्तींकडे रोजगार होता.
जॅज संगीत, रेडिओ, वीजपुरवठा, टेलिफोन यांची विक्री वाढली होती. क्रेडिटसुविधेवर खरेदी केली जात होती. मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या दरात कार उपलब्ध होत्या. फ्लोरिडासारख्या शहरांमध्ये घरं आणि फ्लॅटची बेसुमार विक्री सुरू होती. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी प्रत्येकजण उत्सुक होता. पैसे नसणारे बँकांकडून कर्ज घेत शेअर बाजारात गुंतवणूक करु पाहत होते.
…आणि मंदीनं दार ठोठावलं
बरोबर वर्षभरानं म्हणजेच 1929 मध्ये आर्थिक संकटाचं सावट आणखी गडद झालं. न्यूयॉर्क शेअर बाजार कोसळला, सर्व व्यवसाय बंद झाले, सारंकाही उध्वस्त झालं. कोट्यधीश लयास गेले, सामान्यांनी आयुष्यभराती बचत गमावली. नोकरी, घर सामान्यांनी सारंकाही गमावलं. पुढच्याच काही वर्षांमध्ये अमेरिकेनं भीषण परिस्थिती पाहिली जिथं दर चारपैकी एक माणूस बेरोजगार होता. अमेरिकेत आलेल्या संकटानं सारं जग व्यापलं. पाहता पाहता आधुनिकीकरणाच्या दिशेनं जाणाऱ्या जगानं हा वाईट काळ स्वीकारला आणि त्याला महामंदी किंवा ‘ग्रेट डिप्रेशन’ असं नाव दिलं.
29 ऑक्टोबर 1929 हा तोच दिवस जेव्हा अमेरिकेच्या इतिहासात ‘ब्लॅक ट्युसडे’ची नोंद करण्यात आली. हाच तो दिवस होता जेव्हा अमेरिकेचा शेअर बाजार कोसळून संपूर्ण जग मंदीच्या कचाट्यात सापडलं होतं. याची सुरुवात आठवडाभर आधी म्हणजेच 24 ऑक्टोबरपासून झाली होती. पण, तेव्हा मंदीचा अंदाज मात्र कोणालाच नव्हता. त्या दिवशी शेअर कोसळत होते मात्र दुपारपर्यंतच्या सत्रात त्यांना पुन्हा स्थिर करण्य़ाची जबबादारी काही व्यावसायिकांनी स्वीकारली होती. शेअर खरेदी करत बाजार स्थिर असल्याची बोंब त्यांनी ठोकली आणि सारंकाही पूर्ववत झालं. मात्र ही वादळापूर्वीची शांतता होती. 28 ऑक्टोबरला पुन्हा तसाच काळा दिवस उजाडला, पडझट सुरू झाली तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि अखेर 29 ऑक्चोबरला ज्याची भीती होती तेच घडलं.
कसा कोसळला शेअर बाजार?
या दिवशी न्यूयॉर्क शेअर बाजारात 1.6 कोटी शेअर खरेदी करण्यात आले पण, ते कोसळले आणि ही घसरण 11.73 टक्के इतकी नोंदवण्यात आली. हे पर्व इतकं भीषण होतं की, मॅनहॅटन येथील 44 व्या मजल्यावरून एका महिलेनं उडी मारून आयुष्य संपवलं होतं. अभिनेता ग्राऊसो मार्क्स यांनीसुद्धा सारी संपत्ती गमावली. पुढच्याच दोन वर्षांमध्ये दोन हजार बँक दिवाळखोर झाल्या, सर्व ठेवी शून्यावर पोहोचल्या. या संकटामध्ये सापडेल्या अमेरिकेत 4 वर्षांमध्ये जवळपास 11 हजार बँका बंद पडल्या. ज्या बँका सुरू होत्या तिथं कोणताही व्यवहार करण्याची भीती सामान्यांच्या मनात बसली होती.
जगभरात या महामंदीचे परिणाम…
अमेरिकेतील या महामंदीचे जगभरात परिणाम दिसून आले. अमेरिकेतील बँका बंद पडल्या आणि युरोपातही बँकांची हीच स्थिती पाहायला मिळाली. संपूर्ण जगात या आर्थिक मंदिचे परिणाम दिसून आले. युरोप, आशिया आणि इतर खंडांमध्येसुद्धा उद्योगधंदे बंद पडू लागले, सामान्यांची अर्थार्जनाची साधनं कमी झाली, जगभरातील कैक देशांमध्ये बेरोजगारी दर 33 टक्क्यांवर पोहोचला होता.
जागतिक आर्थिक मंदीवर अखेर कोणी तोडगा काढला?
न्यूयॉर्कचे गव्हर्नर रुझवेल्ट यांनी अखेर या मंदीच्या स्थितीशी दोन हात करण्यासाठी काही पर्याय समोर ठेवले. ज्या ज्या व्यक्तीला मदतीची गरज आहे त्या व्यक्तीला सरकारनं मदत करावी असं ठाम मत त्यांनी अधोरेखित केलं. नोकरी गमावण्यापूर्वी याच नागरिकांनी देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचं योगदान दिल्याचं ते म्हणाले. पुढे खुद्द रुझवेल्ट यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होत त्यांनी यात विजय मिळवला.
रुझवेल्ट सरकारनं शेअर बाजाराला सरकारी नियंत्रणात आणत ट्रेडिंगवर लक्ष ठेवण्यासाठी कठोर नियमावली आखली. जोसेफ केनेडी यांना स्टॉक एक्सचेंज कमिशनच्या अध्यक्षपदी घेण्यात आलं. श्रमिकांना रोजगार देण्यासाठी CWA उपक्रम आखत देशभरात रस्ते, पार्क, शाळा, उड्डाणपूल, आऊट हाऊस तयार केले ज्यामुळं चाळीस लाखांहून अधिक श्रमिकांना रोजगार उपलब्ध झाला.
SOURCE : ZEE NEWS