Source :- BBC INDIA NEWS
गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातल्या मोहझरी गावातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणारी वैष्णवी चौधरी पहिलीच मुलगी. ऑक्टोबर महिन्यात इथं आल्यानंतर तिचं वजन झरझर तीन-चार किलो उतरलं.
“इथं आले तेव्हा एका वसतीगृहात राहत होते. एकटीला परवडत नव्हतं म्हणून मैत्रिणीसोबत मिळून दोन वेळेच्या जेवण्याची मेस लावली. तीन पोळ्या, भाजी, वाटीपेक्षा थोडा जास्त भात आणि डाळ असं दोघीत मिळून खायचो,” वैष्णवी सांगते.
डाळ म्हणजे पातळ पाणीच! बिनचवीच्या, पोषणतत्त्व नसलेल्या आणि एवढ्याशा जेवणानं 19 वर्षांच्या, वाढत्या वयातल्या मुलीची भूक तरी कशी भागणार? पण बाहेर काही खायचं म्हटलं तर त्यातल्या त्यात स्वस्त वडापावच.
“एकवेळ अशी आली की, अन्नावरची वासनाच उडाली. आताही घरी जाते, तेव्हा आधी तीन वेळेस जेवणारी दीदी एका वेळचंही नीट खात नाही म्हणून लहान बहीण टर उडवते,” घरच्या आठवणीनं बोलताना मध्येच तिला भरून येतं. गावी तिची आई, एकल पालक, एक एकर शेतात तांदूळ पिकवते आणि दुसऱ्यांच्या शेतावर मजुरीसाठी जाते.
अलिकडेच केलेल्या एका रक्त तपासणीत वैष्णवीचं हिमोग्लोबीन 9.8 ग्रॅम/प्रति डेसिलीटर (g/dl) भरलं. म्हणजे मध्यम प्रमाणातला ॲनिमिया.
फक्त वैष्णवीच नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून, गरीब घरांमधून पुण्यात आलेल्या अनेक मुली आणि अनेक मुलांना रक्ताक्षय असल्याचं नुकत्याच एका सर्वेणक्षणातून समोर आलं आहे.
स्टुडंट्स हेल्पिंग हॅन्ड्स आणि राष्ट्र सेवा दल या दोन संस्थांनी केलेल्या या आरोग्य सर्वेक्षणात 579 तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता. त्यातल्या 41 टक्के मुलींना आणि 23 टक्के मुलांना रक्ताक्षय असल्याचं सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. यात एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आणि पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांचा समावेश आहे.
चांगलं, सकस आणि पुरेसं पोटभर जेवण न मिळणं हेच त्यांच्या रक्ताक्षयामागचं कारण आहे, असंही हे सर्वेक्षण सांगतं.
हे सर्वेक्षण अत्यंत प्राथमिक पातळीवर आणि मर्यादीत स्वरूपात झाले असले, तरी या शितावरून महाराष्ट्रातल्या शैक्षणिक आणि आरोग्य व्यवस्थेच्या भाताची परीक्षा करता येऊ शकते, असं म्हटलं जात आहे.
हिमोग्लोबीनची गरज काय?
लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा हे माणसाच्या रक्तातले चार महत्त्वाचे घटक असतात. त्यातल्या लाल पेशींमध्ये हिमोग्लोबीन नावाचं प्रथिन असतं. तेच ऑक्सिजन धरून ठेवतं आणि फुफ्फुसांकडून सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवतं.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रक्तातल्या लाल पेशी किंवा त्यामधल्या हिमोग्लोबीनची संख्या सामान्य पातळीपेक्षा कमी असल्यानं उद्भवणारी स्थिती म्हणजे रक्ताक्षय. यालाच ॲनिमिया असंही म्हणतात.
महिलांमध्ये 12 ते 15 g/dl तर पुरूषांमध्ये 14 ते 18 g/dl अशी हिमोग्लोबीनची पातळी सामान्य मानली जाते.
रक्ताक्षय असेल तर गरगरणं, चक्कर येणं, थकवा जाणवणं अशा काही साध्या, तर काही गुंतागुंतीच्या समस्याही जाणवू शकतात, असं रोगनिदानतज्ज्ञ डॉ. मंदार परांजपे सांगतात.
त्यांच्या दर्पण लॅबोरेटरीकडून सर्वेक्षणातील मुलामुलींची रक्त तपासणी केली गेली. त्यांच्याच सहभाग वेल्फेअर फाऊंडेशन या संस्थेडून या तपासणीचा खर्चही उचलला गेला.
सर्वेक्षणाचा अहवाल काय सांगतो?
या सर्वेक्षणात 18 ते 24 या वयोगटातले, बाहेरून पुण्यात शिकायला आलेल्या 215 तरुणी आणि 364 तरुण सहभागी झाले होते.
सर्वेक्षण दोन भागात करण्यात आलं. पहिल्या भागात या मुलांची रक्त तपासणी केली गेली. 4 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या काळात प्रत्येक रविवारी (एकूण 9) थोड्या थोड्या मुलांचे रक्ताचे नमुने जमा करून त्याची तपासणी केली गेली. दुसऱ्या भागात या तरुण-तरुणींकडून त्यांच्या आहारासंबंधी आणि आरोग्याविषयीची वस्तूस्थिती नोंदवणारी आणि त्यांच्या आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेणारी एक प्रश्नावली भरून घेतली.
डिसेंबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या या अहवालात प्रामुख्यानं 89 मुलींना (41 टक्के) आणि 85 (23 टक्के) मुलांना रक्ताक्षय असल्याचं निदान झालं. त्यात सौम्य रक्ताक्षय म्हणजे हिमोग्लोबीन 11 ते 12 g/dl असणाऱ्या मुलींची संख्या 42 होती, तर, 47 मुलांना सौम्य रक्ताक्षय असल्यानं त्यांचं हिमोग्लोबीन 12 ते 14 g/dl होतं.
संपूर्ण देशातच पुरूषांपेक्षा स्रियांमध्ये रक्ताक्षयाचं प्रमाण जास्त दिसतं. त्याचंच प्रतिबिंब या सर्वेक्षणातंही दिसलं.
मुलींची वैद्यकीय पार्श्वभूमी नोंदवून घेताना, मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव जास्त असणं आणि आहाराकडं असलेलं दुर्लक्ष हेच त्यांच्या रक्ताक्षयामागचं कारण असल्याचं समोर येतं.
“आज वयाच्या साधारण विसाव्या वर्षी या मुलींची रक्ततपासणी झाली असेल. मात्र, आपल्याकडच्या पुरूषसत्ताक समाजात त्यांच्या कुपोषणाची सुरुवात लहानपणापासूनच झाली असणार असा अंदाज आहे,” डॉ. परांजपे सांगतात.
हिमोग्लोबीन पहिल्यापासून कमी असेल, तर पुढे बाळंतपणाच्या काळात या मुलींमध्ये अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात, असा इशारा ते देतात.
बुलढाण्याच्या पिंपळगावकाळे गावातली काजल बोडख तीन वर्षांपूर्वी पुण्यात पदवी शिक्षणासाठी आली. मात्र, अलीकडेच तिचं हिमोग्लोबिन 9 g/dl वर येऊन पोहोचलं आहे. तेव्हापासूनच मासिक पाळीतला रक्तस्राव एकदम कमी झाल्याचं ती म्हणते.
“पुण्यात आले तेव्हा सदाशिव पेठेत रुम करून रहायचे. तिथं माझ्यासोबत माझ्या दोन मित्रांचं जेवण बनवता यायचं. बदल्यात, ते दोघं रुमच्या भाड्यासाठी थोडा हातभार लावायचे आणि माझा लायब्ररीचा आणि विजेच्या बीलाचा खर्च उचलायचे,” काजल सांगते.
पदव्युत्तर शिक्षणासाठी काजल पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात आल्यापासून मासिक पाळीचा प्रचंड त्रास होत असल्याचं ती सांगते. तिच्या वसतीगृहातल्या इतर मुलीही अतिरिक्त रक्तस्राव, सहन न होणाऱ्या वेदना आणि मासिक पाळीत बदल झाला असल्याचं सांगतात.
मुलींमध्ये दिसणारा रक्ताक्षय ही नेहमी दिसणारी समस्या आहे. मात्र, सर्वेक्षणात मुलांमध्ये रक्ताक्षयाचं निदान होणं थोडं आश्चर्यकारक असल्याचं डॉ. परांजपे सांगतात.
“खानावळीत मिळणाऱ्या अन्नात पोषणाची कमतरता हेच त्यामागचं मुख्य कारण असणार. जिथं व्यापारी पद्धतीनं अन्न विकलं जातं तिथं सोड्याचा वापर करून ते अन्न फुगतं. प्रत्यक्ष सकस अन्न पोटात कमी जातं असं साधारणपणे दिसतं,” डॉ. परांजपे सांगतात.
रक्ताक्षय सौम्य असला तरी दीर्घकाळ अशी स्थिती राहिली, तर त्याचा हृदयावर ताण पडतो. हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला जास्त जोरानं रक्ताभिसरण करावं लागतं. शरीराच्या इतर अवयवांना आणि खासकरून मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सतत कमी पडत असेल, तर त्याचे परिणाम दीर्घकाळानं शरीरावर दिसू लागतात, असंही ते सांगतात.
संसर्गजन्य आजाराची लक्षणं
हिमोग्लोबीनच्या स्थितीसोबतच सर्वेक्षणातल्या मुलामुलींमध्ये लाल पेशींचा आकार, पांढऱ्या पेशींची आणि प्लेटलेट्सची संख्या कमी जास्त झाली असल्याचं आढळलं.
रक्त पेशींचा आकार लहान म्हणजे लोहाची कमतरता. अशा कमतरेचं सर्वसाधारण कारण आहार नीट नसणं किंवा मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव होणं असं असू शकतं. तर ‘बी12’ जीवनसत्त्व आणि फॉलिक ॲसिड कमी झालं असेल, तर रक्तातल्या लाल पेशींची संख्या वाढते, असं हा अहवाल सांगतो.
रक्तात लहान आणि मोठ्या दोन्ही प्रकारच्या लाल पेशी दिसत असतील, तर त्या स्थितीला ॲनिसोसायटोसिस असं म्हणतात. लाल पेशींची संख्या लहान किंवा मोठी झाली असल्यानं झालेल्या रक्ताक्षयाचे वेगवेगळे परिणाम होतात, असं डॉ. परांजपे सांगतात.
“जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर मानसिक परिणाम जास्त होतात. थकवा, चक्कर, अंधारी, छातीत धडधड हे सर्वच प्रकारच्या रक्ताक्षयात होतं. पण उदासिनता, चिडचिडेपणा, मुंग्या येणं, विस्मरण हे खासकरून जीवनसत्त्वाच्या कमतरेमुळं झालेल्या रक्ताक्षयात होत असतं,” ते माहिती देतात.
लोह आणि जीवनसत्त्वाच्या कमतरतेसोबतच पुण्यामध्ये त्या काळात सुरू असणाऱ्या विषाणुजन्य आजाराची लक्षणं अनेक मुलांच्या रक्तात आढळली. अनेक मुलामुलींच्या पांढऱ्या रक्तपेशींची आणि प्लेटलेट्सची संख्या कमी जास्त होती.
“या वयात रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यानं त्यांना ताप जाणवत नाही किंवा ही मुलं तो अंगावर काढतात. अंग दुखत असतं, तरी दुर्लक्ष केलं जातं,” असं डॉ. परांजपे यांनी सांगितलं.
याशिवाय, त्यांना सर्वेक्षणातून अनपेक्षितरित्या काही आजार शोधता आल्याचं ते सांगतात. एका मुलीला हायपरथायरॉईडिझम हा आजार आढळला. एका मुलाला टाईप वन डायबेटिस हा तरुणांमध्ये होणारा गंभीर आजार आढळला.
एका मुलाला रक्त घेतल्या घेतल्या चक्कर आली. पुढे त्याची एका चांगल्या रुग्णालयात न्युरॉलॉजिकल तपासणी सवलतीच्या दरात केली गेली.
तरुण तरुणींमध्ये ज्या प्रमाणात ॲनिमिया आढळला त्या प्रमाणात त्याची लक्षणं मुलं सांगत नव्हती, असं निरीक्षण डॉ. परांजपे नोंदवतात. त्याची दोन कारणं असू शकतात.
एकतर, हळूहळू न कळत हिमोग्लोबिन कमी होत गेलं, तर शरीर तेवढे इशारे देत नाही. पण ज्या भागातून ही मुलं येतात तिथून सहनशीलता घेऊन येतात. तक्रारी करायची त्यांची वृत्ती नसते. त्यामुळे आपल्याला होणारे त्रास सामान्य आहेत, असं त्यांना वाटतं.
सहभागींची आर्थिक पार्श्वभूमी
सर्वेक्षणाच्या दुसऱ्या भागातल्या प्रश्नावलीवरून या मुलामुलींच्या आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमीचा अंदाज येतो.
रक्त नमुना दिलेल्या आणि इतर अशा 218 तरुणींनी आणि रक्त नमुना दिलेल्यापैकी 351 तरुणांनी ही प्रश्नावली भरून दिली होती.
ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येणाऱ्या बहुतेक तरुण-तरुणी अशाच अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून येतात. त्यातील बहुतेकांनी प्रश्नावलीत पालकांचा व्यवसाय शेती असा नोंदवला आहे. मात्र, या मुलांशी चर्चा केली तेव्हा अनेकांचे पालक अल्पभुधारक असून ते पूर्णवेळ किंवा अर्धवेळ शेतमजुरी करतात असं समोर आलं.
काहींचे पालक ऊसतोड कामगार आहेत किंवा अन्य मजुरीची कामं करतात. अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच मुलांच्या घरात स्थिर आर्थिक उत्पन्न येते. याशिवाय, अनेक तरुण-तरुणी फक्त दोन किंवा एक वेळेचा आहार घेऊन राहतात.
सर्वेक्षणातल्या तरुण-तरुणींनी केलेल्या शारीरिक तक्रारींचीही नोंद अहवालात करण्यात आली आहे. अनेक मुलींनी मासिक पाळीचा असह्य त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. तर मुलं मुली दोघांनीही भूक कमी लागते किंवा खूप भूक लागते अशा तक्रारी केल्या आहेत.
पुणे विद्यापीठात एमएससी केमिस्ट्री करणारा प्रथमेश फेगडे हा त्यातलाच एक तरूण. त्याचं हिमोग्लोबीन व्यवस्थित म्हणजे 16 g/dl असलं, तरी त्याचं वय आणि उंचीच्या प्रमाणात वजन फारच कमी म्हणजे 43 किलोग्रॅम आहे. बुलढाण्याच्या भुसावळ तालुक्यात ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेला प्रथमेश नववीत असताना आई गेल्याापासून एकटाच आहे.
“मी नाष्टा करतच नाही. दुपारी 12-12:30 ला जेवण होतं. मात्र, ते पुरत नाही. त्यानंतर 4-5 तास प्रयोगशाळेत उभं रहावं लागतं. लगेच भूक लागते,” प्रथमेश सांगतो.
रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तो वाढपी म्हणून कामाला जातो. एका दिवसात सकाळी 11 ते रात्री उशीरापर्यंत केलेल्या कामाचे त्याला 800 रूपये मिळतात.
त्याच्यासारखे काही जण ‘कमवा आणि शिका’ योजनेत महिन्याला 3 ते 4 हजार रूपये मिळवतात. काही मुलं सोसायट्यांमधल्या लोकांना मदत करणं, त्यांची बँकेची कामं करणं अशी कामं करतात. अगदी त्यांची पाळलेली कुत्रं फिरवण्याची कामंही ही मुलं करतात.
राज्य सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेचे पैसे मिळाल्यामुळे आर्थिक चणचण सुटल्याचंही पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या काही मुलींनी सांगितलं.
युवकांचं व्यापक कुपोषण
“तरुण मुला मुलींची वाढ होत असते. त्यामुळे त्यांना भूक लागणं ही किती स्वाभाविक गोष्ट आहे. पण तीच गोष्ट त्यांना तक्रार म्हणून सांगावी वाटणं हा आपला समाज म्हणून पराभव नाही का?” राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त प्रमोद मुजुमदार विचारतात.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात काही मुली जेवणासाठी पैसे नसल्यानं शिक्षण सोडून परत जात आहेत, असं त्यांना समजलं. त्यानंतर या मुलींची तात्काळ जेवणाची सोय करून दिली गेली.
मात्र, ज्यांना नीट जेवायलाही मिळत नाही, अशा मुलींची अवस्था काय असेल, हा प्रश्न उभा राहिला. त्यातून त्यांची आरोग्य तपासणी करायचं ठरलं. हळूहळू मुलांचीही परिस्थिती काही वेगळी नाही हे लक्षात आलं. म्हणून मुलांनाही आरोग्य सर्वेक्षणात सहभागी करून घेण्याचं ठरलं.
“पुण्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेली जवळपास 72,000 मुलं शिकतात. ती ज्या ग्रामीण भागातून येतात तिथं शेती एका टप्प्यावर येऊन कुंठित झाली आहे. शैक्षणिक सुविधांचा दर्जा इतका खालावला आहे की, इतर जिल्ह्यातून कॉलेजातून ग्रॅज्युएट झालेल्यांना नोकरीत प्राधान्य दिलं जात नाही. त्यामुळे काहीही झालं, तरी पुण्यात शिक्षण घ्यायची या मुलांची इच्छा असते,” प्रमोद मुजुमदार सांगतात.
सर्वेक्षणादरम्यान एका मुलीनं एका वन रूम किचन फ्लॅटमध्ये 12 ते 13 मुलींसोबत राहत असल्याचं त्यांना सांगितलं. बहुतेक मुलं दोघात एक डबा घेतात “हे युवकांचं व्यापक कुपोषण आहे,” मुजुमदार नमूद करतात.
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मुलभूत गरजांपैकी जेवणासाठी आणि राहण्यासाठी त्रास होत असतो. “एका सरकारी वसतीगृहात बहुतांश दलित समाजातली मुलं राहतात. तिथं छतातून पाणी गळतं, भिंतीचं प्लॅस्टर पडलेलं आहे. गेल्यावर्षी तिथे राहणारी चार मुलं डेंग्यू झाल्यानं मेली,” मुजुमदार सांगतात.
मानसिक आरोग्याचा प्रश्न
या मुलांना आरोग्य विषयक सल्ला देणारे, त्यांच्याशी बोलणारे, मानसिक सल्ला देणारे चांगले समुपदेशक उपलब्ध नाहीत, असंही ते पुढे सांगतात. त्यामुळे अनेक मुलं मुलींनी मानसिक ताणतणाव येत असल्याचंही अनेकांनी सर्वेक्षणात सांगितलं.
पुण्यातल्याच एका खासगी महाविद्यालयात नाशिकचा गालिब अन्सारी बीएच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो. पुण्यात आल्यावर त्याला बसलेला सांस्कृतिक धक्का इतका मोठा होता की, त्यातून सावरताना तो आतून बाहेरून बदलून गेल्याचं सांगतो.
“पुण्यात आल्यावर सुरुवातीचे काही महिने मी रोहित जाधव हे खोटं नाव घेऊन राहत होतो,” तो सांगतो. त्याच्या घरातला तो पहिला पदवीधर असणार आहे. त्यामुळे शिक्षण झाल्यानंतरही नोकरी मिळायला किती त्रास पडतो हे शिवणकाम करणाऱ्या त्याच्या आईला आणि ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या आपल्या वडिलांना समजवताना त्याला फार त्रास होत असतो.
गालिब अन्सारी पुढे सांगतो, “घरची परिस्थिती व्यवस्थित नाही हे अम्मी अब्बू सांगत असतात. शिवाय, इकडे पैसे नसल्यानं कितीतरी गोष्टीत मन मारावं लागतं,” कॉलेजमधल्या इंग्रजी अभ्यासापासून ते इतर मुलामुलींकडे पाहून येणाऱ्या न्यूनगंडापर्यंत रोजच्या जगण्यात येणाऱ्या तणावाबद्दल कोणाशी बोलायचं हे त्याला कळत नाही.
त्यातल्या त्यात स्टुडंट्स हेल्पिंग हँड या संस्थेची अन्न शिष्यवृत्ती मिळाल्यानं जेवणाचा मुलभूत प्रश्न काही प्रमाणात सुटल्याचं समाधान त्याला वाटतं. त्याच्यासारख्या जवळपास 800 मुला-मुलींच्या दोन वेळेच्या डब्याची सोय अन्न शिष्यवृत्तीतून होते.
“अन्न शिष्यवृत्तीसाठी जवळपास 1400 अर्ज आले होते. त्यातल्या सगळ्यांनाच डबा देता येईल एवढा निधी उपलब्ध नव्हता. मात्र, ज्या मुलांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे, जी मुलं अनाथ आहेत, ज्यांना एकल पालक आहेत अशा काही निवडक मुलांच्या मुलाखती घेऊन शिष्यवृत्ती दिली जाते,” स्टुडंट्स हेल्पिंग हँडचे संस्थापक कुलदीप आंबेकर सांगतात.
त्यांच्या रक्ताक्षयावर उपाय म्हणून सर्वेक्षणाचा फायदा घेऊन जेवणातूनच मुलांना चांगलं, सकस अन्न कसं देता येईल यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे.
‘हा फक्त वैद्यकीय प्रश्न नाही’
फक्त चांगलं खाऊन, गोळ्या घेऊन रक्ताक्षयाचं पूर्णपणे उच्चाटन करता येऊ शकणार नाही असं पुण्यातल्या आरोग्यभान या आरोग्याचा संवाद करणाऱ्या संस्थेचे संस्थापक डॉ. मोहन देस म्हणतात.
भारतातल्या निम्म्यापेक्षा जास्त महिलांना आणि लहान मुलामुलींना रक्ताक्षयाची समस्या भेडसावत असतानाही आपल्या समाजात, आरोग्य व्यवस्थेत रक्ताक्षयाबद्दलच्या संवादाचा अभाव असल्याचं ते लक्षात आणून देतात.
“रक्ताक्षय किंवा ॲनिमिया बरा करण्यासाठी अनेकदा गोळ्या दिल्या जातात. त्यानं बरं वाटलं की 10 – 15 दिवसांत अनेकजण गोळ्या घेणं थांबवतात असं अनेकदा दिसतं,” देस म्हणतात.
या गोळ्यांचा साईड इफेक्ट असतो. त्याने मळमळतं, संडासला काळी होते, ते सामान्य असतं, ही लक्षणं कधी थांबतात, रक्ताक्षय टाळण्यासाठी काय खायचं या सगळ्याची लोकांना समजेल अशी वैज्ञानिक माहिती देणं हा त्याच्या संवादाचा एक भाग आहे.
मुुळातच रक्ताक्षय हा फक्त वैद्यकीय प्रश्न नाही. त्यात राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक धागेदोरे गुंतलेले आहेत. रक्ताक्षय घालवणं हा कोणाच्याही प्राध्यानाचा विषय नाही, असं डॉ. मोहन देस म्हणतात.
“आहारात स्वस्त मांसाहाराचा समावेश असणं, अंडी असणं फार गरजेचं आहे. मात्र, शाळा, महाविद्यालयांमध्ये मासांहाराच्या विरोधात वातावरण निर्माण करणं सुरू आहे,” असंही डॉ. मोहन देस सांगतात.
पोल्ट्री, डेअऱ्या या तालुक्याच्या ठिकाणी व्यावसायिक कारणांसाठी चालवल्या जातात. मुलांच्या पोषणासाठी काहीही उपलब्ध नसतं. या अशा आर्थिक, राजकीय, सामाजिक व्यवस्थेत नुसत्या गोळ्यांनी रक्ताक्षय कसा बरा होणार? ते विचारतात.
विद्यापीठांचे, महाविद्यालयांचे परिसर एवढे मोठे असतात. पण ज्याची फळं, फुलं खाऊन जगता येईल असं एकही झाड तिथं का नसतं? मुलांसाठी भाजीपाला पिकवण्यासाठी परसबागा का बांधल्या जात नाहीत? हाही प्रश्न ते पुढे करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC