Source :- BBC INDIA NEWS

उन्हाळा

फोटो स्रोत, Getty Images

कडक उन्हाच्या वेळेस घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो. पण अनेकदा घरातही खूप गरम होतं.

तुम्ही मातीच्या जुन्या घरात राहात असाल, तर उन्हाचा त्रास तेवढा जाणवणार नाही. पण सिमेंट काँक्रिटनं बनलेल्या घरात आणि तेही शहरातल्या दाटीवाटीच्या भागात राहात असाल, तर असं घरही खूप तापतं.

अशावेळी डोक्यात चटकन विचार येईल की एसी लावू, म्हणजे 15 मिनिटांत घर थंड होईल. पण एसीचे दुष्परिणामही आहेत. एकतर त्यामुळे वातावरणातील उष्णता आणखी वाढते, शिवाय वीजबीलही खूप जास्त येतं.

पाण्याचा वापर करणारे कुलर काही भागांत वापरले जातात, मात्र दमट हवेच्या ठिकाणी त्यांचा फारसा फायदा होत नाही.

अशा वळी आपलं घर थंड ठेवायचे काही नैसर्गिक उपाय आहेत. काही गोष्टींचा विचार घर उभारतानाच करणं फायद्याचं ठरतं. पण जर आधीच बांधलेल्या घरात राहात असाल, तरीही काही उपाय करता येतील.

1. घराच्या छतावरचे प्रयोग

छत हा कुठल्याही इमारतीचा सर्वात गरम होणारा भाग असतो. कारण हा एकमेव भाग असा असतो, ज्यावर दिवसात बराच काळ थेट सूर्यकिरणे पडतात.

बहुतांश इमारतींची गच्ची ही सिमेंट काँक्रिटची बनलेली असते आणि तिथे सर्वात वरच्या मजल्यावर जास्त उष्णता जाणवते. ती कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत.

सर्वात सोपं म्हणजे घराच्या छतावर पांढरा रंग मारणे. पांढरा रंग हा रिफ्लेक्टीव्ह असतो, म्हणजे तो अधिकाधिक सूर्यप्रकाश परावर्तित करतो. त्यामुळे घर कमी तापते आणि संध्याकाळी लवकर थंड होण्यासही मदत होते.

नेमका किती फायदा होतो, हे जाणून घेण्यासाठी नागपूर महापालिका विश्वेश्वरय्या नॅशनल इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (VNIT) आर्कीटेक्ट विभागानं शहरातील पूर्व भागात प्रयोग सुरू केला आहे.

इथल्या 30 घराच्या छतांना पांढरा रंग दिला जातो आहे आणि उर्वरीत 30 घरांना असा रंग दिलेला नाही. या दोन्ही गटांमधल्या घरांतील तापमान किती प्रमाणात कमी-जास्त आहे, याची नोंद घेतली जाणार आहे.

असल्याचं VNIT च्या आर्कीटेक्ट डॉ. राजश्री कोठाळकर त्याविषयी माहिती देतात.

सूर्यप्रकाश परावर्तित करणारा पांढरा रंग छतावर लावल्यानं घराच्या आतलं तापमान कमी राहतं, असं याआधी दिसून आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

“नागपूरसारख्या अनेक शहरांमध्ये उन्हाळा म्हणजे 24 तास भट्टीत राहल्यासारखा अनुभव असतो. आधी केवळ दुपारी गरम व्हायचं आणि रात्री तापमान कमी झाल्यावर थंड वाटायचं.

“पण आता रात्रीचं तापमानही जास्त असतं. त्यात सिमेंटची घरं दिवसा शोषून घेतलेली उष्णता रात्री हवेत सोडतात. त्यामुळे घराला, आणि विशेषतः छताला पांढरा रंग लावल्यानं फरक पडतो”, असं डॉ. कोठळकर सांगतात.

पण कोकणासारख्या भरपूर पाऊस पडणाऱ्या ठिकाणी पावसाचं पाणी साठून घरात झिरपू नये, म्हणून गच्चीवरही जाड पत्र्यांचं छत उभारलं जाते.

सिमेंटपेक्षा धातू सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात परावर्तीत करतात, पण त्यावरही रिफ्लेक्टिव्ह रंग लावला तर ते फायद्याचं ठरतं.

एकतर अशा घरांच्या गच्चीवर सूर्याची किरणं थेट पडत नाहीत आणि पत्र्यांखाली हवा खेळती राहिल्यानं छत तुलनेनं थोडं थंड राहतं.

मुळात घर बांधतानाच छतावर पडणाऱ्या उन्हाचा विचार केला, तर अनेक गोष्टी सोप्या होतील.

घराच्या छतावर मातीच्या टाईल्स किंवा कौलंही बसवता येतात. अगदी सिमेंटचं छत असेल पण त्यावर मातीच्या टाईल्स किंवा कौलांचा थर असेल तरी घर तुलनेनं थंड राहतं, असा अनुभव आहे.

गच्चीच्या छतावर मोझेक टाईल्स किंवा तुटलेल्या टाईल्सचं आवरण असेल तरी फायद्याचं ठरतं. डॉ. कोठाळकर सांगतात की अशा टाईल्स प्रकाश परावर्तीत करत असल्यानं छत गरम होत नाही.

घराचं छत तयार करताना त्यात मातीचे पाईप किंवा मडकी वापरून पोकळी ठेवली जाते. अशा पोकळीतील हवा थंड राहिल्यानं घर थंड राहू शकतं. म्हणजेच घर बाहेरच्या उष्णतेपासून वेगळं किंवा इन्सुलेटेड राहतं.

“पण ही पोकळी मुळात घरात जमा झालेली गरम हवा बाहेर काढू शकत नाही आणि त्यामुळे छतासाठी हा उपाय न केलेला बरा”, असंही डॉ. कोठाळकर सांगतात.

2. उंच टॉवर आणि भिंतींवर पडणारं ऊन

छतावरचे उपाय कमी किंवा मध्यम उंचीच्या घरासाठी फायदेशीर ठरतात. कारण अशा घरांच्या भिंतीचा काही भाग अनेकदा सावलीत असतो आणि फक्त छताचा भागच जास्त तापतो.

पण जास्त उंचीची घरं आणि उंच मनोऱ्यांमध्ये छतापेक्षा भिंती जास्त भाग सूर्यप्रकाशात घेऊ शकतात. कारण या भिंतीही अनेकदा मातीच्या विटांपासून नाही तर सिमेंट काँक्रिटनं बनवलेल्या असतात.

सिमेंटपेक्षा विटांच्या जाड भिंती घर थंड ठेवण्यास मदत करतात.

फोटो स्रोत, Getty Images

कमी जाडीच्या भिंती लगेच उष्णता घरात पोहोचवतात. त्यामुळे जाड भिंती जास्त फायद्याच्या ठरतात, असं डॉ. कोठाळकर सांगतात.

अशा भिंती उभारतानाच इन्सुलेशनचा विचार करता येईल. भिंतींमध्ये मडकी किंवा मातीचे वापरून हवेचा कप्पा तयार करता येईल किंवा भिंतींना आतून नैसर्गिक दगडाच्या टाईल्स लावता येतील.

3. खिडक्यांसाठी उपाय

घरात सूर्यप्रकाश येणं गरजेचं असतं, पण उन्हाळ्यात जेव्हा जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश घरात येतो, तेव्हा त्यामुळे घरातलं तापमानही वाढतं.

रात्री आणि पहाटे तापमान तुलनेनं कमी होतं तेव्हा घराच्या खिडक्या काही काळ उघड्या ठेवल्या आणि दिवसा कडक उन्हाच्या वेळेस बंद ठेवल्या किंवा त्यांच्यावर जाड पडदे लावून सूर्यप्रकाश आत येऊ दिला नाही, तर घराचं तापमान कमी करण्यात मदत होते.

थेट उन पडणार नाही असं छोटं छत आणि प्रकाश परावर्तित करणाऱ्या काचा बसवलेली खिडकी

फोटो स्रोत, Getty Images

पण हा उपाय दिवसा तापमान 40-45 अंशांवर जातं, अशा कोरड्या हवेच्या ठिकाणी काहीवेळा लागू होत नाही.

त्यामुळे खिडक्या थंड ठेवण्याचा विचार करता येईल. त्यासाठी सूर्याची किरणं थेट खिडकीवर पडणार नाहीत, असे छोटे झरोके किंवा रिफ्लेक्टिव्ह काचांचा विचार करता येईल.

जिथे सूर्यप्रकाश जास्त आह, अशा पूर्व आणि पश्चिमेकडेच्या खिडक्यांना ग्रीन शेड नेटही लावता येईल.

4. खेळती हवा ठेवा

घरात हवा खेळती कशी राहील याचा विचार करायला हवा.

घरातल्या खिडक्यांची रचना वाऱ्याच्या दिशेनं असेल तर हवा खेळती राहते आणि उन्हाचा तडाखा थोडा कमी होतो.

घरात ‘क्रॉस व्हेंटीलेशन’ कसं राखता येईल याचा विचार घर बांधतानाच करायला हवा. क्रॉस व्हेंटिलेशन म्हणजे खिडकी किंवा दरवाजातून आलेली हवा दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्यासाठीची उपाययोजना. यामुळे घरात हवेचा प्रवाह तयार होतो आणि तापमान फार वाढत नाही.

घरात हवा खेळती कशी राहील, याचा म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशनचा विचार करा.

फोटो स्रोत, Getty Images

पण आता शहरात जसा प्लॉट असेल तसं घर बांधलं जातं आणि त्यामुळे खिडक्या कशा ठेवायच्या, घर कोणत्या दिशेनं असेल या गोष्टी कधी कधी आपल्या हातात नसतात.

तसेच फ्लॅट सिस्टमध्ये पण क्रॉस व्हेंटीलेशन होईल अशा खिडक्या नसतात. उन्हाच्या वेळेला खिडक्या बंद केलेल्या असतात.

अशावेळी आपण पंख्याच्या सहाय्यानं घरात हवा खेळती ठेवू शकतो.

5. पंख्याचा योग्य वापर

अनेकदा स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये एक छोटा पंखा – एक्झॉस्ट फॅन बसवलेला असतो, जो आतली गरम हवा बाहेर फेकतो. घरात क्रॉस व्हेंटिलेशन तयार करण्यासाठी अशा फॅनचा विचार करता येईल.

छतावरचा पंखा म्हणजे सीलिंग फॅन वापरूनही अनेकदा गरम होतं. अशा वेळी एकतर पंख्याची पाती स्वच्छ आहेत ना, हे तपासून पाहा. धूळ भरलेली पाती जड असल्यानं हवा नीट खेळती ठेवू शकत नाहीत.

छतावरच्या पंख्याची दिशाही महत्त्वाची असते. म्हणजे तो घड्याळ्याच्या दिशेनं फिरत असेल, तर छताजवळची गरम हवाच खाली फिरवली जाते. त्यामुळे सीलिंग फॅन घड्याळाच्या उलट्या दिशेनं फिरतो आहे ना, हे तपासून पाहा.

तुमच्या घरासाठी कोणता फॅन योग्य आहे, याचा विचार करा

फोटो स्रोत, Getty Images

काही वेळा मोठ्या खोलीत सीलिंग फॅनपेक्षा टॉवर फॅन जास्त फायद्याचा ठरतो, कारण त्यामुळे पूर्ण खोलीत दूरवरही हवा खेळती ठेवता येते.

सीलिंग फॅनखाली एका बादलीत बर्फ किंवा थंड पाणी ठेवलं तरी थंड हवा घरात खेळती राहू शकते. तुम्ही टॉवर फॅन किंवा टेबल फॅन वापरत असाल तर त्याच्यासमोर एका भांड्यात बर्फ ठेवा.

अर्थात हा उपाय फॅन जवळ बसलेल्यांना जास्त फायद्चाचा असतो आणि अनेकदा दमट हवामानात त्याचा फारसा फायदा होत नाही.

6. स्वयंपाकघरातलं तापमान

उन्हाळ्यात गिझरसारख्या उपकरणांचा आणि गरम पाण्याचा वापर कमी केला जातो, त्यामुळे बाथरूम अर्थात न्हाणीघरातलं तापमान फार वाढत नाही.

पण स्वयंपाकघर ही बहुतांश घरातली सर्वात उष्ण जागा असते. स्वयंपाक घराच्या खिडक्यांची दिशा आणि तिथून हवा बाहेर टाकणारा एक्झॉस्ट फॅन त्यासाठीच महत्त्वाचा ठरतो.

स्वयंपाक घराच्या खिडक्यांची दिशा आणि तिथून हवा बाहेर टाकणारा एक्झॉस्ट फॅन त्यासाठीच महत्त्वाचा ठरतो.

फोटो स्रोत, Getty Images

उन्हाळ्यात स्वयंपाक घरात कोणतीही गोष्ट शिजवताना, अगदी पाणी तापवताना किंवा फोडणी करतानाही वाफांमुळे उष्णता वाढू शकते.

त्यामुळे हा एक्झॉस्ट सुरू ठेवणं महत्त्वाचं ठरतं, कारण तो उष्ण हवा घरात साठू देत नाही. हा फॅन व्यवस्थित काम करतो आहे ना, हे वेळोवेळी तपासून पाहा, तो स्वच्छ ठेवा.

शक्यतो ऊन कमी असेल तेव्हा तसंच कमीत कमी उष्णतेचा वापर करणारे खाद्यपदार्थ बनवणं जास्त फायद्याचं ठरतं.

7. विद्युत उपकरणं

घरात साध्या बल्बपासून ते मोबाईल फोनपर्यंत वीजेवर चालणारी सर्व उपकरणं जास्त उष्णता तयार करतात.

तुमच्या घरात विजेचा बल्ब फक्त घरातल्याच नाही तर जगाच्या तापमानावरही परिणाम करू शकतो. जास्त उष्णता शोषून घेणाऱ्या हॅलोजेन बल्बपेक्षा LED दिवे वापरणं त्यामुळेच फायद्याचं ठरतं.

स्वयंपाकघरात धूर होणाऱ्या चुलींऐवजी शेगडी वापरली आणि फार वाफा न येणारे पदार्थ केले तर घरातलं तापमानही फार वाढणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images

LED दिवे कमी वीज वापरतात आणि कमी उष्णता तयार करतात. असे दिवेही जेव्हा गरज नसेल तेव्हा दिवे बंद ठेवल्यानं उष्णता कमी करण्यात मदतच होते. घरातल्या दिव्यांची प्रखरता (वॉटेज) किती आहे, हेही तपासून पाहा.

घरातील इतर उपकरणं गरज नसताना बंद करा आणि प्लगपासून वेगळी करून ठेवा. घरात विजेचा आणि ऊर्जेचा वापर जेवढा मर्यादित राहील, तेवढं घर थंड राहण्यास मदत होईल.

8. फर्निचर

घरातलं सामान कोणत्या गोष्टींनी बनलं आहे, यावरही घरातलं तापमान अवलंबून असतं.

विशेषतः तुम्ही झोपण्यासाठी गादी किंवा अंथरूण आणि पांघरूण वापरता, ते कशानं बनलं आहे, याचा विचार करा.

घरातला बेड, उशा आणि चादरी पॉलिस्टरच्या असतील तर त्या जास्त उष्णता शोषून घेऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

सुती कापड उन्हाळ्यात जास्त फायद्याचं ठरतं. तर पॉलिस्टरसारखी काही कापडं वातावरणातली आणि आपल्या शरिरातली उष्णताही शोषून घेतात. त्यामुळे पॉलिस्टरसारख्या कपडांपासून बनलेल्या गाद्या, पांघऱुणं, अभ्रे, पडदे आणि अन्य वस्तू वापरणं कमी करा.

हे शक्य नसेल तर किमान फिकट रंगाच्या कापडापासून बनवलेल्या वस्तू वापरा. जिथे रात्री झोपणार आहात, त्या खोलीत हवा खेळती आहे ना, याचा विचार करा. कारण आपण दिवसातले साधारण आठ तास त्या खोलीत घालवणार आहोत.

9. घराचा परिसर

आपलं घर थंड राहणं हे आपल्या घराच्या सभोवतालच्या वातावरणावर देखील अवलूंन असतं.

घराच्या आसपास आवारातही पूर्णपणे काँक्रिटच असेल, तर उष्णता जास्त वाढते. कारण काँक्रिट उष्णता शोषून घेतं.

विशेषतः शहरात जास्त सिमेंटीकरण असल्यानं तिथे हा प्रकार जास्त प्रमाणात जाणवतो. त्याला अर्बन हिट आयलंड असंही म्हणतात.

अनेकदा स्वच्छता राखण्यासाठी घराच्या आसपास मातीच्या अंगणाऐवजी दगडी फरशी, सिमेंटचा कोबा किंवा सिमेंटचे पेव्हर ब्लॉक्स बसवले जातात.

चेन्नईतला झाडांनी वेढलेला परिसर. झाडं इमारतींचा परिसर थंड ठेवायला मदत करतात.

फोटो स्रोत, Getty Images

त्याऐवजी मातीचं अंगण असेल किंवा कच्च्या विटा आणि मातीच्या टाईल्सचा वापर केला असेल तर तुलनेनं हवा थोडी थंड राहते.

घराच्या आसपास पाणी खेळतं राहात असेल किंवा एखादा पाण्याचा स्रोत असेल, तरी फायदा होतो. उदाहरणार्थ बागेतली कारंजी.

मात्र असं पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या, कारण साचलेल्या पाण्यात डास वाढण्याचा धोका असतो. शिवाय दुष्काळी भागात हा उपाय करता येणार नाही.

10. झाडांची लागवड

घराच्या आजूबाजूला आणि अगदी छतावरही हिरवंगार वातावरण असेल तर घराच्या आतमधलं तापमान थोडं कमी होतं.

केवळ शोभेच्या झाडांपेक्षा स्थानिक प्रजातींची झाडं तापमान जास्त नियंत्रणात ठेवतात. शहरातल्या घरात खिडक्यांमध्ये छोटी झाडं किंवा वेली लावल्या जातात.

घराच्या आजूबाजूला आणि अगदी छतावरही हिरवंगार वातावरण असेल तर घराच्या आतमधलं तापमान थोडं कमी होतं.

फोटो स्रोत, Getty Images

घराच्या आत लावलेली झाडं (Indoor plants) घरात जमा होणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आतलं तापमान कमी करण्यास मदत करतात.

पण फक्त झाडं लावून चालणार नाही. ड़ॉ. कोठाळकर सांगतात, “एक झाड किती उष्णता कमी करू शकेल? त्यामुळे आपल्याला सगळ्या पातळींवर उपाय करणं गरजेचं आहे. कारण, आपलं घर नैसर्गिकरित्या थंड राहील या दृष्टीनं बांधलं तर पुढे जाऊन त्या घरात कुलिंग, हिटींगसाठी येणारा खर्च फारच कमी होतो.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC