Source :- BBC INDIA NEWS

मृत तृप्ती पती अविनाश वाघसह

फोटो स्रोत, Pravin Thakre

जळगावच्या चोपडामध्ये ‘ऑनर किलिंग’ची एक गंभीर घटना शनिवारी रात्री घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून पित्यानेच मुलगी आणि जावयावर गोळीबार केला. त्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींनी दिली.

तृप्ती वाघ तिचे पती अविनाश वाघ हे एका नातेवाईकाच्या हळदीसाठी चोपडा इथं आलेले होते. त्यावेळी तृप्तीचे वडील किरण मंगळे यांनी दोघांवर गोळ्या झाडल्या.

यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी किरण मंगळे यांना मारहाण केली. त्यामुळं त्यांनाही उपचारासाठी दाखल करावं लागलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी किरण मंगळे आणि त्यांचा मुलगा निखिल मंगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अविनाश वाघ यांची आई प्रियंका वाघ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या घटनेनंतर त्याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

रेड्डींनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश ईश्वर वाघ हे पुण्याच्या कोथरूड भागात राहतात. त्यांनी मूळच्या धुळ्याच्या शिरपूर मधली तृप्ती मंगळे यांच्याबरोबर साधारणपणे दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, या विवाहाला तृप्तीचे वडील किरण मंगळे यांचा विरोध होता.

26 एप्रिल रोजी अविनाश वाघ यांच्या एका नातेवाईकाच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने चोपडा इथे हळदीचा कार्यक्रम होता.

यासाठी अविनाश पत्नी तृप्तीसह चोपड्यात आलेले होते. किरण मंगळे यांना त्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळे कार्यक्रमात पोहोचले.

घटनास्थळ

फोटो स्रोत, Pravin Thakre

त्यांनी येथे तृप्ती आणि अविनाशवर गोळ्या झाडल्या. त्यात तृप्ती या जागीच ठार झाल्या. तर अविनाश यांच्या पाठीवर आणि हातावर गोळी लागल्यामुळं ते गंभीर जखमी झाले.

त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

मुलीच्या वडिलांना चोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण मंगळे हे सीआरपीएफमधील सेवानिवृत्त अधिकारी होते. त्यांच्याकडं एक परवाना असलेलं शस्त्र होतं. त्यातूनच त्यांनी जावयावर गोळीबार केला.

मंगळे यांनी हळदीच्या कार्यक्रमातच हा गोळीबार केला. कार्यक्रमासाठी याठिकाणी मोठ्या संख्येनं नातेवाईक आलेले होते. त्या नातेवाईकांनी किरण मंगळे यांना चांगलाच चोप दिला. त्यात जखमी झाल्याने त्यांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून किरण अर्जुन मंगळे आणि त्यांचा मुलगा निखिल किरण मंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC