Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
25 मिनिटांपूर्वी
पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) रात्री उशिरा जम्मू-कश्मीरमधील उधमपूर, काश्मीरमधील अनेक भाग आणि पंजाबमधील पठाणकोट इथं क्षेपणास्त्रं डागल्याचा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे. ही क्षेपणास्त्र निष्प्रभ केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानने भारताच्या या आरोपांचे खंडन केले आहे. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने एका निवेदनात दावा केला की, पाकिस्तानने 16 भारतीय संरक्षण तळांवर रॉकेट आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला, मात्र हे हल्ले आधुनिक उपकरणांच्या मदतीने निष्प्रभ करण्यात आले.

फोटो स्रोत, Getty Images
नियंत्रण रेषेजवळील पुंछ भागात काल रात्री जोरदार गोळीबार सुरू होता, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एक महिला जखमी झाली.
पुंछचे पोलीस अधिकारी नवीद अहमद यांनी बीबीसीला सांगितले की, गोळीबारात लोहाल बेला येथील रहिवासी मुहम्मद अबरार यांचा मृत्यू झाला आणि बेलियां गावातील शाहिदा अख्तर नावाच्या महिलेला गोळीबारात दुखापत झाली असून त्यांच्यावर मंडी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजूकडून झालेल्या गोळीबारात अनेक घरांचं नुकसान झालं आहे.
नियंत्रण रेषेजवळील बारामुला, कुपवाडा आणि बांदीपोरा भागात परिस्थिती तणावपूर्ण आहे. कुपवाड्यातील काही सेक्टरमध्ये गोळीबारामुळे इमारतींचे नुकसान झाले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उरी इथे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने बीबीसी उर्दूला सांगितले की, गोळीबारात नर्गीस बेगम नावाच्या महिलेचा मृत्यू झाला.
या संपूर्ण परिस्थितीत भारतीय लष्कराने जम्मू-कश्मीरमध्ये रेड अलर्ट जाहीर केला असून नागरी प्रशासनाने ब्लॅकआउटची घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात रात्री वीज नव्हती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

फोटो स्रोत, Getty Images
श्रीनगरमध्ये उपस्थित असलेले बीबीसीचे प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी माहिती दिली की, गुरुवारी (8 मे) रात्री सुमारे 11 वाजता उरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता आणि सीमेजवळील नागरी भागांना लक्ष्य करण्यात आले होते.
त्याचवेळी, जम्मू-कश्मीरच्या राजौरीमध्ये असलेल्या बीबीसीच्या पत्रकार दिव्या आर्या यांनी सांगितले की, तिथे पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
8 मे रोजी जम्मू-कश्मीरमध्ये स्फोट आणि ब्लॅकआउटच्या बातम्या आल्यानंतर काही वेळातच बीबीसीने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्याशी संवाद साधला.
या संवादात ख्वाजा आसिफ यांनी जम्मू-कश्मीरमधील कोणत्याही हल्ल्याची जबाबदारी नाकारली.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर आज (9 मे) जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मूला भेट दिली.
मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, “जम्मू शहर आणि विभागातील इतर भागांवर काल (8 मे) रात्री झालेल्या अयशस्वी पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता जम्मूकडे जात आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
जम्मू-कश्मीरमधील राजौरी इथं असलेल्या बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांनी सांगितलं की, 8 मेच्या सकाळी त्या जम्मूमध्येच होत्या आणि त्यांनी जिथे लोक सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले होते, त्या गावांचा दौरा केला.

फोटो स्रोत, Getty Images
दिव्या आर्या यांनी सांगितले की, “जम्मू शहरात अनेक स्फोटाचे आवाज ऐकायला आले, त्यानंतर संपूर्ण परिसराची वीज बंद करण्यात आली. आणि फक्त व्हॉट्सअॅप कॉल सेवा सुरु होती. स्थानिक रहिवाशांनी काही व्हिडिओही पाठवले ज्यामध्ये अंधारात आकाशात लहान लहान प्रकाश ठिपके दिसत होते, जे ड्रोन असल्याचा अंदाज रहिवाशांनी लावला होता.

फोटो स्रोत, Getty Images
भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावानंतर पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातील 24 विमानतळांवरील नागरी सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (बीसीसएएस) ने सर्व एअरलाईन्स आणि विमानतळांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC