Source :- ZEE NEWS
Death During Work: चीनमधील एका न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा जगभरामध्ये चर्चा आहे. येथील एका व्यक्तीचा कामाच्या तासादरम्यान प्रेयसीबरोबर सेक्स करताना मृत्यू झाला असता हा मृत्यू ‘इंडस्ट्रीअल अपघात’ असल्याचा निर्णय दिला आहे. प्रेयसीसोबत लैंगिक संबंध ठेवत असतानाच ड्युटी अवर्समध्ये मृत्यू झाल्याने या व्यक्तीच्या नातेवाईकांना कंपनीकडून नुकसानभरपाई घेण्याचा अधिकार असल्याचं न्यायालाने स्पष्ट केलं आहे.
नेमकं घडलं काय?
मृत व्यक्तीचे नाव झांग असं असून तो 60 वर्षांचा होता, असं ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. झांग हा बीजिंगमधील एका छोट्या कारखान्यात सुरक्षा रक्षक होता. झांग हा आठवड्याचे सातही दिवस 24 तास काम करत होता आणि त्याला सुट्टीही दिली जात नव्हती. विशेष म्हणजे सुरक्षेची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. कामाच्या या परिस्थितीमुळे, मृत व्यक्ती स्वतः वयस्कर असल्यानेही नोकरी सोडू शकत नव्हता. त्याला मोकळा वेळच मिळायचा नाही. म्हणूनच तो सुरक्षा कक्षात मैत्रिणीला भेटायचा. त्यापैकी भेटीत दोघांनी लैंगिक संबंध ठेवले आणि त्याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
मुलाने दाखल केला भरपाईसाठीचा खटला
पोलिस तपासात झांगचा मृत्यू नैसर्गिक असून त्याच्यासोबत कोणताही घातपात झालेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. वडीलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाने झांगचा मुलगा झांग शिओशीने म्युनिसिपल सोशल सिक्युरिटी ब्युरोच्या कायदेशीर विभागामार्फत औद्योगिक अपघाताअंतर्गत वडिलांच्या मृत्यूच्या मोबदल्यात भरपाई मिळावी यासाठी दावा केला. वडिलांचा मृत्यू कामाच्या वेळेत आणि त्याच्या नियुक्त केलेल्या कामाच्या ठिकाणी झाला असल्याने आम्ही नुकसानभरपाईसाठी पात्र आहोत, असा युक्तिवाद झांग यांच्या मुलाने केला होता. हा मृत्यू खाजगी प्रकरणादरम्यान झाला होता म्हणून तो कामाशी संबंधित नव्हता असं म्हणत सुरुवातीला अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळेच 2016 मध्ये, झांग शिओशीने कारखाना आणि सामाजिक सुरक्षा प्राधिकरणाविरुद्ध खटला दाखल केला. माझे वडील नेहमीच कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असायचे. त्यामुळे त्यांनी केलेले कोणतेही कृत्य जरी ते स्वतःसाठी असले तरी ते करणं अपरिहार्य होतं असं झांग शिओशीने सांगितलं. म्हणजेच माझे वडील 24 तास नोकरीवर असल्याने खासगी प्रकरणादरम्यान झालेला मृत्यू म्हणून त्यांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं मुलाने केलेल्या दाव्यात नमूद केलं.
न्यायालयाने निकालात काय म्हटलं?
न्यायालयाने अखेर अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर या प्रकरणात झांग शिओशीच्या बाजूने निकाल दिला. झांग सिनियर यांचे कामाच्या ठिकाणी कामाच्या वेळेत निधन झाले होते आणि त्यांच्यावर सर्व सुरक्षा आणि काम अवलंबून असल्याने ते नोकरी सोडू शकत नव्हते, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळेच हा मृत्यू कामाशी संबंधित होता, असं न्यायालयाने म्हटलं. या निकालाविरुद्ध कारखाना आणि सामाजिक सुरक्षा ब्युरोनेही आक्षेप घेत विरोध दर्शवणारा अर्ज केला. मात्र उच्च न्यायालयाने हा निकाल कायम ठेवला. फेब्रुवारी 2017 मध्ये, सामाजिक सुरक्षा ब्युरोने अधिकृत कागदपत्रात झांग यांच्या मृत्यूचे ‘औद्योगिक अपघात’ म्हणून वर्गीकरण केल्याची माहिती दिली. परंतु कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेली रक्कम यावेळेस उघड करण्यात आली नाही.
निकालात हे दोन घटक महत्त्वाचे ठरले
खूप जुन्या प्रकरणामध्ये आता पुन्हा एकदा चिनी माध्यमांने विशेष लक्ष का दिले आहे याबद्दलचं कोणतंही ठोस कारण सध्या उपलब्ध नाही. चोंगकिंग येथील वकील चेन रुई यांनी या निकालाचं विश्लेषण करताना न्यायालयाच्या निर्णयात दोन प्रमुख घटक कोणते हे सांगितलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे झांग यांचे कामाचे वेळापत्रक हे 24 तासांचं होतं. याच कालावधीमध्ये त्यांना वैयक्तिक कामं करावी लागायची. ज्यामध्ये प्रेयसीला भेटणे, जेवण करणे, जेवण खाणे किंवा शौचालय वापरण्यासारख्या गोष्टींचा समावेश होता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, मृत्यू झाला तेव्हा झांग हे कंपनीच्या नियमाप्रमाणे कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नव्हते. ते त्यांच्या जोडीदारासोबत असल्याने त्यांचे वर्तन सामाजिक नियमांच्या विरुद्ध मानले गेले नाही.
मर्यादा निश्चित करणं आवश्यक
सध्या हा असामान्य खटला आणि निकाल चिनी सोशल मीडियाबरोबरच जगभरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. कामगार हक्क, कामाच्या परिस्थिती आणि वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक कर्तव्यांमधील विभाजन करणाऱ्या मर्यांदावर या खटल्यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.
SOURCE : ZEE NEWS