Source :- BBC INDIA NEWS

नीरज चोप्राचं लग्न अत्यंत साधेपणाने करण्यात आलं.

फोटो स्रोत, X/@NEERAJ_CHOPRA1

भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा विवाहबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून नीरजने त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे. नीरज चोप्राने रविवारी (19 जानेवारी) पोस्ट करून त्याने टेनिस खेळाडू हिमानीसोबत लग्न केल्याची घोषणा केली आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला अ‍ॅथलेटिक्सचं पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने त्यानंतर झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकस्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिलं होतं.

नीरज चोप्राने लग्नाची घोषणा केल्यानंतर त्याची पत्नी हिमानी नेमकी कोण आहे? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

मागच्या वर्षी झालेल्या पॅरिस ऑलीम्पिक स्पर्धेनंतर नीरज चोप्रा हा भारतातला ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ असल्याची चर्चा सुरु झाली होती.

त्यावेळी लोकांनी वेगवेगळे फोटो पोस्ट करून नीरज चोप्राच्या संभाव्य जोडीदाराबाबत चर्चा केल्या होत्या.

हिमानी मोर आणि नीरज चोप्रा यांनी अत्यंत साधेपणाने विवाह केला आहे. नीरज चोप्राच्या विवाहाबाबत बहुतांश माध्यमं देखील अनभिज्ञ होती. यामुळेच लोकांना या विवाहाबाबत जाणून घ्यायचं होतं.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून नीरज चोप्राने लिहिलं की, “मी कुटुंबासोबत आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरु करत आहे. या क्षणापर्यंत आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल आभारी आहे.”

ग्राफिक्स
ग्राफिक्स

दोन्ही कुटुंबांचं जुनं नातं

नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर ही मूळची हरियाणातील सोनीपतची रहिवासी आहे. तिने तिचे शालेय शिक्षण तिथल्या लिटिल एंजल स्कूलमधून केलं.

सोनीपतच्या लिटिल एंजल स्कूलने बीबीसीला सांगितलं की, हिमानीने या शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. येथून ती दिल्लीतील मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये पोहोचली.

हिमानीची आई मीना मोर या सोनीपतमधील त्याच शाळेत टेनिस प्रशिक्षक आहेत.

मीना मोर यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “हिमानीचे वडील देखील एक खेळाडू होते. ते कबड्डी खेळायचे.”

हिमानीचे वडील चांद राम यांनी नंतर स्टेट बँकेत नोकरी केली. तेथून ते अलिकडेच निवृत्त झाले.

नीरज चोप्रा

फोटो स्रोत, X/@NEERAJ_CHOPRA1

मीना मोर यांनी बीबीसीला सांगितले की, नीरज आणि आमचे कुटुंब बऱ्याच काळापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये खेळाडू आहेत. आणि आम्ही बऱ्याच काळापासून एकमेकांच्या घरी जात आहोत.”

दोन्ही कुटुंबांमधील जुन्या ओळखीमुळे, हिमानी आणि नीरज देखील एकमेकांना बराच काळ ओळखत होते.

हिमानी मोर ही एक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. सध्या ती अमेरिकेत काम करत आहे, जिथे ती स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण देखील घेत आहे.

हिमानी ही बोस्टनमधील एका विद्यापीठात भरती अधिकारी (रिक्रुटमेंट ऑफिसर) देखील आहे.

अत्यंत साधेपणाने विवाह का केला?

मीना मोर म्हणाल्या, “हिमानी लहानपणापासूनच टेनिस खेळत आहे, ती भारताकडून अंडर-14 प्रकारात खेळली आहे. याशिवाय, ती अंडर-16 प्रकारातही खेळली आहे. शाळा सोडल्यानंतर हिमानीने दिल्लीतील मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, जिथे तिने बीए प्रोग्रामचा अभ्यास केला.”

नीरज आणि हिमानी लग्नानंतर लगेचच अमेरिकेला निघून गेले. येत्या काही महिन्यांत नीरजला अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे.

नीरज चोप्रा

फोटो स्रोत, X/@NEERAJ_CHOPRA1

मीना मोर म्हणाल्या, “नीरज आणि हिमानी दोघांनीही लग्नासाठी मोठा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला. खरंतर नीरजला वाटलं की, एखादा मोठा कार्यक्रम त्याचे लक्ष विचलित करू शकतो, कारण त्याला भविष्यात अनेक सामने खेळायचे आहेत.”

त्यांचं असं म्हणणं आहे की, जास्त संख्येने पाहुण्यांना बोलावलं असतं तर कार्यक्रमही तेवढाच मोठा करावा लागला असता. त्यामुळे नीरजची अशी इच्छा होती की लग्नही व्हावं आणि त्याचं खेळावरचं लक्षही भटकू नये.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC