Source :- BBC INDIA NEWS
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
-
26 डिसेंबर 2024, 15:06 IST
अपडेटेड 7 तासांपूर्वी
कल्याण परिसरात 22 डिसेंबर 2024 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण घटनेप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.
विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव म्हणाले की, “23 डिसेंबर रोजी कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये बारा वर्षीय मुलीचं अपहरण करून बलात्कार आणि हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या विशाल गवळीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शेगाव येथून अटक केली. या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.”
अमरसिंह जाधव म्हणाले की, “आरोपी आणि त्यांची पत्नी यांना अटक करण्यात आली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करतात. विशाल गवळी याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. गुन्हा कसा केला? हत्यार कोणते वापरले? यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का? याचा तपास होणार आहे. तसेच मद्यपान करून हे अत्याचार केले का याचाही तपास आम्ही करणार आहोत. आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावताना कोणाची मदत घेतली? तसेच अजून कोणी सहभागी होते का? या सर्वांचा तपास करून कायदेशीर कारवाई केली जाणार.”
अमरसिंह जाधव म्हणाले की, “हा आरोपी मनोरुग्ण आहे का यांचा देखील तपास केला जाणार आहे. तसेच आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने सर्व तपास केला जाईल.”
कल्याणमधील घटना नक्की काय आहे?
22 डिसेंबर 2024 ला सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका येथे, पीडित मुलगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली.
पण सायंकाळी उशिरा झाला तरी ती मुलगी घरी आली नाही, त्यानंतर मुलीच्या आईने शोधायला सुरु केली. मात्र, शोधाशोध करूनही मुलगी सापडत नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलेने आपल्या पतीला मुलगी सापडत नसल्याचं सांगितलं.
यानंतर मुलीचे वडील घरी आले, दोघांनीही मुलीला शोधलं. पण मुलगी कुठेच सापडली नाही. यानंतर दाम्पत्यानं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचं सांगितलं.
मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्यावरील निर्जनस्थळी एका झुडपामध्ये मुलीचा मृतदेह आढळला.
त्यामुळे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना बोलावण्यात आलं वडिलांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं.
मृतदेह सापडल्याचं ठिकाण मुलीच्या घरापासून 13 किलोमीटर दूर आहे.
मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची माहिती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समोर आलीय.
या प्रकरणी दोन जणांनी आपल्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करण्यासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत लोकांची चौकशी सुरू केली होती.
त्यात विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीवर पोलिसांना संशय आला आणि त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या.
आरोपीचे तीन विवाह; तिसरी पत्नीदेखील या घटनेत सहभागी
कल्याण पोलिसांनी विशाल गवळीच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यात विशाल गवळीच्या पत्नीने माहिती दिली.
मुलीवर अत्याचार करून विशालने मुलीची हत्या केली. सोमवारी कामावरून घरी येताच तिने रक्ताचा थारोळं पहिलं.
यानंतर पतीला जाब विचारण्याऐवजी स्वतःलाही विशाल मारून टाकेल म्हणून तिने घरातील रक्ताचे डाग पुसून काढले. तेवढ्या वेळात विशाल मित्राची रिक्षा घेऊन आला.
पती-पत्नीने रात्री 10 वाजताच्या सुमारास मृतदेह भरलेली बॅग घेऊन बापगावजवळील कब्रस्थान गाठले. या निर्जनस्थळी त्यांनी पीडित मुलीचा मृतदेह फेकला. यानंतर विशाल फरार झाला, तर ती घरी परतली अशी माहिती पोलिसांना आरोपी साक्षी गवळी हिने दिली आहे.
अधिक तपासात मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या
या घटनेनंतर विशाल शेगावला जाण्यापूर्वी पत्नीला सोडून तो एका बारमध्ये मद्यपान करण्यासाठी गेला. यानंतर तो ठाण्याला आला आणि पुढे दादरला येऊन त्याने शेगावला जाणारी गाडी पकडली.
पोलिसांच्या चौकशी दरम्यान अनेक सीसीटीव्हींमध्ये तो दिसला आहे.
पोलिसांच्या पुढील तपासादरम्यान याप्रकरणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहणीत आलेल्या रिक्षा चालकाला पोलिसांनी देखील ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.
यात विशालची पत्नीदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचं पोलिसांना चौकशीत निष्पन्न झालं. सुरुवातीला विशालची पत्नी चौकशीदरम्यान काहीही माहिती देत नव्हती.
पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत तिने विशाल शेगावला आपल्या माहेरी गेल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांचे पथक तातडीने शेगावमध्ये दाखल झाले आणि विशालला अटक केली.
याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी चौकशी करत असताना अनेक सीसीटीव्ही माध्यमातून आरोपींची ओळख पटलेली आहे. यात मुख्य आरोपी आणि त्याची पत्नी तसेच एका रिक्षावाल्याला देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे.
“अजूनही विविध पद्धतीने आमचा तपास सुरू आहे. यात आणखी कोणी आहे का? काही वेगळा अँगल आहे का? हा तपास आम्ही करत आहोत,: असे कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
ओळख मिटवण्यासाठी सलूनमध्ये दाढी करताना पकडला
दाढी राखणारा विशाल ओळख मिटवण्यासाठी, सलूनमध्ये दाढी करून बाहेर पडत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
कल्याण पूर्व भागात राहणारा विशाल हा विकृत मनोवृत्तीचा आहे. त्याने तीन लग्नं केली असून, साक्षी त्याची तिसरी पत्नी आहे.
त्याच्यावर विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे पाच गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत दोन गुन्ह्यात तडीपार आणि नुकतंच जामिनावर एका गुन्ह्याप्रकरणी बाहेर विशाल आला होता, असे आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
या घटनेप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या माहितीनुसार आणि सूचनेप्रमाणे आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे कर्मचारी शेगाव शहराच्या मार्केटमध्ये या आरोपीचा शोध घेतला. त्यावेळेला हा आरोपी दुरून दिसून आला, त्याला लगेचच न पकडता, त्यासाठी सापळा रचला.
सदर गुन्हा हा कल्याण मध्ये दाखल असून त्याला आम्ही ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास ठाणे आणि कल्याण पोलीस करतील अशी माहिती शेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.
2 जानेवारीपर्यंत दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत
22 डिसेंबरला घटना घडल्यानंतर पोलिसांनी 24 डिसेंबरला आरोपी विशाल गवळीची पत्नी आरोपी साक्षी गवळी हीला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तर आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी काल या प्रकरणी अटक केली आहे. आज कल्याण कोर्टात दोन्ही आरोपींना पोलिसांनी हजर केले असून न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.
आरोपीने अल्पवयीन मुलीचं अपहरण कुठून केलं? तिची हत्या कशी झाली? तिला कशा प्रकारे मारलं? त्याला या प्रकरणात मदत करणारे आणखी कोणी आहेत का? त्याने हत्या करण्यासाठी कोणतं साहित्य वापरलं? मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली? या सर्वांचा तपास करायचा असल्याने त्याची पोलीस कोठडी द्यावी, असी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार कोर्टाने 2 जानेवारीपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदलापूर घटनेप्रमाणे या प्रकरणी न्याय द्या
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करून या घटनेचा निषेध केला आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलं की, “राज्यातील पोलिस आणि कायदा यांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते. बदलापूर असो किंवा कल्याण, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महायुती सरकार किती गंभीर आहे, हे या घटनांमधून स्पष्ट होत आहे.
राज्यात महिला आणि लेकी निर्भयपणे फिरू शकत नाही इथे गुंड, बलात्कारी निर्धास्तपणे फिरत आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महायुती सरकारला जबाबदारी स्वीकारावी लागेल.या दोन्ही घटनांतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिस आणि न्यायव्यवस्थेने ठोस पावले उचलावीत.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
Twitter पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Twitterवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
कल्याण येथील या घटनेनंतर तीव्र संताप राज्यभर व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे एका अल्पवयीन मुलींवर शाळेत अत्याचार केल्याची घटना राज्यभर देशभर गाजली होती. याप्रकरणी काही महिन्यातच आरोपीचा एन्काऊंटर झाला होता.
बदलापूर प्रमाणेच कल्याण घटनेतील आरोपीला फाशी द्या एन्काऊंटर करा अशी मागणी करत नागरिक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बुधवारी 25 डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरले होते.
शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांनी या घटनेचा निषेध केला. कठोरात कठोर शासन या आरोपींना व्हावं, अशी मागणी यावेळी केली.
“या आरोपीला यापूर्वीपासून राजकीय बळ कोणी दिला हे सर्वांना माहीत आहे, मात्र आता त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी महेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना केली.
आरोपीला फाशी व्हावी यासाठी प्रयत्न करणार: मुख्यमंत्री
कल्याण येथील या घटनेनंतर राज्यभर याचे पडसाद उमटू लागले. सर्वत्र या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी देखील महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला.
यातच या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती माध्यमांना दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC