Source :- BBC INDIA NEWS

महिला

फोटो स्रोत, Getty Images

नागपुरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मधील महिला डॉक्टरची तब्बल 13 लाख 74 हजार रुपयांची फसवणूक झालीय.

या महिला डॉक्टर सायबर गुन्ह्याच्या शिकार बनल्या आहेत.

इंटरनेटवरील त्यांची नेमकी कोणती चूक त्यांना महागात पडली? हे आपण सविस्तर जाणून घेऊ, जेणेकरून तुम्हालाही अशी फसवणूक टाळण्यासाठी मदत होईल आणि आवश्यक काळजी घेता येईल.

फसवणूक नेमकी कशी होऊ शकते? हे समजून घेण्यासाठी सर्वात आधी नागपुरातल्या या महिला डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊ.

महिला डॉक्टरसोबत नेमकं काय घडलं?

एम्समध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर त्या नागपुरातील चिंचभवन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. त्यांना बँक खात्यातील आठ लाख रुपयांचे पोस्टात फिक्स्ड डिपॉजिट करायचे होते.

त्यांनी बँकेतून फिक्स्ड डिपॉजिट केलं. मात्र, त्यांच्या बँक खात्यातून पैसे एफडीत वळते झाले नव्हते. त्यामुळे त्या चौकशी करण्यासाठी बँकेत गेल्या. पण हे सगळं तुम्ही ऑनलाईन तपासू शकता, स्टेटस चेक करू शकता, असं त्यांना बँकेतून सांगण्यात आलं.

डॉक्टर घरी परतल्या आणि त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया करून बघितली. पण ऑनलाईन काम करण्यात अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी इंटरनेटवर कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यात एसबीआयचा टोल फ्री क्रमांक होता. पण तो क्रमांक लागत नव्हता.

त्यामुळे त्यांनी ‘जस्ट डायल’वरून एसबीआय कस्टमर केअरचा कॉन्टॅक्ट नंबर काढला. त्यांनी त्या क्रमांकावर फोन केला.

समोरून “मी एसबीआय चिंचभवन बँकेतून बोलतोय” असं सांगण्यात आलं. त्यामुळे महिला डॉक्टरलाही विश्वास बसला. त्यांनी समोरची व्यक्ती सांगेल, तशी प्रक्रिया केली.

बँकेच्या नावावर अनोळखी नंबरवरून लिंक पाठवणारे हे सायबर गुन्हेगार असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

“मी तुम्हाला एक फाईल पाठवतो. तुम्हाला ती ओपन करायची आहे,” असं त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी त्या फाईलवर क्लिक केलं आणि त्यांचा फोनचा ताबा त्या गुन्हेगाराकडे गेला. पूर्ण एक दिवस त्या गुन्हेगाराकडे त्या मोबाईलचा ताबा होता. त्यामुळे फोनवर आलेले ओटीपी, मेसेज सगळं त्या सायबर गुन्हेगारानं डिलिट केलं.

पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आणखी काही एसएमएस दिसले आणि काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चिंचभवन शाखेत धाव घेतली, तर त्यांच्या बँक खात्यातून इतके पैशांचा व्यवहार बँकेतून झाला नाही असं समोर आलं.

त्यांच्या बँक खात्यातून 10 लाख 90 हजार रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले आणि त्यांच्या एफडी खात्यावरही 2.84 लाख रुपयांचं कर्जही दाखवत होतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

बँकेलाही विचारणा केली असता आमच्याकडून असे कुठलेही फोन येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बेलतरोडी पोलिस ठाण्याला भेट देऊन तक्रार नोंदवून घेतली, अशी माहिती बेलतरोडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिली.

अशा फसवणुकीपासून स्वतःला कसं वाचवायचं?

अशी फसवणूक तुमची देखील होऊ शकते. आपल्याही बरेचदा एखादा कॉन्टॅक्ट नंबर मिळत नसेल, तर आपण इंटरनेटवर शोधतो. तिथून फोन करून आपल्याला हवी असेल ती माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी आपलीही फसवणूक होऊ शकते.

समोरची व्यक्ती सायबर गुन्हेगार असेल आणि खोटं बोलून आपल्याला कुठली फाईल पाठवतो ती ओपन करा असं सांगत असेल, तर त्या फाईलवर किंवा लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. कारण ही ‘डॉट एपीके’ फाईल असते.

यावर क्लिक केल्यानंतर आपला फोन हॅक होऊन सायबर गुन्हेगाराला त्याचा अक्सेस मिळतो. त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये येणारे ओटीपी त्याला सहज उपलब्ध होतात.

यातूनच आपलं अख्खं बँक खातं रिकामं होतं. त्यामुळे कुठल्याही फाईलवर आणि लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दहावेळा विचार करा. अनोळखी नंबरवरून अशा लिंक किंवा फाईल आल्यास त्यावर कधीही क्लिक करू नका.

अनोळखी नंबरवरून लिंक किंवा फाईल आल्यास त्यावर कधीही क्लिक करू नका.

फोटो स्रोत, Getty Images

तसेच, बँकेचा व्यवहार असेल तर बँक तुम्हाला कधीही तुमच्या व्हॉट्सअपवर लिंक पाठवून तुम्हाला त्यावर क्लिक करायला लावत नाही हे कायम लक्षात असू द्या. बँकेच्या नावावर अनोळखी नंबरवरून लिंक पाठवणारे हे सायबर गुन्हेगार असू शकतात.

आणखी कुठली खबरदारी घ्यायला हवी?

बँकेसंबंधी व्यवहार असेल तर आपल्याला वारंवार सांगितलं जातं की, लिंकवर क्लिक करू नका, ओटीपी किंवा पासवर्ड शेअर करू नका, आमिषाला बळी पडू नका. आपण ही खबरदारी घेत असलो तरी दररोज नवनवीन फंडे वापरून सायबर फसवणुकीचे प्रकार समोर येतात त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

बँकेच्या नावावर अनोळखी नंबरवरून लिंक पाठवणारे हे सायबर गुन्हेगार असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

यात पहिला महत्वाचं म्हणजे, इंटरनेटवरून एखादा कॉन्टॅक्ट नंबर घेताना त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून घ्यायला हवा. बँकेसंबंधी काम असेल तर बँकेच्या टोलफ्री क्रमांकावर फोन करता येईल.

हे टोल फ्री क्रमांक आपल्या डेबिट कार्डवर दिलेले असतात. तसेच बँकेच्या पासबुकवरही दिलेले असतात किंवा आपण त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर गेलो तरी संबंधित बँकेचा टोल फ्री क्रमांक आपल्याला मिळतो.

पण या टोल फ्री क्रमांकावरून कोणी उत्तर देत नसेल तर आपण बँकेला ईमेलद्वारे संपर्क साधू शकतो. ईमेलचं उत्तर आलं नाहीतर शेवटचा पर्याय म्हणजे थेट बँकेत जाऊन चौकशी करणे. बँकेत जाऊन आपल्याला काही शंका असतील तर त्याचं निरसन करून घ्यायला हवं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC