Source :- ZEE NEWS
Life Expectency In Rich Countries: जगातील विविध देश हे आपल्या देशाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यापैकी काही विकसित तर काही विकसनशील देश म्हणून गणले गेले आहेत. विकसित देशांच्या या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक देश हा वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती साधत असतो. अशात, जगातील श्रीमंत देश हे आपल्या देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अनेक बदल करतात. यासोबत तेथील आरोग्याशी निगडीत सुविधासुद्धा विकसित होत आहेत.
देशातील खेडोपाड्यातदेखील उद्योगधंद्यांचा विकास होत आहे. सरकार आपल्या देशातील अर्थव्यवस्था विकसित होण्यासाठी लोकांसाठी असलेल्या अनेक पॉलिसींमध्ये बदल करत असते. या सगळ्या बदलांचा परिणाम हा देशातील लोकांच्या आयुर्मानावर होत असतो. एका रिपोर्टनुसार, देशातील बदलती ट्रेड पॉलिसी आणि आर्थिक सुधार यामुळे देशातील लोकांची अधिक काळ जगण्याची इच्छा सुद्धा वाढत आहे. याच कारणामुळे सर्वाधिक अर्थव्यवस्था असणाऱ्या देशात व्यक्तींच्या आयुर्मानात म्हणजेच जगण्याच्या कालावधीत वाढ होत आहे.
एका अहवालानुसार, जगातील 29 मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये जपान पहिल्या क्रमांकावर आहे. येथील लोकांचे सरासरी वय 84.8 वर्षे आहे. या रिपोर्टमध्ये जपानची उत्तम आरोग्य सुविधा, गुन्हेगारीतील घट आणि आधुनिक जीवनशैलीमुळे तिथल्या लोकांचे आयुर्मान वाढण्यास मदत झाली आहे, असे नमूद केले गेले आहे. हाँगकाँग या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, या देशातील लोकांचे सरासरी वय 84.3 वर्षे आहे.
‘या’ देशांमध्ये सुद्धा झाली लोकांच्या आयुर्मानात वाढ
जगातील विकसित अर्थव्यवस्था असणाऱ्या सिंगापूर, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, कॅनडा, युनायटेड किंगडम, थायलंड, चीन आणि अमेरिका या देशात लोकांच्या जगण्याच्या कार्यकाळात सुधारणा झाली आहे. मोठ्या देशांबद्दल बोलायचं झाल्यास, ऑस्ट्रेलियामध्ये लोकांचे सरासरी वय 83.6 वर्षे, न्यूझीलँडमध्ये 83.8 वर्षे, चीनमध्ये 78.5 वर्षे आणि अमेरिकेत 78.2 वर्षे आहे.
भारताचे स्थान
जगातील विकसनशील आणि प्रगत अशा 29 देशांमध्ये भारताचे स्थान 26 व्या क्रमांकावर आहे. भारतातील लोकांचे सरासरी वय 67.7 वर्षे आहे. म्यानमार, पाकिस्तान आणि पापुआ न्यू गिनी या देशांचे स्थान भारतानंतर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे श्रीलंका आणि बांगलादेशमधील लोकांचे सरासरी वय भारतापेक्षा चांगले आहे. श्रीलंकेतील देशांचे सरासरी वय 76.6 वर्षे आहे तर बांगलादेशात सरासरी वय 73.7 वर्षे आहे. या व्यतिरिक्त, रशियातील लोकांचे सरासरी वय 70.1 वर्षे आहे. व्यापारविषयक धोरणे तसेच, देशाचा आर्थिक विकास साधुन देशांतील पायाभूत सुविधांमध्ये चांगले बदल घडवून आणल्याने नागरिकांच्या आयुर्मानात वाढ होऊ शकते.
SOURCE : ZEE NEWS