Source :- ZEE NEWS
अमेरिका-कॅनडा सीमेवर जानेवारी 2022 मध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीत एका गुजराती कुटुंबाने जीव गमावला होता. या कुटुंबात एक तीन वर्षांचा आणि एक 11 वर्षांचा मुलगा होता. बर्फात गोठलेल्या अवस्थेत त्यांचे मृतदेह आढळले होते. अखेर याप्रकरणी तीन वर्षांनी कोर्टाने निर्णय दिला. कोर्टाने आंतरराष्ट्रीय मानव तस्करीचा कथित म्होरक्या हर्षकुमार रमनलाल पटेलला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यासह आणखी एका तस्कराला शिक्षा सुनावण्यात आल्याचं अमेरिकेच्या न्याय विभागाने सांगितलं आहे.
29 वर्षीय हर्षकुमार रमनलाल पटेलला रसद व्यवस्था केल्याबद्दल 10 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि कटात सहभागी 50 वर्षीय स्टीव्ह अँथनी शँड याला अमेरिकेत स्थलांतरितांना नेल्याबद्दल सहा वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
दोन्ही आरोपींनी मोठ्या प्रमाणात मानवी तस्करीच्या कारवाईत भारतीय नागरिकांना बनावट विद्यार्थी व्हिसावर कॅनडामध्ये आणले आणि नंतर त्यांची अमेरिकेत तस्करी केली याची न्याय विभागाला खात्री पटली आहे. त्यामुळेच दोघांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
जानेवारी 2022 मध्ये, प्रतिकूल हवामानात, पटेल आणि शँड यांनी कॅनडामधून 11 भारतीय नागरिकांना पायी अमेरिकेत तस्करी करण्याचा प्रयत्न केला, असं डीओजेने म्हटलं आहे. यावेळी तापमान -37.8 अंश सेल्सिअस होतं. अमेरिकन बॉर्डर पेट्रोल एजंटला शँडची व्हॅन मिनेसोटा येथील बर्फात अडकलेली आढळली. शँडने त्यावेली बर्फात इतर कोणीही लोक अडकलेले नाहीत असा दावा केला होता. परंतु शेतातून आणखी पाच लोक बाहेर आले, ज्यामधील एकाचा जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.
शँड याला इतर दोन निर्वासितांसह अटक करण्यात आली होती. यावेळी भारतीय कुटुंब कुठेही दिसलं नव्हतं. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांना कॅनडातील एका दुर्गम भागात त्यांचे गोठलेले मृतदेह आढळले. “मुलाला ब्लँकेटमध्ये गुंडाळण्यात आलं होतं आणि त्याच्या वडिलांच्या गोठलेल्या हातमोज्याने त्याचा चेहरा झाकलेला होता,” असं डीओजेने म्हटलं आहे.
“मी जेव्हा जेव्हा या प्रकरणाबद्दल विचार करतो तेव्हा या कुटुंबाचा विचार मनात येतो. ज्यामध्ये दोन सुंदर लहान मुले देखील समाविष्ट आहे, ज्यांना प्रतिवादींनी हिमवादळात गोठून मरण्यासाठी सोडले होते,” असं कार्यकारी यूएस अॅटर्नी लिसा डी. किर्कपॅट्रिक म्हणाल्या.
SOURCE : ZEE NEWS