Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, ANI
51 मिनिटांपूर्वी
उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमधील केदारनाथ मंदिराचे दरवाजे 2 मे 2025 रोजी उघडण्यात आले आहेत.
हे दरवाजे उघडत असताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेदेखील उपस्थित होते. त्यांनी हा ‘राज्याचा महोत्सव’ असल्याचं घोषित करत म्हटलं की, चारधाम यात्रा सुव्यवस्थित आणि यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था राज्य सरकारने केलेल्या आहेत.
याआधी 30 एप्रिल 2025 रोजी यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिराचे दरवाजेदेखील उघडण्यात आले होते. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 4 मे रोजी उघडण्यात येणार आहेत.
या मंदिरांचे दरवाजे उघडताच चारधाम यात्रा सुरु झाली आहे. जाणून घेऊयात, चारधाम यात्रेबाबतच्या खास गोष्टी!
चारधाम यात्रा नेमकी काय आहे?
उत्तराखंड हे राज्य अनेक प्रकारच्या प्राचीन मंदिरांसाठी ओळखलं जातं. वर्षभर देशाच्या वेगवेगळ्या भागातील भाविक या राज्यातील अनेक मंदिरांना भेट देण्यासाठी येतात.
यात सर्वांत महत्त्वाची मानली जाते ती चारधाम यात्रा होय. या यात्रेसाठी भाविक दीर्घकालीन नियोजन करुन उत्तराखंडमध्ये येतात.
हे सर्व धाम उत्तराखंडमधील गढवाल प्रदेशामध्ये एका उंचीवर स्थित आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तराखंडच्या पर्यटन वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट उंचीवर असलेली ही मंदिरं हिवाळ्याच्या सुरुवातीलाच (ऑक्टोबर वा नोव्हेंबर) बंद केली जातात. त्यानंतर, जवळपास सहा महिने ही मंदिरं बंद राहिल्यानंतर पुन्हा उन्हाळ्याच्या सुरुवातीला (एप्रिल अथवा मे) या मंदिरांचे दरवाजे उघडले जातात.
चारधाम यात्रा घड्याळातील काट्याच्या दिशेने पूर्ण करावी असं मानलं जातं, म्हणून ती यमुनोत्रीपासून सुरू होते.
यानंतर, भाविक गंगोत्रीच्या दिशेने रवाना होतात आणि त्यानंतर केदारनाथचं दर्शन घेतल्यानंतर बद्रीनाथला जातात. तिथे पूजा केल्यानंतर ही यात्रा संपते.
यमुनोत्री
चारधाम यात्रा यमुनोत्रीमधून सुरु होते. यमुना नदीच्या उगमस्थानाजवळ असलेल्या या मंदिरापर्यंत पायी, घोड्यावरून किंवा पालखीच्या माध्यमातून जाता येते.

फोटो स्रोत, ANI
हे मंदिर समुद्रसपाटीपासून 3,233 मीटर उंचीवर वसलेलं आहे. हे ठिकाण उत्तरकाशी जिल्ह्यात आहे. ऋषिकेशपासून यमुनोत्रीपर्यंतचे अंतर जवळपास 210 किलोमीटर आहे.
गंगोत्री
या यात्रेतील दुसरा टप्पा म्हणजेच गंगोत्री होय. हे मंदिर देखील उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये आहे. गंगोत्री ऋषिकेशपासून जवळपास 250 किलोमीटर अंतरावर आहे.
गंगोत्री भारतातील सर्वाधिक उंचीवर वसलेल्या धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून 3,415 मीटर उंचीवर वसलेलं आहे.

फोटो स्रोत, ANI
गंगा नदीचा उगम जिथून होतो, त्याला ‘गोमुख’ असं म्हटलं जातं. हे ठिकाण गंगोत्रीपासून जवळपास 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगोत्रीच्या हिमनदीमध्ये आहे.
उगमस्थान असलेल्या ‘गोमुखा’मधून निघाल्यानंतर या नदीला ‘भागीरथी’ असं म्हटलं जातं. तसेच, जेव्हा ही नदी देवप्रयागजवळ अलकनंदा नदीला जाऊन मिळते, तेव्हा तिचं गंगेमध्ये रूपांतर होतं. म्हणजेच तिला ‘गंगा’ नदी म्हणून ओळखलं जातं.
केदारनाथ
केदारनाथ उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये वसलेलं तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून 3,584 मीटर उंचीवर हिमालयातील गढवाल प्रदेशामध्ये येतं. ऋषिकेश ते केदारनाथ हे अंतर सुमारे 227 किलोमीटर आहे.
या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 18 किलोमीटरपर्यंत ट्रेकिंग करावं लागतं.
या मंदिरापर्यंत तुम्ही पालखी किंवा खेचराच्या सहय्यानेदेखील पोहोचू शकता. किंवा, बुकिंग करून हेलीकॉप्टरनेही तिथवर पोहोचण्याची सुविधा उपलब्ध आहे.

फोटो स्रोत, Asif Ali
केदारनाथ हे तीर्थक्षेत्र हिंदूंच्या चार पवित्र अशा धामांपैकी एक मानलं जातं.
हिंदूंच्या धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं केदारनाथ हे सर्वात उंचीवर वसलेलं ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथ मंदिराजवळूनच मंदाकिनी ही नदी वाहते.
हे मंदिर जवळपास एक हजार वर्षे प्राचीन असल्याचं सांगितलं जातं. हे मंदिर चतुर्भुजाकार पायावर मोठमोठाल्या दगडांच्या पट्ट्या वापरून बांधण्यात आलेलं आहे. केदारनाथ मंदिराच्या मागे केदारनाथ शिखर तसेच हिमालयातील इतर शिखरे आहेत. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे.
केदारनाथ धाम उघडण्याच्या पहिल्याच दिवशी, 30,154 भाविकांनी इथे भेट दिली आहे.
बद्रीनाथ
चारधाम यात्रेचा सर्वांत शेवटचा टप्पा म्हणजे बद्रीनाथ धाम आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून 3,100 मीटर उंचीवर आहे.

फोटो स्रोत, ANI
हे मंदिर अलकनंदा नदीच्या काठावर गढवाल हिमालयात आहे. असं मानलं जातं की आदि शंकराचार्य यांनी ते 8 व्या शतकात या मंदिराची स्थापना केली होती. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे.
‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी
दरवर्षी लाखो भाविक चारधाम यात्रा करतात. मात्र, तुम्ही नियोजन करताना आधीच गाडी, हॉटेल आणि इतर गोष्टींचं प्लॅनिंग कराल, तर तुम्हाला या यात्रेमध्ये फारसा त्रास होणार नाही. तुम्ही विनासायास हा प्रवास करु शकाल.
या यात्रेसाठी आधीच रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनची सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून उपलब्ध आहेत.
या यात्रेच्या मार्गावर हरिद्वार, ऋषिकेश आणि इतर ठिकाणी यासाठी काउंटर उभारलेले आहेत.

फोटो स्रोत, Asif Ali
- तुमचे नोंदणी प्रमाणपत्र तुमच्यासोबत ठेवा.
- यात्रेला जाण्यापूर्वी तुमच्याकडे वैध ओळखपत्र सोबत असल्याची खात्री करा.
- जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर ते तुमच्यासोबत ठेवा.
- उबदार कपडे सोबत ठेवा.
- या यात्रेबद्दलची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला उत्तराखंड पर्यटन वेबसाईटवर मिळेल.
जर तुम्ही केदारनाथ धामची यात्रा करण्यासाठी हेलीकॉप्टर सर्व्हीसचा उपयोग करु इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसी हेलीयात्रा या ऑनलाईन माध्यमातून बुकींग करावं लागेल.
हेलीकॉप्टर तिकिट बुकिंग 7 मे पासून सुरू होईल. या प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक किलोमीटर चालावं लागू शकतं, म्हणून त्यासाठीची तयारी आधीपासूनच सुरू करा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC